भक्तीयोग

Article also available in :

बहुतेक लोक भक्तीयोगी असतात. म्हणजे देवाला भाव-भक्तीने आळवतात. प्रस्तुत लेखात भक्तीयोग म्हणजे काय, या साधनामार्गाची उत्पत्ती, भक्तीयोगाची वैशिष्ट्ये यांविषयी माहिती पाहू. भक्त बनण्यासाठी काय करावे याविषयीही लेखात थोडक्यात विवेचन करण्यात आले आहे.

 

१. भक्तीयोग

भगवंताची भक्ती करणे, म्हणजे सुख आणि भगवंताला विसरणे, म्हणजे दुःख

आध्यात्मिक उन्नतीसाठी साधना करणार्‍या जवळजवळ ९० ते ९५ टक्के व्यक्ती या भक्तीमार्गाने जाणार्‍या असतात. ‘अध्यात्म’ हे भक्तीयोगाचे सार आहे. भक्तीयोग या योगमार्गानुसार भगवंताची भक्ती करणे, म्हणजे सुख आणि भगवंताला विसरणे, म्हणजे दुःख होय. याची जाणीव या मार्गाने साधना करणार्‍या भक्ताला असल्यामुळे तो आर्ततेने सतत देवाला आळवत असतो. भक्तीयोगानुसार साधना करणार्‍याचा नामजप अखंड चालू झाला की, त्याच्याकडून होणारे कर्म हे अकर्म कर्म होते आणि त्यामुळे अशा कर्माला कर्मफळाचा न्याय न लागत असल्याने ते कर्म, कर्म करणार्‍याला बंधनात अडकवत नाही. म्हणजेच ते अकर्म कर्म होते.

संदर्भ : सनातन-निर्मित विविध ग्रंथ ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’

 

२. निर्मळ हृदयात भक्तीचा उदय होऊन जीव भक्त बनू शकणे

भगवंत अतिशय शुद्ध आणि पवित्र आहे. या निर्मळ आणि प्रेमळ भगवंताशी एकरूप होण्यासाठी भक्तालाही त्याच्याप्रमाणे निर्मळ आणि प्रेमळ बनले पाहिजे. सत्यकथनामुळे जिवाच्या मनातील दूषितपणा चटकन न्यून होतो आणि त्याचे मन निर्मळ होऊ लागते. अशा निर्मळ हृदयात भक्तीचा उदय होऊन जीव भक्त बनतो आणि परम सत्याची अनुभूती घेण्यास पात्र ठरतो. सत्यकथनाने जिवाच्या मनाचा त्याग होतो आणि त्याच्या मनोदेहाचे अल्प अवधीत शुद्धीकरण होते. – ईश्वर ( कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, ५.७.२००६, सायं. ७)

 

३. ५० टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या साधकामधील आंतरिक चैतन्यामुळे
तो कर्मकांड, उपासनाकांड आणि मानसपूजा म्हणजे खर्‍या भक्तीयोग या योगाचा अधिकारी होणे

५० टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या साधकामध्ये पूजाविधीतून प्रक्षेपित होणार्‍या शक्तीलहरी पेलवण्याची क्षमता निर्माण झाल्याने आणि त्याच्या आंतरिक चैतन्यातच हळूहळू वृद्धी होऊ लागल्याने त्याला उपासनेसाठी बाह्य गोष्टी वापरण्याची आवश्यकता उरत नाही. त्यानंतर हळूहळू तो प्रत्यक्ष कर्मकांडातून उपासनाकांडाकडे, मानसपूजेकडे प्रवास करू लागतो, म्हणजेच खर्‍या भक्तीयोग या योगाचा पुरस्कर्ता होतो.

 

४. पातळीनुसार भक्तीमार्गातील साधनेचे पुढचे पुढचे टप्पे

प.पू. डाॅ. आठवले

हल्ली बहुसंख्य व्यक्ती साधना करत नाहीत. साधना करणार्‍या बहुतेकांना साधनेत पातळीनुसार पालट होत जातो, हे ज्ञात नसते. त्यामुळे ते आयुष्यभर तीच साधना करत रहातात. कोणत्याही योगमार्गाने साधना करत असले, तरी असेच होत असल्याचे लक्षात येते. येथे भक्तीयोगाचे उदाहरण दिले आहे.

भक्तीयोगातील प्रगतीनुसार साधनेतील टप्पे

 

साधनेचा प्रकार आणि स्तर अनुभव आणि अनुभूती साधकाची आध्यात्मिक पातळी(टक्के) (टीप १) साधनेत या टप्प्याला येण्यामागील तत्त्व
१. पूजापाठ
(सर्वसाधारण व्यक्ती)
१५ – २० मिनिटांत पूजा आटोपणे आणि नंतर दिवसभर देवाला विसरणे २० कुटुंबाचे संस्कार
२. भावपूर्ण पूजापाठ (साधक) दिवसभर अधूनमधून देवाची आठवण होणे ३० भावाचे महत्त्व समजणे
३. मानसपूजा दिवसभर देवाची अधिक वेळा आठवण होणे ४० स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ हे कळणे
४. नामस्मरण नामाशी अधिकाधिक एकरूप होणे ५० अनेकातून एकात जाणे महत्त्वाचे हे कळल्याने मानसपूजेतील अनेक घटकांपासून (उदा. स्नान, गंध, अक्षता, फूल इत्यादींपासून) एका नामावर येणे
५. भावपूर्ण नामस्मरण आनंद ७० शब्दांपलिकडे असलेल्या भगवंताशी एकरूप होण्यास आरंभ होणे
६. नामाशी एकरूप होणे (मुक्ती / मोक्ष) शांती १०० भगवंताशी एकरूप होणे (अद्वैत)

 

टीप १ : सर्वसाधारण व्यक्तीची पातळी २० टक्के आणि मोक्ष म्हणजे १०० टक्के, यासंदर्भात त्या त्या स्तराची आध्यात्मिक पातळी दिली आहे.

– प.पू. डाॅ. आठवले

 

प्रधान गुण आणि भक्तीयोग यांनुसार पूरक साधना

पू. (डॉ.) वसंत बाळाजी आठवले

तमप्रधान

अशी व्यक्ती आळशी असून ती नामस्मरण करण्यास कंटाळा करते. अशा व्यक्तीला अवतारांच्या गोष्टी, गुरुचरित्र, शिवलीलामृत इत्यादी मोठ्याने वाचण्यास सांगावे. तिला समजेल अशा सोप्या गोष्टी किंवा भाग वाचण्यास सांगावे, तसेच प्रतिदिन एक सहस्र वेळा नामजप किंवा एकदा विष्णुसहस्रनाम लिहिण्यास सांगावे.

रजप्रधान

अशी व्यक्ती नामावर मन एकाग्र करू शकत नाही. तिने विष्णुसहस्रनाम, गणेशसहस्रनाम किंवा पुरुषसूक्त इत्यादी मोठ्याने वाचावे किंवा श्रीमद्भगवदगीतेतील एखादा अध्याय वाचावा.

सत्त्वप्रधान

अशा व्यक्तीची एखाद्या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्याची क्षमता असते; म्हणून तिने एखादे नाम किंवा गुरुमंत्र यांचा जप करावा. सात्त्विक व्यक्तीमध्ये कधीकधी रज-तम गुण उफाळून येतात, त्या वेळी नामस्मरण करणे कठीण जाते. अशा वेळी नाम किंवा गुरुमंत्र मोठ्याने म्हणावा किंवा विष्णुसहस्रनाम म्हणावे. सत्त्वगुण वाढल्यावर पूर्ववत नामाचा किंवा गुरुमंत्राचा जप करावा.

– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९८१)

 

भक्तांनी व्यवहारात वागतांना ठेवावयाचे विविध भाव

१. समभाव

अ. आपल्या वयोगटांतील माणसांशी भाऊ किंवा बहीण यांप्रमाणे वागावे.
आ. वयाने मोठ्या असलेल्या माणसांशी त्यांच्या मुलांप्रमाणे वागावे.
इ. लहान मुलांबरोबर लहान मुलांप्रमाणे वागावे.

२ . आत्मीयभाव

सर्वांविषयी आत्मीयभाव असावा, म्हणजे सर्वांवर स्वतःप्रमाणेच प्रेम करावे.

३ . देवताभाव

आपल्या आवडत्या देवतेला सर्वांच्यात पहावे आणि सर्वांशी आदराने वागावे.

४ . ईश्‍वरी भाव

भक्ताला सर्व प्राणिमात्रात आणि वस्तूतही ईश्‍वराची अनुभूती होते. त्यामुळे तो त्या तर्‍हेने वागतो.

– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९०)

Leave a Comment