अल्प आध्यात्मिक पातळी असतांना ज्ञानमार्गाच्या तुलनेत भक्तीमार्गाने साधना केल्यास लवकर आध्यात्मिक प्रगती होण्यामागील शास्त्र

श्री. राम होनप

संकलक : प्रत्येक साधनामार्ग हा भगवंतानेच निर्माण केला आहे, तरीपण ‘भक्तीयोग्यांच्या तुलनेत ज्ञानयोग्यांमध्ये अहं अधिक असतो’, असे म्हटले जाते. भक्तीमार्गातही अहं निर्माण होऊ शकतो. त्यामुळे दोष साधनामार्गाचा नसून व्यक्तीचा आहे.

उत्तर

१. साधकाची प्रगती ही योग्य साधनामार्ग आणि त्यासाठी
आवश्यक आध्यात्मिक पातळी, या घटकांवर अवलंबून असणे

‘कुठल्याही साधनामार्गात दोष नसून प्रत्येक मार्ग हा परिपूर्णच आहे. संबंधित मार्गाने जाणार्या व्यक्तीची प्रगती होणे, हे योग्य साधनामार्ग आणि त्यासाठी आवश्यक आध्यात्मिक पातळी, या घटकांवर अवलंबून असते.

२. विशिष्ट साधनामार्गानुसार साधना करण्यासाठी आवश्यक आध्यात्मिक पातळी

२ अ. ज्ञानयोगाची मर्यादा आणि भक्तीयोग किंवा गुरुकृपायोग या साधनामार्गांतील सुलभता

कलियुगात अल्प आध्यात्मिक पातळी असतांना ज्ञानयोगानुसार साधना केल्यास संबंधितांची आध्यात्मिक प्रगती होण्यास बराच वेळ लागतो; कारण हा मार्ग त्यांना पेलवत नाही. त्यामुळे संबंधित ज्ञानयोग्यांच्या ज्ञानात रूक्षपणा येऊन त्यांना ज्ञानाचा अहं होण्याची शक्यता अधिक असते; पण याच व्यक्ती भक्तीयोग अथवा गुरुकृपायोग या साधनामार्गानुसार साधना करू लागल्या, तर त्यांच्यात हळूहळू भाव निर्माण होऊन त्यांचा परमेश्वरप्राप्तीचा मार्ग सुलभ होतो.

३. ज्ञानयोग, भक्तीयोग आणि गुरुकृपायोग या
साधनामार्गांनी आध्यात्मिक प्रगती होण्याचे सरासरी प्रमाण

४. भक्तीयोग्याला भावामुळे भगवंताला
अनुभवणे ज्ञानयोग्याच्या तुलनेत लवकर साध्य होणे

ज्ञानयोग्याला ज्ञानाच्या माध्यमातून ईश्वराशी अनुसंधान ठेवणे भक्तीयोग्यांच्या तुलनेत कठीण असते; कारण ज्ञानातून भगवंताचा गोडवा अथवा अनुभव करण्यास उच्च आध्यात्मिक पातळीची आवश्यकता असते. हीच अवस्था भक्तीयोग्याला भावामुळे लवकर साध्य होते.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.१०.२०१६)

 ५. ज्ञानयोग्यांच्या तुलनेत भक्तीयोग्यांना देवाने
साधनेच्या आरंभापासून साहाय्य करण्यामागील शास्त्र

डॉ. आठवले : ज्ञानयोग्यांना बरीच प्रगती झाल्याविना देव साहाय्य करत नाही; पण भक्तीयोग्यांना देव आरंभापासून साहाय्य करतो. असे आहे का ?

उत्तर : हो.

५ अ. साधनेने परमेश्वराशी एकरूप होण्यातील टप्पे

अ. ‘जाणणे
आ. अनुभवणे
इ. एकरूप होणे

५ आ. ज्ञानयोग्याने ज्ञानाच्या माध्यमातून परमेश्वराला दीर्घकाळ जाणण्याचा
प्रयत्न करणे आणि भक्तीयोग्याने भावाच्या माध्यमातून परमेश्वराला जलद अनुभवणे

ज्ञानयोगी परमेश्वराला साधनेच्या आरंभापासून ज्ञानाच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करतात, तर भक्तीयोगी परमेश्वराविषयी आवश्यक ते ज्ञान झाल्यावर लगेचच भावाचा आधार घेतात. भक्तीयोगी भावाच्या माध्यमातून हळूहळू प्रत्यक्ष परमेश्वराचा अनुभव घेतात. अशा वेळी परमेश्वर भक्ताच्या भावामुळे त्याच्यासाठी जे काही करणे आवश्यक आहे, ते करू लागतो.

५ इ. ज्ञानयोग्यात दीर्घकाळ भावाचा ओलावा निर्माण न
झाल्याने तो परमेश्वराच्या अनुभवाविना कोरडाच रहाणे

ज्ञानमार्गात परमेश्वराला दीर्घकाळ जाणण्याची प्रक्रिया चालू असते. परमेश्वर अनंत असल्याने त्याला जाणण्यात बराच काळ जातो; परंतु या प्रक्रियेत संबंधित ज्ञानयोग्यांमध्ये भावाचा ओलावा निर्माण न झाल्यामुळे ते भगवंताच्या अनुभवाविना कोरडेच रहातात. वर्षानुवर्षे गेल्यावर ज्ञानयोग्याला ज्ञानातून भगवंताचा अनुभव होऊ लागतो, तेव्हा त्याला देवाचे साहाय्य मिळते.

५ ई. भक्तीयोग्याने परमेश्वराला सतत आळवून स्वतःतील
अहंचा लय करत जाणे आणि त्यामुळे भगवंताची कृपा
भक्तीयोग्यावर अन्य साधनामार्गियांच्या तुलनेत लवकर होणे

भगवंताला जितके अनुभवण्याची क्रिया संबंधित साधकाकडून होते, त्यानुसार अनुभूती घेत घेत तो भगवंताच्या समीप जातो. भक्तीयोगी परमेश्वराला सतत आळवून, शरण जाऊन किंवा कृतज्ञ राहून आपल्यातील अहंचा लय करत जातात. यातून अन्य साधनामार्गांच्या तुलनेत भगवंताची कृपा संबंधित भक्तीयोग्यावर लवकर होते. ज्ञानामार्गाने साधना करतांना संबंधित योग्याचे चित्त भावमय होण्यास विलंब लागतो. त्यामुळे ज्ञानयोग्यांना अहं न्यून होण्यास भक्तीमार्गियांच्या तुलनेत वेळ लागतो.

५ उ. भक्तीयोग्यांना परमेश्वोराशी लवकर एकरूप होता येणे

भक्तीयोगी भगवंताला सतत अनुभवत असल्याने भगवंताचे गुण भक्तीयोग्याला ज्ञानयोग्याच्या तुलनेत लवकर आत्मसात होतात. त्यामुळे भक्तीयोग्यांची तुलनेने जलद प्रगती होऊन त्यांना परमेश्वराशी लवकर एकरूप होता येते.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment