आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी भगवंताने घेतलेली परीक्षा

अ. संत तुकाराम महाराज

संत तुकाराम महाराज दुसर्‍याचे शेत राखण्यासाठी गेले असतांना भगवंताच्या भजनात रंगून जात. भगवंत संत तुकाराम महाराज यांची परीक्षा घेण्यासाठी शेतातील धान्याची रास गाढवांना खाऊ देतो. शेताचा मालक हे पहातो, तेव्हा त्याला राग येतो आणि तो रागाच्या भरात संत तुकाराम यांना दूषणे देऊन धान्य भरून देण्यास सांगतो. संत तुकाराम महाराज धान्य भरपाई देण्यास असमर्थता दर्शवतात. तेव्हा शेताचा मालक त्यांची गाढवावरून धिंड काढतो. त्या वेळी संत तुकाराम महाराज भगवंताला म्हणतात, माझ्यावर किती रे तुझी कृपा आहे. माझी आज तू मिरवणूक काढत आहेस. त्यांना गाढव म्हणजे भगवंताचे चैतन्यच असल्याचे जाणवत होते. त्यामुळे ते भावावस्थेत रमून भजन म्हणत होते. पुढे शेताचा मालक शेतात जाऊन पहातो. तेव्हा धान्याची रास नेहमीपेक्षा अधिक स्वरूपात असलेली त्याला दिसते. हे पाहिल्यावर तो संत तुकाराम महाराजांची क्षमा मागून त्यांच्या पाया पडतो आणि त्याच्याकडील अतिरिक्त धान्याची रास तो संत तुकारामांच्या घरी पोहोचवतो. ही धान्याची रास पाहून संत तुकारामांकडे एक भिकारी धान्य मागतो. तेव्हा ते त्यांना मिळालेल्या धान्यातील काही धान्य देतात. हे पाहून आजूबाजूच्या गावातील सर्व भिकारी त्यांच्याकडे धान्य मागण्यास येतात. तेव्हा तुकाराम महाराज सर्वच धान्य त्यांना नेऊ देतात. परिणामी संत तुकारामांच्या घरी एकही दाणा शिल्लक रहात नाही. तेव्हा ते म्हणतात, देवा, किती रे दयाळू आहेस. माझ्याकडून हे फुकाचे पुण्य घडवून आणलेस. कोणतीही वाईट परिस्थिती आली किंवा घटना घडली, तरी न घाबरता, सतत भगवंताच्या अनुसंधानात राहून तिचा स्वीकार केल्यास आत्मबळ मिळून त्या परिस्थितीला सहज सामोरे जाता येते.

 

आ. संत एकनाथ महाराज

एक मनुष्य त्याच्या हातून अनेक चुका झाल्याने अस्वस्थ होऊन संत एकनाथ महाराज यांच्याकडे येतो. तेव्हा ते त्याला म्हणतात, अरे, तू तर ७ दिवसांत मरणार आहेस. तुझे जे काही निपटवायचे असेल किंवा काही उणेदुणे राहिले असेल, देणेघेणे राहिले असेल किंवा कुणाशी वैरभाव असेल, तर त्याची क्षमा मागून सारे पूर्ण करून माझ्याकडे ये. त्या मनुष्याला सत्य कळून चुकल्यावर त्याने मरणाच्या पूर्वी आपल्या हातून ज्या गोष्टींची पूर्तता करणे शिल्लक असते, त्या पूर्ण केल्या आणि ७ दिवसांनी निर्मळ मनाने संत एकनाथ महाराजांकडे आला आणि म्हणाला, मी अजून जिवंतच आहे. तेव्हा एकनाथ महाराज म्हणतात, अरे, तुझ्यात जे दोष होते, ते जाण्यासाठी मी हा प्रयोग केला. आता तू जाऊ शकतोस. तेव्हा तो मनुष्य परत न जाता त्यांना गुरु मानून त्यांची सेवा करत पुढील आयुष्य व्यतीत करतो. मायेच्या अनुसंधानात राहिल्याने मनुष्य सत्य परिस्थिती विसरतो आणि मायेशी बद्ध राहून दुःखी होतो. यासाठी मायेशी बद्ध न रहाता, मायेतील कर्म करत ईश्‍वराचे अनुसंधान ठेवून साधना केल्यास आयुष्य सार्थकी लागते.

 

इ. ब्रह्मर्षि नारद

एकदा नारदमुनी फिरत एका चिंचेच्या झाडाखाली येतात. तिथे एक जण ईश्‍वरप्राप्तीसाठी ध्यान करत होता. त्याला ते विचारतात, अरे, काय करतोस ? तेव्हा तो म्हणतो, मी ईश्‍वरप्राप्तीसाठी ध्यान करतो. तेव्हा ते त्याला म्हणतात, या चिंचेच्या झाडाला जेवढी पाने आहेत, तेवढी वर्षे तुला ईश्‍वरप्राप्तीसाठी लागतील. नारदमुनींवर विश्‍वास असल्याने तो मनुष्य विचार करतो, इतकी वर्षे येथे थांबून काय करायचे ? आणि तो तिथून निघून जातो.

नारदमुनी पुढे गेल्यावर त्यांना चिंचेच्या झाडाखाली ईश्‍वरप्राप्तीसाठी ध्यानाला बसलेला आणखी एक मनुष्य दिसतो. त्यालाही ते तसेच सांगतात. तेव्हा त्याला आपल्याला ईश्‍वरप्राप्ती किती का वर्षांनी होईना; परंतु होणार आहे ना ! या विचारानेच त्याला इतका आनंद होतो की, तो त्या आनंदात नाचू लागतो. परिणामी त्याला ईश्‍वरदर्शन घडते. भगवत्प्राप्तीसाठी केवळ अतूट श्रद्धेची आवश्यकता आहे. गुरूंवरील श्रद्धेने जीवनाची मार्गक्रमणा करत साधनारत राहिल्यास मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment