पुरोगाम्यांची भोंदूगिरी !

हिंदूूंचे सण म्हणजे अंधश्रद्धा; मात्र अन्य धर्मियांची
अंधश्रद्धा म्हणजे धार्मिकता समजणे, हीच पुरोगाम्यांची भोंदूगिरी !

हिंदु धर्मातील रुढी, परंपरा यांवर टीका करण्यासाठी टपून बसलेले पुरा(अधो)गामी स्वतःला मानवतावादी म्हणत सर्व धर्मांतील अंधश्रद्धा वाईटच असतात, असे सांगतात; मात्र ते किती पोकळ आहे, हे नाताळच्या निमित्ताने पहायला मिळाले. त्याचे कारण म्हणजे रात्रीच्या वेळी लहान मुलांसाठी त्यांच्या झोळीमध्ये भेटवस्तू टाकणार्‍या (?) सांताक्लॉज या कपोलकल्पित व्यक्तीरेखाविषयी पुरोगाम्यांनी बाळगलेली आळीमिळी गुपचिळी !

येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर साधारण २८० वर्षांनंतर संत निकोलस यांचा जन्म झाला. निकोलस यांना गोरगरिबांना साहाय्य करण्याची आवड होती, असे सांगितले जाते. निकोलस यांच्या असलेल्या सिंटर क्लास या डच या नावावरून सांताक्लॉज हे नाव पडले असल्याचे सांगितले जाते. सांताक्लॉज म्हणे उत्तर ध्रुवावर रहात असून रेनडियर्सच्या गाडीवर विराजमान होऊन ते लहान मुलांसाठी भेटवस्तू ठेवतात !

खरेतर लाल-पांढर्‍या पोशाखातील सांताक्लॉज २४ डिसेंबरच्या रात्री लहान मुलांसाठी भेटवस्तू देणार असल्याचे सांगणे आणि स्वतःच लहान मुलांच्या गादीपाशी अथवा त्यांनी ठेवलेल्या पिशवीमध्ये भेटवस्तू ठेवणे, हीच अनेक सुशिक्षित (?) आणि उच्चभूू्र पालकांची अंधश्रद्धा आहे. कोणी तरी सांता येऊन गाणी गात मुलांना भेटवस्तू देऊन जातो, हे कुणाही व्यक्तीने प्रत्यक्ष पाहिलेले नाही कि वैज्ञानिक पातळीवर कुठेही सिद्ध झालेले नाही, असे असतांनाही या सांताक्लॉजविषयी कुणाही विज्ञानवाद्यांनी आतापर्यंत आवाज उठवलेला नाही. उत्तर ध्रुवावर सांताक्लॉज कुठे रहातो, त्याचा पत्ता सांगा, असे आवाहन केले नाही कि सांताक्लॉज दाखवा आणि २५ लक्ष रुपये मिळवा, असे आव्हान देण्याचा विवेक दाखवला नाही. यावरूनच पुरोगाम्यांचा ढोंगीपणा उघड होतो.

हिंदु धर्मातील सणांच्या वेळी वैज्ञानिक कसोट्या आठवणार्‍या मंडळींची बुद्धी सांताक्लॉज, देवदूत, रेनडियर्सची गाडी अशा वेळी कुठे गहाण पडलेली असते ते कळत नाही. खरेतर हिंदु धर्मातील प्रत्येक कृती शास्त्रशुद्धच आहे. धर्म आणि अध्यात्म यांमधील सिद्धांतांसाठी वैज्ञानिकतेची मोजपट्टी वापरणे, हीच भोंदूगिरी आहे; मात्र पुरोगाम्यांनी केलेल्या वैचारिक प्रदूषणामुळे अन्य धर्मियांच्या अंधश्रद्धा या धार्मिकतेचा आणि सणाचा एक भाग, तर हिंदूंच्या धार्मिक कृती या अंधश्रद्धा असा पगडा समाजमनावर निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी पुरोगाम्यांच्या भोंदूगिरीला बळी न पडता सर्वत्र डोळसपणे पहाण्याची आवश्यकता आहे.

– प्रा. (कु.) शलाका सहस्रबुद्धे, पुणे

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’