नामजप, देवता आदींसंबंधातील काही टीका आणि त्यांचे खंडण

Article also available in :

अभ्यास आणि स्वानुभव नसतांना पु.ल. देशपांडे यांनी
केलेली नामजपाविषयीची (नामस्मरणासंबंधीची) बेताल वक्तव्ये !

विख्यात साहित्यिक ‘महाराष्ट्र भूषण’ पु.ल. देशपांडे यांनी `नामस्मरणाचा रोग’ हा लेख (संदर्भ : दैनिक ‘सामना’ [मुंबई आवृत्ती, रविवार २५.११.१९९०]) लिहिला आहे. या लेखातून त्यांनी; नामजपासंबंधी काही विषारी फुत्कार सोडले आहेत. पु.ल. देशपांडे यांचे म्हणणे ‘टीका’ या उपमथळ्याखाली दिले आहे.

 

१ अ. मनोभावे नामजप केल्यास आचारांत
दोष रहात नाहीत, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट असणे !

टीका :

नामस्मरणवाल्यांना त्यांचे उच्चार आणि आचार यांतला भेदभाव दाखवणारी उदाहरणे देऊन जाब विचारण्याचे काम फुल्यांचा वारसा मानणार्‍या आजच्या पिढीने केले पाहिजे.

 

खंडण :

उच्चार आणि आचार यांत भेद असला, तरी नामजप करणार्‍यांतला हा भेद कधीतरी चित्तशुद्धी झाल्यावर नाहीसा होतो; मात्र नामजप नाकारणार्‍यांमधला असा भेद कधीही नाहीसा होणार नाही.

त्यांना शिकवण्याचे काम फुल्यांचा वारसा मानणारे नाही, तर नामजप करणारेच करू शकतात.

 

१ आ. (म्हणे) ‘नामजप हा दुबळे करणारा रोग आहे !’

टीका

शतकानुशतके आपल्या देशाला कर्मप्रणवतेपेक्षा ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे ।’ असे म्हणत दुबळे करणारा हा नामस्मरणाचा रोग याही पिढीला जडायला लागला आहे’, असेच म्हणावे लागेल.

 

खंडण

संत तुकाराम महाराजांनी ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे ।’ असे जे म्हटले आहे, ते दुबळेपणाने नव्हे, तर ईश्वरावर पूर्ण श्रद्धा असल्याने म्हटले आहे. ‘ईश्वर आपले कधीही वाईट चिंतत नाही, जे होते ते आपल्या भल्यासाठी आणि कर्मप्रारब्धानुसार’, हे त्यातील गमक आहे. याउलट ज्याची ईश्वरावर नव्हे, तर स्वकर्तृत्वावर अहंपोटी श्रद्धा असते, त्यांना ते अयोग्यच वाटेल.

नामजप हा रोग नसून रोगांचे निवारण करणारे आहे. सध्याच्या पिढीला नामजपाची सवय न लागल्यानेच व्यसनाधीनता, अनैतिकता, भ्रष्टाचार इत्यादी रोग जडले आहेत. त्यांवर नामजप हाच नामी उपाय आहे.

शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’ हा अध्यात्मातील नियम आहे. त्यामुळे देवाचा नामजप केला की, वरील नियमानुसार त्याचे तत्त्व, म्हणजे चैतन्य मिळते. त्यामुळे दुबळ्याला बळ प्राप्त होते. याचा प्रयोग करायचा असेल, तर ‘गुंड’ आणि ‘संत’ या दोन शब्दांचा जप प्रत्येकी दोन मिनिटे करा आणि स्वतःला काय वाटते, ते अनुभवा.

 

१ इ. म्हणे, नामजप करणार्‍याला
हवी तेवढी पापे करायची मोकळीक असते !’

टीका

नामस्मरणाच्या सोप्या साधनाने जन्मजन्मांतरीच्या पापांच्या राशी भस्म होऊन जातात, हे एकदा भाबड्या जनसमुदायाच्या मनावर बिंबले किंवा बिंबवत राहिले की, त्याने या जन्मी हवी तेवढी पापे करावी.

 

खंडण

या जन्मी हवी तेवढी पापे करावीत’, असे हिंदु धर्माने सांगितलेले नाही किंबहुना ‘पापे करूच नयेत’, असे हिंदु धर्माचे सांगणे आहे. यामुळे पु.ल. देशपांडे यांनी असे म्हणणे, म्हणजे ‘पोटदुखीवर औषधे उपलब्ध आहेत; म्हणून माणसे वाटेल, ते खायला मोकळी असतात’, असे म्हणण्याएवढे हास्यास्पद आहे ! वास्तविक नामजप करणार्‍यांची वृत्ती पापाकडे न वळता त्यांच्या पदरी इतके पुण्य पडते की, त्याची गणती होऊच शकत नाही; म्हणूनच म्हणतात, ‘हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ।।’ (हरीपाठ)

 

१ ई. नामजप करून व्याधी दूर झाल्याच्या सहस्त्रो
अनुभूती असतांना पु.ल. देशपांडे यांनी त्या अमान्य करणे

टीका

कागदावर लाख वेळा ; श्रीराम जयराम’ लिहा, म्हणजे सर्व आधीव्याधी नष्ट होतील’, हे सांगणारे महापुरुष आणि ते ऐकणारे महाभाग निर्माण होतात.

 

खंडण

कोणत्याही व्याधीमागे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशी तीन प्रकारची कारणे असू शकतात, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. ‘या संघटनेपेक्षा मी अधिक विज्ञाननिष्ठ आहे’, असे कोणताही विद्वान म्हणणार नाही. व्याधीच्या वरील तीन कारणांपैकी आध्यात्मिक कारणांनी होणार्‍या व्याधी जर श्रीरामाचा नामजप लिहून दूर होणार असतील, तर पु.ल. देशपांडे यांनी त्यावर आक्षेप घेण्याचे कारण काय ?’

 

संदर्भ : साप्ताहिक ‘सनातन चिंतन’, अंक ७, जून २००७, प्रकाशक – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी समस्त वाङ्मय प्रकाशन

Leave a Comment