अध्यात्मविषयक अपसमज (भाग १)

गेल्या १०० वर्षांच्या काळात तथाकथित आंग्लाळलेले समाजसुधारक, विज्ञाननिष्ठ म्हणवणारी मंडळी, श्रद्धा म्हणजे काय, हे ठाऊक नसतांना अंधश्रद्धेच्या नावाने डांगोरा पिटणारे, तसेच निधर्मी म्हणवणार्‍या राज्यकर्त्यांनी समाजाला धर्मशिक्षण न दिल्यामुळे अध्यात्म, साधना यांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर गैरसमजुती पसरलेल्या आहेत. त्याचा लाभ भोंदू लोकांनाही झाला. परिणामी ते गैरसमज अधिकच दृढ झाले. अशा या गैरसमजुतींविषयी विवेचन येथे देत आहोत.

 

अध्यात्माविषयी समज असण्यापेक्षा बर्‍याच व्यक्तींच्या, विशेषतः युवावर्गाच्या, मनात अपसमजच जास्त असतात. हे अपसमज कोणते, म्हणजेच ‘अध्यात्म म्हणजे काय नाही’, हे आपण आता समजून घेऊ.

 

जिज्ञासूंचे हे गैरसमज दूर होऊन त्यांनी योग्य त्या मार्गाने साधना करावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना !

 

१. भीती

देव, साधू किंवा संत हे जर काही कारणामुळे आपल्यावर रागावले, तर आपल्याला त्रास होईल, असे समाजातील ३० टक्के व्यक्तींना वाटते. एखादा देव किंवा संत यांच्या नावे आलेल्या पत्रात लिहिल्याप्रमाणे ‘त्या पत्राच्या २५-५० इत्यादी प्रती करून त्या इतरांना न पाठवल्यास आपली जास्त हानी होईल’, या भीतीपोटी काही जण तशी पत्रे पाठवतात. ‘एखाद्या साधूवेशातील व्यक्तीला दुखवल्यास ती आपले वाईट चिंतेल, आपल्याला शाप देईल’, अशा भीतीपोटी काही जण तिला भीक घालतात. अशा तर्‍हेची भीती बाळगण्याचे काहीएक कारण नाही.

‘आपण काही चुकीचे केले, तर आपल्या हातून पाप होईल आणि देव आपल्याला पापासाठी शिक्षा करील’, या विचाराने समाजातील ३० टक्के व्यक्ती चूक करण्याचे टाळतात़ हा अशा विचारसरणीचा झालेला अप्रत्यक्ष लाभच होय.

 

२. अज्ञान

व्यावहारिक शिक्षणाचा आणि अध्यात्मविषयक अज्ञानाचा काहीएक संबंध नाही. अशिक्षित, प्राथमिक शिक्षण झालेले, माध्यमिक शिक्षण झालेले, पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण झालेले, अशा प्रत्येक गटातील जवळ जवळ ९० टक्के व्यक्तींत अध्यात्माविषयी अज्ञानच असते. 

अ. अज्ञानाचे एक उदाहरण एका वर्तमानपत्रात छापून आलेल्या ‘गणेशमूर्ती – एक सौंदर्यशास्त्रीय दृष्टीकोन’ या लेखात पहायला मिळते. एका प्रसिद्ध चित्रकाराने लिहिलेल्या त्या लेखात म्हटले होते, ‘गणेशाची पारंपरिक मूर्ती शिल्पकलेतील सौंदर्याचा एक महान नमुना म्हणून मानली जाते. ज्या कलावंताने ही संकल्पना प्रथम साकार केली, त्या अज्ञात कलावंताच्या कलात्मकतेला खरोखर दाद द्यावीशी वाटते.’ ‘गणपति ही संकल्पना आहे’, हा अज्ञानाचा भाग झाला. गणपति इत्यादी देवता कल्पनेतील नसून प्रत्यक्षात आहेत, त्यांना आकारही आहे, हे त्या बिचार्‍या लेखकाला ठाऊक (माहीत) नव्हते.

आ. मुंबईत एके ठिकाणी अध्यात्मावरील व्याख्यानाला प.पू. डॉ. जयंत आठवले यांना बोलावले होते. आयोजनकर्त्यांनी त्यांना विचारले, ‘‘बसायला चौरंग (आसंदी (खुर्ची) नव्हे !) पाहिजे का ? पटलावर (टेबलावर) भगवे कापड हवे का ? जवळ समई इत्यादी हवी का ?’’ ‘बाह्यरंगात अध्यात्म नसते. अंतरंग भगवे (वैराग्याने) रंगवायचे असते’, हे त्यांना ठाऊकच नव्हते.

इ. लैंगिकता आणि अध्यात्माविषयीचे अज्ञान

१. ‘मला अध्यात्माकडे वळायला सांगता आणि ‘लैंगिक जीवन सामान्य असायला पाहिजे. नवर्‍याला ‘नाही’ म्हणू नका’, असे सांगता. हे अध्यात्माच्या विरुद्ध नाही का’, असे एका साधिकेने विचारले. लैंगिक जीवन अध्यात्माच्या आड येत नाही. संत तुकाराम, संत एकनाथ, आमचे गुरु प.पू. भक्तराज महाराज आदींना संत झाल्यावरही मुले झाली होती. यामागील दृष्टीकोन पुढीलप्रमाणे आहेत.

१ अ. हठयोगात वासनेवर नियंत्रण मिळवणे महत्त्वाचे आहे; मात्र भक्तीयोगात त्याला महत्त्व नाही. भक्तीयोगानुसार साधना करणार्‍याची भावावस्था ‘संसारी असूनी देहे, चित्त राहो चरणासी’, अशी झाली की, त्याला संसारातील सर्व कर्तव्यकर्मे करत अध्यात्म जगता येते. 

१ आ. भक्तीयोगानुसार साधना करणार्‍याचा नामजप अखंड चालू असला की, त्याच्याकडून होणारे कर्म हे अकर्म कर्म होते आणि त्यामुळे अशा कर्माला कर्मफळाचा लेप न लागल्याने ते कर्म बंधनात अडकवत नाही.

१ इ. जसजशी आध्यात्मिक पातळी वाढते, तसतसे स्वेच्छेचे रूपांतर परेच्छेत आणि परेच्छेचे रूपांतर ईश्वरेच्छेत होते. म्हणून संतांच्या पातळीला जे काही होते, ते बहुधा ईश्वरेच्छेनुसारच होत असते.

१ ई. प्रारब्ध हे भोगूनच संपवावे लागते; म्हणून संतही सहसा प्रारब्धात ढवळाढवळ करत नाहीत.

२. एका निराश स्त्रीला असे वाटले की, वयोमानानुसार तिची लैंगिक इच्छा अल्प झाली आहे. प्रत्यक्षात वाढत्या वयानुसार, नैराश्यामुळे किंवा आध्यात्मिक उन्नतीमुळे ती अल्प होऊ शकते.

३. ‘पारमार्थिकांनी अध्यात्म आणि विश्व यांची फारकत केली. विश्व ‘माया आहे’; म्हणून दृष्टीआड केले. त्यामुळे जीवनातला रस किंवा स्वारस्य संपले. लोक अगतिक आणि निष्क्रीय झाले अन् मोक्षाच्या नावाखाली क्रियाशून्य जीवन जगू लागले. हा खरा धर्म नव्हे.’ – श्री. अरविंद (व्यष्टी साधना करणार्‍यांचे हे हुबेहुब वर्णन आहे. प्रत्यक्षात पारमार्थिकाचे जीवन सृष्टीला पोषक असले पाहिजे.)

४. दैववादी : ‘प्रारब्ध मानणार्‍यांना ‘दैववादी / भित्रा’, असे म्हणतात; पण ते चूक आहे. तो खरा शूर / संत होण्याच्या योग्यतेचा (लायकीचा) असतो.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जि. पुणे, महाराष्ट्र

५. ‘हिंदु समाजाच्या नि पर्यायाने सार्‍या देशाच्या अधःपतनाला एक कारण असेल तर हा धर्म, त्याची ती तंत्रे, उत्सव, त्यातील जातीभेद, स्पर्शास्पर्शता, गल्लीगल्लीतील देवळे, वेड्यावाकड्या मूर्ती नि ध्येये होत, अशी आमची ठाम समजूत होती.’

 

३. अंधश्रद्धा

पुढे दिलेल्या उदाहरणांवरून आजही भारतियांच्या मनात अंधश्रद्धा किती खोलवर मूळ धरून आहे, हे लक्षात येते.

अ. उत्तर भारतातील वृंदावन ही भूमी भगवान श्रीकृष्णाच्या वास्तव्याने पावन झालेली आहे. वृंदावनवासियांची अशी समजूत आहे की, अशा पावन भूमीत मृत्यू आला, तर जीव उद्धरला जातो; म्हणजे जिवाला मुक्ती मिळते. या कारणामुळे वृंदावनवासियांना पूर्वजांचा त्रास होणारच नाही, अशी ‘अंधश्रद्धा’ तेथे आहे.

येथे लक्षात घ्यावयाची गोष्ट म्हणजे जर असे खरोखरीच असते, तर प्रत्येक भ्रष्टाचारी, दरोडेखोर, खुनी आयुष्यात अनेक पापे करून अंती तेथे मरायला जातील आणि मुक्त होतील ! असे झाले, तर तो इतरांवर झालेला अन्याय होईल. ईश्वर कोणावर अन्याय करत नाही. वृंदावनला मृत्यू आल्यास मुक्ती मिळते, असे जे सांगितलेले आहे, तशी मुक्ती कोणाला मिळते, तर भक्ताला किंवा पूर्ण पश्चात्ताप झालेल्या पाप्याला, इतरांना नाही.

आ. महाराष्ट्रात एके ठिकाणी कित्येक साईभक्तांचे, विशेषतः एका साईभक्त संस्थानाच्या भक्तगणांचे श्रद्धास्थान एक पॉमेरियन जातीचा कुत्रा आहे. ‘शिर्डीच्या श्री साईबाबांनी हयात असतांना आपल्या पट्टशिष्यांना कुत्र्याच्या रूपात दर्शन दिले होते आणि त्यानंतर ते या पॉमेरियन कुत्र्याच्या रूपात पुन्हा भूतलावर अवतरले’, अशी त्या साईभक्तांची श्रद्धा आहे. या ‘श्वानबाबांची’ त्यांच्या हयातीत प्रत्येक गुरुवारी, तसेच उत्सवाच्या दिवशी चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढली जात असे. या ‘श्वानबाबांनी’ आपली इहलोकीची यात्रा संपवल्यानंतर भक्तांनी त्यांची समाधी बांधली असून आजही त्यांची तेवढ्याच श्रद्धेने पूजा-अर्चा केली जाते आणि त्यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली जाते.

येथे विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे श्री साईबाबांना भूलोकी अवतारकार्य करायचे असले, तर ते एका प्राण्याचे रूप का धारण करतील ?

त्यापेक्षा मनुष्यरूपात येऊन ते कित्येक जिवांचा उद्धार सहजपणे करू शकतात. भगवंताचे कूर्म, वराह आदी प्राण्यांच्या रूपातही अवतार झाले आहेत; पण त्या अवतारांमागे विशिष्ट प्रयोजन होते. तसेच ते सर्व अवतार सत्ययुगात झाले आहेत. सत्ययुगात मनुष्याची सात्त्विकता जास्त असल्याने प्राण्यांची भाषा समजण्याची क्षमता त्याच्यात असायची; मात्र सध्याच्या कलियुगात मनुष्याची सात्त्विकता पुष्कळ अल्प झालेली असल्याने ही गोष्ट शक्य नाही. ईश्वर नेहमी त्या त्या काळाला आवश्यक आणि पूरक असा अवतार घेत असतो. या सर्वांचा विचार करता संतांनी एका कुत्र्याच्या रूपात अवतार घेणे, ही गोष्ट निःसंशय चुकीची असल्याचे लक्षात येते.

इ. ‘मांजर आडवी आली की, अपशकून होतो’, असे आपण मानतो. मांजराने कधी मार्गात येऊच नये का ? पाल अंगावर पडली की, मनुष्य त्रस्त होतो. या समजुती नसून सूचक घटना असतात. असे झाल्यास देवाचे नाव घ्यावे.

समाजातील २० टक्के व्यक्तींमध्ये अंधश्रद्धा आढळून येते. अंधश्रद्धेमुळे समाजाची १० टक्के हानी होत असली, तरी २० टक्के लाभही होतो; कारण अंधश्रद्धेपोटी वाईट कृत्ये करण्याचे काही जण तरी टाळतात.

साधनेला उद्या नव्हे, आज नव्हे, तर आतापासून आरंभ करा !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अध्यात्म’

Leave a Comment