गुरूंविषयी अयोग्य विचार आणि त्यांचे खंडण !

खंडण करण्यामागील उद्देश

विश्वाच्या आरंभापासून भूतलावर असणारा सनातन वैदिक धर्म (हिंदु धर्म), हिंदूंचे धर्मग्रंथ, देवता, धार्मिक विधी, अध्यात्म आदींवर अनेकांकडून टीका केली जाते. काही लोकांना ती टीका खरी वाटते, तर अनेकांना ‘ती टीका विखारी आहे’, हे लक्षात येऊनही टीकेचे खंडण करणे शक्य होत नाही. काही विद्वान किंवा अभ्यासक यांच्याकडूनही अज्ञानापोटी अयोग्य विचार मांडले जातात. असे सर्वच अयोग्य विचार आणि टीका यांचा योग्य प्रतिवाद न केल्याने हिंदूंची धर्मावरील श्रद्धा डळमळीत होते अन् त्यामुळे धर्महानी होते. ही धर्महानी रोखण्यासाठी हिंदूंना बौद्धिक बळ प्राप्त व्हावे, यासाठी अयोग्य विचार आणि टीका यांचे खंडण पुढे दिले आहे.

 

 

१. म्हणे, ग्रंथ असतांना गुरूंची आवश्यकता काय ?

अयोग्य विचार

आपल्याकडे अध्यात्मशास्त्रावर एकाहून एक आदर्श असे ग्रंथ असतांना आणि त्यांत सर्व सूत्रे विस्ताराने चर्चिली असल्याने, त्यांच्या आधारे जिज्ञासू शेवटपर्यंत पोहोचू शकतो. मग गुरूंची आवश्यकता काय ?

 

खंडण

अ. शल्यकर्माची कितीही पुस्तके वाचली, तरी स्वतः कोणाच्यातरी मार्गदर्शनाखाली शल्यकर्म केल्याविना शल्यकर्माचे तंत्र खर्‍या अर्थाने आत्मसात होत नाही. त्याप्रमाणे केवळ पुस्तके वाचून ईश्वरप्राप्ती करणे पुष्कळ कठीण आहे; त्यासाठी प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार्‍या गुरूंची आवश्यकता असते.

 

आ. शिष्याची खरी प्रगती गुरूंच्या संकल्पामुळेच होते. ग्रंथाला संकल्प करता येत नाही.

 

 

२. म्हणे, कपड्यांप्रमाणे गुरुही पाहून घेतले पाहिजेत !

अयोग्य विचार

सदरा खरेदी करतांना दहातील एक, साडी शंभरातील एक अशी बघून घेतो, तसेच गुरुही पाहून घेतले पाहिजेत. गुरूंची पात्रता अल्प असल्यास शिष्याची प्रगतीही अल्प होते.

 

खंडण

अ. कपडे खरेदी करतांना आपल्या आवडीनुसार खरेदी केले जातात; पण औषध आपल्या आवडीनुसार घेत नाही, तर आधुनिक वैद्य (डॉक्टर) सांगतील तेच घेतो. गुरूंना पारखणे सर्वसामान्य व्यक्तीला अशक्य असते. एखादा आधुनिक वैद्यच दुसरा आधुनिक वैद्य चांगला आहे कि नाही, हे सांगू शकतो. त्याप्रमाणे एखादे गुरुच दुसरे गुरु योग्य आहेत कि नाहीत, हे सूक्ष्मातून समजून घेऊन सांगू शकतात. सर्वसाधारण व्यक्तीला सूक्ष्मातील कळत नसल्यामुळे ती याविषयी काही ठरवण्यास अपात्र असते.

 

आ. अध्यात्मात शिष्याने गुरु करावयाचे नसतात, तर गुरुच शिष्य करतात, म्हणजे तेच शिष्याची निवड आणि सिद्धता (तयारी) करतात. साधकाची आध्यात्मिक पातळी ५५ टक्क्यांहून जास्त वाढली की, गुरु स्वतःहून त्याच्याकडे येऊन त्याचा शिष्य म्हणून स्वीकार करतात. साधकाची आध्यात्मिक पातळी ४० टक्के इतकी असली; पण त्याचे मुमुक्षुत्व (तळमळ) तीव्र असले, तरीही त्याला गुरुप्राप्ती होते. थोडक्यात, गुरु शोधण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा शिष्य म्हणून पात्र होण्याचा साधकाने प्रयत्न करावा.

 

 

 

३. म्हणे हिंदुस्थानात सर्वांत जास्त अधार्मिक
लोक आहेत; म्हणून त्यांना गुरूंची जास्त आवश्यकता आहे !

अयोग्य विचार

हिंदुस्थानात सर्वांत जास्त अधार्मिक लोक आहेत; म्हणून त्यांना गुरूंची जास्त आवश्यकता आहे.

 

खंडण

प्रत्यक्षात हिंदुस्थानात इतर देशांच्या तुलनेत गुरूंकडून शिकण्याची तळमळ असलेले आणि भक्तीभाव असलेले सात्त्विक साधक सर्वाधिक प्रमाणात आहेत; म्हणून हिंदुस्थानात गुरु सर्वाधिक प्रमाणात आहेत.

 

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘गुरूंचे महत्त्व, प्रकार आणि गुरुमंत्र’