नामजपाविषयीचे अपसमज (गैरसमज)

१. काही जणांचा असा समज असतो की, अमुक एक कोटी जप झाला की, अमुक एक फलप्राप्ती होते, उदा. ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे एकेक कोटी जप केला की, कुंडलीतील एकेका स्थानाची शुद्धी होते; म्हणून दोन कोटी जप झाल्यास कर्जनिवारण, सात कोटी जप झाल्यास लग्न होते इत्यादी ! दहा-पंधरा कोटी जप झालेले असे कित्येक जण असतात की, ज्यांना जपाचा विशेष असा व्यावहारिक किंवा आध्यात्मिक लाभ झालेला नसतो; कारण एकतर त्यांचा जपच चुकीच्या नामाचा असतो किंवा तो करायला त्यांना अधिकारी व्यक्तींनी सांगितलेले नसते.

२. काही वेळा अधिकारी व्यक्तींनी सांगितलेला किंवा ‘अमुक एका संख्येचा विशिष्ट नामजप केल्यास अमुक एक फलप्राप्ती होईल’, असे ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलेला जप करूनही त्याचा जप करणार्‍याला विशेष लाभ होत नाही. याचे कारण म्हणजे तो नामजप भावपूर्ण नसतो.

नामजपाचे महत्त्व

१. देवाला नाव असण्याचे महत्त्व

अ. ईश्वराच्या नामाने त्याला ओळखता येणे आणि त्याच्याइतकी महती निर्माण होणे

'मी जन्माला आलो, तेव्हा प्रथम रूप आले. नामाभिधान नंतर झाले. नामकरणानंतर जग त्या नामाने त्या रूपाला (‘मला’) ओळखू आणि संबोधू लागले. वास्तविक ‘मी’ (रूप) आणि त्याला लाभलेले नाम यांचा काहीच संबंध नाही; कारण या शरिराला ‘राजा’ म्हटले काय किंवा ‘गोविंदा’ म्हटले काय, त्या शरिरात काही अंतर (फरक) पडणार आहे का ? नाही ना! मग या संबंधाने जर एवढी महती निर्माण होते, तर ज्याने ‘मला’ (‘माझ्या रूपाला’) निर्माण केले, त्या जगत् नियंत्याच्या नामजपाने केवढी महानता निर्माण होईल ! जर ‘मी’ माझे नाम विसरून ईश्वराचेच नाम जपावयास लागलो, तर त्यातील महत्त्वपूर्ण संबंधाने माझी महतीसुद्धा साहजिकच वाढणार नाही का ?’

आ. नामामुळे भगवंतापर्यंत पोहोचता येणे

भगवंत गुप्त असला, तरी त्याचे नाम गुप्त नाही. त्यामुळे नामाच्या आधारे आपण त्याला शोधून काढू शकतो.

कोठे लपशी नारायणा । तरी नाम कोठे नेशी ?

आम्ही अहर्निशी । तेचि घोकू ।। – संत तुकाराम महाराज

भावार्थ : संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘देवा, तू कोठेही लपला असलास, तरी आम्ही तुला तुझ्या नामजपाच्या बळावर शोधून काढू.

एखाद्या माणसाची आणि आपली ओळख असेल, तर पहिल्यांदा त्याचे रूप आपल्या दृष्टी पुढे येते अन् नंतर नाम (नाव) येते; पण आपली आणि त्याची ओळख नसेल अन् आपण त्याला बघितलेले नसेल, तर आपल्या मनात त्याचे नाव आधी येते आणि नंतर त्याचे रूप येते. आज आपल्याला भगवंताची ओळख नाही; म्हणून त्याचे रूप ज्ञात (माहिती) नाही; परंतु त्याचे नाम आपल्याला घेता येईल. त्याचे नाम घेतांना त्याचीच आठवण होते, इतरांची नाही. हा आपला अनुभव आहे. समजा `राम' या नावाचा आपला एक मित्र आणि दुसरा एक गडी असला, तरी ‘राम-राम’ असा जप करत असतांना आपल्याला आपल्या मित्राची किंवा गड्याची आठवण होत नाही, तर भगवंताची होते. भगवंताची रूपे निरनिराळी आहेत – काळा राम, गोरा राम, लहान राम, मोठा राम, उग्र आणि सौम्य रूपातला राम; पण सर्व रूपे एका रामाचीच. भगवंत स्वतः अरूप आहे; म्हणून जे रूप त्याला आपण द्यावे, तेच त्याचे रूप असते. यासाठी आपण कोणत्याही रूपामध्ये त्याचे ध्यान केले तरी चालते. व्यवहारामध्ये जशी एकाच माणसाला अनेक नावे असतात आणि त्यांपैकी कोणत्याही नावाला तो ‘ओ’ देतो, तसे कोणत्याही नावाने हाक मारली, तरी एकच भगवंत ‘ओ’ देतो.’

इ. देवाला हाक मारण्यासाठी त्याचे नाम आवश्यक

‘जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीला हाक मारावयाची असेल आणि तिचे नाव ज्ञात (माहिती) नसेल, तर हाक कशी मारणार ? थोडक्यात हाक मारू शकणार नाही. (असेच देवाच्या नावाच्या संदर्भातही आहे.) नेमका हाच भाव व्यक्त करण्यासाठी माऊलींनी ‘ॐ नमो जी आद्या । वेदप्रतिपाद्या ।’ म्हणजे `सर्वांचे मूळ असणार्‍या आणि वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणार्‍या ‘हे श्री ओंकारा, तुला नमस्कार असो', या शब्दांनी ज्ञानेश्वरीचा आरंभ केला आहे. त्यामुळेच हे मंगलाचरण एकमेवाद्वितीय असे झाले आहे.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

ई. जे काम भगवंत करतो, तेच काम त्याचे नाम करते

मोठा अधिकारी आपल्या स्वाक्षरी शिक्का करतो. तो शिक्का ज्याच्या हातामध्ये असतो, तो मनुष्य त्या शिक्क्याने साहेबाच्या इतकेच काम करवून घेऊ शकतो. हे जसे व्यवहारामध्ये आहे, अगदी तसेच भगवंताच्या संदर्भातही आहे. जे काम प्रत्यक्ष भगवंत करतो, तेच काम त्याचे नाम करते.’

उ. भगवंताच्या रूपापेक्षा त्याचे नाम महत्त्वाचे

‘भगवंताचे नाम घेत असतांना प्रत्यक्ष भगवंत समोर उभा ठाकला आणि ‘तुला काय पाहिजे’, असे त्याने विचारले, तर ‘तुझे नामच मला दे’, हे त्याच्याजवळ मागणे, याचे नाव निष्कामता. रूपाने व्यक्त झालेला भगवंत केव्हातरी नाहीसा होईल; पण त्याचे नाम मात्र अखंड टिकेल आणि त्याचे नाम घेतले की, त्याला इकडे (नामाकडे) यावेच लागेल.’

ऊ. भगवंताच्या रूपाला बंधने आहेत, तर भगवंताचे नाम हे बंधनातीत आहे

‘भगवंताचे रूप हे जड (स्थूल) आणि दृश्य असल्यामुळे उत्पत्ती-स्थिती-लय, स्थळ इत्यादी बंधने त्याला असतात; पण नाम हे दृश्याच्या पलीकडचे, म्हणजे सूक्ष्म असल्याने त्याला देशकालमर्यादा इत्यादी विकार नाहीत; म्हणून नाम आज आहे आणि पुढेही तसेच राहील; कारण ते सत्स्वरूप आहे.’

ए. रामापेक्षा रामनाम महत्त्वाचे, तसे स्वत:पेक्षा स्वत:ची स्वाक्षरी (लिखित नाव) महत्त्वाची !

श्री रामचंद्राचे नाम घेऊन वानरांनी समुद्रात दगड फेकून सेतू बांधला. नामामुळे समुद्रात दगड तरंगू शकले; पण स्वतः रामचंद्रांनी दगड फेकला तेव्हा तो बुडाला, म्हणूनच म्हणतात, ‘रामसे बडा रामका नाम ।’

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘नामजपाचे महत्त्व आणि लाभ’

Leave a Comment