अलंकारांचा वापर करण्यामागील उद्देश आणि महत्त्व

Article also available in :

अलंकारांमध्ये देवतांच्या लहरी आकृष्ट करण्याची क्षमता असते. ही प्रकिया घडण्यामागे नेमके शास्त्र काय आहे आणि देवतांनी परिधान केलेले अलंकार महिलांनी घातल्यास काय लाभ होतात, अलंकार परिधान करण्यातून नकळत बिंदूदाबन (अ‍ॅक्युप्रेशर) उपाय कसे होतात आणि ग्रहपिडा टाळण्यासाठी रत्नांचे महत्त्व या लेखातून जाणून घेऊया.

 

१. देवतांनी अलंकार धारण केल्याने देवतांकडून प्रक्षेपित
होणार्‍या लहरी अलंकारांच्या माध्यमातून व्यक्तीला ग्रहण करता येणे

अ. ‘अलंकार’ हे देवतेचे तेज भक्तांना लीलया प्रदान करण्याचे प्रतीक आहे.’ – सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ३१.१२.२००७, दुपारी ४.३४)

आ. देवतांकडून प्रक्षेपित होणार्‍या लहरी ग्रहण व्हाव्यात, यासाठी देवताही अलंकारांसहित असणे

‘कलियुगात एकूणच जिवांची सात्त्विकता अल्प (कमी) असल्याने अलंकारांसारख्या बाह्य माध्यमांचा उपयोग जिवांना व्हावा, तसेच देवतांकडून प्रक्षेपित होणार्‍या लहरींनाही अलंकारांच्या माध्यमातून सगुणता प्राप्त व्हावी आणि असे तत्त्व सर्वसामान्यांना ग्रहण करणे सोपे जावे, यासाठी ईश्वराने प्रत्येक देवतेच्या रूपाचीही निर्मिती सर्वसामान्यांच्या लाभासाठी अलंकारांसहित केली.’ – सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ८.१२.२००५, दुपारी १.०२)

यासाठीच हिंदु धर्मात देवतेचे पूजन करतांना तिला वस्त्रालंकारांनी सुशोभित करण्याची पद्धत आहे. दिवाळीतील श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी श्री लक्ष्मीदेवीला अलंकार परिधान करण्याविषयी प्रार्थना करतात. त्या वेळी पुढील श्लोक म्हणतात.

 

रत्नकंकणकेयूरकांचीकुण्डलनूपुरम् ।

मुक्ताहारं किरीटं च गृहाणाभरणानिमे ।।

 

अर्थ : हे देवी, रत्नजडित कंकणे, केयूर म्हणजे बाहूबंद (बाजूबंद), कांची (कमरपट्टा), कर्णभूषणे, पैंजण, मोत्यांचा हार, मुकुट आदी अलंकार तू धारण कर.

 

२. अलंकारांच्या माध्यमातून देवतांचे चैतन्य ग्रहण करता येणे

अ. ‘अलंकार म्हणजे ईश्वरी तत्त्व ग्रहण करून जिवाला त्याचा लाभ करून देणारा प्रणेता.

आ. अलंकार धारण केल्याने देवतांचा चैतन्यदायी उर्जाशाक्तीचा स्त्रोत देहात ग्रहण होऊन जिवाला कार्य करण्यास चालना मिळते.’

– एक अज्ञात शक्ती (सौ. रंजना गडेकर यांच्या माध्यमातून, फाल्गुन शुद्ध चतुर्दशी (२०.३.२००८), दुपारी १.४७ आणि २.१४)

इ. ‘शरिराच्या त्या त्या भागात तो तो अलंकार घालणे, म्हणजे सगुणत्वाच्या माध्यमातून ब्रह्मांडमंडलात देवतेचे त्या त्या वेळी कार्यरत असणारे तेजरूपी चैतन्य ग्रहण करण्यात सुलभता येणे.’ – सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २७.१२.२००७, दुपारी २.४९)

ई. ‘अलंकार हे मनुष्याच्या शरिरावर त्याच्या सौंदर्यामुळे नव्हे, तर ईश्वराकडून त्याला मिळणार्‍या चैतन्यामुळेच शोभतात!’ – प.पू. परशराम माधव पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

उ. ईश्वरी चैतन्यामुळेच दागिन्यांचे सौंदर्य वाढून दागिन्यांतून ईश्वरी चैतन्याचे प्रक्षेपण होऊन लाभ होतांना जाणवणे

‘कार्तिक कृ. तृतीया, कलियुग वर्ष ५११० (१५.११.२००८) या दिवशी प.पू. पांडे महाराजांनी मला ‘अलंकार हे मनुष्याच्या शरिरावर त्याच्या सौंदर्यामुळे नव्हे, तर ईश्वराकडून त्याला मिळणार्‍या चैतन्यामुळेच शोभतात ! नुसत्या प्रेतवत शरिरावर दागिने शोभून दिसणार नाहीत’, असे सांगितले. त्यांनी मला सूक्ष्मातील प्रयोग करून या गोष्टीची अनुभूती घेण्यास सांगितले. मी डोळे मिटून त्यांच्यासमोर बसले. या वेळी मला दागिने घातलेली एक काळी मानवी आकृती दिसली. त्या आकृतीवर घातलेले दागिनेही निस्तेज दिसत होते. काही वेळाने आकृतीच्या डोक्यातून ईश्वरी चैतन्य आत येत असल्याचे दिसले. जेव्हा हे चैतन्य त्या दागिन्यांच्या ठिकाणी पोहोचले, तेव्हा त्या दागिन्यांतून चैतन्य प्रक्षेपित होऊ लागले. त्यामुळे त्या दागिन्यांचे सौंदर्य वाढले आणि त्याचा लाभ त्या व्यक्तीला होतांना जाणवला.’ – कु. सोनल जोशी, गोवा.

 

३. सण आणि धार्मिक विधी असलेल्या दिवशी, तसेच शुभदिनी नवीन किंवा कौशेय
(रेशमी) वस्त्रे अन् विविध अलंकार परिधान केल्याने देवतांच्या लहरी ग्रहण करता येणे

‘सण आणि धार्मिक विधी असलेल्या दिवशी आणि शुभदिनी काही वेळा देवता सूक्ष्मातून भूतलावर येतात. त्या दिवशी व्यक्ती वस्त्रालंकाराने सुशोभित झाल्यामुळे तिने देवतांच्या आगमनाचे स्वागत केल्यासारखेच होते. त्यामुळे देवता प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात आणि व्यक्तीला देवतांच्या लहरी ग्रहण करता येतात.’ – ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १२.११.२००७, रात्री ८.१५)

 

४. देवीला अर्पण केलेले अलंकार परिधान केल्यास
त्या अलंकारांतील देवीची शक्ती आणि चैतन्य मिळणे

देवीला अर्पण केलेल्या अलंकारांत देवीची शक्ती आणि चैतन्य येते. ते अलंकार स्त्रीने परिधान केल्यास तिला त्या अलंकारांतील देवीची शक्ती आणि चैतन्य मिळते. त्या व्यतिरिक्त स्त्रीने अलंकार परिधान केल्यावर ती शक्ती आणि चैतन्य वातावरणातही पसरते.

 

देवीला अर्पण केलेल्या हिरव्या बांगड्या स्त्रियांनी घालण्याचे लाभ

अ. बांगड्यांच्या प्रकारानुसार (उदा. त्या कशापासून बनल्या आहेत आणि त्यांचा रंगानुसार) त्यांच्यात वेगवेगळ्या प्रमाणात शक्ती निर्माण होते.

आ. बांगड्यांमुळे निर्माण होणारा ध्वनी सात्त्विक असतो.

इ. देवीला बांगड्या अर्पण करतांना पुजारी मंत्रपठण करत असल्यामुळे त्या बांगड्यांमध्ये देवीतत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट होऊन चैतन्यही येते.

ई. देवीची शक्ती आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी स्त्रिया देवीला अर्पण केलेल्या बांगड्या परिधान करतात.

अनुभूती

देवाच्या डोक्यावरील मुकूट घातल्याने स्वतःच्या डोक्यावरील काळ्या शक्तीचे आवरण मुकुटाच्या पोकळीत खेचले जाणे

‘सप्टेंबर २००६ मध्ये मी गोव्यातील श्री बालाजी मंदिरामध्ये गेले होते. देवाचे दर्शन घेतल्यानंतर तेथील पुजार्‍याने देवाच्या डोक्यावरील मुकूट माझ्या डोक्यावर ठेवला. तेव्हा माझ्या डोक्यावरील काळ्या शक्तीचे आवरण मुकुटाच्या पोकळीत खेचले गेल्याचे मला जाणवले. मुकुटामध्ये असलेल्या देवाच्या शक्तीची प्रचीती मला आली.’ – कु. मधुरा भोसले, सनातन संस्था

 

५. अलंकार परिधान करण्यातून नकळत बिंदूदाबन (अ‍ॅक्युप्रेशर) उपायांचा लाभ होणे

शरिरातील विशिष्ट अवयवांशी निगडित असलेल्या विशिष्ट बिंदूंवर दाब देऊन शरिरात वहाणार्‍या चैतन्यशक्तीच्या प्रवाहातील काळ्या शक्तीचे अडथळे दूर करणे म्हणजे ‘बिंदूदाबन’. ‘बिंदूदाबन’ उपायांमुळे व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांचे निवारण होण्यास साहाय्य होते.

‘विविध अलंकार परिधान केल्याने शरिराच्या त्या त्या भागातील बिंदू दाबले जाऊन नकळत बिंदूदाबनाचे (अ‍ॅक्युप्रेशरचे) उपाय होतात. यावरून ‘पूर्वापार चालत आलेला अलंकार परिधान करण्याचा उद्देश हा किती आध्यात्मिक स्तरावर बिंदूदाबन पद्धतीतून जिवाच्या नकळतच सातत्याने कार्य करणारा आहे’, हे लक्षात येते. अलंकार परिधान करण्याचा आचार पूर्वीचे जीव तंतोतंत पाळत असल्याने त्यांना बाह्यतः कुणाच्या माध्यमातून स्वतःवर बिंदूदाबन पद्धत वापरण्याची आवश्यकता पडली नाही; कारण ते त्यांच्या जीवनात बिंदूदाबन सततच अनुभवत होते. कलियुगात हिंदू आचारधर्मापासून दूर गेल्याने आता बाह्यतः या पद्धतीचा अवलंब करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अशा प्रकारे पूर्वीच्या काळी ही बिंदूदाबनाची पद्धत वापरली जाऊन त्याचा आचारधर्माच्या योगे चैतन्याच्या स्तरावर वापर करून घेण्यात आपले वैदिकजन अग्रेसर ठरलेले होते, हेच यातून सिद्ध होते.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २२.१०.२००७, रात्री ८.३३)

 

६. अलंकारांमुळे चक्रशुद्धी आणि चक्रजागृती होणे

अलंकार शरिराच्या विशिष्ट अवयवांशी निगडित असतात. प्रत्येक अवयव शरिरातील विशिष्ट चक्राशी (उदा. अनाहतचक्र, आज्ञाचक्र) निगडित असतो. त्या त्या अवयवाच्या ठिकाणी अलंकार धारण केल्याने अलंकाराच्या माध्यमातून कार्यरत होणार्‍या ईश्वरी चैतन्याचा संबंध त्या त्या अवयवाच्या संबंधित चक्राशी पोहोचतो. यामुळे चक्रशुद्धी झाल्याने वाईट शक्तींचा त्रास असलेल्या व्यक्तीच्या त्रासात घट होते. वाईट शक्तींचा त्रास नसलेल्या व्यक्तीची चक्रजागृती होऊन तिला त्या त्या चक्राशी संबंधित अनुभूती येऊ शकते, उदा. अनाहतचक्राची जागृती झाल्यास ईश्वराप्रती भाव जागृत होतो.

 

७. ग्रहपीडा टाळण्यासाठी अलंकार घालणे

ग्रहांचा मनुष्याच्या जीवनावर मोठा प्रभाव असतो. ग्रहपीडा निवारणासाठी किंवा होऊ नये यासाठी विविध रत्नांनी युक्त असलेल्या अंगठ्या घालण्याविषयीचे विवेचन (माहिती) ज्योतिषशास्त्रात दिलेले असते.

अ. ग्रह, रत्न आणि ते हाताच्या कोणत्या बोटात घालतात ?

१. सूर्य – माणिक – अनामिका

२. चंद्र – मोती – करंगळी

३. मंगळ – प्रवाळ – अनामिका

४. बुध – पाचू – करंगळी

५. गुरु – पुष्कराज – तर्जनी

६. शुक्र – हिरा – अनामिका

७. शनि – नीलमणी – मध्यमा

८. राहु – गोमेद – करंगळी

९. केतु – वैडूर्य (लसण्या) – करंगळी

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अलंकारशास्त्र’

 

सण आणि धार्मिक विधी असलेल्या दिवशी, तसेच शुभदिनी नवीन
किंवा रेशमी वस्त्रे अन् विविध अलंकार परिधान केल्याने वाईट शक्तींपासून रक्षण होणे

सण, यज्ञ, मुंज, विवाह, वास्तूशांत यांसारखे धार्मिक विधी या वेळी देवता आणि अनिष्ट शक्ती यांचे सूक्ष्म-युद्ध अनुक्रमे ब्रह्मांड, वायूमंडल आणि वास्तू येथे होत असते. त्यामुळे सण साजरा करणार्‍या आणि धार्मिक विधींच्या ठिकाणी उपस्थित असणार्‍या व्यक्ती यांच्यावर सूक्ष्म-युद्धाचा परिणाम होऊन त्यांना वाईट शक्तींचा त्रास होऊ शकतो. विविध सुवर्णालंकार आणि रेशमी वस्त्रे परिधान केल्यामुळे त्या व्यक्तींच्या भोवती ईश्‍वराच्या सगुण-निर्गुण स्तरावरील चैतन्याचे संरक्षक वलय निर्माण होऊन व्यक्तींची सात्त्विकता वाढते आणि वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून त्यांचे संरक्षण होते. यासाठी सण आणि धार्मिक विधी असलेल्या दिवशी, तसेच शुभदिनी नवीन किंवा रेशमी वस्त्रे आणि विविध अलंकार परिधान करण्याविषयी धर्मशास्त्रात सांगितले आहे.

– ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १२.११.२००७)

Leave a Comment