देवतेच्‍या यंत्रामध्‍ये त्रासदायक स्‍पंदने आली असल्‍यास त्‍यावर आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय करा !

‘आपण देवतांच्‍या मूर्ती किंवा चित्रे यांच्‍याप्रमाणे त्‍यांची यंत्रेही पूजतो. कधी कधी एखादे लहान आकाराचे देवतेचे यंत्र, उदा. श्रीयंत्र आपण ‘लॉकेट’प्रमाणे गळ्‍यातही घालतो. देवतांच्‍या मूर्ती आणि चित्रे ही सगुण-निर्गुण स्‍तरावर, तर देवतांची यंत्रे ही निर्गुण-सगुण स्‍तरावर कार्यरत असतात. देवतांची यंत्रे अधिक निर्गुण स्‍तरावर कार्यरत असल्‍याने ती आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपायांसाठी किंवा संकटनिवारणासाठी देवतांच्‍या मूर्ती किंवा चित्रे यांच्‍यापेक्षा अधिक परिणामकारक असतात. त्‍यामुळे अनिष्‍ट शक्‍ती देवतांच्‍या मूर्ती किंवा चित्रे यांच्‍यापेक्षा देवतांच्‍या यंत्रांवर आक्रमण करण्‍याची शक्‍यता अधिक असते.

अनिष्‍ट शक्‍तींनी देवतेच्‍या यंत्रावर आक्रमण केल्‍यास त्‍याच्‍यामध्‍ये नकारात्‍मक (त्रासदायक) स्‍पंदने येतात. त्‍यामुळे त्‍या यंत्राकडे बघून डोके जड होणे, छातीवर दाब जाणवणे, ‘त्‍या यंत्राकडे पाहू नये’, असे वाटणे, असे त्रास होतात. असे त्रास होत असल्‍यास त्‍या यंत्रावर आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय करून त्‍याच्‍यातील त्रासदायक शक्‍ती दूर करणे आवश्‍यक ठरते.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

 

१. रिकाम्‍या खोक्‍यांचे उपाय करणे

नकारात्‍मक स्‍पंदने असलेल्‍या देवतेच्‍या यंत्रावर रिकाम्‍या खोक्‍यांचे आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय करावेत. रिकाम्‍या खोक्‍यातील पोकळीमध्‍ये त्रासदायक शक्‍ती खेचली गेल्‍याने आध्‍यात्मिक लाभ होतात. (अधिक माहितीसाठी सनातनचा ‘विकार-निर्मूलनासाठी रिकाम्‍या खोक्‍यांचे उपाय कसे करावेत ?’ हा ग्रंथ वाचावा.) त्‍यासाठी देवतेच्‍या यंत्रापेक्षा थोडा मोठा आकार असलेले आणि एक बाजू उघडी असलेले ४ रिकामे खोके घ्‍यावेत. पटलावर यंत्र ठेवून त्‍याच्‍या चारही बाजूंना ते रिकामे खोके यंत्रापासून ३० सें.मी. अंतरावर ठेवावेत. खोके ठेवतांना त्‍यांची उघडी बाजू यंत्राकडे राहील, असे ठेवावेत. अशा प्रकारे रिकाम्‍या खोक्‍यांचे उपाय त्‍या यंत्रावर रात्रभर करू शकतो. उपाय झाल्‍यावर सकाळी ‘देवतेच्‍या त्‍या यंत्रातून त्रासदायक शक्‍ती प्रक्षेपित होत आहे का ?’, हे पहावे. तेव्‍हा यंत्रातून थोड्या प्रमाणात त्रासदायक शक्‍ती प्रक्षेपित होत असल्‍यास त्‍यावर पुढीलप्रमाणे सूर्याचे उपाय करावेत.

 

२. श्री सूर्यनारायणाचे उपाय

श्री सूर्यनारायणामध्‍ये रज-तम नष्‍ट करण्‍याची अलौकिक शक्‍ती आहे. आपण याचा लाभ आपल्‍यावरील त्रासदायक शक्‍तीचे आवरण दूर होण्‍यासाठी श्री सूर्यनारायणाच्‍या सकाळच्‍या किंवा सायंकाळच्‍या कोवळ्‍या उन्‍हात २० मिनिटे बसून करून घेऊ शकतो, तसेच एखाद्या वस्‍तूतील त्रासदायक शक्‍ती नष्‍ट होण्‍यासाठी ती वस्‍तू अर्धा ते एक घंटा कोणत्‍याही वेळी उन्‍हात ठेवून करून घेऊ शकतो. देवतेच्‍या यंत्रामधील त्रासदायक शक्‍ती नष्‍ट होण्‍यासाठी ते यंत्र उन्‍हात १ घंटा ठेवावे. यंत्र उन्‍हात ठेवतांना श्री सूर्यनारायणाला पुढील प्रार्थना करावी – ‘तुझ्‍या कृपेने या यंत्रातील त्रासदायक शक्‍ती नष्‍ट होऊ दे.’

हे आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय केल्‍याने देवतेच्‍या यंत्रातील नकारात्‍मक स्‍पंदने नष्‍ट होतील. अनिष्‍ट शक्‍तींचे आक्रमण पुष्‍कळ तीव्र असल्‍यास काही दिवस हे उपाय करावे लागतात. उपाय पूर्ण झाल्‍यावर ते देवतेचे यंत्र पूजनासाठी किंवा परिधान करण्‍यासाठी घेऊ शकतो. अंगावर परिधान करत असलेले यंत्र प्रतिदिन सकाळी सूर्याचे उपाय करूनच परिधान केलेले चांगले. पूजेत असलेल्‍या यंत्रामध्‍ये नकारात्‍मक स्‍पंदने आलेली जाणवल्‍यास त्‍यावर पुन्‍हा आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय करावेत.’

– (सद़्‍गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., गोवा. (३.१.२०२३)

 

Leave a Comment