सनातन संस्थेचा नव्हे, तर हिंदु धर्माचाच द्वेष करणारे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र !

अंनिसवाल्यांनी तोडलेले अकलेचे तारे आणि हे म्हणे बुद्धीप्रामाण्यवादी !

श्री. चेतन राजहंस
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे धर्मद्रोही विचारांचे मुखपत्र म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र ! या वार्तापत्रात नेहमीच हिंदु धर्मद्वेषापोटी सनातन धर्मसंस्कृती अन् परंपरा, तसेच सनातन संस्थेसारख्या आध्यात्मिक संस्था यांवर टीका केली जाते. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या २००० या वर्षीच्या वार्षिक विशेषांकात मठ्ठ, बुरसटलेली मानसिकता जपणारी सनातन संस्था ! या शीर्षकाखाली १५ पानी (वार्तापत्राचे पृष्ठ ७६ ते ९१) लेख प्रसिद्ध झाला होता. हा लेख जुना असला, तरी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सनातन संस्थेविषयीचे आक्षेप आजही तेच आहेत; म्हणून आमच्या वाचकांसाठी त्यातील उतारे वैचारिक प्रतिवादासह प्रसिद्ध करत आहोत.
 
आज १५ वर्षांनंतर लक्षात येईल की, आतापर्यंत सनातन संस्थेविषयी अंनिस करत असलेला हा अपप्रचार जर खरा असता, तर सनातन संस्था केव्हाच रसातळाला गेली असती; पण तसे घडले नाही; कारण ती नावाप्रमाणेच सनातन (नित्य नूतन) आहे आणि पुढेही राहील.
 
संकलक : श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था
 
१. सनातन संस्थेच्या वैज्ञानिक परिभाषेतील अध्यात्माला बुरसटलेली मानसिकता म्हणणारी अंनिस !
टीका : या लेखाचे शीर्षक मठ्ठ, बुरसटलेली मानसिकता जपणारी सनातन संस्था ! असा आहे. या शीर्षकावरून अंधश्रद्धावाल्यांना सनातन संस्थेविषयी वाटणारा तिरस्कार दिसून येतो. 
 
खंडण : सनातन संस्था ही मठ्ठ आणि बुरसटलेली मानसिकता जपणारी नाही, तर वैज्ञानिक परिभाषेत अध्यात्म शिकवणारी संस्था आहे.
 
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संमोहन उपचाराच्या संदर्भातील संशोधन कार्याविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणे, हा अंनिसवाल्यांचा संतद्वेष !
टीका : जयंत बाळाजी आठवले. शिक्षणाने मानसोपचारतज्ञ. फार पूर्वी म्हणे ते नास्तिक होते. २० वर्षे संमोहन उपचारतज्ञ म्हणून हे आठवले संशोधन (?) करत होते.
 
खंडण : पत्रकारांनी किंवा लेखकांनी समाजाला विवेक (?) शिकवतांना त्या विषयावरील अभ्यास करणे आवश्यक असते. किंबहुना अभ्यास न करतांना असले प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणे, हा अविवेकच ठरतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संमोहन-उपचारतज्ञ म्हणून केलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधनकार्य पुढे दिले आहे. 
 
अ. वर्ष १९७१ ते १९७८ या कालात ब्रिटनमध्ये संमोहन-उपचारपद्धतीवर संशोधन केले.
 
आ. अयोग्य कृतीची जाणीव आणि तीवर नियंत्रण, अयोग्य प्रतिक्रियांच्या जागी योग्य प्रतिक्रिया निर्माण करणे, प्रसंगाचा मनात सराव करणे आदी संमोहन-उपचारांच्या नाविन्यपूर्ण पद्धतींची निर्मिती केली.
 
इ. इओसिनोफिलिया हा पेशींचा रोग मानसिक ताणामुळेही होऊ शकतो, याचे सर्वप्रथम संशोधन केले.
 
ई. वर्ष १९६७ ते १९८२ अशी १५ वर्षे त्यांनी ५०० हून अधिक आधुनिक वैद्यांना (डॉक्टरांना) संमोहनशास्त्र आणि संमोहन-उपचार यांचे सिद्धान्त आणि प्रात्यक्षिके यांविषयी अमूल्य मार्गदर्शन केले.
 
उ. संमोहनशास्त्रावर २ आणि संमोहन-उपचार यांविषयी ४ ग्रंथ आणि विविध नियतकालिकांत १२३ लेखांद्वारे मार्गदर्शन केले.
 
३. अंनिसचा कुलदेवतेच्या नामस्मरणावर आक्षेप म्हणजे अध्यात्माविषयी अपसमज पसरवण्याचा प्रकार ! 
टीका : हिंदु धर्मात पंथानुसार नामस्मरण पालटते. विठ्ठल, पांडुरंग, राम, कृष्ण, दत्त अशा विविध देवतांच्या नामांचा वापर होतो; पण सनातन संस्थेत या सर्वांपेक्षा कुलदेवतेचे नाम महत्त्वाचे ! कुलदेवता वगैरेंविषयी हिंदु मन संवेदनशील असते. परंपरेने त्याची कुलदेवतेविषयी आईपणाचीच भावना असते. सनातनवाले या भावनेला फक्त उजाळा देतात.
 
खंडण : ज्यांना देवता म्हणजे काय, हे माहीत नाही, त्यांनी कुलदेवतेविषयी बोलावे, हे हास्यास्पद आहे. कुलदेवतेचे नामस्मरण करण्याविषयीचे अध्यात्मशास्त्र पुढे दिले आहे. 
 
अ. कुल म्हणजे आप्तसंबंधाने एकत्र आलेले आणि एका रक्ताचे लोक. ज्या कुलदेवतेची उपासना करणे आवश्यक असेल, त्या कुलात व्यक्ती जन्म घेते.
 
आ. कुल म्हणजे मूलाधारचक्र, शक्ती किंवा कुंडलिनी. कुल + देवता, म्हणजे ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधारचक्रातील कुंडलिनीशक्ती जागृत होते, म्हणजे आध्यात्मिक प्रगतीला प्रारंभ होतो, अशी देवता. देवता म्हणजे देव किंवा देवी.
 
इ. ब्रह्मांडात असलेली सर्व तत्त्वे पिंडात आणली की, साधना पूर्ण झाली, असे होते. ब्रह्मांडात असलेल्या सर्व देवतांच्या स्पंदनलहरी जशा सर्व प्राण्यांपैकी केवळ गायीत येऊ शकतात (म्हणूनच गायीच्या पोटात ३३ कोटी देवता असतात, असे म्हणतात. अर्थात एका विचारसरणीनुसार देवता तेहेतीस कोटी नसून तेहतीस आहेत.) ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्त्वांना आकर्षित करून त्या सर्वांची ३० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचे सामर्थ्य केवळ कुलदेवतेच्या नामजपात आहे. याउलट अल्प असलेले विशिष्ट तत्त्व श्रीविष्णु, शिव, गणपति, श्रीलक्ष्मी या देवतांच्या नामजपाने वाढते, जसे शक्तीवर्धक म्हणून अ, ब इत्यादी जीवनसत्त्वे घेतात.
 
ई. कुलदेवतेची साधना करून आध्यात्मिक आणि व्यावहारिक प्रगती केल्याचे एक सर्वज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तसेच संत तुकाराम महाराजांनी ज्या पांडुरंगाची अनन्यभक्ती करून सदेह-मुक्ती मिळवली, तो विठोबा त्यांचे कुलदैवतच होता.
 
४. सनातनच्या सत्संगाविषयी धर्मद्रोही अंनिसचा पुरोगामी अभिप्राय !
अ. टीका : सनातनच्या सत्संगातून साधकांच्या मनावर पद्धतशीरपणे सनातनी मूल्यांचा मारा केला जातो. 
 
खंडण : सनातनच्या सत्संगात सनातन धर्मातील तात्त्विक आणि प्रायोगिक अध्यात्मशास्त्र शिकवले जाते.
 
आ. टीका : सत्संगातून दुर्जनांचा नाश कसा होणार ? उलट दुर्जन आहेत, तसेच अन्याय करत रहाणार आणि भरडल्या जाणार त्या त्यांच्या सत्संगात येणार्‍या स्त्रियाच. 
 
खंडण : सत्संगात येणार्‍या व्यक्तीचा सत्त्वगुण वाढून तो सदाचरणी बनतो. सदाचरणी व्यक्ती रज-तमोगुणी दुर्जनांप्रमाणे वागत नाही, म्हणजेच स्वतःतील दुर्जनत्व नष्ट करते. या सत्संगात समाजातील दुष्प्रवृत्तींचे वैध मार्गाने निर्मूलन कसे करायचे, हेही शिकवले जाते, उदा. लाच घेणार्‍यांना कसे पकडून द्यायचे इत्यादी. सत्संगाला जाण्याने स्त्रियांचे शोषण होते, असा अभिनव शोध लावल्याबद्दल अंनिसवाल्यांना नोबेल पुरस्कारच दिला पाहिजे.
 
इ. टीका : सत्संगात येणार्‍या स्त्रिया लहानपणापासूनच व्रतवैकल्ये, पूजा याच्यात गुरफटलेल्या. 
 
खंडण : यालाच साधना म्हणतात.
 
ई. टीका : त्यामुळे सत्संगातील ईश्‍वरी इच्छेचे उत्तर त्यांना पटते. या स्त्रिया अशाच रहाव्यात, यासाठीच सनातन संस्था कार्यरत आहे.
 
खंडण : अंनिसमधल्या महिला कार्यकर्त्या आणि सनातनमधील साधिका यांतील जास्त आनंदी जीवन कोण जगत आहे, हे डोळे उघडले, तर अंनिसला दिसेल ! 
 
५. साधना ही ईश्‍वरप्राप्तीसाठी आणि आनंदप्राप्तीसाठी करतात, हे साधना न करणार्‍या अंनिला कसे कळणार ?
टीका : सनातनमध्ये सर्व घरगुती ताणतणावांवर साधना करणे, साधनेत मन रमवणे हे उपाय सांगितले जातात. म्हणजे परिस्थिति जैसे थे ठेवली जाते. त्यात कोणताही बदल घडवून आणण्याचा कार्यक्रम सांगितला जात नाही, तर सर्व सहन करण्यास, अन्याय सोसण्यास भाग पाडले जाते.
 
खंडण : सामान्य माणसाच्या जीवनातील एकूण समस्यांपैकी ८० टक्के समस्या या आध्यात्मिक कारणांमुळेच घडत असतात. त्यामुळे त्या समस्यांवर वरवरचे उपाय करण्यापेक्षा साधना करून त्यांच्या मूळ कारणावरच उपाय केला जातो. अर्थात् अध्यात्म न मानणार्‍यांसमोर कितीही डोकेफोड केली, तरी पालथ्या घड्यावर पाणीच होय !
 
६. अध्यात्मातील गुरु-शिष्य परंपरेविषयी घोर अज्ञान असलेले अंनिसवाले !
अ. टीका : गुरुपणाचे स्तोम सनातन संस्थेत प्रचंड आहे. 
 
खंडण : गुरु-शिष्य परंपरेला गुरुपणाचे स्तोम म्हणणारे धर्मद्रोही अंनिसवाले ! 
 
आ. टीका : स्वतःचे व्यक्तीमत्त्व समृद्ध करण्यासाठी गुरूचे साहाय्य घ्यायचे नाही, तर गुरु सांगेल ते विनातक्रार, बिनडोकपणे, कोणतीही चिकित्सा न करता पार पाडायचे. 
 
खंडण : यामुळेच मनोलय आणि बुद्धीलय होऊन साधक बुद्धीच्या पलीकडे असलेल्या अध्यात्मक्षेत्रात प्रवेश करतो.
 
इ. टीका : असे करणारा साधक तो खरा शिष्य अशा पद्धतीने सनातन संस्थेतील गुरु-शिष्य संबंध बांधण्यात आलेले दिसतात. त्यामुळे त्यांच्या पुस्तकात दिलेली सर्व उदाहरणेही तशीच आहेत. शिष्य या पुस्तकात पान ३९ वर एक उदाहरण दिले आहे. रामदासाचे – एकदा शिष्य अंबादासला समर्थ रामदासस्वामींनी एका झाडाच्या फांदीवर टोकाकडे बसून ती खोडाच्या बाजूला कापायला सांगितली. गुरूंवर पूर्ण श्रद्धा असल्याने त्याने फांदी तशी कापायला सुरुवात केली. फांदी कापल्यावर तो झाडाखालच्या विहिरीत पडला. तीन दिवसांनी समर्थांनी विचारले, खुशाल आहेस ना ? तेव्हा तो म्हणाला, आपल्या कृपेने खुशाल आहे. मग समर्थांनी त्याला बाहेर काढून त्याचे नाव कल्याण असे ठेवले. 
 
खंडण : याला आज्ञापालन म्हणतात, बिनडोकपणा म्हणत नाहीत. आपण विहिरीत पडू, हे ठाऊक असूनही गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवून कल्याणस्वामीने समर्थांचे ऐकले आणि गुरुकृपेने तो तीन दिवसांनी विहिरीतून सुखरूप बाहेर आलाही. पूर्ण गुरुकृपा होऊन त्याची जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटका झाली. 
 
७. गुरुपौर्णिमेच्या आध्यात्मिक महत्त्वाचे आर्थिक दृष्टीने चिकित्सा करणारे अंनिसवाले !
टीका : गुरुपौर्णिमेच्या दिवशी १ सहस्र पटीने गुरुतत्त्व कार्यरत असते. आपण जर ५० रुपये अर्पण केले, तर त्याचे फळ ५० सहस्र मिळेल. 
 
खंडण : ज्यांना गुरुकृपेचे आध्यात्मिक फळ म्हणजे १००० पटींनी मिळणारे पैसे असे वाटते, त्यांची कीव करावी तेवढी थोडी. गुरुकृपा काय लॉटरी आहे कि एकास हजार देणारा मटका ? 
 
८. सत्पात्रे दानम् । हा धर्मशास्त्रीय सिद्धान्त आहे, हे ज्ञात नसलेले अंनिसवाले असेच बरळणार ! 
अ. टीका : सनातन संस्थेकडून अर्पण मिळवण्यासाठी अनेक क्लुप्त्या योजल्या जातात. सध्या संधीकाळ आहे. कलियुग संपून सत्ययुगाचा प्रारंभ होणार आहे. या संधीकालात अर्पण केल्यास सहस्रपट लाभ होईल. 
 
खंडण : कलियुगाच्या अंतर्गत कलियुग संपत असून कलियुगांतर्गत सत्ययुग चालू होणार आहे. हे केवळ सनातन नाही, सर्वच संत सांगत आहेत. सनातन संधीकाळात अर्पण करा, असे नाही, तर साधना करा, असे सांगते, याचे कारण सूर्योदय, सूर्यास्त, ग्रहणकालादी संधीकालात साधना केल्याने जसा लाभ होतो, तसा लाभ या काळात होणार आहे. 
 
आ. टीका : सनातन सांगते की, गेल्या जन्मीचे तुम्ही देणेे लागत असाल, तर ते या जन्मात फेडावे लागेल. हे देणे सनातन संस्थेस, म्हणजे ईश्‍वरी कार्यास अर्पण केले तरी फिटते.
 
खंडण : सनातन संस्था सनातनला नाही, तर संतांना धन अर्पण करा, असे शिकवते; कारण त्यांच्यापेक्षा लायक (पात्र) जगात कोणीच नसते आणि पात्रे दानम् अशी धर्मशास्त्रीय शिकवण आहे. 
 
इ. टीका : असा प्रचार साधकांत करून अर्पण देण्यास भाग पाडले जाते. 
 
खंडण : भाग पाडायला संस्थेत लहान मुले आहेत कि हप्ता गोळा करणारे गुंड आहेत ? 
 
९. साधनेमुळे परिस्थिती गंभीर होईल, असा जावईशोध लावणारे अंनिसवाले !
टीका : जसजसे आपण साधना वाढवत जाऊ, तसतसे आपण सनातनी बनत जाऊ. आपले रूपांतर कळसूत्री बाहुलीत होऊन जाईल. आपल्याला जयंत आठवले सारखे लोक नाचवत रहातील. आपले कोणतेच प्रश्‍न या वांझ साधनेतून सुटणार नाहीत. कोणत्याच दुःखाचा निरास होणार नाही. उलट परिस्थिति जास्तच गंभीर होऊन जाईल. 
 
खंडण : साधना वाढल्याने परिस्थिती गंभीर होत नाही; उलट कुठल्याही आपद्स्थितीला तोंड देण्यासाठी आत्मबळ वाढते. साधना करणार्‍यालाच खरी आनंदप्राप्ती होऊन तो सुख-दुःखाच्या पलीकडे जातो. स्वतः साधना न करताच इतरांना साधना न करण्याचा उपदेश देणे, हा अंनिसवाल्यांचा अविवेक नव्हे का ?
 
१०. आध्यात्मिक संस्थेकडे आर्थिक व्यवस्थेच्या दृष्टीने पहाणारी साम्यवादी विचारांची अंनिस ! 
टीका : सनातन संस्थेसारख्या संस्था येथील आर्थिक व्यवस्था ज्या वर्गाच्या हातात आहे त्याच्याच साहाय्यक, समर्थक असल्याने त्यांना येथील परिस्थिति जैसे थे ठेवायची आहे. 
 
खंडण : अध्यात्मात वर्ग, भांडवलशाही, साम्यवाद इत्यादी काही नसते. हेही ठाऊक नसणार्‍यांनी असे लिखाण करावे, याचे आश्‍चर्य वाटत नाही. 
 
११. सनातन संस्थेसारख्या आध्यात्मिक संस्थेने आध्यात्मिक शब्द वापरायचे नाहीत, तर काय अंनिसवाल्यांनी वापरायचे ?
टीका : ईश्‍वरी राज्याची स्थापना, सत्संग, अध्यात्म, सेवा, प्रीती यांसारखे पारंपरिक आणि येथील सर्वसामान्य, धर्मभोळ्या जनतेच्या मनावर खोलवर बसलेले शब्द हे सनातनवाले वापरतात. या शब्दांनी सर्वसामान्य जनतेला भुलवले जात आहे.
 
खंडण : राजकारण्यांच्या फुकाच्या आश्‍वासनांविषयी न बोलणारी; मात्र आध्यात्मिक संस्थेला आध्यात्मिक शब्द वापरण्यास विरोध करणारी अंनिस !
 
१२. सनातनला फुलेविरोधी ठरवण्याचा अंनिसचा डाव !
टीका : सनातन प्रभात नावाचे दैनिक चालू करून म. फुल्यांवर चिखलफेक करतात.
 
खंडण : महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या म. ज्योतीराव फुले समग्र वाड्मय यातील विचार जसेच्या तसे उद्धृत करण्याला चिखलफेक कधीपासून म्हणतात ? 
 
१३. अंनिसवाल्यांनी हे सिद्ध करावे आणि ५ कोटींचे पारितोषिक घ्यावे !
टीका : 
अ. कुडाळसारख्या ठिकाणी ३६ जीप्स, सुमो गाड्या साधकांच्या तैनातीला उभ्या असतात. 
आ. नवी मुंबई, नाशिक अशा ठिकाणी इमारती, भूमी आहेत. 
इ. गल्लीबोळातील बेरोजगार आणि गुंड प्रवृत्तीचे तरुण एकत्र येऊन सेना बनली. तसे प्रत्येक बुवाकडील भोळे भक्त एकत्र करून सनातन संस्थेची सेना निर्माण होत आहे. 
 
खंडण : एखाद्या आध्यात्मिक संस्थेला कलंकित करण्यासाठी कसे आरोप केले जातात, हेच यावरून लक्षात येते. 
 
१४. शास्त्रीय परिभाषेला वेड म्हणणारे अंनिसवाले शहाणे कि वेडे ?
टीका : सनातन संस्थेत टक्केवारीचे वेड फार दिसते. या लेखातील एका चौकटीच्या शीर्षकाला टक्के (टोणपे) असा शब्दप्रयोग केला आहे.
 
खंडण : सनातन संस्था अध्यात्म टक्केवारीच्या भाषेत सांगते. त्याला टोणपे म्हणणारे टोणगे आहेत, असे म्हटल्यास ते योग्य ठरणार नाही का ?
 
१५. शंकानिरसन हेच सनातनच्या सत्संगाचे वैशिष्ट्य आहे, हेही ज्ञात नसलेल्या अंनिसवाल्यांची अभ्यासशून्य टीका !
टीका : सनातन संस्थेतला मूलभूत मंत्र म्हणजे लोकांची विचारक्षमता नष्ट करा ! बुद्धी वापरू नका ! शंका विचारू नका !
 
खंडण : सनातनच्या सहस्रो सत्संगांपैकी एखाद्या सत्संगात जरी अंनिसवाला गेला असता, तरी त्याला तेथे शंकानिरसन केले जात, हे अनुभवास आले असते. अर्थात् सत्याचा शोध घ्यायची अंनिसची प्रथा नसल्याने ते अशी विधाने करतात. 
 
१६. उत्कृष्ट पत्रकारितेविषयी ज्या सनातन प्रभातला अर्धा डझनहून अधिक पुरस्कार मिळाले आहेत, त्याला विकृत म्हणणारे वैचारिक दिवाळखोर अंनिसवाले !
टीका : दैनिक, साप्ताहिक सनातन प्रभातमधून विकृत केलेल्या बातम्यांचा रतिब आहेच !
 
खंडण : बातम्यांसह समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताच्या दृष्टीकोन मांडणे, यास विकृत केलेल्या बातम्या म्हणणे, ही आहे अंनिसवाल्यांची अविवेकी वृत्ती !
 
१७. अंनिसवाल्यांची हीन दर्जाची भाषा !
टीका : मेंदू गहाण टाकणे म्हणजे काय ?, हे अभ्यासायचे असेल, तर सनातन संस्थेच्या साधकांचा अभ्यास करावा.
 
खंडण : साधनेमुळेच मेधा, प्रज्ञा आणि प्रतिभा शक्ती जागृत होतात आणि म्हणूनच सनातनचे साधक संख्येने अल्प असूनही मेंदूचा योग्य वापर करून विविध माध्यमांद्वारे जगभर हिंदु धर्म पोहोचवत आहेत. अशा साधकांसाठी मेंदू गहाण टाकणे, हा शब्द योजणार्‍या अंनिसवाल्यांनो, डॉ. दाभोलकरांचा एक तरी शिष्य महाराष्ट्राच्या बाहेर अंनिसची चळवळ नेऊ शकला का, याचे आधी उत्तर द्या !
 
१८. हा शोध अंनिसने कशाच्या आधारे लावला, हे विचारण्यात अर्थ नाही; कारण अशा बरळण्याविषयी अंनिस प्रसिद्ध आहे !
टीका : सर्वसामान्यांना दुर्जनांचा नाश, ईश्‍वरी राज्याची स्थापना, ईश्‍वरी सेवा यांसारख्या शब्दांची भुरळ पडते. सध्याच्या व्यवस्थेतील भ्रष्टाचार, गुंडगिरी, बेकारी, महागाई, असुरक्षितता यांच्या विळख्यात हा सर्वसामान्य सापडलेला असतोच. ही दुःखे त्यालाही छळत असतातच. त्यातून त्यालाही सुटका हवीच असते. 
 
त्याच्याही मनात सुखी, समाधानी आयुष्याच्या कल्पना तरंगत असतातच. त्यामुळे सनातनच्या सर्व शब्दजंजाळात तो फसला जातो. जे यांच्यात सामील होऊन मठ्ठ सनातनी बनत नाहीत ते दुर्जन. जे भ्रष्टाचारी, अनाचारी, अत्याचारी आहेत ते त्यांच्या मते दुर्जन नाहीतच.
 
खंडण : भ्रष्टाचार, गुंडगिरी, बेकारी, महागाई, असुरक्षितता यांच्यापासून समाजाची सुटका करण्यासाठी अंनिसने इतकी वर्षे काय केले ? सनातनचे या प्रत्येक सूत्राच्या संदर्भात गेली १० – १५ वर्षे कार्य चालू आहे. 
 
१९. अंनिसरूपी डोमकावळ्यांची निरर्थक कावकाव !
टीका : या संस्था अत्यंत आधुनिक बाजारी तंत्रे वापरून सर्वसामान्यांना आपल्याकडे खेचताहेत आणि या सर्वसामान्यांचे रूपांतर एका निष्क्रीय, मठ्ठ, सनातनी मानसिकतेत करून टाकीत आहेत. असंतोषाची ठिणगी पडण्यापूर्वीच विझवून टाकली जात आहे.
 
खंडण : अंनिसवाले कुठल्या असंतोषाच्या ठिणगीविषयी बोलत आहेत ? आज १५ वर्षांनंतर सनातनने हिंदु धर्माच्या श्रद्धासंवर्धन चळवळीत गरूडछेप घेतली असतांना दुसरीकडे अंधश्रद्धेच्या नावाखाली श्रद्धा निर्मूलन करायला निघालेल्या अंनिसची न पेटलेली ठिणगीच विझलेली दिसत आहे ! कालाय तस्मै नमः ।
 

सनातन संस्था गणेशमूर्ती विसर्जनाविषयीचे अध्यात्मशास्त्र सांगते !

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र या मासिकाच्या फेब्रुवारी २००३ च्या अंकामध्ये भ्रामक विज्ञान या सदराखाली गणेशमूर्ती विसर्जनाचे हास्यास्पद विज्ञान हा सनातनद्वेषी लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखात म्हटले आहे, 
१. टीका : सनातनने गणेशमूर्तीचे विसर्जन वहात्या पाण्यात करा ! या पत्रकात मांडलेले सनातनचे विचार हे मूळ हिंदु धर्मातील कल्पनेशी विसंगत आहेत. 
 
खंडण : सनातनचे विचार हिंदु धर्मातील कल्पनेशी विसंगत आहेत, हे सांगणारी अंनिस कोणी हिंदु धर्माची अधिकारी आहे का ? हिंदु धर्मात कल्पना नाहीत, तर चिरंतन शास्त्र आहे, हेही अंनिसवाल्यांना माहीत नाही. धर्मसिंधू या धर्मग्रंथात म्हटले आहे – अग्निना दारुजं दग्धं क्षिप्तं शैलादिकं जले ।, म्हणजेच काष्ठापासून (लाकडापासून) बनवलेल्या (देवतांच्या) मूर्ती अग्नीने दग्ध करून, तर पाषाण/धातू आदींपासून बनवलेल्या मूर्ती पाण्यामध्ये विसर्जित कराव्यात.
 
२. टीका : सनातनच्या गणेशमूर्तीचे विसर्जन या दुसर्‍या पत्रकानुसार एक दिवसापेक्षा जास्त काळ देवत्व रहात नाही. (ही बाब हिंदु धर्माशी विसंगत आहे.) मग दीड दिवसापर्यंत दहा दिवसांपर्यंत गणेशमूर्तींचे विसर्जन होत असतांना पाण्यात पसरण्यासाठी पवित्रके किंवा देवत्व कोठून येणार ? 
 
खंडण : अध्यात्मशास्त्राचा अर्धवट अभ्यास करणार्‍यांना या गोष्टी हिंदु धर्माशी विसंगत वाटणारच ! या संदर्भातील अध्यात्मशास्त्र असे – मूर्तीतील देवत्व नष्ट झाले, तरी देवत्वाचा परिणाम म्हणून मूर्तीत २१ दिवसांपर्यंत श्री गणपतीचे चैतन्य टिकून असते. तसेच गणेशोत्सवाच्या काळात मूर्तीची पूजा-अर्चा होत असल्याने पूजकाच्या भक्तीभावाप्रमाणे मूर्तीतील चैतन्यात वाढही होऊ शकते. २१ दिवसांनंतर मूर्तीतील चैतन्य हळूहळू घटू लागते. 
 
३. टीका : सनातनच्या विचारांतील ही आध्यात्मिक बनवाबनवी थोडा विचार केला तर लक्षात येऊ शकते. 
 
खंडण : अध्यात्माचा अभ्यास न करणार्‍यांना ही आध्यात्मिक बनवाबनवीच वाटणार. 
 
४. टीका : एखाद्या गोष्टीच्या समर्थनासाठी विज्ञानाचा उपयोग करावयाचा असेल, तर विज्ञानाच्या नियमाची कसोटी त्यास लावली पाहिजे.
 
खंडण : विज्ञान म्हणजे केवळ भौतिकशास्त्र नव्हे ! अध्यात्मातही विज्ञान आहे. वेदांमध्येही विज्ञान आहे. डोळस विज्ञानवाद असेल, तर ते लक्षात येईल. विज्ञानाविषयीच अंधविश्‍वास असलेल्यांना अध्यात्मातील विज्ञान कसे कळणार ? (वैज्ञानिक उपकरणांद्वारे सनातनने शेकडो प्रयोग केले आहेत. त्यांत त्यांच्या निष्कर्षानुसार अध्यात्माचे महत्त्व लक्षात येते.)