ऋषिपंचमी

१. तिथी

ऋषिपंचमी हे व्रत भाद्रपद शुद्ध पंचमी या तिथीला साजरे करतात.

 

२. ऋषि

कश्यप, अत्रि, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि आणि वसिष्ठ हे सप्तर्षी आहेत.

 

३. उद्देश

अ. ‘ज्या ऋषींनी आपल्या तपोबलाने जगतातील मानवावर अनंत उपकार करून ठेवले आहेत, मानवाच्या जीवनाला योग्य दिशा दाखविली आहे, त्या ऋषींचे स्मरण या दिवशी केले जाते.’ – प.पू. परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

आ. मासिक पाळी, अशौच आणि स्पर्शास्पर्श यांचा स्त्रियांवर होणारा परिणाम या व्रताने, तसेच गोकुळाष्टमीच्या उपवासानेही कमी होतो. (पुरुषांवर होणारा परिणाम क्षौरादी प्रायश्चित्त कर्माने आणि वास्तूवर होणारा परिणाम उदकशांतीने कमी होतो.)

 

४. व्रत करण्याची पद्धत

अ. या दिवशी स्त्रियांनी सकाळी आघाड्याच्या काडीने दात घासावेत.

आ. आंघोळ झाल्यावर पूजेपूर्वी ‘मासिक पाळीच्या वेळी कळत-नकळत केलेल्या स्पर्शांमुळे जे दोष लागतात, त्यांच्या निराकरणासाठी अरुंधतीसह सप्तर्षींना प्रसन्न करण्यासाठी मी हे व्रत करीत आहे’, असा संकल्प करावा.

इ. पाटावर तांदुळाच्या आठ पुंज्या घालून त्यांवर आठ सुपार्‍या ठेवून कश्यपादी सात ऋषि आणि अरुंधती यांचे आवाहन अन् षोडशोपचार पूजन करावे.

ई. या दिवशी कंदमुळांचा आहार घ्यावा आणि बैलांच्या श्रमाचे काहीही खाऊ नये, असे सांगितले आहे.

उ. दुसर्‍या दिवशी कश्यपादी सात ऋषि आणि अरुंधती यांचे विसर्जन करावे.

बारा वर्षांनी किंवा वयाच्या पन्नाशीनंतर या व्रताचे उद्यापन करायला हरकत नाही. उद्यापनानंतरही हे व्रत चालू ठेवता येते.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव व व्रते’

 

५. इतर माहिती

अ. ‘नागांना ऋषि म्हणतात. एका बाजूला स्त्री आणि दुसर्‍या बाजूला पुरुष असा नांगर ओढून त्यातून आलेले धान्य ऋषिपंचमीला खातात. ऋषिपंचमीला जनावरांच्या मदतीने बनविलेल्या धान्याचे अन्न खायचे नसते.

आ. पाळी बंद झाल्यावर स्त्रिया ऋषिऋण फेडण्यासाठी ऋषिपंचमीचे व्रत करतात.

इ. व्याहृती म्हणजे जन्म देण्याची क्षमता. ७ व्याहृतींना ओलांडण्यासाठी ७ वर्षे व्रत करतात. नंतर व्रताचे उद्यापन करतात.

 

६. अनुभूती

ऋषिपंचमीच्या दिवशी ‘आकाशातून सप्तऋषी आणि अरूंधती आशीर्वाद देत आहेत’, असे दिसणे

‘सप्टेंबर १९९९ च्या ऋषिपंचमीला मला ताप येत होता. ऋषिपंचमीला उपवास असतो. कंदमुळांची भाजी करणे, एकशे आठ तांबे थंड पाण्याने आंघोळ करणे, आघाड्याच्या काठीने दंतधावन करणे असे करावे लागते. मला तापामुळे थंड पाण्याने आंघोळ करणे शक्य नव्हते; म्हणून मी सप्तऋषींनाच प्रार्थना केली, ‘मला क्षमा करा. माझ्याने हे सगळे होणार नाही.’ तेव्हा मी जिथे उभी होते तेथील स्नानगृह नाहीसे झाले आणि सर्वत्र आकाश दिसायला लागले. ‘आकाशातून सप्तऋषी आणि अरूंधती मला आशीर्वाद देत आहेत’, असे दिसले. ऋषींनी धोतर आणि उपरणे नेसलेले होते अन् केस रूद्राक्षांच्या माळांनी बांधलेले होते. अरूंधतीने पांढरी साडी, पांढरे पोलके परिधान केले होते आणि केशभूषा आम्ही डोक्यावरून आंघोळ केल्यावर केस बांधतो तशी होती.’ – सौ. राधा मराठे, नेसाई, गोवा.

Leave a Comment