दिवसातून ४ – ४ वेळा खाणे टाळा !

Article also available in :

अनुक्रमणिका

वैद्य मेघराज माधव पराडकर

१. आरोग्य चांगले रहाण्यासाठी दिवसभरात किती वेळा आहार घ्यावा ?

‘दिवसातून केवळ २ वेळा आहार घेणे’, हे आदर्श आहे. यामुळे शरीर निरोगी रहाते. हे शक्य नसल्यास जास्तीतजास्त ३ वेळा आहार घ्यावा. सकाळी शौचाला साफ झालेले असणे, शरीर हलके असणे आणि चांगली भूक लागलेली असणे ही लक्षणे निर्माण झाल्यावरच सकाळचा अल्पाहार करावा. ही लक्षणे निर्माण झाली नाहीत, तर सकाळी १० वाजेपर्यंत काही खाऊ नये. तहान लागल्यास केवळ गरम पाणी प्यावे. सकाळी १० वाजल्यानंतर अल्पाहार (‘अल्प’ आहार) करावा. अशा वेळी दुपारचे जेवण साधारण १ ते २ वाजता घ्यावे. सायंकाळी ७ वाजता रात्रीचे जेवण घ्यावे. असे ३ वेळा आहार घेणेही आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे.

 

२. खाण्याचे पदार्थ सहज उपलब्ध असले, तरी जास्त वेळा खाण्याचा मोह टाळा !

घरी डब्यांमध्ये खाऊ ठेवलेला असतो. काही वेळा नोकरीच्या ठिकाणी सकाळ-सायंकाळ चहा असतो. हॉटेलमध्ये कधीही खाण्याचे पदार्थ उपलब्ध असतात. पुष्कळजण एका ठिकाणी रहातात, अशा ठिकाणी ४ – ४ वेळा आहार उपलब्ध असतो. असे असले, तरी ही केवळ सोय असते. ३ पेक्षा जास्त वेळा आहार घेणे किंवा दिवसभर खात रहाणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. कधीतरी भूक लागली म्हणून किंवा वेगळेपणा म्हणून अतिरिक्त वेळी खाणे चालते; पण प्रतिदिन नेमाने जास्त वेळा खाणे टाळावे.’

 

३. प्रतिदिन सायंकाळी चहा-फराळ करणे आवश्यक नसल्याने ते सोडा !

‘अनेकजण सायंकाळच्या वेळेत चहा आणि फराळ करतात. फराळामध्ये शेव, चिवडा, फरसाण यांसारखे तळलेले पदार्थ खातात. खरेतर या सायंकाळच्या चहा-फराळाची शरिराला थोडीसुद्धा आवश्यकता नसते, तरीही बहुतेक जण केवळ घरी हे पदार्थ आणून ठेवलेले आहेत किंवा उपलब्ध आहेत, म्हणून खातात. शेव, चिवडा यांसारखे पदार्थ वर्षातून एकदा खाण्यासारखे आहेत; पण आजकाल उपलब्ध आहेत, म्हणून हे पदार्थ प्रतिदिन खाल्ले जातात. मनावर थोडेसे नियंत्रण ठेवून प्रतिदिन सायंकाळी करण्यात येणारा चहा-फराळ सोडून तर पहा ! सायंकाळच्या वेळी चहा प्यायलात नाही, म्हणून फारतर २ – ३ दिवस डोकेदुखीच तेवढी काय ती होईल; परंतु प्रतिदिनचा चहा-फराळ सोडलात, तर तुम्ही निरोगी जीवनाच्या दिशेने निश्चितच एक पाऊल पुढे टाकलेले असेल. चहा-फराळ सोडल्याने होणारी डोकेदुखी किंवा पोटात पडणारी आग शमवण्यासाठीही सोपे उपाय आहेत.

जे कष्टाची कामे करतात, त्यांनी ३ वेळा आहार घेतला, तरी चालतो; परंतु जे बैठी कामे करतात, त्यांनी २ वेळाच आहार घ्यायला हवा. यापेक्षा जास्त वेळा खाल्ल्यास ते आरोग्य बिघडवण्यास कारण ठरते. ’

 

४. ‘सायंकाळी वेळ झाल्यावर चहा-फराळाची इच्छा होणे’ हे खोट्या भुकेचे लक्षण

‘सायंकाळच्या चहा-फराळाची आरोग्याच्या दृष्टीने खरोखर काही आवश्यकता नसते. प्रतिदिन शेव, चिवडा इत्यादी तळलेले पदार्थ खाऊन आपण हृदयविकाराची शक्यता वाढवत असतो. नेहमी सायंकाळी चहा-फराळ करायची सवय झाली की, ती सवय मोडता येत नाही. वेळ झाली की, शरिराला आवश्यकता नसली, तरी भूक लागते आणि इथेच आपण फसतो. ‘ही खोटी भूक आहे’, हे आपण लक्षात घ्यायला हवे.

४ अ. सकाळी अल्पाहाराच्या वेळेस लागणारी भूक ही ‘खोटी भूक’ !

‘काहींना सकाळी उठल्या उठल्या पुष्कळ भूक लागते. काहींना सकाळी अल्पाहाराच्या वेळेस, म्हणजे सकाळी ८ ते ९ या वेळेत भूक लागते. ही भूक सवयीमुळे लागलेली ‘खोटी भूक’ असते. या वेळेत व्यायाम किंवा शारीरिक कामे केल्यास ही भूक नाहीशी होते. मग पुन्हा काही काळाने भूक लागते. व्यायाम झाल्यावर पुन्हा भूक लागते त्या वेळी ‘लेखांक ६३’ यात दिल्याप्रमाणे तूप खावे. तूप खाल्ल्याने तात्पुरती भूक भागते. पित्ताचा त्रास होत नाही आणि दुपारी जेवणाच्या वेळेत चांगली भूक लागते. ‘दिवसातून २ वेळा आहार घेणे आणि अवेळी भूक लागल्यास तूप खाणे’, असे केल्यावर काही दिवसांनी आहारामध्ये योग्य प्रमाणात वाढ होते आणि अवेळी भूक लागणेही बंद होते. असे झाल्यावर जेवण सोडून अन्य वेळी तूप खाण्याची आवश्यकता रहात नाही.’

 

५. ४ वेळा खाण्याची सवय मोडून २ वेळाच आहार
घेण्याची आरोग्यदायी सवय लावण्यासाठी चहा-फराळ सोडणे आवश्यक

शरीर ही ईश्वराने बनवलेली एक अद्भुत यंत्रणा आहे. आपण शरिराला जी सवय लावू, ती लागते. दिवसातून ४ वेळा खाण्याची सवय लावली, तर शरीर दिवसातून ४ वेळा खायला मागेल. २ वेळाच खाण्याची सवय लावली, तर २ वेळाच मागेल; परंतु ४ वेळा खाण्याची सवय असल्यास ती मोडणे कठीण जाते. अशा वेळी आरंभी सायंकाळचा चहा-फराळ सोडावा, म्हणजे ४ पेक्षा ३ वेळा आहार होईल.

 

६. ‘चहा-फराळ सोडतांना शरिराला पित्ताचा त्रास होऊ नये’,
यासाठी पोटात जठराच्या हालचाली जाणवतील, तेव्हा चमचाभर तूप खा !

सायंकाळचा चहा-फराळ सोडण्यासाठी मनाचा निश्चय करावा. आपल्याकडून होणार्‍या चुकांसाठी प्रायश्चित्त म्हणूनही सायंकाळचा चहा-फराळ सोडता येईल. नेहमीच्या सवयीनुसार सायंकाळच्या फराळाची वेळ झाली की, भूक लागेल. त्या वेळी शारीरिक सेवा कराव्यात, म्हणजे भुकेचे विचार निघून जातील. तरीही भूक लागली, तर थोडे पाणी प्यावे. याने भूक शमते. असे करूनही काही जणांची भूक शमत नाही. पोटामध्ये जठराच्या हालचाली जाणवतात आणि पुष्कळ भूक लागते. अशा वेळी चहाचे १ – २ चमचे (५ ते १० मिलि) तूप चघळून खावे आणि शक्य असल्यास वर थोडे गरम पाणी प्यावे. निवळ तूप खाणे कठीण जात असेल, तर तुपामध्ये थोडी साखर किंवा गूळ घालावा. तूप प्यायल्याने पोटामधील भगभग (आग) शमते. तुपावर गरम पाणी प्यायल्याने तूप पचायला साहाय्य होते. यासाठी स्वतःकडे तुपाची बरणी बाळगा आणि अवेळी पुष्कळ भूक लागून पोटात जठराच्या हालचाली जाणवतील, तेव्हा चमचाभर तूप खा !’

 

७. गृहिणींनो, दुपारच्या जेवणामध्ये विविधता आणा !

‘माणूस हा चवीचा भोक्ता आहे. विविध प्रकारचे चवदार पदार्थ खाण्याची आवड प्रत्येकालाच असते. बर्‍याच वेळा असे होते की, आठवड्याभरात घरी अल्पाहारासाठी प्रतिदिन वेगळा पदार्थ बनतो; परंतु दुपारच्या जेवणात ‘तोच तोच’पणा असतो. असे झाल्याने घरच्या व्यक्तींना भूक नसतांना केवळ चवीसाठी अल्पाहार खाण्याची इच्छा होते. त्यामुळे सकाळचा किंवा सायंकाळचा अल्पाहार सोडवत नाही. घरच्यांना २ वेळाच आहार घेण्याची आरोग्यदायी सवय लावायची असेल, तर दुपारच्या जेवणात विविधता आणावी. गृहिणींनी नेहमी नवीन शिकण्याची सवय ठेवल्यास हे सहज शक्य आहे.’

 

८. ‘भूक सहन करता येणे’ हे आरोग्याचे एक लक्षण !

‘बर्‍याच जणांचे असे सांगणे असते की, त्यांना भूक सहन होत नाही. खाण्याची वेळ झाली की, खावेच लागते; परंतु हे शारीरिक क्षमता न्यून असल्याचे लक्षण आहे, हे लक्षात घ्यायला हवे. भूक सहन होण्याची क्षमता निर्माण होण्यासाठी हळूहळू आहाराच्या एकूण वेळा न्यून करून केवळ २ वेळा आहार घेण्याची सवय लावायला हवी.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

Leave a Comment