फोडणीच्या पोह्यांनी पित्त होते का ?

Article also available in :

‘फोडणीचे पोहे हा अल्पाहारामध्ये जास्त खाल्ला जाणारा पदार्थ आहे. काही जणांना फोडणीचे पोहे खाल्ल्यावर घशात किंवा छातीत जळजळणे आणि मळमळणे असे त्रास होतात. त्यामुळे ‘फोडणीच्या पोह्यांनी पित्त होते’, असा त्यांचा समज होतो. आयुर्वेदानुसार नुसते पोहे पित्तकारक नाहीत. आंबट, खारट, तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने पित्त होते. बर्‍याच वेळा फोडणीचे पोहे करतांना पुष्कळ तेल वापरले जाते. हे तेल एवढे असते की, पोहे खाल्ल्यावर ताटलीलाही भरपूर तेल लागलेले दिसते. काही वेळा, तर पोहे मुठीत धरून पिळले, तर त्यातून तेल निघेल, एवढे तेल वापरलेले असते. या तेलकटपणामुळे पित्त होते. फोडणीचे पोहे बनवतांना अत्यंत अल्प प्रमाणात तेल वापरले, तर पित्ताचा त्रास होत नाही. अत्यल्प तेल वापरूनही उत्तम चवीचे फोडणीचे पोहे बनवता येतात. ज्यांना हे येत नाही, त्यांनी ओळखीच्या सुगरणींकडून ते शिकून घेतले, तर घरातील पित्ताचे त्रास पुष्कळ न्यून होतील.’

 

तूरडाळ खाल्ल्याने पित्त होते का ?

‘कुळीथ आणि उडीद सोडल्यास सर्व कडधान्यांच्या डाळी पित्त न्यून करणार्‍या आहेत. त्यामुळे ‘तूरडाळीने पित्त होते’, हा निवळ अपसमज आहे. तूरडाळीची आमटी करतांना त्यामध्ये जास्त प्रमाणात आंबट किंवा तिखट घातले असेल, तर त्याने मात्र पित्त होते. यामध्ये दोष तूरडाळीचा नसून आंबट आणि तिखट यांचा असतो.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

Leave a Comment