परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातून प्रक्षेपित होणार्‍या तेजतत्त्वरूपी प्रकाशाची प्रचीती देणार्‍या काही बुद्धीअगम्य अनुभूती !

अनुक्रमणिका

मानवी देह पंचमहाभूतांनी बनलेला आहे. व्यक्तीची साधना जसजशी वाढते, तसतशी देहातील पंचमहाभूतांना जागृती येते. व्यक्तीच्या साधनेनुसार आणि कार्याच्या आवश्यकतेनुसार देहातील विशिष्ट तत्त्वाचे प्रमाण अल्प-अधिक होत असते. संतांच्या साधनेमुळे त्यांच्या देहातील ईश्वरी तत्त्वाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे अशा सात्त्विक देहावर पंचमहाभूतांचा झालेला परिणाम साधना करणार्‍या इतर सात्त्विक जिवांना सहजतेने दिसून येतो. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे साधकांना ईश्वरप्राप्ती व्हावी, यासाठी अखंड मार्गदर्शन करत असतात. हिंदु राष्ट्राची स्थापना करून सर्वत्र सात्त्विक राज्य यावे, राष्ट्राला धर्माचे अधिष्ठान लाभावे, या संकल्पाने ते कार्यरत आहेत. त्यांच्या या ईश्वरी कार्यामुळे त्यांचा देहही ईश्वरी तत्त्वांनी भारित झाला आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहात काळानुरूप, कार्यानुरूप विविध बुद्धीअगम्य पालट दिसून येतात. नुकतेच परात्पर गुरु डॉक्टरांच्या देहातील तेजतत्त्वरूपी प्रकाशाच्या संदर्भात सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात विविध प्रयोग करण्यात आले. या प्रयोगांतून विविध बुद्धीअगम्य अनुभूतींचे नवे दालनच अखिल मानवजातीसाठी खुले झाले आहे. हे प्रयोग, त्याचे छायाचित्रीकरण आणि त्यामागील अध्यात्मशास्त्र इत्यादींविषयी या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हातांच्या बोटांतून
उदबत्तीच्या धुराप्रमाणे धूर आणि पांढरा प्रकाश बाहेर पडत असल्याचे दिसणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना साधारण जानेवारी २०२२ मध्ये लक्षात आले की, मंद प्रकाशात त्यांनी स्वतःच्या हाताकडे पाहिल्यावर हाताच्या बोटांतून उदबत्तीच्या धुराप्रमाणे धूर आणि पांढरा प्रकाश येत आहे. त्यांनी याविषयी समवेत असलेल्या साधकांना विचारले, तेव्हा त्यांनाही परात्पर गुरु डॉक्टरांच्या हाताच्या बोटांच्या टोकांतून उदबत्तीच्या धुराप्रमाणे धूर आणि पांढरा प्रकाश प्रक्षेपित होत असल्याचे दिसले. काही वेळा त्यांचा तळहात आणि मनगटाच्या पुढे १० – १२ सें.मी. पर्यंतचा हात यांमधूनही हा धूर येतांना दिसतो. ही एक बुद्धीअगम्य घटना लक्षात आली असली, तरी परात्पर गुरु डॉक्टरांनी अत्यंत जिज्ञासेने यासंदर्भात पुढील संशोधन केले. या घटनेनंतर ते जेव्हा जेव्हा साधकांना भेटले, तेव्हा तेव्हा त्यांनी उपस्थित साधकांकडूनही हा प्रयोग करून घेतला. तेव्हा त्या सत्संगातील साधकांनाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दोन्ही हातांच्या बोटांतून उदबत्तीच्या धुराप्रमाणे धूर आणि पांढरा प्रकाश बाहेर पडत असल्याचे दिसले.

 

२. अल्प प्रकाशात साधकाच्या हाताच्या तळव्याच्या
तुलनेत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हाताचा तळवा स्पष्टपणे दिसणे

हातांच्या तळव्यांचे प्रयोग करत असतांना एक दिवस परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांकडून आणखी एक प्रयोग करवून घेतला. ‘अल्प प्रकाशात परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांच्याप्रमाणेच गोरा वर्ण असलेला साधक यांच्यापैकी कुणाच्या हाताचा तळवा उठून दिसतो ?’, असा तुलनात्मक प्रयोग घेण्यात आला. या प्रयोगाच्या वेळी लक्षात आले की, अनेक साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हाताचा तळवा अल्प प्रकाशातही दिसतो आणि त्यातून उदबत्तीच्या धुराप्रमाणे धूर अन् पांढरा प्रकाश बाहेर पडतांना दिसतो. प्रयोगासाठी बसलेल्या साधकाचा हात अन्य साधकांना त्याच प्रकाशात स्पष्ट दिसत नाही, तसेच परात्पर गुरु डॉक्टरांच्या हाताच्या संदर्भात आलेल्या अनुभूतीही येत नाहीत.

 

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा तोंडवळा, तळहात आणि
तळपायहे मंद प्रकाशात एकत्रित बघितल्यास तळपाय सर्वाधिक उठून दिसणे

तेजतत्त्वाच्या प्रयोगांतर्गत आणखी एक प्रयोग करण्यात आला. या प्रयोगात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा तोंडवळा, हातांचे तळवे आणि चरणांचे तळवे हे अंधारात किती स्पष्ट दिसतात अन् त्या तिन्हींपैकी अधिक स्पष्ट काय दिसते ?’, यांचा अभ्यास करण्यात आला. या प्रयोगाच्या अंती लक्षात आले की, मंद प्रकाशात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मुखमंडल स्पष्ट दिसते. त्याहून अधिक त्यांच्या हातांचे तळवे प्रकाशमान आणि सुस्पष्ट दिसतात. मुखमंडल आणि हातांचे तळवे यांहून त्यांच्या चरणांचे तळवे अधिक प्रकाशमान दिसतात. या छायाचित्रामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तळहात आणि तळपाय हे तेल लावल्याप्रमाणे तुकतुकीत, तसेच चमकदारही दिसतात. ते त्यांच्या देहातील अनुक्रमे वायुतत्त्व आणि तेजतत्त्व यांमुळे !

छायाचित्र काढण्याची केलेली पूर्वसिद्धता

 

परात्पर गुरु डॉक्टरांच्या तोंडवळ्याच्या तुलनेत हातांचे तळवे आणि त्याहून अधिक चरणांचे तळवे प्रकाशमान दिसतात, हे दर्शवणारे छायाचित्र

३ अ. छायाचित्र काढतांना घेण्यात आलेली दक्षता !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा तोंडवळा, हातांचे तळवे आणि चरणांचे तळवे यांत तुलनेने चरणांचे तळवे अधिक प्रकाशमान दिसतात’, हे दाखवण्यासाठी त्यांचे छायाचित्र काढण्यात आले. हे छायाचित्र काढतांना पुढील दक्षता घेण्यात आली.

३ अ.१. कपड्यांच्या रंगाचा प्रयोगावर परिणाम होऊ नये, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा तोंडवळा, तळहात आणि तळपाय वगळता बाकी देहावर काळे कापड घालण्यात आले.
३ अ.२. चित्रीकरण कक्षातील पार्श्वभूमीला असलेल्या भिंतीला काळ्या रंगाचे कापड लावण्यात आले.

३ आ. छायाचित्रीकरणाची मर्यादा

हे अल्प प्रकाशातील छायाचित्र (low light photography) असल्याने या छायाचित्रांची गुणवत्ता थोडी अल्प आहे. प्रकाश अपुरा असल्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मुखावर लालसरपणाही आला आहे; परंतु प्रयोग अल्प प्रकाशातच करायचा असल्याने ही तडजोड स्वीकारावी लागली.

 

४. अल्प प्रकाशात साधकाच्या तुलनेत परात्पर गुरु डॉ. आठवले अधिक स्पष्ट दिसणे

आधीच्या प्रयोगांचा पुढील टप्पा म्हणून ‘अल्प प्रकाशात परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांच्यासारख्या गोर्‍या वर्णाचा साधक यांच्याकडे पहाणे’ अशा स्वरूपाचे प्रयोग पुढील काही सत्संगांमध्ये घेण्यात आले. या प्रयोगांमध्ये साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले अल्प प्रकाशातही स्पष्टपणे दिसले. परात्पर गुरु डॉक्टरांचा सदरा तर दिसून येतोच, तसेच त्यांचे डोळे, नाक, कान हे अवयवही अल्प प्रकाशात स्पष्टपणे दिसून येतात; पण त्यांच्या समवेत असलेल्या साधकाच्या देहाची केवळ बाह्यरेषा दिसते. त्या वेळी साधकाचा तोंडवळा, डोळे, कान आदी स्पष्ट न दिसता केवळ गालांचे उंचवटे दिसतात.

अशाच प्रकारे ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि एक साधक यांनी अंधारातून प्रकाशाकडे चालत पुढे पुढे येणे’, असा प्रयोगही घेण्यात आला. या प्रयोगातूनही ‘साधकाच्या तुलनेत परात्पर गुरु डॉक्टर मंद प्रकाशात अधिक स्पष्ट दिसून येतात’, हे लक्षात आले.

४ अ. अंधारातून प्रकाशाच्या दिशेने चालत येतांना घेण्यात आलेली निरीक्षणे

अंधारातून प्रकाशाच्या दिशेने चालत येणे, या प्रयोगाच्या वेळी छायाचित्रकाच्या समोरच्या बाजूला अंधार होता आणि छायाचित्रकाच्या मागे मंद प्रकाशाचा दिवा लावला होता. प्रयोगामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांच्यासारखा गौर वर्ण असलेला एक साधक छायाचित्रकापासून ८.५ मीटर दूर अंतरापासून (अंधार असलेल्या ठिकाणाहून) छायाचित्रकाकडे (प्रकाश असलेल्या ठिकाणाकडे) चालत आले. ते दोघे पुढे पुढे चालत येतांना केलेली निरीक्षणे खालील सारणीत दिली आहेत.

या प्रयोगातील छायाचित्रे छापून येण्यात तांत्रिक मर्यादा असल्याने प्रसिद्ध केलेली नाहीत. या प्रयोगाचे चलचित्र (Video) सनातन संस्थेकडे उपलब्ध आहे.

४ आ. प्रयोग करतांना घेण्यात आलेली दक्षता

४ आ.१. चित्रीकरण कक्षेतील पार्श्वभूमीला (परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांच्या बरोबर साधक चालत आले, त्यांच्या मागे) असलेल्या भिंतीला काळे कापड लावण्यात आले.
४ आ.२. छायाचित्रकाच्या मागे मंद प्रकाशाचा दिवा लावण्यात आला.
४ आ.३. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि प्रयोगात सहभागी साधक यांनी समान रंगाचा (बदामी) सदरा परिधान केला होता.

४ इ. प्रयोगात सहभागी व्यक्तींच्या आध्यात्मिक
पातळीनुसार त्यांची मंद प्रकाशातील दृष्यमानता अल्प-अधिक असू शकणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासमवेत प्रयोगात सहभागी असलेल्या साधकाची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के आहे. व्यक्तीची आध्यात्मिक पातळी याहून अधिक असल्यास तिच्यातील चैतन्य वाढत असल्याने त्या व्यक्तीची दृष्यमानता मंद प्रकाशात अधिक असू शकते.

 

५. कृतज्ञता

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील संशोधक वृत्तीमुळे आजच्या काळातही या दैवी घटना अनुभवण्यास मिळतात. त्यांनी त्यांच्या देहातून प्रक्षेपित होणारा धूर आणि प्रकाश यांच्या अनुभूती दिल्या. यासाठी त्यांच्या कोमल चरणी कोटी कोटी कृतज्ञता !

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., गोवा. (४.६.२०२२)

अखिल मानवजातीसाठी चंदनासम देह झिजवणार्‍या गुरुमाऊलीप्रती कृतज्ञता !

परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहात काळानुरूप अनेक बुद्धीअगम्य पालट होत असतात. साधनेमुळे व्यक्तीच्या देहात कशा प्रकारे पालट होतात, हे अखिल मानवजातीला कळावे, यासाठी परात्पर गुरु डॉक्टर या पालटांचे चित्रीकरण करून ठेवण्यास सांगतात, तसेच या पालटांची छायाचित्रेही काढली जातात. वास्तविक परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शारीरिक स्थिती पुष्कळ कठीण आहे. त्यांचे वयही ८० वर्षे आहे. या वयात आणि अत्यंत शारीरिक त्रास होत असूनही ते पुढील पिढ्यांना हे बुद्धीअगम्य संशोधन उपलब्ध व्हावे, यासाठी विशिष्ट ‘पोज’ (छायाचित्रासाठी विशिष्ट स्थितीत बसणे) देऊन घंटोन्घंटे बसून छायाचित्रे काढून घेतात, तसेच आवश्यक तेथे या सर्व घटनांचे चित्रीकरणही करून घेतात. त्यांची संशोधक वृत्ती, प्रयोगशीलता आणि समष्टीला हे अमूल्य ज्ञान देण्याची तळमळ यांमुळे ते छायाचित्रे अन् चित्रीकरण अपेक्षित असे होईपर्यंत प्रयत्न करतात. साधकांना या दिव्य घटना पहाण्याचा आनंद मिळण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात. परात्पर गुरु डॉक्टर अशा प्रकारे सूक्ष्मातील घटनांचा अभ्यास करत असल्यामुळे साधकांमध्येही ती वृत्ती निर्माण झाली आहे.

अशा प्रकारे अखिल मानवजातीसाठी चंदनापरी देह झिजवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती केवळ साधकच नाही, तर अखिल मानवजातीच्या पुढील अनेक पिढ्या कृतज्ञच असतील !

– श्री. अतुल बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.६.२०२२)

तज्ञ, अभ्यासू आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांना विनंती !

‘संतांच्या देहातील बुद्धीअगम्य पालटांविषयी संशोधन करून त्यांचा कार्यकारणभाव शोधून काढण्यासाठी साधक प्रयत्न करत आहेत. त्यासाठी

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हातांच्या बोटांतून उदबत्तीच्या धुराप्रमाणे धूर आणि पांढरा प्रकाश बाहेर पडत असल्याचे दिसण्यामागील कारण काय ?
२. अल्प प्रकाशात साधकाच्या हाताच्या तळव्याच्या तुलनेत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हाताचा तळवा स्पष्टपणे दिसण्यामागे कारण काय ?
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा तोंडवळा, तळहात आणि तळपाय हे मंद प्रकाशात एकत्रित बघितल्यास तळपाय सर्वाधिक उठून दिसण्यामागील कारण काय ?
४. अल्प प्रकाशात साधकाच्या तुलनेत परात्पर गुरु डॉ. आठवले अधिक स्पष्ट का दिसतात ?

या संदर्भात तज्ञ, अभ्यासू, या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांचे साहाय्य आम्हाला लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.’

– व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संपर्क : श्री. आशिष सावंत
ई-मेल : [email protected]

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Leave a Comment