शांतीविधीतील काही विधींचे सूक्ष्म-ज्ञानविषयक परीक्षण

व्यक्तीचा शांतीविधी कसा करावा, याचे विवेचन धर्मशास्त्रविषयक ग्रंथांत दिलेले असते. या ग्रंथात प्रामुख्याने शांतीविधीचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे. शांतीविधीच्या वेळी केलेल्या सूक्ष्म-ज्ञानविषयक परीक्षणावरून त्या वेळी सूक्ष्मातून नेमकी काय प्रक्रिया घडत असते, हे समजते. यामुळे शांतीविधीचे महत्त्व अधिक प्रकर्षाने लक्षात येण्यास साहाय्य होते. यासाठी पुढे शांतीविधीतील काही निवडक विधींच्या वेळी सनातनच्या साधिकांनी केलेली सूक्ष्म-ज्ञानविषयक परीक्षणे दिली आहेत. शांतीविधीच्या अंतर्गत केल्या जाणार्‍या श्री गणपतिपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन यांसारख्या सर्वसाधारण विधींच्या वेळी केलेल्या सूक्ष्म-ज्ञानविषयक परीक्षणांविषयीचे विवेचन निराळ्या ग्रंथात दिले आहे.

 

 

मुख्य देवतांची स्थापना आणि पूजन यांच्या वेळचे सूक्ष्म-ज्ञानविषयक परीक्षण

अ. ‘अक्षतांच्या अष्टदलकमलावर ठेवलेल्या सुपार्‍यांवर देवता आणि ऋषि यांचे अंगठ्यांएवढ्या लघुरूपांत दर्शन झाले.

 

आ. अक्षतांच्या अष्टदलकमलावरील देवतांच्या सुपार्‍यांवर पुष्पे वाहिल्यावर अष्टदलकमलातून भाव आणि आनंद यांच्या निळ्या लहरी बाहेर पडतांना दिसू लागल्या अन् त्या लहरी वातावरणात पसरू लागल्या. सुपार्‍यांवर झेंडूची फुले वाहिल्यावर अष्टदलकमलातून चैतन्याच्या पिवळ्या किरणांचे मोठ्या प्रमाणात प्रक्षेपण होऊ लागले आणि ते सजीव वाटू लागले.’

 

– कु. मधुरा भोसले, सनातन संस्था (श्रीमती वैद्य यांचा केलेला ‘रौद्री शांती’ विधी, १३.५.२००६)

 

 

मुख्य देवतेला आहुती देतांना केलेले सूक्ष्म-ज्ञानविषयक परीक्षण

१. वैष्णवी शांती

अ. वास्तूतील काळे प्रवाह, तसेच उपस्थित व्यक्तींवरची काळी आवरणे होमकुंडाकडे खेचली जाऊन त्यांचे विघटन होण्यास आरंभ होणे

‘शांतीहोमाचे मंत्र चालू झाल्यावर माझी भावजागृती होऊ लागली. माझ्या डोक्यावर चांगल्या संवेदना जाणवल्या. वास्तूतील काळे प्रवाह, तसेच उपस्थित व्यक्तींवरील काळी आवरणे होमकुंडाकडे खेचली जाऊन त्यांचे विघटन होऊ लागले. त्या वेळी होमकुंडातून प्रक्षेपित होणारा धूरही प्रत्यक्षात जास्त प्रमाणात काळसर दिसत होता.’

 

– सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (श्री. ढवळीकर यांचा केलेला ‘वैष्णवी शांती’ विधी, ९.१२.२००६)

 

वैष्णवीशांतीच्यावेळी केलेले सूक्ष्म परीक्षण

खालील सूक्ष्म-चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

 

२. उग्ररथ (षष्टी) शांती

अ. हवन चालू असतांना चौथ्या पाताळातील मांत्रिकांनी यज्ञ करून हवनातील सात्त्विकता आणि चैतन्य खेचून घेऊन षष्टीशांतीचा परिणाम न्यून करण्याचा प्रयत्न करणे

‘हवन चालू असतांना वास्तूच्या ईशान्य दिशेला भूमीच्या खालून विविध मंत्रांचा सूक्ष्मातून ध्वनी (आवाज) ऐकू येऊ लागला. त्या वेळी चौथ्या पाताळातील मांत्रिक पहिल्या पाताळातील वाईट शक्तींच्या साहाय्याने पूजास्थळापासून काही अंतरावर यज्ञ करत असल्याचे दिसले. उग्ररथ शांतीच्या हवनातील सात्त्विकता आणि चैतन्य खेचून घेऊन या शांतीचा परिणाम न्यून करण्याचा त्यांचा उद्देश होता.

 

टीप १ – मांत्रिक म्हणजे मानवजातीला त्रास देणार्‍या भुवलोक आणि पाताळ यांतील सूक्ष्म-रूपातील सर्वांत बलाढ्य अनिष्ट शक्ती. शांतीविधी केल्यामुळे यजमानाला चैतन्य आणि सात्त्विकता मिळते. ते मिळू नये यासाठी मांत्रिकप्रयत्नशील असतात. त्यासाठी ते यज्ञ करून किंवा इतर माध्यमांतून काळी शक्ती प्रक्षेपित करून यज्ञाची परिणामकारकता न्यून करण्याचा प्रयत्न करतात. ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी प्रयत्नशील असणार्‍या सनातनच्या साधकांना अनिष्ट शक्ती जास्त प्रमाणात त्रास देतात (श्री. आत्माराम जोशी हेही सनातनचे साधक आहेत.); परंतु साधकांच्या ईश्वरावरील श्रद्धेमुळे ईश्वर त्यांचे अनिष्ट शक्तींपासून रक्षण करतो. सत् विषयक कोणत्याही विधीत अनिष्ट शक्ती कशा प्रकारे अडथळे आणतात, हे वरील उदाहरणावरून लक्षात येते. अनिष्ट शक्तींनी सूक्ष्मातून अडथळे आणल्यामुळे ते सर्वसामान्यांना कळत नाही, तर केवळ सूक्ष्मातील जाणणार्‍यांनाच समजू शकते. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता साधनेने निर्माण होते. अनिष्ट शक्तींपासून रक्षण होण्यासाठी आणि सत् च्या दिशेने पुढे जाण्यासाठी साधना करणे अनिवार्य असते. योग्य साधना कोणती आणि ती कशी करावी, हे सनातन शिकवते.

 

आ. पुरोहितांनी मृत्युंजय मंत्राचा उच्चार करीत यज्ञात समिधांची आहुती देण्यास आरंभ केल्यावर शिवाने पाताळातील मांत्रिकांचा यज्ञ उद्ध्वस्त करणे

यज्ञ करणार्‍या पुरोहितांनी मृत्युंजय मंत्राचा उच्चार करत यज्ञात समिधांची आहुती देण्यास आरंभ केला. त्या वेळी यज्ञाजवळ शिवतत्त्व जाणवू लागले. मंत्रोच्चार आणि आहुती देणे चालू असतांना वातावरणातील शिवतत्त्व वाढले अन् मला शिवाचे मारक रूप दिसले. शिवाने त्याचा पाय आपटून आणि त्रिशूळाच्या प्रहाराने पाताळातील मांत्रिकांचा यज्ञ उद्ध्वस्त केला.

 

इ. दूर्वांच्या आहुतीमुळे आप आणि वायू यांचे संयुक्त तत्त्व कार्यरत होऊन वातावरणातील सात्त्विकता अन् शीतलता वाढणे

यज्ञ करणार्‍या पुरोहितांनी दूर्वांची आहुती देण्यास आरंभ केल्यावर वातावरणातील शीतलता वाढू लागली आणि वातावरणात चैतन्य जाणवू लागले. दूर्वांच्या आहुतीमुळे आप आणि वायू यांचे संयुक्त तत्त्व कार्यरत होऊन वातावरणातील सात्त्विकता वाढू लागली. त्या वेळी यज्ञकुंडाच्या दिशेने गंगा नदी येतांना दिसली आणि तिचे पाणीरूपी चैतन्य संपूर्ण यज्ञकुंडात पसरले.

 

ई. सप्तचिरंजिवांसाठी लाह्यांची आहुती देतांना वातावरणातील निर्गुण तत्त्व आणि शुद्ध चैतन्य यांचे प्रमाण वाढू लागल्याचे जाणवले.’

 

– कु. मधुरा भोसले, सनातन संस्था (श्री. जोशी यांचा केलेला ‘उग्ररथ शांती’ विधी, २९.४.२००६)

 

३. सहस्रचंद्रदर्शन

अ. होम चालू होताच एक ऋषिकन्या श्रीविष्णूची पाद्यपूजा करतांना दिसणे आणि तिने त्याच्या चरणांवर मंजिरी वाहिल्याचे दिसणे

‘होम चालू होताच मला श्रीविष्णूची फार तीव्रतेने आठवण येऊ लागली. एक ऋषीकन्या श्री-विष्णूची पाद्यपूजा करतांना दिसली. त्यानंतर तिने त्याच्या चरणांवर तुळशीपत्र वाहिले.

 

आ. आहुती देत असतांना एक भयानक राक्षस यज्ञकुंड उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने रागाने येणे आणि अग्नीदेवाने सूर्यदेव अन् श्रीकृष्ण यांना केलेल्या प्रार्थनेमुळे यज्ञकुंडातून निघालेले अग्नी-अस्त्र आणि सुदर्शनचक्र यांमुळे राक्षसाचे तीन तुकडे होणे

पुरोहित यमाचे आवाहन करून मंत्रोच्चार करत समिधांची आहुती देत होते. तेव्हा उत्तर दिशेकडून एक भयानक राक्षस यज्ञकुंड उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने रागाने येऊ लागला. त्या वेळी होमात प्रज्वलित झालेल्या अग्नीत मला अग्नीदेव दिसला. त्याने अतिशय नम्रतेने आणि शरणागतीने सूर्यदेव अन् श्रीकृष्ण यांना प्रार्थना केली. त्यानंतर लगेचच यज्ञकुंडातून अग्नी-अस्त्र आणि पिवळे सुदर्शनचक्र त्या राक्षसाच्या दिशेने गेले अन् त्यांनी राक्षसावर प्रभावी आघात करून त्याचे तीन तुकडे केले.

 

इ. पूजन केलेल्या चंद्रदेवाच्या प्रतिमेच्या ठिकाणी कौशेय (रेशमी) श्वेतवस्त्र धारण केलेल्या आणि मुखावर शांतभाव असलेल्या चंद्रदेवाचे दर्शन होणे

चंद्रदेवाच्या प्रतिमेचे पूजन केलेल्या ठिकाणी माझे सहज लक्ष गेले. त्या वेळी तेथे चंदेरी रंगाची तेजस्वी चंद्रकोर चमकतांना दिसली. तिच्याकडे पहातांना मला माझ्या दिशेने शीतल लहरी येतांना दिसल्या आणि मला चैतन्य मिळत असल्याचे जाणवले. तेव्हा तेथे कौशेय श्वेतवस्त्र परिधान केलेल्या आणि मुखावर शांतभाव असलेल्या चंद्रदेवाचे दर्शन झाले. तो हात जोडून यज्ञाकडे पहात होता आणि श्रीविष्णु, तसेच अग्नीदेव यांना नम्रपणे नमस्कार करत होता.

 

ई. मृत्युंजय मंत्र म्हणण्यापूर्वीच शिवतत्त्वाचे अस्तित्व पांढर्‍या प्रकाशाच्या प्रभावळीद्वारे चंद्रदेवाभोवती दिसणे आणि देवतांना आवाहन करण्यापूर्वीच त्या येत असल्याचे लक्षात येणे

चंद्रदेवाभोवती शिवतत्त्वाचे अस्तित्व जाणवू लागले आणि त्यामध्ये वाढ होऊ लागली. त्यामुळे चंद्रदेवाभोवती पांढर्‍या प्रकाशाची प्रभावळ दिसू लागली. त्यानंतर पुरोहितांनी मृत्युंजय मंत्र म्हणण्यास आरंभ केला. देव सर्वज्ञ असल्यामुळे मंत्र म्हणण्यापूर्वीच आणि देवतांचे आवाहन करण्यापूर्वीच ती ती देवता किंवा तिचे तत्त्व पूजास्थळी अन् यज्ञस्थळी उपस्थित रहात होते.’

– कु. मधुरा भोसले, सनातन संस्था (श्री. मणेरीकर यांचा केलेला ‘सहस्रचंद्रदर्शन’ विधी, ५.५.२००६)

 

४. रौद्री शांती

अ. होमातील धुरामुळे श्रीमती शांताबाई वैद्य (उत्सवमूर्ती) यांच्या सूक्ष्म-देहांची शुद्धी होणे आणि वातावरणही सात्त्विक होणे

‘यज्ञातील धुरातून प्रक्षेपित होणारी सात्त्विकता आणि चैतन्य यांच्या लहरी श्रीमती शांताबाई वैद्य (उत्सवमूर्ती) यांच्या दिशेने जाऊ लागल्या. त्या लहरींमुळे श्रीमती शांताबाईच्या सूक्ष्म-देहांची शुद्धी होऊन त्या सात्त्विक होत आहेत, असे जाणवले. होमातील धुरामुळे वातावरणाचीही शुद्धता होऊन वातावरण सात्त्विक आणि चैतन्यमय बनू लागले.

 

आ. होमातील अग्नीत तुपाची आहुती देतांना अग्नीत तीन देवतांची अस्पष्ट मुखे दिसली. त्यांतील एक मुख रुद्राचे होते. ती मुखे आहुती ग्रहण करत होती.’

 

– कु. मधुरा भोसले, सनातन संस्था (श्रीमती वैद्य यांचा केलेला ‘रौद्री शांती’ विधी, १३.५.२००६)

 

 

आज्यावलोकन या विधीच्या वेळी केलेले सूक्ष्म-ज्ञानविषयक परीक्षण

१. यजमान पती-पत्नीने त्यांचे मुख तुपाच्या पात्रात पाहिल्याने
त्यांच्यावरील काळे आवरण आणि त्यांच्या तोंडवळ्याच्या पेशींतील काळी शक्ती तुपात खेचली जाणे

‘तुपाच्या पात्रात यजमान पती-पत्नीने त्यांचे तोंड पाहिले. तेव्हा त्यांचे मन अन् बुद्धी यांवरील काळे आवरण आणि त्यांच्या तोंडवळ्याच्या पेशींतील काळी शक्ती तुपाच्या पात्रातील प्रतिबिंबात पडली अन् तुपामध्ये काळे आवरण आणि काळी शक्ती खेचली गेली. त्या वेळी होमातील धुरामुळेही त्यांच्यावर उपाय होत होते.’ – कु. मधुरा भोसले (श्री. मणेरीकर यांचा केलेला ‘सहस्रचंद्रदर्शन’ विधी, ५.५.२००६)

 

२. यजमानांना पिठाच्या दिव्यांनी ओवाळणे या विधीच्या वेळी केलेले सूक्ष्म-ज्ञानविषयक परीक्षण

अ. यजमान पती-पत्नी यांचे कणकेच्या दिव्यांनी औक्षण करतांना त्यांच्या जवळ श्री महालक्ष्मीदेवीचे अस्तित्व जाणवणे

‘यजमान पती-पत्नी यांचे कणकेच्या दिव्यांनी औक्षण करतांना त्यांच्याभोवती निर्माण झालेले चैतन्याचे कवच प्रकाशमान झाल्याचे जाणवले आणि त्यांच्या जवळ श्री महालक्ष्मीदेवीचे अस्तित्व जाणवले. देवीचे जोडवी घातलेले चरण दिसले. त्या वेळी मोगर्‍याचा सू्क्ष्मगंध आल्याने माझे मन प्रसन्न झाले आणि ईश्वराप्रती कृतज्ञतेचा भाव जागृत झाला.’ – सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (श्री. ढवळीकर यांचा केलेला ‘वैष्णवी शांती’ विधी, ९.१२.२००६)

 

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘कौटुंबिक धार्मिक कृती आणि सामाजिक कृतीयांमागील शास्त्र’

Leave a Comment