फोंडा येथे हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून हिंदूंनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग चेतवले !

सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने . . .

फोंडा (गोवा), ८ मे – सनातन संस्थेच्या वतीने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखंड कार्यरत असलेले सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण भारतात ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’ राबवले जात आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून फोंडा येथे ८ मे या दिवशी दुपारी ४ वाजता हिंदू एकता दिंडी काढण्यात आली. हिंदू एकता दिंडीला स्वामी हरिश्रद्धानंद सरस्वती यांची वंदनीय उपस्थिती लाभली. त्याचप्रमाणे प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सुहास वझे आणि उद्योजक श्री. जयंत मिरींगकर हे मान्यवर उपस्थित होते.

धर्मध्वजाचे पूजन करतांना स्वामी हरिश्रद्धानंद सरस्वती

हिंदू एकता दिंडीला राजीव गांधी कला मंदिरापासून धर्मध्वजपूजनाने प्रारंभ झाला. प्रारंभी स्वामी हरिश्रद्धानंद सरस्वती यांनी धर्मध्वजाचे पूजन केले, तर सनातनचे हितचिंतक श्री. जयंत मिरींगकर यांनी नारळ वाढवला. नंतर स्वामी हरिश्रद्धानंद सरस्वती यांनी दिंडीमधील पालखीतील परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर दिंडीला राजीव कला मंदिरापासून प्रारंभ झाला. यानंतर दिंडी श्री विठोबा मंदिर-वरचा बाजार-टपाल कार्यालय या मार्गाने जाऊन तिचे तिस्क-फोंडा येथे एका लहान सभेत रूपांतर झाले. दिंडीच्या समोर धर्मध्वज, मागे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र असलेली दिव्य चैतन्यदायी पालखी आणि पालखीच्या दोन्ही बाजूंनी नऊवारी साडी नेसलेल्या सुवासिनींचे कलश डोक्यावर घेतलेले पथक, स्वरक्षणाची प्रात्यक्षिके दाखवणारी स्वरक्षण पथके, बाल साधक कक्ष, प्रथमोपचार पथक, लाठीकाठीची प्रात्यक्षिके दाखवणारे ‘रणरागिणी’ पथक, टाळ-मृदंग घेतलेले ‘इस्कॉन’चे पथक, असे दिंडीचे स्वरूप होते. दिंडीमध्ये हातात ध्वज घेऊन विविध घोषणा देत सनातनचे हितचिंतक आणि विविध संप्रदायांचे अनुयायी सहभागी झाले होते. दिंडीच्या मार्गावर धर्मध्वजाची आरती ओवाळून अनेकांनी दिंडीचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राहुल वझे यांनी केले.

दिंडीतील कांही चित्रमय क्षण . . .

 

(सौजन्य : ingoanews)

दिंडीला उपस्थित महनीय व्यक्ती

म्हापसा नगरपालिकेच्या विद्यमान नगराध्यक्ष सौ. शुभांगी वायंगणकर, आसगाव येथील श्री बारा साखळेश्‍वर मंदिराचे अध्यक्ष श्री. अनिल सावंत, फोंडा पालिकेचे माजी नगराध्यक्ष श्री. शांताराम शेट कोलवेकर आणि केसरीया हिंदु वाहिनीचे श्री. राजीव झा.

दिंडीमध्ये सहभागी संघटना

भारत माता की जय, इॅस्कान, गायत्री परिवार, मये ग्रामरक्षा दल, वैश्य समाज संघटना, केसरीया हिंदु वाहिनी आणि शिवप्रेमी संघटना, बेतुल.

 

दिंडीनंतरच्या सभेत वक्त्यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले अनमोल मार्गदर्शन

देवतांच्या हातात शस्त्रे असून त्यांचे अनुकरण करून आत्मरक्षणासाठी सज्ज रहा ! – स्वामी हरिश्रद्धानंद सरस्वती

हिंदु धर्माचा गौरव आनंद आणि परमार्थ यांचा अगाध खजाना आहे. हिंदु धर्मामध्ये मोठी शक्ती आहे. हिंदूंच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्याच्या घटना घडल्या आहेत. देवतांच्या हातात शस्त्रे आहेत आणि देवतांचे आम्ही अनुकरण करून आत्मरक्षणासाठी सज्ज राहिले पाहिजे. हिंदूंनी कोणताही भेदभाव न बाळगता संघटित झाले पाहिजे. पाकधार्जिण्या लोकांकडून सामान खरेदी करू नये.

काळ साद घालत आहे की ‘हिंदूंनो, एक व्हा’! – ह.भ.प. सुहास वझे

 

ह.भ.प. सुहासबुवा वझे

काळ साद घालत आहे की, ‘हिंदूंनो एक व्हा !’ धर्म टिकला, तरच आम्ही टिकणार आहोत. प्रत्येक हिंदूने अहंकार दूर ठेवून एकत्र आले पाहिजे. मंदिरातून भक्त निर्माण व्हावे, ही काळाची आवश्यकता आहे. प्रत्येक मंदिरातून धर्मशिक्षण दिले गेले पाहिजे. सनातन संस्था धर्मशिक्षणाचे कार्य करते आणि माझ्यासारखा कीर्तनकारही सनातन संस्थेकडून पुष्कळ काही शिकत असतो.

हिंदूऐक्य अबाधित राहील, तोपर्यत गोमंतक सुरक्षित राहील ! – श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस

हिंदूऐक्याचा आविष्कार दर्शवणारी ही सांप्रदायिक एकता सदैव हिंदु धर्माच्या संरक्षणासाठी वारंवार दिसून आली पाहिजे. हिंदूंच्या आया-बहिणी आणि मंदिरे सुरक्षित झाली पाहिजेत. धर्मांध वृत्तीला अपराध करण्याची हिंमतच होऊ नये, असे वातावरण निर्माण झाले पाहिजे, तर या हिंदूऐक्याची खरी शक्ती आपल्याला अनुभवता येईल.

जोपर्यंत हे हिंदूऐक्य अबाधित राहील, तोपर्यत गोमंतक सुरक्षित राहील, याची निश्‍चिती बाळगा. आज काश्मीर फाईल्सची चर्चा होते; पण जे ५०० वर्षांपूर्वी गोव्यात इन्क्विझिशन घडले, त्याची आजही चर्चा होत नाही. आम्हाला गोमंतक ही देवभूमी म्हणून जिवंत ठेवायची आहे.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात यथाशक्ती योगदान
देण्याचा निश्‍चय करा ! – डॉ. मनोज सोलंकी, राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

डॉ. मनोज सोलंकी

हिंदु धर्मावर विविध माध्यमांतून होणार्‍या आघातांच्या विरोधात हिंदु जनजागृती समिती सनदशीर मार्गाने प्रबोधन करत आहे. हिंदु धर्माची सध्याची स्थिती पाहिल्यास हिंदूसंघटनाची पुष्कळ तीव्रतेने आवश्यकता भासते. वर्ष २०२५ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे आणि या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात आपण यथाशक्ती योगदान देण्याचा आजपासून निश्‍चय केला पाहिजे.

Leave a Comment