वसंत पंचमी

सर्व ऋतूंचा राजा असणार्‍या वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल वसंत पंचमीच्या दिनी लागते. तसेच हा दिवस देवी सरस्वती आणि लक्ष्मी यांचा जन्मदिवसही मानला जातो. वसंत पंचमी या उत्सवामागील इतिहास आणि त्याचे महत्त्व या लेखातून जाणून घेऊया.

श्री सरस्वतीदेवी Shri Saraswati

श्री सरस्वतीदेवी

 

१. तिथी

वसंत पंचमी हा उत्सव ‘माघ शुद्ध पंचमी या तिथीला साजरा करतात.

२. इतिहास आणि साजरी करण्याची पद्धत

अ. कामदेव मदनाचा जन्म याच दिवशी झाला, असे म्हटले आहे. दांपत्यजीवन सुखाचे जावे, यासाठी लोक रतिमदनाची पूजा आणि प्रार्थना करत असत.

आ. वसंत पंचमी या दिवशी नवीन पिकांच्या लोंब्या आणून त्या घरातील देवतेला अर्पण करून नवान्न ग्रहण करतात.

इ. वसंत पंचमी या तिथीला सरस्वतीदेवी उत्पन्न झाली; म्हणून तिची पूजा करतात, तसेच लक्ष्मीचाही हा जन्मदिन मानला जातो; म्हणून या तिथीला ‘श्रीपंचमी’ असेही म्हणतात.

ई. या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करून पूजा करतात. वसंत पंचमी या दिवशी वाणीची अधिष्ठात्री देवी सरस्वती हिची पूजा आणि प्रार्थना करण्याचे महत्त्व आहे. हा दिवस देवीचा प्रकटदिन म्हणून मानला जातो. या दिवशी कलशाची स्थापना करून त्यात सरस्वतीदेवीला आवाहन करून तिचे पूजन केले जाते.

सरस्वती देवीची नामावली

विद्यार्थ्यांनी सरस्वती देवीची पुढील नामावली पाठ करावी.

प्रथमं भारती नाम द्वितीयं च सरस्वती ।

तृतीयं शारदादेवी चतुर्थं हंसवाहिनी ।।

पंचमं जगती ख्याता षष्ठं वागीश्वरी तथा ।

सप्तमं कुमुदी प्रोक्ता अष्टमं ब्रह्मचारिणी ।।

नवमं बुद्धिदात्री च दशमं वरदायिनी ।

एकादशं चन्द्रकान्तिर्द्वादशं भुवनेश्वरी ।।

द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः ।

जिह्वाग्रे वसते नित्यं ब्रह्मरूपा सरस्वती ।। – (‘ऋषीप्रसाद’, फेब्रुवारी २००८)

३. वसंत पंचमी या उत्सवाचा उद्देश

या दिवशी सृष्टीतील नवचैतन्य आणि नवनिर्माण यांच्यामुळे झालेला आनंद प्रकट करणे आणि मौज करणे, हा या उत्सवाचा उद्देश आहे.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’