एखाद्याला नामजपादी उपाय शोधून देतांना त्या व्यक्तीचा त्रास, त्याची आध्यात्मिक पातळी, वाईट शक्ती करत असलेले आक्रमण इत्यादी घटकांचा विचार करा !

Article also available in :

‘सनातनचे काही संत, तसेच ६० टक्क्यांहून अधिक पातळीचे काही साधक अन्य साधक आणि संत यांना होणार्‍या शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक त्रासांसाठी नामजपाचा आध्यात्मिक उपाय शोधून देतात. तेव्हा त्यांनी त्रास होणारे साधक किंवा संत यांची आध्यात्मिक पातळी, ते करत असलेले समष्टी कार्य, त्यांना होणारा आध्यात्मिक त्रास, वाईट शक्ती त्यांच्यावर करत असलेले आक्रमण इत्यादी घटकांचा विचार करून त्यांना नामजप, करावयाची बोटांची मुद्रा आणि त्या मुद्रेने करावयाचा न्यास शोधून द्यावा.

सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

 

१. आध्यात्मिक पातळी

त्रास होणारा साधक किंवा संत यांची आध्यात्मिक पातळी जितकी अधिक, तितका त्यांना सध्याच्या आपत्काळानुसार होणारा त्रास अधिक असतो. त्यामुळे त्यांचा त्रास दूर होण्यासाठी अधिक कालावधी लागतो; म्हणून त्यांना त्रास दूर होईपर्यंत प्रतिदिन नामजपादी उपाय सांगणे आवश्यक असते. अशा वेळी तो साधक किंवा संत यांच्या त्रासाची प्रतिदिन विचारपूस करून आढावा घेणे आवश्यक असते.

 

२. करत असलेले समष्टी कार्य

त्रास होत असणारा साधक किंवा संत ईश्वरी राज्याच्या स्थापनेच्या समष्टी कार्यात दायित्व घेऊन सहभागी असतील, तर त्यांच्यावर होणारी वाईट शक्तींची आक्रमणेही अधिक तीव्रतेची असतात. अशा वेळी त्यांना नुसता नामजपाचा उपाय न सांगता ‘त्यांच्यावरील वाईट शक्तींचे आक्रमण लवकर दूर होण्यासाठी त्यांची दृष्ट काढायची का आणि किती दिवस काढायची ?’, याचाही विचार करावा. दृष्ट काढून झाल्यावर त्यांना पुन्हा एकदा नामजपादी उपाय शोधून सांगावा.

 

३. असणारा आध्यात्मिक त्रास आणि त्याची तीव्रता

३ अ. कुलदेवता रुष्ट असणे

एखाद्या कुटुंबावर त्याची कुलदेवता रुष्ट असेल, तर त्या कुटुंबातील व्यक्तींना सतत शारीरिक दुखापती होणे, कुटुंबियांमध्ये वादविवाद होणे, आर्थिक अडचणी येणे, अशा स्वरूपाचे त्रास होतात. अशांना कुलदेवतेचे दर्शन घेऊन तिला घरातील सर्वांच्या साधनेतील अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करणे, कुलदेवतेकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल तिची क्षमायाचना करणे, देवघरात कलशावर नारळ उभा ठेवून कुलदेवतेला प्रतिदिन प्रार्थना करणे, असे उपाय सांगावेत.

३ आ. पूर्वजांचे त्रास असणे

याहून अधिक स्वरूपाचे त्रास कुटुंबियांना पूर्वजांचे त्रास असल्यास होतात, उदा. घरातल्यांना दारूचे व्यसन असणे, त्वचारोग असणे, घरात पैसा न टिकणे, घरात अशांतता असणे इत्यादी. अशांना घरात दिवसभर दत्ताचा नामजप हळू आवाजात लावून ठेवणे, शोधून दिलेल्या नामजपाबरोबरच दत्ताचा नामजपही काही वेळ नियमित करणे, श्राद्धविधी करणे, असे उपाय सांगावेत.

३ इ. वाईट शक्तींचे त्रास

काही कारण नसतांना आदळ-आपट करावीशी वाटणे, तोंडात शिव्या येणे, ओरडावेसे वाटणे, वाईट शक्तीचे प्रकटीकरण होणे, अशा स्वरूपाचे त्रास वाईट शक्तींच्या त्रासामुळे होतात. अशांना नामजप शोधून देऊन तो ठराविक कालावधीपर्यंत करायला सांगावा आणि त्यानंतर पुन्हा नामजप शोधून द्यावा. वाईट शक्तींचा त्रास मंद, मध्यम कि तीव्र स्वरूपाचा आहे ? यानुसार शोधून दिलेला नामजप करण्याचा कालावधी ठरवू शकतो. त्रास तीव्र स्वरूपाचा असल्यास तो दूर होण्यासाठी अधिक कालावधी लागत असल्याने एकच नामजप अधिक कालावधीपर्यंत करण्यास सांगू शकतो.

 

४. वाईट शक्ती करत असलेले आक्रमण

चांगली आध्यात्मिक पातळी असणारा आणि समष्टी सेवा दायित्व घेऊन करणारा साधक किंवा संत यांवर वाईट शक्तींना आक्रमण करण्यास अधिक शक्ती लागते. अशा वाईट शक्ती ५ व्या किंवा ६ व्या पाताळातीलही असू शकतात. त्यामुळे त्यांची आक्रमणे अधिक निर्गुण स्वरूपाची असल्याने ती आपल्याला सहजतेने कळत नाहीत. याची काही उदाहरणे म्हणजे त्रासाची लक्षणे एका चक्रावर जाणवतात; पण वाईट शक्तीचे स्थान दुसर्‍याच चक्रावर असते किंवा वाईट शक्तींनी चक्रावर आणलेले आवरण कितीही दूर केले, तरी ते पुन:पुन्हा येते (तेव्हा वाईट शक्तींनी काळ्या शक्तीचा प्रवाह वरून सोडलेला असतो) किंवा वाईट शक्तींनी आपल्या समोर काळ्या शक्तीचा पडदा निर्माण केला असल्यामुळे आपल्याला शरिरावर आवरण जाणवत नाही; पण त्रास तर होत असतो इत्यादी. त्यामुळे वाईट शक्तींची अशी आक्रमणे अचूक ओळखणे आवश्यक असते. वाईट शक्ती चक्रांवरील आक्रमणाचे स्थानही पालटतात. त्यामुळे नामजप, मुद्रा आणि न्यासस्थान पुनःपुन्हा शोधावे लागते.

अशा प्रकारे एखाद्याला नामजपादी उपाय सांगतांना आपल्या सूक्ष्मातील क्षमतेची चाचणी होते, तसेच उपाय शोधतांना प्रत्येक वेळी नवनवीन शिकायला मिळते. वाईट शक्तींकडूनही आपल्याला बरेच शिकता येते. त्या आपली शक्ती अनावश्यक वाया घालवत नाहीत. त्या काटकसरी असतात. ज्या साधकाची किंवा संतांची ज्या चक्राशी संबंधित सेवा असते, त्या चक्रावरच त्या आक्रमण करतात, उदा. साधक-अधिवक्त्याला (वकिलाला) अधिक बोलायचे असल्याने वाईट शक्ती त्याच्या विशुद्धचक्रावर आक्रमण करतात. ज्ञान प्राप्त करणार्‍या साधकाच्याही आज्ञाचक्रावर वाईट शक्ती आक्रमण करतात इत्यादी. उपाय शोधतांना देवही नवनवीन पद्धतींनी उपाय करायला शिकवतो. बीजमंत्रांचे उपाय, कुंडलिनीशक्ती जागृत करून त्याद्वारे उपाय, चैतन्याचा प्रवाह सर्व चक्रांवर सोडणे, सूक्ष्मातून दृष्ट काढणे अशा उपायांचा तात्काळ परिणाम होतो. त्यामुळे ‘अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे’ आणि ‘जिज्ञासा असल्यास देव भरभरून शिकवतो’ ही सूत्रे मनावर ठसतात. शेवटी हे सर्व गुरुकृपेनेच शिकता येते. गुरूंना आपली शिकण्याची वृत्ती आवडते आणि ते भरभरून कृपा करतात !’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment