श्री रेणुकादेवीप्रती भक्तीभाव असणारे, राणीसावरगाव (जिल्हा परभणी) येथील श्री. गोविंदराव गळाकाटू (सावरगावकर) (वय ८६ वर्षे) संतपदी विराजमान !

पू. गोविंदराव गळाकाटू (उजवीकडे) यांचा सन्मान करतांना सद्गुरु नंदकुमार जाधव

नांदेड – प्रीती, त्याग, श्री रेणुकादेवीप्रती भक्तीभाव, सेवाभाव अन् सदैव सकारात्मक रहाणे, या दैवी गुणांनी संपन्न असलेले राणीसावरगाव (जिल्हा परभणी) येथील श्री. गोविंदराव गळाकाटू (सावरगावकर) हे संतपदी विराजमान झाले. ८ सप्टेंबर २०२१ या दिवशी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी पू. गळाकाटू (सावरगावकर) यांच्या कन्या सौ. भावना इनामदार यांच्या नांदेड येथील घरी हे घोषित केले. सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी पू. गोविंदराव गळाकाटू (सावरगावकर) यांचा सन्मान सनातन-निर्मित श्री लक्ष्मीदेवीचे चित्र देऊन केला. या घरगुती कार्यक्रमामध्ये त्यांचे काही नातेवाईक उपस्थित होते. सद्गुरु जाधवकाका यांनी या वेळी ‘काळानुसार साधना कशी करावी ?’, याविषयी मार्गदर्शन केले. पू. गळाकाटू (सावरगावकर) हे ‘रेणुकादेवी मंदिर ट्रस्ट’चे मुख्य विश्वस्त असून ते गेली ३२ वर्षे देवीची सेवा करत आहेत.

 

‘संपूर्ण विश्वाचा उद्धार व्हावा’, हीच माझी सदिच्छा ! – पू. गोविंदराव गळाकाटू (सावरगावकर)

पू. गोविंदराव गळाकाटू (सावरगावकर)

आजचा हा सोहळा अनुभवून मी धन्य झालो आहे. ‘माझ्यातील उर्वरित दोषही निघून जावेत’, अशी मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. यापुढे माझ्या सहवासातील लोकांचा उद्धार करण्याचा मी अधिकाधिक प्रयत्न करीन.

याचसमवेत ‘संपूर्ण विश्वाचा उद्धार व्हावा’, हीच माझी सदिच्छा आहे. ‘आज सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या रूपातून मला साक्षात् परमेश्वराचे दर्शन झाले’, असे मी समजतो. साक्षात् माझ्या घरी देव आला. ‘जसा एकनाथांच्या घरी साक्षात् भगवान श्रीकृष्ण अवतरला, तसा सनातनच्या साधकांच्या रूपात मला साक्षात् भगवंताचा सहवास लाभला’, असे मी समजतो.

 

जीवनातील सर्व कर्तव्ये पार पाडण्यासाठी वडिलांकडूनच शक्ती
आणि प्रेरणा मिळते ! – सौ. भावना इनामदार, नांदेड (पू. गोविंद गळाकाटू यांच्या कन्या)

माझे वडील पू. गोविंद गळाकाटू यांच्यातील गुण मी माझ्या वयाच्या पाचव्या वर्षापासून अनुभवत आहे. ते कुणालाही लगेचच आपलेसे करतात, भरभरून प्रेम देतात. त्यांनी कधीच कुणाचा द्वेष केला नाही. कधीच कुणाविषयी ते वाईट बोलले नाहीत. त्यांच्यामध्ये शिस्तप्रियता आहे. त्यांच्या या गुणांच्या छत्रछायेत वाढल्यामुळे मलाही माझ्या जीवनातील सर्व कार्ये आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी त्यांच्याकडूनच शक्ती अन् प्रेरणा मिळते. भगवंत मला दादांच्या (वडिलांच्या) रूपात भेटला आहे. त्यांच्या पोटी जन्म घेतला, हे मी माझे अहोभाग्य समजते. ‘त्यांच्यातील दैवी गुण, सात्त्विकता माझ्या मुलांमध्ये, तसेच पुढच्या पिढ्यांतही येवोत’, अशी मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment