बहुगुणी भीमसेनी आयुर्वेदीय कापूर !

Article also available in :

हिंदु धर्मात पूजेत कर्पुरारतीसाठी कापूर वापरला जातो. या व्यतिरिक्त कापराचे अन्यही उपयोग आहेत. त्याविषयी येथे माहिती करून घेऊया.

भीमसेनी आयुर्वेदीय कापूर

 

१. आकार

भीमसेनी आयुर्वेदीय कापराला विशिष्ट आकार नसतो. हा कापूर स्फटिकासारखा असतो. याच्या गोल किंवा चौकोनी वड्या करता येत नाही; कारण नेहमीच्या कापरासारखे यात मेण नसते.

 

२. भीमसेनी आयुर्वेदीय कापराचे औषधी उपयोग

२ अ. सर्दी आणि खोकला यांवर गुणकारी

१. सर्दी, खोकला झाल्यास एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात या कापराची पूड घालावी आणि त्याची वाफ घ्यावी.

२. व्यक्तीचे नाक, कपाळ आणि छाती या अवयवांना कापूर लावावा. लहान मुलांनाही कापूर लावला, तरी चालेल. रुमालावर कापूर चुरडून तो हुंगावा किंवा एखाद्या लहानशा डबीत कापूर ठेवून ती डबी समवेत ठेवावी. ‘व्हिक्स’ची सवय टाळावी.

३. रुमालात कापराचे काही खडे दोर्‍याने बांधून ठेवल्यास रुमालाला सुगंध येतो आणि कापूर हुंगायलाही सोपे जाते. रुमाल तसाच धुवायला गेल्यास डाग पडत नाही आणि त्यावरील कापूर साबणाने विरघळतही नाही.

४. खोकल्यावरील औषधांसाठी आयुर्वेदीय औषधी आस्थापने याच कापराचा उपयोग करतात.

२ आ. पर्यटनाच्या वेळी बर्फाळ स्थानात श्वास लागत असल्यास…

पर्यटनाच्या वेळी बर्फाळ स्थानात श्वास लागत असल्यास हा कापूर हुंगावा.

२ इ. सांधेदुखी

तिळाच्या तेलात कापराची पूड करून ते तेल सांध्यांना लावावे. तिळाच्या तेलाचा वास उग्र असल्यामुळे हे कापूरमिश्रित तेल लावल्यावर कपड्यांना वास येतो. त्यामुळे त्याची योग्यतोपरी काळजी घ्यावी.

२ ई. दाढदुखी

या कापराचा लहानसा खडा किडलेल्या दातात ठेवावा. कापुराची लाळ पोटात गेल्यास अपाय होत नाही; परंतु एका दिवसात १ ग्रॅमपेक्षा जास्त कापूर पोटात जाणार नाही, याची दक्षता घ्यावी.

२ उ. केसांत होणारा कोंड्यावरील उपाय

खोबरेल तेलात हा कापूर मिसळून ते तेल केसांच्या मुळाशी लावावे. कोंडा झालेल्या व्यक्तीला सतत सर्दी होत असल्यास खोबरेल तेलाऐवजी तिळाच्या तेलाचा वापर करावा.

 

३. धार्मिक विधीत उपयोग

अ. अन्य कापरात मेण असते. हा कापूर शुद्ध असल्याने त्याचा वापर धार्मिक कार्यात करतात. आरती करतांना हा कापूर जाळावा. गंध उगाळतांना त्यात कापूर घालावा.

आ. देवाला विडा देतांना हाच कापूर घालून विडा देतात. दक्षिण भारतातील तीर्थांत वेलची आणि भीमसेनी कापूर वापरतात. तिरुपति येथील श्री बालाजी देवस्थान येथील सुप्रसिद्ध लाडवांतही याचा उपयोग केला जातो.

 

४. दृष्ट काढणे

या कापराचे दोन लहान तुकडे हातात घेऊन संध्याकाळी घराची दृष्ट काढावी. नंतर घराबाहेर जुन्या पणतीत किंवा एखाद्या जुन्या भांड्यात हा कापूर जाळावा.

 

५. अन्य उपयोग

अ. प्रवासी बॅग किंवा कपडे ठेवण्याची बॅग यांत हा कापूर ठेवल्यास कुबट किंवा अन्य वास न येता सुगंध येतो, तसेच कपड्यांना कसर, झुरळे लागत नाहीत.

आ. पावसाळ्यात कपडे चांगले वाळत नाहीत. ते ओलसर रहातात. असे कपडे बॅगमध्ये ठेवल्यास कुबट वास येतो. बॅगेत कापूर ठेवल्यास कुबट वास येत नाही.

इ. कापूर पायमोज्यात घातल्यास मोजे आणि पाय यांना कुबट वास येत नाही. काही जणांना मोजे घातल्यामुळे पायाला खाज येते. पायमोज्यात कापूर घातल्यास पायांना खाज येत नाही.

ई. रात्री आपल्या सभोवती कापूर घातल्यास डास जवळ फिरकत नाहीत, तसेच अन्य कीटक आणि उंदीर यांसारखे प्राणी दूर जातात.

उ. घरात डास असतील, तर आपण ‘गुड नाईट’ यंत्रावर मॅट (डासांचा त्रास दूर करण्यासाठीची वडी) लावतो. त्या यंत्रावर मॅट न ठेवता कापूर ठेवून यंत्र चालू करावे. कापूर विरघळून हवेत सुगंध पसरेल आणि डासही पळून जातील. हे मॅटपेक्षा अधिक सुरक्षित आहे.

ऊ. कधी शेकोटी किंवा चूल पेटवणे त्रासदायक असल्यास काही कापराच्या वड्या ते काम सोपे करतात.

(संदर्भ : सनातन प्रभात)

भीमसेनी कापूर संधिवातावरही उपयुक्त !

‘पुदिन्याचे फूल, ओव्याचे फूल आणि भीमसेनी कापूर सम प्रमाणात एकत्र केले असता काही काळानंतर त्याचे तेलात रूपांतर होते. या तेलाला ‘अमृतधारा तेल’ असे म्हणतात. हे तेल संधिवातावर अत्यंत उपयुक्त आहे.’ – वैद्या (सौ.) प्राची दळवी-मोडक, ठाणे

2 thoughts on “बहुगुणी भीमसेनी आयुर्वेदीय कापूर !”

 1. ️ नमस्ते ! भिमसेन कापूर आरोग्य लाभ महत्व वाचनात आले.
  कृपया हे कोठे व कसे उपलब्ध होईल ? व त्याचा उपयोग परिणाम या संबंधीची
  सविस्तर माहिती. व सविस्तर दर पत्रक कृपया संपर्क साधावा.
  श्री. नंदकुमार श्रीनिवास इनामदार ; इनामदार ज्योतिष कार्यालय…. जिल्हा सांगली
  महाराष्ट्र राज्य.
  इनामदार गुरूजी ज्योतिष कार्यालय.

  Reply
  • नमस्कार,

   कृपया आपल्या घराजवळ सनातनची उत्पादने कुठे मिळू शकतात, हे जाणून घेण्यासाठी 9322315317 या क्रमांकावर संपर्क करावा.

   Reply

Leave a Comment