युगानुयुगांसाठी मार्गदर्शन करणारी भगवान श्रीकृष्णाची शिकवण !

साधना पथावरून चालणार्‍यांना युगानुयुगांसाठी मार्गदर्शन करणारी भगवान श्रीकृष्णाची शिकवण !

भगवान श्रीकृष्ण ! नाव घेताच मन आदराने आणि आनंदाने भरून जाते. श्रीकृष्णाविषयी अत्याधिक आदर का वाटतो ? त्याच्या अप्रतिम सौंदर्यामुळे ? रासलीलेमुळे ? बालपणापासून त्याने केलेल्या अनेक चमत्कारांमुळे ? सर्वज्ञतेमुळे ? विष्णूच्या १६ कलांचा पूर्णावतार असल्यामुळे ? नाही, तर भगवद्गीतेत त्याने सांगितलेल्या दिव्य ज्ञानामुळे ! वस्तूतः त्या ज्ञानासाठी दिव्य, अप्रतिम, अलौकिक हे शब्दही थिटे पडतात.

 

अर्जुनाला गीता लगेच कळली !

आपल्याला गीता अनेकदा वाचूनही कळत नाही. काही काळाने आपण गीतेचा अभ्यास करणे सोडून देतो; मात्र श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता एकदाच सांगितली. त्याला ती कळली आणि त्याने तिच्यातील शिकवणीनुसार आचरण केले. यावरून हे लक्षात येते की, आपण अर्जुनासारखा भाव ठेवला, तरच आपल्याला गीता कळेल. – (प.पू.) डॉ. आठवले

 

१. शब्दांना मर्यादा असूनही विलक्षण
शब्दरचनेतून भगवान श्रीकृष्णाने अनिर्वचनीय आत्मा,
ईश्वर, ब्रह्मादी अनेक विषय सुस्पष्ट अन् सुंदररित्या उद्धृत करणे

केवळ ७०० श्लो‍कांची भगवद्गीता आणि त्यातील ५७४ श्लोक श्रीकृष्णाचे. खरेतर शब्दांनी व्यक्त करण्याची क्षमता सीमित असते. अगदी नेहमीच्या व्यवहारातल्या आणि अनुभवातल्या गोष्टीही आपण शब्दांनी व्यक्त करू शकत नाही, उदाहरणार्थ गुळाची चव कशी ? तर गोड. सीताफळ गोड, केळे गोड, फणस गोड. मग गूळ चवीला सीताफळासारखा लागतो का ? केळे फणसासारखे लागते का ? या प्रत्येकाच्या चवीतील वेगळेपण आपण शब्दांनी सांगू शकत नाही. ती केवळ अनुभवण्याची गोष्ट आहे. अनुभवगम्य आहे, तसेच ईश्वर, ब्रह्म हे अनिर्वचनीय आहेत. केवळ अनुभवगम्य आहेत, तरीही श्रीकृष्ण तो श्रीकृष्णच !

इतक्या थोड्या श्लोकांमध्ये विलक्षण शब्दरचनेतून त्याने आत्मा, ईश्वर, ब्रह्म, जन्म-मृत्यू-पुनर्जन्माचे रहस्य, देवतांचे पूजन आणि त्याचे फळ, त्रिगुण अन् जीवनातील प्रत्येक अंगाचे गुणांनुसार भेद, जन्म-मरणाच्या चक्रांत अडकण्याचे कारण आणि त्यातून सुटण्यासाठी अनेक योगमार्ग (साधना), पराभक्ती इत्यादी अनेक विषय इतके स्पष्ट करून सांगितले आहेत की, एकही संदेह रहात नाही. कर्मे करूनही त्यांचे पाप-पुण्य लागू न देण्याच्या त्याने सांगितलेल्या युक्तीला तर तोडच नाही.

 

२. गीतेवरील लिखाणाची ग्रंथनिर्मिती
करण्यामागील प्रयोजन आणि निर्मितीचा प्रवास

२ अ. प्रस्तूत ग्रंथात तत्त्वज्ञान, साधना आणि
तिचे फळ असे अध्यायानुसार वर्गीकरण केलेले असणे

गीतेविषयी एक उक्ती आहे, गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः । (श्रीमद्भगवद्गीतामाहात्म्य, श्लोक ४), म्हणजे गीतेचे भावपूर्ण पठण करून ती अंतःकरणात धारण केल्यास इतर शास्त्रांची काय आवश्यकता ? इतके गीतेचे महत्त्व आहे.

गीतेवर थोर विद्वानांचे अनेक ग्रंथ आहेत; पण प्रत्येक अध्यायातील तत्त्वज्ञान, साधना आणि तिचे फळ असे वर्गीकरण करणारा ग्रंथ पहाण्यात आला नाही. ते करून आवश्यक तेथे विषय स्पष्ट करणारे विवेचनही या ग्रंथात जोडले आहे. काही विशेष विषय परिशिष्ट १ मध्ये स्पष्ट केले आहेत.

२ आ. वर्ष २००३ मध्ये अध्याय २ ते ९ वर
टिपण्या लिहिणे आणि गीतेतील ज्ञान समजणे कठीण
असल्याच्या निर्णयाप्रत पोहोचून टिपण्या काढणे थांबवणे

पुढील परिच्छेद या प्रस्तावनेत लिहावा, अशी माझी इच्छा नाही; कारण ती माझी व्यक्तीगत अनुभूती आहे, तसेच ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय भगवान श्रीकृष्णाची शिकवण हा आहे. त्यात माझा मीपणा नको; पण प.पू. डॉ. आठवले यांचा दृष्टीकोन वेगळा आहे. ते प्रत्येक घटनेतून इतरांना काय शिकता येईल, याचा विचार करतात; म्हणून त्यांनी लिहिण्यास सांगितला.

मी गीता अनेक वेळा वाचली होती; पण गीतेतील वेगवेगळ्या अध्यायांत सांगितलेले तत्त्वज्ञान आणि साधना यांच्यातील वेगवेगळेपणा काही ठिकाणी स्पष्ट होत नव्हता; म्हणून स्वतःला नीट समजण्यासाठी मी टिपणे (Notes) काढू लागलो. साधारण वर्ष २००३ मध्ये अध्याय २ ते ९ वर टिपणे लिहिली. त्या वेळी ग्रंथ लिहिण्याचा विचार मनात नव्हता. नंतर गीतेतील ज्ञान समजणे माझ्या बुद्धीमत्तेच्या पलीकडचे आहे, अशा निर्णयापर्यंत पोहोचून मी टिपण्या काढणे थांबवले.

२ इ. टिपण्या पूर्ण न झाल्याची टोचणी मनाला
लागून उर्वरित अध्यायांवर टिपण्या काढणे चालू करणे
आणि नोव्हेंबर २०१३ मध्ये त्यांना अंतिम स्वरूप देता येणे

नंतर गीता वाचणे चालूच राहिले; पण टिपण्या पूर्ण न झाल्याची टोचणी मनाला सतत राहिली होती. शेवटी मनाची अस्वस्थता इतकी वाढली की, जून २०१३ पासून आधीच्या टिपण्यांचे पुनर्निरिक्षण आणि उरलेल्या अध्यायांवर टिपण्या काढणे चालू केले. नंतर ज्ञान तर पूर्ण आले पाहिजे; पण शक्यतो न्यूनतम पृष्ठांत व्यक्त झाले पाहिजे, या दृष्टीकोनातून पुन्हा पुनर्निरीक्षण करून अध्यायांवरच्या टिपण्यांना नोव्हेंबर २०१३ च्या दिवाळीपर्यंत अंतिम स्वरूप दिले.

२ ई. श्रीकृष्णाच्या वचनांची घेतलेली प्रत्यक्षानुभूती !

हे सर्व करत असतांना प्रत्येक दिवशी, अगदी प्रत्येक दिवशी हे सर्व थांबवावे. हे काम माझ्या शारीरिक आणि बौद्धिक आवाक्याबाहेरचे आहे, असे सतत वाटत राहिले अन् एकीकडे अनिच्छेने काम होतही राहिले. भगवान् श्रीकृष्णाने म्हटले आहे, मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति । (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १८, श्लोयक ५९), म्हणजे मी हे करणार नाही, हा तुझा निश्चय व्यर्थ आहे. तुझा स्वभाव तुला ते करायला लावील. भगवान् श्रीकृष्ण पुढे सांगतो, मी हे करू नये, असे जरी मोहामुळे (अज्ञानामुळे) ठरवितोस, तरी ते तुझ्या स्वभावजन्य कर्मामुळे विवश होऊन करशील (अध्याय १८, श्लोभक ६०). श्रीकृष्णाच्या या कथनाची मला प्रत्यक्ष अनुभूती आली.

 

३. काही शब्द योजण्यामागील प्रघात

अध्यात्मशास्त्रीय ग्रंथांमध्ये आत्मा, पुरुष, परमात्मा, ईश्वर, ब्रह्म हे शब्द भेद न बाळगता एकमेकांसाठी योजले जातात. कुठे काय अर्थ घ्यायचा, हे अनुभवाने किंवा आद्य शंकराचार्य, ज्ञानेश्वर यांच्यासारख्या महात्म्यांनी सांगितलेल्या श्लोकांच्या अर्थाने समजते. याच प्रकारे गीतेच्या दुसऱ्या अध्यायात बुद्धियोग हा शब्द कर्मयोगासाठी, तर दहाव्या अध्यायाच्या दहाव्या श्लोकात आत्मज्ञान या अर्थाने योजला गेला आहे. स्वरूप म्हणजे स्वतःचे रूप; पण ग्रंथांमध्ये स्वरूप हा शब्द रूप या अर्थाने योजण्याचा आणि स्वतःच्या रूपासाठी स्वस्वरूप शब्द योजण्याचा प्रघात आहे.

ग्रंथात काही ठिकाणी संख्या लिहिल्या आहेत. त्या अनुक्रमे गीतेतील अध्याय आणि श्लोक यांच्या संख्या आहेत.

 

४. श्रीकृष्णाच्या उपदेशाचा सारांश !

४ अ. मुक्त व्हा, म्हणजे मुक्त व्हाल !

स्वरूपाचे अज्ञान, कामना आणि अहंकार यांपासून मुक्त व्हा, म्हणजे जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हाल.

 

५. कृतज्ञता

५ अ. प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले
या थोर विभूतीने गीतेवरील हे लिखाण ग्रंथरूपाने
छापणार, असे सांगितल्याबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता !

गीतेत सांगितलेल्या कर्मयोग, ध्यानयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग इत्यादी साधना करून आधी चित्तशुद्धी होते आणि नंतर मोक्षाची प्राप्ती सुलभ होते. तीच चित्तशुद्धी सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले स्वभावदोष निर्मूलनाच्या प्रक्रियेद्वारा साधकांची करून घेऊन त्यांना मुक्ती सुगम करून देत आहेत. अशा थोर विभूतीने माझे गीतेवरील लिखाण ग्रंथरूपाने छापणार असे सांगितल्याबद्दल मी त्यांचा कृतज्ञ आहे.

५ आ. रामसुखदासजी महाराज यांचा ऋणी आहे !

ब्रह्मलीन स्वामी रामसुखदासजी महाराजांच्या लिखाणातून तत्त्वज्ञानातील अनेक विषयांवर मला सुस्पष्ट दृष्टीकोन मिळाला. मी त्यांचा ऋणी आहे.

५ इ. भगवान श्रीकृष्णासमोर कृतज्ञतेने नतमस्तक !

माझ्या किशोरावस्थेपासूनच ज्यांचे बोट धरून मी आत्मज्ञानप्राप्तीच्या मार्गावर चाललो, ते समर्थ रामदासस्वामी आणि किशोरावस्थेतच ज्याने माझा हात धरला अन् तो आजपावेतो सोडला नाही आणि गीतेचे ज्ञान दिले, तो भगवान श्रीकृष्ण यांच्यासमोर मी कृतज्ञतेने नतमस्तक आहे.

– श्री. अनंत बाळाजी आठवले (भाऊकाका – प.पू. डॉक्टरांचे ज्येष्ठ बंधू), शीव, मुंबई. (२१.१२.२०१३)

 

Leave a Comment