एखाद्या वस्तूवर जलद गतीने आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्याची पद्धत

Article also available in :

एखाद्या वस्तूवरील त्रासदायक स्पंदनांचे आवरण काढण्यासाठी त्या वस्तूच्या काठासमोरून
मुठीने आवरण काढा आणि त्यानंतर वस्तूच्या काठासमोर तळहात ठेवून आध्यात्मिक उपाय करा !

सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

‘एकदा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यज्ञासाठी नेसणार असलेल्या साडीमध्ये त्रासदायक स्पंदने येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. (समष्टी साधना करणार्‍यांवर अनेकदा वाईट शक्ती आक्रमणे करतात. म्हणून त्यांच्या वस्तूंमध्ये त्रासदायक स्पंदने असतात.) त्यांनी ती साडी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करून त्रासदायक स्पंदने दूर करण्यासाठी माझ्याकडे दिली. ती साडी उपाय करण्यासाठी हातात घेतल्यावर मला देवाने विचार दिला, ‘त्या साडीवर हात ठेवून उपाय करण्यापेक्षा त्या साडीच्या काठांसमोर हात ठेवून उपाय करूया.’ एखाद्या वस्तूमधून त्रासदायक किंवा चांगली स्पंदने प्रक्षेपित होतांना ती त्या वस्तूच्या काठामधून सर्वाधिक प्रमाणात प्रक्षेपित होतात. त्यामुळे त्या वस्तूच्या काठावर उपाय केल्यावर त्याचा परिणाम सर्वाधिक प्रमाणात होईल. उपाय करण्यामागील हे शास्त्र लक्षात आल्यावर मी त्याप्रमाणे साडीवर उपाय केले आणि खरोखरच त्याचा परिणाम जलद गतीने झाला.

मी घडी घातलेल्या साडीच्या एकत्रित काठांसमोर १ ते २ सें.मी. अंतरावर माझ्या हाताचा तळवा ठेवून ५ मिनिटे ध्यान लावल्यावर त्या साडीमधून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होणे थांबले. त्यानंतर त्या साडीमधून चांगली स्पंदने प्रक्षेपित होत असल्याचे लक्षात आले आणि ते ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी केल्यावरही सिद्ध झाले. त्याची निरीक्षणे खालील सारणीत दिली आहेत.

त्यानंतर आणखी एक सूत्र लक्षात आले, ‘एखाद्या वस्तूवरील त्रासदायक स्पंदनांचे आवरण दूर करण्यासाठीही त्या वस्तूच्या काठासमोरून मुठीने आवरण काढल्यास त्या वस्तूवरील आवरणही लवकर निघून जाते. त्यानंतर त्या वस्तूच्या काठासमोर तळहात ठेवून आध्यात्मिक उपाय केल्यावर तिच्यामध्ये लवकर चांगली स्पंदने येतात.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment