‘साधकांना सर्व संकटांचा खंबीरपणे सामना करता यावा’, यासाठी साधनेची शिकवण देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

सध्या सामाजिक, नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती, असे सर्व बाजूंनी संकटांनी घेरल्यामुळे समाज हतबल झाल्याचे दिसून येत आहे. अनेकांना भविष्यातील चिंतांनी ग्रासलेले आहे. आर्थिक अनिश्‍चिततेमुळे नैराश्याचे प्रमाणही वाढलेले आहे. अशा परिस्थितीत खंबीर राहून संकटांचा धिराने सामना करण्यासाठी मनोबल आणि आत्मबळ लागते. ‘ते साधनेनेच मिळू शकते’, हे लक्षात घेऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अनेक वर्षांपूर्वीपासूनच साधकांची साधना वाढवण्यावर भर दिला. नामजपामुळे साधकांना आत्मबळ लाभत आहे, तर स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेमुळे साधकांचे मनोबल उंचावत आहे. सनातनचे सहस्रो साधक सध्याच्या सामाजिक प्रतिकूलतेचा सामना खंबीरपणे करत आहेत, तसेच स्वतः स्थिर राहून इतरांनाही आधार देत आहेत. याचे खरे गमक परात्पर गुरु डॉक्टरांनी केलेल्या साधनेच्या संस्कारांमध्ये आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले

 

साधकांच्या साधनेतील आधारस्तंभ :
स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया अन् भाववृद्धी सत्संग !

साधकांचे मनोबल उंचावणारी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया

कु. योगिता पालन

कु. वैष्णवी वेसणेकर

‘परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना व्यष्टी साधना म्हणून नामजप, स्वभावदोष अन् अहं निर्मूलन करणे, यांसारखे प्रयत्न करण्याची शिकवण दिली. साधकांच्या व्यष्टीसाधनेच्या प्रयत्नांचा साप्ताहिक आढावा घेऊन त्यांना पुढील दिशा देण्याची अभिनव पद्धत केवळ सनातन संस्थेमध्येच आहे. सर्व साधक ‘स्वतःकडून ईश्‍वरप्राप्तीसाठी कोणते प्रयत्न झाले ?’, याचे चिंतन सांगून मार्गदर्शक साधकांकडून पुढील दिशा घेतात. स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया ही साधकांचे मन घडवणारी प्रक्रिया आहे. गेल्या काही वर्षांत परात्पर गुरु डॉक्टरांनी ही प्रक्रिया अधिक गतीमान केली. त्यामुळेच जराही न डगमगता संकटाचा सामना करता आल्याची अनुभूती शेकडो साधक घेत आहेत.

मोठ्या आपत्तींमध्ये केवळ मनोबल असून चालत नाही, तर ईश्‍वरावर नितांत श्रद्धा ठेवून सकारात्मक रहावे लागते. ‘अनेक वर्षे सातत्याने ईश्‍वराला प्रार्थना करणे, मधे मधे देवाचे स्मरण करणे, देवाने केलेल्या कृपेची स्वतःला जाणीव होण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणे’, यांसारख्या प्रयत्नांमुळे ईश्‍वराचे साहाय्य घेण्याचा संस्कार मनावर होतो. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांचा भक्तीभाव वाढवण्यासाठीही विशेष प्रयत्न केले. आरंभी ठिकठिकाणचे साधक एकत्र येऊन ईश्‍वराविषयी भक्तीभाव वाढवणार्‍या सूत्रांविषयी चर्चा करून प्रयत्नांची दिशा ठरवायचे. गेली ४ वर्षे आता संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून भाववृद्धी सत्संग होत असून एप्रिल २०२१ पर्यंत वैविध्यपूर्ण विषयांवरील २०६ भाववृद्धी सत्संग पूर्ण झाले आहेत. सध्या या सत्संगांतर्गत ‘आपत्कालीन स्थितीला श्रद्धेने कसे सामोरे जावे ?’, या संदर्भात विशेष मार्गदर्शन करण्यात येत आहे. सनातनच्या श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ साधकांना मार्गदर्शन करून त्यांच्या अंतरात श्रद्धेचे आणि भक्तीचे बीजारोपण करत आहेत.

‘या सत्संगांत केलेल्या मार्गदर्शनानुसार साधना केल्यामुळे साधकांना विविध संकटांना कशा प्रकारे सामोरे जाता आले ?’, या संदर्भातील काही प्रेरक प्रसंग येथे दिले आहेत. हे अनुभवकथन पहाता ‘गुरुदेवांनी साधकांच्या अंतरात रोवलेले साधनाबीज आता अंकुरले आहे’, हेच दिसून येते. अत्यंत सामान्य जीवन जगणार्‍या आम्हा साधकांना साधनेची शिकवण देऊन असामान्यत्वाकडे घेऊन जाणार्‍या परात्पर गुरु डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्दच नाहीत. ‘त्यांनी शिकवलेली साधना अंगीकारून या आपत्काळातही आमच्याकडून ईश्‍वरप्राप्तीचे प्रयत्न होऊ देत’, अशी त्यांच्याच चरणी प्रार्थना आहे.

 

‘साधना केली की, कठीण प्रसंगात देवच
योग्य विचार देऊन साधकाची काळजी घेतो’, याची काही उदाहरणे

१. श्री. रणजीत प्रसाद

गुरूंनी आतून योग्य त्या मार्गावरून जाण्यास सुचवणे

‘एके ठिकाणी जातांना समोर २ रस्ते होते. गुरूंनी आतून सांगितले की, या नको दुसर्‍या रस्त्याने जा. दुसर्‍या रस्त्याने गेलो, तेव्हा नंतर कळले की, आधीच्या रस्त्यावर भीषण आग लागली होती, ५ गाड्यांनी आग विझवत होते. तेव्हाही मी कृतज्ञता व्यक्त करायला अल्प पडलो. आता सत्संगात जाणीव झाली. ‘गुरु भीषण आपत्काळात कसे रक्षण करणार’, हे प्रत्यक्ष अनुभवले.’

२. श्रीमती जयश्री जावळकोटी, सोलापूर

घरावर मोठी आपत्ती कोसळूनही गुरूंच्या कृपेने वास्तूचे आणि कुटुंबियांचे रक्षण होणे

‘१० दिवसांपूर्वी मोठे वादळ झाले आणि आमच्या शेजारच्या घराच्या बाजूलाच भिंतीला लागून वीज पडली. तेव्हा मोठे दगड आमच्या घरात पडले. आमच्या घराचे पाठीमागचे दार उघडे होते. तेथून दगड आत घुसले होते. एक मोठा ७ – ८ वजनाचा किलो मोठा दगड एक-दीड फूट अंतरावर पडला. तो जावयांनी ढकलून दिला आणि ते मुलाला घेऊन आतल्या खोलीत गेले. त्या वेळी मी झोपले होते. आवाज आल्याने मी एकदम घाबरले. ‘प.पू. गुरुदेव, हे काय झाले ?’, असे म्हणून मी ओरडले. बघते, तर काय ? सगळ्या घरात दगड होते. ते पाहून मीपण थोडीशी घाबरले. मी सगळ्यांना शांत केले. गच्चीवर बघितले, तर तेथेही पुष्कळ दगड होते. गुरुदेवांनी किती काळजी घेतली ! नातवाच्या डोक्यावर जर दगड पडला असता, तर काय झाले असते ? त्याला वास्तुदेवतेने वाचवले. मी तिला प्रतिदिन प्रार्थना करते आणि कृतज्ञता व्यक्त करते, तसेच तिची शुद्धी करते. देवाने मला सेवेचे फळ दिले. एवढ्या मोठ्या संकटातून वाचवले. गुरुमाऊलीने माझी श्रद्धा वाढण्यासाठी हा प्रसंग घडवला.’

३. सौ. विद्या कुलकर्णी, सोलापूर

‘परात्पर गुरु डॉ. आठवले तारणहार आहेत’, याची साधिकेला आलेली प्रचीती !

‘गेल्या आठवड्यात एक प्रसंग घडला आणि त्यात ‘देव कसा सांभाळ करतो ?’, याची अनुभूती देवाने दिली. माझा मुलगा बेंगळुरूला आहे. त्याचे स्वतःचे आस्थापन आहे. दळणवळण बंदीमुळे तो घरीच होता. त्याला सरकारकडून ऑर्डर आली की, तुम्ही मास्क बनवून द्या. त्याचा मला भ्रमणभाष आला, ‘‘मला आस्थापन चालू करावे लागेल.’’ एक क्षण माझ्या मनात विचार आला, ‘आता कसे व्हायचे ? त्याचे नवीनच लग्न झाले आहे. ही ऑर्डर नको.’ तो म्हणाला, ‘‘आई, तू एवढी साधना करतेस, लोकांना सांगतेस. मला अनेकांना वाचवण्याची संधी मिळत आहे, तर त्या देवाला तू केवळ प्रार्थना कर.’’ नंतर भाववृद्धी सत्संगात सांगितलेल्या चिमणीचे उदाहरण माझ्या डोळ्यांसमोर आले आणि गुरुदेव शंख अन् चक्र धारी विष्णूच्या रूपात माझ्या समोर उभे असलेले मला दिसले. मी त्यांचे चरण घट्ट धरले आणि त्यांना सांगितले, ‘गुरुदेव, तुम्हीच तारणहार आहात; पण मी चिमणी नाही. मला तिच्यासारखी प्रार्थना करता येत नाही. मी एक आई आहे आणि आईची व्यथा तुम्हाला कळते. तुम्ही संपूर्ण जगाची आई आहात, तर या आईची प्रार्थना ऐकून घ्या. माझे लक्ष तुमच्या चरणांशी राहू द्या. हे चित्त तुमच्या चरणांपासून ढळू देऊ नका.’ मग त्यांनी सांगितले, ‘‘तुझ्या बाळांचे रक्षण होणारच आहे.’’ त्या वेळी मी सगळी स्तोत्रे, दुर्गादेवीचा जप, प.पू. बाबांची (प.पू. भक्तराज महाराज यांची) भजने हे सगळे मुलाला ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरून पाठवले आणि त्याला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘तू काम करत असतांना हे अखंड लावून ठेव आणि सगळी स्तोत्रपण ऐक. जेव्हा तू काम करणार, तेव्हा तुझ्या उजव्या बाजूला एक आसंदी ठेव.’’ हे सगळे देवच माझ्याकडून वदवून घेत होता. ‘त्याला मी काय सांगत आहे ?’, हे मला कळतही नव्हते. मी गुरुदेवांना शरण गेले. त्या वेळी माझ्या मनामध्ये केवळ एकच वाक्य यायचे, ‘तुम्ही तारणहार आहात गुरुदेवा !’ मुलाला २ दिवस आणि २ रात्री मास्क बनवण्यासाठी लागले. सगळे झाल्यावर त्याने मला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘त्यांनी ६ जणांची टीम केली होती. ते जेव्हा कार्यालयात जायचे आणि काम करायला बसायचे, त्या वेळी तू दिलेली भजने मी संगणकावर लावून ठेवायचो. ‘तू सांगितलेल्या आसंदीवर कुणीतरी बसले आहे आणि मला सांगत आहे, ‘माऊसवर कसे बोट ठेवायचे ?’, असे मला जाणवायचे. काम पूर्ण व्हायला अनेक दिवस लागले असते. ते काम २ दिवस आणि २ रात्रीत पूर्ण झाले. मला त्याचा मुळीच ताण आला नाही. हे सगळे तू केलेल्या प्रार्थनेमुळे झाले आई.’’ तेव्हा माझी भावजागृती झाली. मला अखंड जाणवत होते की, त्या आसंदीवर कुणीतरी बसले आहे. मी मुलाला विचारले, ‘‘ते कसे दिसत होते ?’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘हो आई, कुणीतरी धोतर नेसलेले, सदरा आणि कोट घातलेले, डोक्यावर टोपी घातलेले अन् हातात काठी घेतलेले होते. जेव्हा जेव्हा माझे त्या आसंदीकडे लक्ष जायचे, तेव्हा मला जाणवायचे की, तेथे ते बसलेले आहेत.’’ मग मी प.पू. बाबांचे छायाचित्र त्याला पाठवले आणि विचारले, ‘हे होते का रे ?’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘हो आई. हेच होते. ते अखंड मला आसंदीवर बसलेले जाणवायचे आणि माझ्याकडून अखंड भजन करून घ्यायचे.’’ यावरून लक्षात आले, ‘परात्पर गुरु तारणहार आहेत.’ ‘माझ्या छोट्याशा प्रार्थनेलाही ते धावून आले’, याविषयी कोटीशः कृतज्ञता !’

४. कु. सुनीता छत्तर, वाराणसी

कुटुंबियांच्या भविष्याची चिंता वाटून मन अस्थिर होणे आणि आत्मनिवेदन करताच सर्व विचार न्यून होऊन मन आनंदी होणे

‘घरचे गावी जात आहेत. घरची परिस्थिती तेवढी चांगली नाही. गावचे वातावरण पालटले आहे. घरचे तेथे जाणार, तर कसे होणार ?’, असे विचार येऊन मला त्यांची काळजी वाटू लागली. हा माझा अहंचा विचार असल्याचे माझ्या लक्षात आले. घरच्यांच्या विचारामुळे माझे साधनेकडचे लक्ष न्यून होत होते. तेव्हा सत्संगात सांगितल्याप्रमाणे ‘साक्षात् परात्पर गुरु समवेत आहेत’, असे मला जाणवले. त्यानंतर मी त्यांचे अस्तित्व अनुभवत होते. मी त्यांना प्रार्थना करत नव्हते; पण ते मला दिसत होते. तेव्हा मी त्यांच्याशी बोलू लागले. मला जाणीव झाली, ‘मी घरच्यांची काळजी काय घेणार ? देवच घेऊ शकतो.’ नंतर काही न सांगताच माझे मन आत्मनिवेदन करू लागले. त्यामुळे मन शांत आणि स्थिर झाले. आता घरचे मला सांगतात, ‘‘तू आमची काळजी करू नकोस. तू साधनेकडे लक्ष दे.’’ तेव्हा मला जाणीव होते, ‘मला काळजी करायची नाही, तर साधना आणि श्रद्धा वाढवायची आहे.’ ‘पुढे कसे होणार ?’, हे माझ्या मनातील विचार न्यून झाले. आता माझे मन शांत, स्थिर आणि आनंदी आहे.’

५. सौ. शीतल पवार, पुणे

दळणवळण बंदीच्या काळात आर्थिक स्थिती खालावली असतांना देवाच्या साहाय्याने त्यावर मात करता येणे आणि देवाच्या चरणी निर्धास्त राहून साधना करण्याची आवश्यकता लक्षात येणे

‘दळणवळण बंदीच्या काळात माझ्या पतींची नोकरी गेली. मला त्याचा ताण आला. आर्थिक परिस्थिती खालावलेली असल्याने सासू सासर्‍यांना पण ताण आला. आम्ही ऑनलाईन क्लास चालू केले. ६ – ७ मास कुणीच प्रवेश घेतला नव्हता. त्यात स्थलांतराचे घरी बोलले, तेव्हा घरच्यांना पटले नाही. सासू-सासरे म्हटले, ‘‘तुला जायचे आहे, तर तू जाऊ शकतेस. आम्हाला काही सक्ती करू नकोस.’’ तेव्हा मला पुष्कळ ताण आला. मी सद्गुरु स्वातीताईंशी (सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्याशी) बोलले. तेव्हा माझे मन ५० टक्के हलके झाले. परिस्थिती स्वीकारायची माझी सिद्धता झाली. आता मला काळजी वाटत नाही. ‘गुरुदेव योग्य वेळ आली की, योग्य ते करणारच आहेत. माझी साधना व्हायला पाहिजे’, असे विचार सतत मनात असायचे. मग मी परात्पर गुरु डॉक्टरांना सांगितले, ‘जे आहे, त्याचा मला १०० टक्के स्वीकार करायचा आहे.’ आपण आपल्या मनाने करण्याचा प्रयत्न करतो; पण गुरूंच्या मनात वेगळेच असते. डिसेंबरमध्ये अकस्मात् कोणतेही प्रयत्न न करता क्लासला २५ मुले आली. ‘देव कुठून कधी आणि कसा येईल ?’, हे आपण सांगू शकत नाही. ‘त्याच्या चरणी निर्धास्त राहून साधना करणे’ हे मला शिकायला मिळाले.’

६. सौ. वर्षा कोरडे, संभाजीनगर

भावाच्या निधनामुळे वाढलेले नकारात्मक विचार भाववृद्धी सत्संगामुळे न्यून होऊन त्या प्रसंगातून बाहेर पडता येणे आणि व्यष्टी अन् समष्टी साधना चालू होणे

‘माझ्या भावाचे अपघाती निधन झाल्याने मी पुष्कळ खचले. माझ्या मनातील नकारात्मकता वाढली; पण त्या परिस्थितीत परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्याकडून साधना करून घेतली. ‘आईच्या परिचयाच्या ज्या बायका भेटण्यास आल्या, त्यांना साधना सांगणे, सत्संगाला जोडणे’ इत्यादी सेवा देवाने माझ्याकडून करवून घेतल्या. त्या कठीण परिस्थितीतही माझी साधना झाली. या भाववृद्धी सत्संगातून माझ्या मनातील नकारात्मक विचार न्यून झाले. मनातील प्रश्‍नांची उत्तरे सत्संगातून मिळाली. ‘आता मनातील सर्व विचार न्यून होऊन व्यष्टी आणि समष्टी साधना गुरु करवून घेत आहेत’, याविषयी मला कृतज्ञता वाटली. गुरुदेवांच्या कृपेने या प्रसंगातून मला पुष्कळ शिकायला मिळाले आणि प्रेरणा मिळाली.’

७. सौ. जयश्री पाटील, जळगाव

कठीण प्रसंगात गुरुदेवांना अनुभवणे

‘७ दिवसांपूर्वी यजमानांनी सांगितले, ‘‘त्यांनी एका सहकार्‍यासमवेत प्रवास केला. त्यांना ताप आला. त्यांनी कोरोनाची चाचणी केली.’’ त्या वेळी हे सर्व होऊनही मी स्थिर होते. मी पतींनाही सांगितले, ‘‘श्रद्धा ठेवा. ते आहेत.’’ आध्यात्मिक उपायही केले. ‘प्रारब्धात जे आहे, ते आनंदाने भोगायचे आहे’, असे वाटायचे. ‘कितीही कठीण प्रसंग घडले, तरी एक क्षणही माझी श्रद्धा डळमळू नये, भगवंताच्या न्यायावर माझा विश्‍वास असावा’, अशी प्रार्थना झाली. माझ्या मनात संघर्ष व्हायचा. त्यांच्या मावशींना आणि यजमानांनापण मधुमेह आहे. ‘ज्यांना मधुमेह आहे आणि त्यांना कोरोना झाला, तर ते परत आले नाहीत’, असा विचार येऊन मला पुष्कळ थकल्यासारखे व्हायचे. तेव्हा मला वाईट वाटायचे की, माझी श्रद्धा अजून किती अल्प आहे. ‘या मायाजाळातून बाहेर पडायला केवळ गुरुदेवांचीच कृपा लागते’, हे मला शिकायला मिळाले. आता मी पुष्कळ स्थिर आहे.’

८. श्री. परेश गुजराथी, दाभोळ, रत्नागिरी

सद्गुरूंनी दिलेला ‘परिस्थिती पालटणे शक्य नसल्यामुळे श्रद्धा वाढवा’, हा दृष्टीकोन ऐकून काळजीचे विचार अल्प होणे

आमचे घर समुद्राजवळ आहे. पुढील काळात समुद्रात चक्रीवादळे इत्यादी निर्माण झाली, तर धोका निर्माण होऊ शकतो, असे विचार येत असत. आमच्या घराच्या चारही बाजूंनी धोकादायक सामाजिक स्थिती आहे. त्याविषयी मला कधी कधी काळजी वाटायची, तसेच ताणही यायचा. एकदा सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि सद्गुरु सत्यवान कदम यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले, ‘‘परिस्थिती पालटणे आपल्या हातात नाही, तर श्रद्धा आणि भक्ती वाढवा. प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते आणि योग्य वेळ आली की, ती गोष्ट घडत असते.’’ त्यानंतर माझे मन स्थिर झाले. भावसत्संगात सांगितल्याप्रमाणे वाटत आहे की, वेळ आली की, होणारच आहे. त्यामुळे काळजी कमी झाली. ‘माझी आणि कुटुंबियांची काळजी श्रीगुरु घेणारच आहेत. प्रत्येक गोष्ट देवाच्या इच्छेनेच होणार आहे’ अशी श्रद्धा निर्माण झाली आहे.

९. एक साधिका

‘गुरुदेव कुटुंबियांचे रक्षण करणारच आहेत’, हे मनावर बिंबवण्यासाठी स्वयंसूचना घेतल्याने काळजीचे विचार अल्प होणे

माझे यजमान आणि दीर दोघेही पोलीस आहेत. त्यांना कोरोना महामारीच्या काळातही कामासाठी प्रतिदिन बाहेर जावे लागते. त्या वेळी मला पुष्कळ काळजी वाटत असे. माझी मुलगीही पुण्याला असते. त्या वेळी माझ्या मनात विचार आला की, ‘गुरुमाऊलीने आपल्या सगळ्यांचे दायित्व घेतलेलेच आहे. त्यांनी सर्व साधकांच्या कुटुंबाची काळजी घेतलेली आहे; मग मी कशाला काळजी करते ? सगळे गुरुमाऊली करणार आहे.’ श्रद्धा वाढवण्यासाठी स्वयंसूचना घेतल्यानंतर माझ्या मनातील काळजीचे विचार कमी झाले.

– कु. योगिता पालन आणि कु. वैष्णवी वेसणेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.४.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक दैनिक सनातन प्रभात
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment