भक्तांच्या रक्षणासाठी मारक रूप घेऊन अवतरणार्या श्री दुर्गा देवीविषयीची माहिती या लेखातून करून घेऊया.

१. व्युत्पत्ती आणि अर्थ
अ. दैत्यनाशार्थवचनो दकारः परिकीर्तितः ।
उकारो विघ्ननाशस्य वाचको वेदसम्मतः ।
रेफो रोगघ्नवचनो गश्च पापघ्नवाचकः ।
भयशत्रुघ्नवचनश्चाकारः परिकीर्तितः ।।
अर्थ : दुर्गा शब्दातला ‘द’कार दैत्यनाश हा अर्थ सूचित करतो. ‘उ’कार हा विघ्ननाशाचा वाचक असल्याचे वेदांनी मान्य केले आहे. ‘रफारा’चा (गा वरील रफार) रोगहरण, ‘ग’चा पापनाशन आणि ‘आ’चा भय आणि शत्रू यांचे हनन, असा अर्थ सांगितलेला आहे.
आ. दुर्ग नावाच्या दैत्याचा वध केलेला पाहून लोक तिला दुर्गा म्हणू लागले.
इ. ‘दुर्गा’मधील ‘दुर्’ म्हणजे वाईट आणि ‘ग’ म्हणजे गमन करणारी, नाहीशी करणारी. वाईटाचा नाश करणारी ती दुर्गा होय.
ई. मूळ रूप दुर्गा : ‘पूर्वी निरनिराळ्या भागांत निरनिराळ्या देवी अनेक नावांनी पुजल्या जात होत्या. पुराणकारांनी या सर्व देवींना दुर्गा या ठिकाणी एकरूप केले आणि तिला शिवाच्या पत्नीपदावर बसवले.’
२. श्री दुर्गादेवी – वैशिष्ट्ये आणि कार्य
अ. महिषासुर, चंड-मुंड आणि शुंभ-निशुंभ या बलदंड दैत्यांचा वध करून श्री दुर्गादेवी ही महाशक्ती ठरली अन् तिने सर्व देव आणि मानव यांना अभय दिले. देवांनी स्तुती केल्यावर त्यांना अभय वचन देतांना ती म्हणाली –
इत्थं यदा यदा बाधा दानवोत्था भविष्यति ।
तदा तदाऽवतीर्याहं करिष्याम्यरिसंक्षयम् ।। – मार्कंडेयपुराण, ९१.५१
अर्थ : अशा प्रकारे जेव्हा जेव्हा दानवांकडून (जगाला) बाधा होईल, तेव्हा तेव्हा मी अवतार घेऊन शत्रूचा क्षय करीन.
आ. दुर्गेच्या आधिदैविक स्वरूपाच्या पलीकडे तिचे एक आध्यात्मिक स्वरूपही आहे. त्या स्वरूपात ती भक्तांची माया-मोह निरसून त्यांना ब्रह्मपदावर आरूढ करते. आपल्या या आध्यात्मिक स्वरूपाचे वर्णन तिनेच स्वमुखाने सांगितले आहे, ते असे –
सर्वे वै देवा देवीमुपतस्थुः । काऽसि त्वं महादेवि ।।
साऽब्रविदहं ब्रह्मस्वरूपिणी । मतः प्रकृतिपुरुषाऽत्मकं जगच्छून्यं चाऽशून्यं च ।।
अहमानन्दाऽनानन्दा विज्ञानाविज्ञाने अहम् । ब्रह्माब्रह्मणी वेदितव्ये ।। – देव्युपनिषद
अर्थ : सर्व देव देवीपुढे उपस्थित झाले आणि त्यांनी तिला विचारले, ‘‘हे महादेवी, तू कोण आहेस ?’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘मी ब्रह्मस्वरूपिणी आहे. हे प्रकृतीपुरुषात्मक आणि शून्य-अशून्यात्मक जगत मजपासूनच उत्पन्न झाले आहे. आनंद आणि निरानंद मीच आहे. विज्ञान आणि अविज्ञान मीच आहे. जाणण्यास योग्य असे ब्रह्म आणि अब्रह्म मीच आहे.’’
इ. दुर्गेची प्रतिमा म्हणजे राष्ट्रशक्तीचे प्रतिरूपच आहे. राष्ट्राचे शरीर-मनोबल, सर्वांगीण समृद्धी आणि अध्यात्मसंपदा, या तिन्हींचा संयोग त्या प्रतिरूपात झालेला आहे. या विधानाची प्रचीती देणारी अनुभूती एका साधकाला आली.
ई. दुर्गेची शक्ती ही इच्छा, ज्ञान आणि क्रिया या रूपांनी त्रिविध आहे.
३. उपासना
आपल्या उपास्यदेवतेची वैशिष्ट्ये अन् तिच्या उपासनेविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती ज्ञात झाल्यास देवतेप्रती श्रद्धा निर्माण होते. त्यामुळे साधना चांगली होण्यास साहाय्य होते.
अधिक माहितीसाठी पहा ‘देवीची उपासना’.
४. नवदुर्गा
सृष्टीमध्ये एकूण नवमिती असून प्रत्येक मितीवर एकेक दुर्गादेवीचे आधिपत्य आहे. अशा एकूण नऊ दुर्गा आहेत; म्हणून त्यांना ‘नवदुर्गा’ असे म्हणतात.
अ. ‘नऊ’ या आकड्याची वैशिष्ट्ये
१. ‘महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती ही (शक्तीची) तीन प्रमुख रूपे होत. या प्रत्येक रूपात आणखी दुसरी दोन रूपे प्रविष्ट होऊन तिघींचे त्रिवृत्करण झाले. मग या नऊ रूपांना नवदुर्गा हे नाव मिळाले.’
३. पार्वतीची नऊ रूपे म्हणजे नवधाप्रकृती होय. यांनाच श्री शंकराचार्य नवात्माप्रकृती म्हणतात. नवधाप्रकृती म्हणजे पंचमहाभूते, मन, चित्त, बुद्धी आणि अहं अशी नऊ तत्त्वे होय.
श्री दुर्गादेवीची मूर्ती सिद्ध करतांना मूर्तीकाराने पाळावयाचे आचारधर्म, करावयाची साधना अन् त्यामागील शास्त्र
देवीची उपासना
ही माहिती वाचल्यावर दुर्गादेवी प्रति श्रद्धा वाढण्यास सहाय्य झाले. सनातन संस्था निर्मित दुर्गादेवीचे सात्विक चित्र पाहून भावजागृती होते.