श्री दुर्गादेवीची मूर्ती सिद्ध करतांना मूर्तीकाराने पाळावयाचे आचारधर्म, करावयाची साधना अन् त्यामागील शास्त्र

१. श्री गणेशमूर्ती शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवल्या
जात नसल्याने गणेशभक्त खर्‍या आनंदाला मुकणे

rs78875_sri_durgadevi_merge-scr
सनातन-निर्मित श्री दुर्गादेवीचे चित्र

मनुष्याला मूर्तीच्या माध्यमातून देवाशी जोडले जाणे सुलभ होते. श्री गणेशचतुर्थीच्या काळातील सर्व भक्तांचा केंद्रबिंदू, म्हणजे श्री गणेशमूर्ती. देवतेची मूर्ती घडवतांना अध्यात्मशास्त्र महत्त्वाचे असते. मूर्तीचा रंग, आकार, उंची आणि त्या मूर्तीत देवत्व आणणे ही दैवी कला आहे. मूर्तीकाराला आचारधर्माचे पालन आणि साधना केल्यामुळे ही कला आत्मसात होते; परंतु मूर्तीकाराला याचे ज्ञान नसल्याने आणि मूर्ती सिद्ध करण्यामागे केवळ व्यावसायिक दृष्टीकोन असल्यामुळे मूर्तीत देवत्व अल्प प्रमाणात येते. परिणामी मूर्तीकारावर देवतेची कृपा होत नाही आणि गणेशभक्तही खर्‍या आनंदाला मुकतो.

मूर्तीत देवीचे अधिकाधिक तत्त्व येण्यासाठी मूर्तीकाराने कोणती साधना करावी ? कोणते आचारधर्म पाळावेत ? तसे केल्यावर मूर्तीकाराला कोणता लाभ होणार आहे ? आचारधर्माचे पालन न केल्यास काय हानी होऊ शकते ? इत्यादी विविध पैलूंचे या लेखात शास्त्रीय भाषेत वर्णन केले आहे.

मूर्तीकार आणि भक्त या दोघांनाही खरा आनंद प्राप्त व्हावा, यासाठी या लेखातील ईश्‍वरी ज्ञान उपयोगी ठरेल.

 

Ram_honap
श्री. राम होनप

२. मूर्तीत तत्त्व आकृष्ट होईल, अशा पद्धतीने तिची रचना करणे आवश्यक !

मूर्तीविज्ञान हे तत्त्वधारणेवर आधारित आहे. मूर्तीत देवतेचे तत्त्व येण्यासाठी मनुष्याचे आचरण देवतेला अनुसरून असायला हवे. हे तत्त्वज्ञान मूर्ती घडवण्याचा पाया मानले जाते. मूर्तीला मनाप्रमाणे कसाही आकार दिला, तर तिच्यात देवतेचे तत्त्व येत नाही. त्यामुळे मूर्तीत तत्त्व आकृष्ट होईल, अशा पद्धतीने तिची रचना करावी लागते.

 

३. मूर्ती घडवतांना पाळावयाचे आचारधर्म

३ अ. आहार

फलाहार अथवा सात्त्विक आहार ग्रहण करावा. अगदी साध्या सुपारीचेही व्यसन टाळावे. पुष्कळ पोट भरलेले असतांना किंवा उपाशीपोटी मूर्ती घडवू नये. या दोन्ही स्थितीत लक्ष मूर्तीऐवजी स्वतःच्या शरिराकडे अधिक असते. अशा वेळी समतोल आहार ठेवावा.

३ आ. शुचिर्भूतता

मूर्तीला स्पर्श करण्यापूर्वी हात, पाय आणि नेत्र यांची शुद्धी करणे आवश्यक आहे. प्रतिदिन कपडे धुतलेले आणि सात्त्विक असावेत. देवपूजा करण्यापूर्वी स्नान करणे बंधनकारक असते, त्याप्रमाणे मूर्ती घडवणे, हीसुद्धा देवपूजा असल्याने या गोष्टी बंधनकारक आहेत.

३ आ १. शास्त्र : शरीर पाण्याने शुद्ध केल्याने बाह्य मळ निघून जातो, तसेच संबंधित जिवावर काही आसुरी बाधा आलेली असेल, तर तीही दूर होते. पाण्याचा शरिरावर आणि मनावरही परिणाम होऊन मन उत्साही अन् शांत रहाण्यास साहाय्य होते.

३ इ. ब्रह्मचर्य

या काळात स्त्रीसंग टाळावा.

३ इ १. शास्त्र अ. एका संभोगाने अर्धा ते एक प्रतिशत शक्ती न्यून झालेली असते. त्यामुळे भावाचे प्रमाण न्यून होऊ शकते आणि या क्रियेचा मूर्तीवर परिणाम होतो.

आ. संभोगाच्या क्रियेतून निर्माण झालेल्या रज आणि तम गुणांमुळे काही वेळ चित्त दूषित झालेले असते. त्यामुळे मूर्तीत दोष उत्पन्न होऊ शकतो.

३ ई. स्पर्श

मूर्ती सिद्ध करतांना मूर्तीकार आणि संत यांव्यतिरिक्त अन्य कुणीही मूर्तीला स्पर्श करू नये.

३ ई १. शास्त्र 

अ. मूर्तीत देवत्व येऊ लागते, तशी मूर्ती सजीव आणि संवेदशील बनते. त्यामुळे तिला होणार्‍या मनुष्याच्या स्पर्शाचा तिच्यावर परिणाम होतो.

आ. मूर्तिस्पर्शेन गुणदोषाणां निर्मितिः । मर्यादितस्पर्शेन शुद्धनिर्मितिः ।

अर्थ : मूर्तीस्पर्शाने गुण आणि दोष यांची निर्मिती होते. मर्यादित स्पर्शाने शुद्ध निर्मिती होते. या नियमांचा आचारधर्मात समाविष्ट केला आहे. आचारधर्माचे पालन केल्याने ईश्‍वरी कृपा प्राप्त होते.

इ. भावेन मूर्तिः भक्त्या च मुक्तिः पवित्रकर्मणा देवीतत्त्वं लभ्यते ।

अर्थ : भावातून मूर्ती आणि भक्तीतून मुक्ती प्राप्त होते, तर पवित्र कर्मांनी देवीतत्त्व प्राप्त होते. कर्म सुयोग्य पद्धतीने केल्याने पावित्र्य निर्माण होते. पवित्र कर्माने देवीतत्त्वाचा लाभ होतो.

ई. शुद्धजलं स्पर्शेन भवति अपवित्रम् । मूर्तिश्‍च स्पर्शन भवेत् अपवित्रम् ।
देव्याश्‍च तत्त्वं शुद्धात् शुद्धतमम् । मनुष्यस्पर्शेन बाधा भवति तत्त्वे ।

अर्थ : शुद्ध पाण्याला स्पर्श केल्याने ते अपवित्र होते. त्याप्रमाणे मूर्तीला स्पर्श केल्याने ती अपवित्र होते. देवीचे तत्त्व शुद्धाहून शुद्ध आहे. मनुष्य स्पर्शाने तत्त्वात बाधा उत्पन्न होते.

उ. त्रिगुणात्मकरूपा देवी मनुष्यसमीपं आगच्छति तदा देव्याः रूपं गुणस्वरूपम् ।

अर्थ : त्रिगुणात्मक रूप असलेली देवी जेव्हा मनुष्याच्या जवळ येते, त्या वेळी देवी गुणस्वरूप बनते.

देवी मूर्तीच्या माध्यमातून भक्ताच्या
सान्निध्यात येताच तिला गुणमयी अवस्था प्राप्त होणे

देवांच्या मूर्ती पुरुषतत्त्वाशी संबंधित असतात, तर देवीची मूर्ती शक्तीतत्त्वाशी संबंधित असते. शक्ती स्त्री स्वरूपात असते. जेव्हा देवी मूर्तीच्या माध्यमातून मनुष्याच्या, विशेषतः भक्ताच्या सान्निध्यात येते, तेव्हा तिची गुणमयी अवस्था असते. ही अवस्था शालीनता, सौंदर्य, कोमलता आणि कौमार्य अशा स्वरूपात असते, उदा. पर्जन्यकण ज्या वेळी वातावरणात असतात, त्या वेळी त्यांचे गुणधर्म अन् नियम वेगळे असतात. पर्जन्यकण वातावरणात असतात, त्या वेळी ते आप आणि वायू तत्त्व यांचे बनलेले असतात. जेव्हा या कणांचे थेंबात रूपांतर होते, त्या वेळी हा थेंब आप + वायू + पृथ्वी या तत्त्वांनी बनलेला असतो. पावसाचे थेंब खाली पडतात, तेव्हा त्यांना पाण्याचे गुणधर्म लागू होतात. या पाण्याचे बाष्प होऊन ते परत वातावरणात जातात, तेव्हा परत पर्जन्यकणांना त्यांचे मूळ गुणधर्म आणि नियम प्राप्त होतात, त्याप्रमाणे देवतांचे असते.

३ उ. मूर्ती पूर्ण होईपर्यंत तिच्याभोवती कापडाचे आवरण असावे, जेणेकरून ती सहजतेने कुणाच्याही दृष्टीस पडणार नाही.

३ उ १. शास्त्र : अपूर्ण मूर्ती ही नग्नावस्थेत असते. मूर्तीवर पडलेल्या अयोग्य दृष्टीनेही मूर्तीतील तत्त्वाचा अनादर होऊ शकतो. अशा ठिकाणी देवतेला थांबू नये, असे वाटते.

३ ऊ. फुले, पक्षी आणि प्राणी यांना जाणिवा असतात. त्याप्रमाणेच मूर्तीत देवतेचे तत्त्व उतरते, त्या वेळी ती सजीव होते. तिच्यात जाणिवा निर्माण होतात.

३ ए. मनुष्याच्या दृष्टीचा देवतेच्या तत्त्वावर परिणाम होणे

येता-जाता देवीकडे पाहिल्यास त्या वेळी मनुष्याचा भाव कार्यरत नसून मन अधिक प्रमाणात कार्यरत असते. त्याचा परिणाम मूर्तीवर होतो. एका जागी थांबून अपूर्ण मूर्तीचे दर्शन घेतले, तरी चालते. त्या वेळी साधकांचा देवतेप्रती भाव असतो. त्यामुळे तिचा अनादर होत नाही. पृथ्वी, आप, अग्नि, वायू आणि आकाश या तत्त्वांचा मानवी शरिरावर परिणाम होतो, त्याप्रमाणे मनुष्याच्या दृष्टीचा देवतेच्या तत्त्वावर परिणाम होतो. इतके देवतेचे तत्त्व सूक्ष्म आणि संवेदनशील असते.

३ ऐ. मूर्ती घडवतांना मूर्तीकाराने मूर्ती आणि संबंधित उपकरणे यांव्यतिरिक्त अन्य कुठल्याही वस्तूला स्पर्श करू नये. असे केल्यास हात धुऊन मगच मूर्तीसंबंधी पुढील कृती करावी.

१. मन उद्विग्न, उदास, क्रोधित आणि उत्तेजित असेल, त्या वेळी हे दोष मूर्तीत उतरू शकतात. त्यामुळे मूर्ती घडवतेसमयी मन शांत आणि प्रसन्न ठेवावे.

२. मूर्तीत देवीतत्त्व अवतरित होणे, हे मानवी क्षमतेबाहेर असल्याने आध्यात्मिक उपायांना महत्त्वाचे स्थान आहे.

 

४. आचारधर्मांचे पालन करण्याचे महत्त्व

सातत्याने आणि कठोरतेने केलेल्या साधनेला तपश्‍चर्या म्हणतात. देवतेची मूर्ती घडवणे, हीसुद्धा तपश्‍चर्या आहे. एका जागी बसून तप करतांना काही चूक झाल्यास त्याचा व्यक्तीगत परिणाम होतो; परंतु मूर्तीसमवेत होत असलेल्या तपश्‍चर्येतून काही दोष उत्पन्न झाल्यास मूर्तीत दोष उत्पन्न होऊ शकतो. असे घडू नये, यासाठी शास्त्राने आचारधर्माचे पालन करण्याची आज्ञा दिली आहे.

अ. या नियमांचे पालन केल्याने मूर्ती शुद्ध राहून मूर्तिविज्ञानाविषयी मूर्तीकाराला आकलन होते, तसेच मूर्ती घडवण्याचे कार्य निर्विघ्नपणे पार पडते.

आ. नियमांचे पालन केल्याने मूर्तीकार साधकाची व्यष्टी साधना होऊन आपत्काळात मूर्तीत अवतरित होणार्‍या देवीतत्त्वाचा लाभ साधकांना होणार असल्याने त्यातून साधकाची समष्टी साधनाही होते.

इ. आचारधर्मपालनेन धर्मविजयो भवति । आचरणं कृत्वा शान्तिं लभेत ।

अर्थ : आचारधर्म पालनाने धर्माचा विजय होतो. आचरण केल्याने शांती लाभते.

ई. आचारपालनेन देवी प्रसन्ना भवति । मूर्तिकारस्य शुद्धचारित्र्येन देवीमूर्तिः पवित्रा भवति ।

अर्थ : आचारांचे पालन केल्याने देवी प्रसन्न होते. मूर्तीकाराच्या शुद्ध चारित्र्याने देवीची मूर्ती पवित्र बनते.

उ. आचारपावित्र्येण मूर्त्यां तत्त्वधारणा भवति । बह्व्या तत्त्वधारणया मूर्त्यां प्रसन्नता आगच्छति ।

अर्थ : आचारपावित्र्यामुळे तत्त्वधारणा होते. मोठ्या प्रमाणात तत्त्वधारणा झाल्याने मूर्तीत प्रसन्नता येते.

ऊ. स्वयंपाक करतांना ते बनवणार्‍याचे दोष अन्नात उतरतात, तसेच मूर्तीकाराच्या गुण-दोषांचा मूर्तीवर परिणाम होतो. ही मर्यादा लक्षात घेऊन आचारधर्माची निर्मिती झालेली आहे. आचारधर्माच्या पालनाने मूर्तीत संबंधित देवतेचे तत्त्व उतरण्यात येणार्‍या अडचणी दूर होतात.

ए. आचार आणि विचार यांचा चित्तावर परिणाम होतो. चित्ताची मूर्तीशी एकरूपता होते. जितकी चित्तशुद्धी अधिक, तेवढी तत्त्वाशी एकरूपता येऊन अधिक प्रमाणात मूर्तीत देवीचे तत्त्व येऊ लागते.

ऐ. आचारधर्माच्या पालनाने देव आणि मनुष्य यांमधील अंतर न्यून होऊन देवतांची मनुष्यावर कृपा होते.

 

५. मूर्ती पूर्ण होईपर्यंत मूर्तीकाराने
पाळावयाचे नियम आणि करावयाची विशिष्ट साधना

अ. २१ सप्टेंबर या दिवशी दिलेल्या आचारधर्मांचे पालन करावे.

आ. प्रतिदिन सकाळी देवीकवच म्हणावे. यामुळे आध्यात्मिक त्रासांपासून रक्षण होईल.

इ. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ प्रतिदिन ॐ श्री दुर्गादेव्यै नमः हा जप अर्धा घंटा करावा. यामुळे मूर्ती घडवण्यासाठी आवश्यक शक्ती आणि ज्ञान देवीकडून प्राप्त होण्यास साहाय्य होईल.

 

६. आदर्श मूर्ती सिद्ध होण्यासाठी
आवश्यक घटक आणि त्यांचे प्रमाण

table_1

 

७. मूर्ती घडवतांना करावयाच्या विविध प्रार्थना

अ. माते, धर्मकार्यासाठी आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी या मूर्तीत प्रगट हो !

आ. माते, तुला अपेक्षित अशी मूर्ती घडवण्याचा मार्ग मला दाखव !

इ. माते, मी तुला शरण आलो आहे.

 

८. मूर्तीतून प्रत्यक्ष देवच साकार होत असल्याने
तपश्‍चर्येच्या तुलनेत मूर्तीकाराला लवकर फलप्राप्ती होणे

एका जागी बसून केलेल्या तपश्‍चर्येतून ईश्‍वर प्रसन्न झाल्यावर देवता येऊन इच्छित मनोकामना पूर्ण करतात; पण मूर्तीतून प्रत्यक्ष देवच साकार होत असल्याने देव आवश्यक ते स्वतःहून मूर्तीकाराला देतो, म्हणजे लवकर फळ प्राप्त होते.

 

९. सांगितलेली सूत्रे कृतीत आणल्यास
मूर्तीत देवीचे तत्त्व २० प्रतिशतऐवजी २५ प्रतिशत आकृष्ट होईल.

१०. देवीला अपेक्षित अशी मूर्ती
घडवल्यास मूर्तीकार साधकाला होणारे लाभ

अ. बहुधा मूर्तीकाराच्या मागील काही पिढ्या अतृप्त असतात. देवतेचा आशीर्वाद प्राप्त झाल्यास त्या पिढ्यांची शुद्धी होते.

आ. देवीकृपाप्रसादेन मनःशान्तिं लभेत । (ज्ञानातून मिळालेला श्‍लोक)

देवीच्या कृपेने अनेक वर्षांपासून मूर्तीकाराला न मिळालेली मनःशांती लाभण्यास साहाय्य होईल.

इ. मूर्तीकार साधकाने आचारधर्म पाळल्याने मूर्ती बनवण्याचे ब्रह्मकर्म घडून शास्त्रकर्म पूर्ण होईल आणि मूर्तीत देवीचे तत्त्व अधिक प्रमाणात उतरेल. त्यामुळे मूर्तीकार साधकाची साधना होऊन आपत्काळात या देवीतत्त्वाचा लाभ समष्टीला होईल. देवीची मूर्ती सिद्ध होण्यास सहा मासांऐवजी (महिन्यांऐवजी) १ वर्ष लागले, तरी चालेल; परंतु सिद्ध झालेली मूर्ती सर्वांगीण परिपूर्ण असावी, अशी देवतेची इच्छा आहे, हे मूर्तीकाराने लक्षात घ्यावे.

 

११. मूर्तीकाराचे शरीर, मन, बुद्धी
आणि भाव यांची मूर्तीशी एकरूपता येऊन त्याची
चित्तशुद्धी होणे अन् त्यातून त्याचा ईश्‍वरप्राप्तीचा मार्ग सुकर होणे

मूर्ती बनवतांना मूर्तीला हाताचा स्पर्श होतो. त्या वेळी डोळे ती मूर्ती न्याहाळत असते. बुद्धी मूर्ती घडवण्याचे कर्म उत्तम प्रकारे कसे करू ?, याचा निर्णय घेत असते. मन मूर्तीशी संबंधित देवतेच्या स्मरणात असते. अशा प्रकारे मूर्तीकाराचे शरीर, मन, बुद्धी आणि भाव मूर्तीशी एकरूप होत असतात. यातून मूर्तीयोग घडून दैवीयोग साध्य होतो. अशा कृतीने मूर्तीकाराची सर्वांगीण शुद्धी होऊन चित्तशुद्धी होण्यास साहाय्य होते. यामुळे मूर्तीच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्तीचा मार्ग सुकर होतो.

 

१२. मूर्तीला शास्त्रानुसार बनवणे, याला
३० प्रतिशतमहत्त्व असून मूर्तीकाराने शुद्ध आचरण आणि भावयांनी तिच्यात देवीतत्त्व उतरवणे, याला ७० प्रतिशत महत्त्व असणे

देवीचे भाव मूर्तीत उतरवणे, ही बुद्धीपलीकडील कला आहे. ही कला आचारधर्माने साध्य होते, उदा. मूर्तीच्या आकारात पालट करून त्या मूर्तीत हास्य उतरवू शकतो; पण प्रसन्नता आणण्यासाठी मूर्तीत तेवढ्या प्रमाणात तत्त्व उतरणे महत्त्वाचे ठरते. मूर्तीत हास्य आले, म्हणजे प्रसन्नता आली, असे म्हणता येत नाही. मूर्तीला शास्त्रानुसार बनवणे, याला ३० प्रतिशत महत्त्व असून शुद्ध आचरण आणि भाव यांनी तिच्यात देवी तत्त्व उतरवणे, याला ७० प्रतिशत महत्त्व आहे.

 

१३. पातळीनुसार आचारधर्म

मूर्तीकाराची आध्यात्मिक पातळी जितकी अधिक, तितके त्याला आचारधर्माचे बंधन न्यून होत जाते. केवळ भावाच्या आधारे मूर्ती घडवणे, हे भावसंमत असते, तर अचूक कर्म आणि भाव यांच्या आधारे मूर्ती घडवणे, हे धर्मसंमत असते. धर्मसंमत मूर्तीत धर्मज्ञान आणि उत्तम कर्म अभिप्रेत आहे.

 

१४. योगमार्गानुसार मूर्तीची वैशिष्ट्ये

१४ अ. भक्तीप्रधान : आकाराला महत्त्व नाही. त्यामागील भाव श्रेष्ठ. त्यामुळे विशिष्ट आकार नसलेल्या दगडातही देवत्व येते. हे व्यष्टी साधनेच्या अंतर्गत येते.

१४ आ. कर्मप्रधान : मूर्तीचा आकार आणि ती घडवण्यासाठी आवश्यक शास्त्रशुद्ध कला यांना महत्त्व आहे. ही व्यष्टी भावांतर्गत येते. ही व्यष्टी साधनेच्या अंतर्गत येते.

१४ इ. कर्म आणि भक्ती प्रधान : शास्त्रशुद्ध कर्म आणि त्याला भक्तीची जोड यांना महत्त्व आहे. हा मार्ग समष्टी साधनेच्या अंतर्गत येतो.

 

१५. देवी आणि शिव यांचे प्रधान गुण

table_2

ज्या भक्तांना प्रेम आणि शक्ती हवी असते, ते देवीची उपासना करतात आणि ज्यांना वैराग्य हवे असते, त्यांचा कल शिवाच्या उपासनेकडे असतो अन् ज्यांना हे सगळेच प्राप्त करायचे आहे, ते गुरूंकडे जातात !

 

१६. देवीचे मातृत्व !

देवी ही भक्तांची माता आहे. त्यामुळे भक्ताच्या रक्षणप्रसंगी ती देवांच्या तुलनेत अधिक उग्र आणि क्रोधित होते.

 

१७. अन्य सूत्रे

१७ अ. देवीच्या मूर्तीच्या अवयवांच्या संदर्भातील सूत्रे

१. देवतेच्या (मूर्तीतून) डोळ्यांतून सर्वाधिक चैतन्य प्रक्षेपित होते. त्यामुळे साधकाचे लक्ष प्रथम डोळ्यांकडे जाते. संतांच्या चरणातून सर्वाधिक चैतन्य प्रक्षेपित होत असल्याने साधकाचे मन चरणांकडे अधिक एकाग्र होते.

२. देवीचे डोळे म्हणजे तेज प्रक्षेपणाचे केंद्र होय.

३. प्रसन्नता देवीची मुद्रा दर्शवते, तर मांगल्य हा त्याचा परिणाम आहे. प्रसन्नतेनेच मंगल कार्य घडते.

१७ आ. देवाजवळ नेते ती मूर्ती आणि देवाशी एकरूप करते ती भक्ती.

१७ इ. मूर्तीतील देवत्व प्रगट होणे म्हणजे काय ?

धार्मिक विधीनंतर मूर्तीत देवतेचे पूर्णतः तत्त्व उतरते. त्या वेळी मूर्तीत तत्त्वधारणा झाली, असे म्हणतात. पूजाविधीनंतर लगेच मूर्तीतील तत्त्व पूर्णतः कार्यरत होते, यालाच मूर्तीतील देवत्व प्रगट झाले, असे म्हणतात.

१७ ई. मूर्तीच्या माध्यमातून देवीतत्त्व पृथ्वीवर येण्याचे महत्त्व

मूर्तीच्या माध्यमातून देवीतत्त्व पृथ्वीवर येणे, म्हणजे अंधारात पणती ठेवल्याप्रमाणे आहे. सूर्याचा अंश अग्नी आहे, त्याप्रमाणे प्रत्यक्ष देवीचा अंश या मूर्तीत असेल. देवीच्या या अंशाने धर्मकार्याचे लक्ष दीप लागतील आणि धर्मरूपी प्रकाश सर्वत्र पसरून आसमंत उजळेल.

१७ उ. देवीचे तत्त्व पृथ्वीवर आणणे आणि तेही मूर्तीस्वरूपात, हे अतिशय कठीण कार्य आहे. ईश्‍वरी कृपेनेचे हे साध्य होते.

१७ ऊ. ज्ञान, भक्ती आणि कर्म यांच्या संयोगाने मूर्तीत देवत्व प्रगट होणे

ज्ञान, भक्ती आणि कर्म यांच्या संयोगाने उत्तम मूर्ती घडते. मूर्ती कशी घडवायची आणि त्यातून काय साध्य करायचे ?, याचे ज्ञान हवे. या ज्ञानाला भावाची जोड दिल्यास घडणारे कर्म अचूक आणि परिपूर्ण होते. यांचा उत्तम संगम झाल्याने मूर्तीत देवत्व प्रगटते.

१७ ए. मूर्तीच्या परिणांमानुसार तिचा स्तर ठरणे

१७ ए १. कनिष्ठ मूर्ती : मूर्ती बघून मनाला चांगले वाटणे आणि संबंधित देवता पाहून तिच्या गुणांची आठवण होणे

१७ ए २. मध्यम मूर्ती : देवतेविषयी साधकाच्या मनात ओढ निर्माण होण्यास साहाय्य होणे

१७ ए ३. उत्तम मूर्ती : मूर्ती पाहून साक्षात् देवता आहे, याची जाणीव होऊन साधकाला विविध अनुभूती येणे

१७ ऐ. भावकला आणि त्यातून आत्मकला
साध्य करणे, हे मूर्तीशास्त्राचे मूळ गमक असणे

केवळ मातीला आकार देऊन मूर्ती घडवणे, ही कनिष्ठ कला आहे. मूर्तीत देवत्त्व उतरवणे ही भावकला आहे. या प्रक्रियेतून स्वतःला घडवणे (आध्यात्मिक प्रगती करणे) ही सर्वश्रेष्ठ आत्मकला आहे. भावकला आणि त्यातून आत्मकला साध्य करणे, हे मूर्तीशास्त्राचे मूळ गमक आहे.

 

१८.  प्रार्थना

हा लेख वाचून हिंदूंना आचारधर्माचे महत्त्व लक्षात यावे, धर्मप्रेमींची श्रद्धा वृद्धींगत व्हावी आणि मूर्तीकारांनी आचारधर्माचे पालन करून समाजाला अधिकाधिक देवतेचे तत्त्व आकृष्ट करणार्‍या मूर्ती उपलब्ध करून द्याव्यात, ही श्रीगुरुचरणी प्रार्थना !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात