करुणासागर आणि कृपासिंधू परात्पर गुरु डॉक्टर, आम्ही आपल्या चरणी शतशः कृतज्ञ आहोत !

‘प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा, म्हणजेच डॉ. जयंत आठवले यांचे गुरु) म्हणायचे, ‘माझे गुरु (श्री अनंतानंद साईश) मला सांगत, ‘मेरा भजन जो करेगा, उसे मैं खाने को दूंगा ।’ या वचनाचा सारांश असा आहे – ‘प.पू. बाबांनी गुरुमहती, नामजप, भक्तीयोग इत्यादींसंबंधी अनेक भजने लिहिली अन् ‘गुरूंची सेवा’ म्हणून जीवनभर त्या भजनांचा प्रसार केला. ‘हे कार्य करणार्‍याचे पालनपोषण गुरु सदैव करतील’, असा आशीर्वादच गुरूंनी त्यांच्या वचनातून दिला होता.’ यासंदर्भात प.पू. बाबा सांगत, ‘मी गुरूंनी सांगितल्याप्रमाणे भजनांचा प्रसार केला आणि गुरूंनीच माझा सर्व योगक्षेम वाहिला.’ प.पू. बाबांनी गुरूंप्रमाणेच त्यांच्या भक्तांचाही योगक्षेम सर्वार्थाने वाहिला.

पू. संदीप आळशी

शिष्य डॉ. जयंत आठवले यांनीही प.पू. बाबांचेच अनुसरण करून आयुष्यभर अध्यात्मप्रसाराचे कार्य केले आणि अजूनही करत आहेत. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सनातनच्या साधकांची साधना चांगली व्हावी, तसेच राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे कार्य वाढावे, यांसाठी आश्रमांची निर्मितीही केली. या आश्रमांमध्ये अनेक साधक सेवा करत आहेत. त्यांच्यापैकी बरेच साधक आज आजारपण, आध्यात्मिक त्रास आणि वृद्धापकाळ यांमुळे म्हणावी तशी सेवा करू शकत नाहीत. असे असतांनाही कृपाळू आणि भक्तवत्सल परात्पर गुरु डॉक्टरांनी अशा साधकांनाही गोकुळासम असणार्‍या सनातनच्या आश्रमांत रहाण्याची अमूल्य संधी उपलब्ध करून दिली आहे; कारण त्यांना साधकांकडून एकच अपेक्षा आहे, ‘साधकांनी चांगली साधना करावी.’ परात्पर गुरु डॉक्टरही गुरुपरंपरेला अनुसरून साधकांचा योगक्षेम सर्वतोपरी वहात आहेत. याची काही उदाहरणे…

१. सनातनच्या आश्रमांमध्ये साधकांचे सर्व दृष्टींनी पालनपोषण होत आहे, उदा. साधकांना पथ्यानुसार आहार, विकार-निर्मूलनासाठी विविध उपचारपद्धती इत्यादींची सोय करण्यात येते.

२. सध्या ‘कोरोना’ महामारीमुळे जगभर अत्यंत भीषण स्थिती उद्भवली आहे. प्रतिदिन अनेक जण मृत्यूमुखी पडत आहेत. अनेकांना नोकर्‍या गमवाव्या लागल्यामुळे त्यांची अन्नान्नदशा झाली आहे. असे असतांनाही सनातनच्या आश्रमांत, तसेच सर्वत्र धर्मप्रसाराची सेवा करणारे सनातनचे साधक नेहमीप्रमाणे जीवन जगत असून साधनारतही आहेत. यापुढचा आपत्काळ ‘कोरोना’ महामारीपेक्षाही कितीतरी महाभीषण असणार आहे. तेव्हा ‘साधना न करणार्‍या समाजाची स्थिती किती केविलवाणी होईल’, याची केवळ कल्पनाच केलेली बरी ! ‘अशा आपत्काळातही सनातनच्या आश्रमांत रहाणारे, तसेच सनातनचे सर्वत्रचे साधक यांचे रक्षण होईलच’, अशी सर्व साधकांची परात्पर गुरु डॉक्टरांप्रती दृृढ श्रद्धा आहे.

३. ‘वैष्णव जन तो तेने कहिये जे पीड पराई जाणे रे ।’, असे गुजरात येथील थोर संत नरसी मेहता यांनी म्हटले आहे. साधकांना होणार्‍या आध्यात्मिक त्रासांची तीव्रता लक्षात घेऊन त्यांचे त्रास लवकर अल्प होण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टर विविध उपाययोजना सांगत असतात. साधकांच्या त्रासांच्या निवारणासाठी त्यांना नामजपादी उपाय सांगणारे आणि त्यांना उपाय करण्यासाठी साहाय्य करणारे संत, तसेच उन्नत साधक केवळ आश्रमांतच नव्हे, तर सर्वत्रच्या साधकांनाही उपलब्ध करून देणारे परात्पर गुरु डॉक्टर हे एकमेवच आहेत !

४. काही वेळा साधकांची आजारपणे आणि आध्यात्मिक त्रास, हा त्यांच्या गतजन्मांतील पापांचा परिणामही असतो. असे साधक घरी राहिले असते, तर आजारपणे आणि आध्यात्मिक त्रास यांच्यापुढे हतबल होऊन त्यांच्या साधनेला मर्यादा आली असती. याउलट आश्रमांत सोयीसुविधा, सहसाधकांचे साहाय्य आणि साधनेला पूरक वातावरण असल्यामुळे अशा साधकांची थोडीफार तरी साधना होते. साधना झाल्यामुळे त्यांची पापे नष्ट व्हायला साहाय्य होते. ही पापे नष्ट झाली नाहीत, तर त्यांना पुनःपुन्हा पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल.

५. सनातनच्या आश्रमांमध्ये काही साधकांकडून समष्टी स्तरावर गंभीर चुका झाल्या, तरी त्या सुधारण्याविषयी साधकांना प्रेमाने समजावून त्यांना साधनेची पुनःपुन्हा संधी दिली जाते. यामुळे अनेक साधक साधनेत टिकून आहेत आणि त्यांची साधना वृद्धींगतही होत आहे.

६. ज्या साधकांनी आतापर्यंत साधना आणि गुरुकार्य यांसाठी सर्वस्वाचा त्याग केला, अशांचे मन वृद्धापकाळी ‘मुलांच्या घरी राहून नातवंडांशी खेळणे, घरात चालू असलेले दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहाणे, मायेतील गप्पागोष्टी करणे’ इत्यादींत रमत नाही. त्यांना साधना सोडून अन्य सर्व नकोसे वाटते. वृद्धावस्थेतील अशा साधकांना आश्रमांत रहाण्याची संधी उपलब्ध झाल्याने त्यांना ‘आमची शेवटच्या श्‍वासापर्यंत चांगली साधना होईल’, याची निश्‍चिती वाटते.

७. ज्या साधकांनी साधना आणि गुरुकार्य यांसाठी पूर्णवेळ त्याग केला आहे, अशांच्या वृद्ध माता-पित्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांनाही आश्रमात रहाण्याची संधी दिली जाते. त्यामुळे साधकांना वृद्ध माता-पित्यांची कोणत्याच प्रकारची काळजी न वाटता ते निश्‍चिंतपणे स्वतःला गुरुकार्यात झोकून देऊन साधना करत आहेत.

– (पू.) श्री. संदीप आळशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.


साधकांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपणारे परात्पर गुरु डॉक्टरांसारखे दुसरे गुरु आज त्रिलोकांत तरी शोधून सापडतील का ? केवळ अशक्य ! यासाठीच परात्पर गुरु डॉक्टरांविषयी अंतःकरणात पुन:पुन्हा हेच शब्द उमटतात, ‘चालविसी हाती धरोनिया ।’ खरे पहाता त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासही आम्ही साधक असमर्थ आहोत. यासाठी ‘पुष्प मनाचे कर जोडोनिया । अर्पी तव चरणा ॥’, या भावाने आम्ही त्यांना सर्वस्वी शरण आलो आहोत !’

स्वतःवर सतत महामृत्यूयोगाचे सावट असतांनाही राष्ट्र आणि धर्म
यांच्या कार्याच्या तीव्र तळमळीपोटी ७८ व्या वर्षीही कार्यरत असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर ओढवलेल्या महामृत्यूयोगांमुळे वर्ष २००७ पासून त्यांची प्राणशक्ती अत्यल्प झाली असून त्यांना दिवसभर प्रचंड थकवा असतो आणि अनेक आजारही जडले आहेत. अत्यल्प प्राणशक्तीमुळे बर्‍याचदा त्यांनी मृत्यूसदृश स्थितीही अनुभवली आहे. असे असले, तरी ग्रंथांचे संकलन करणे; ग्रंथ, प्रसारसाहित्य, ध्वनीचित्रीकरण आदी विभागांतील सेवा आध्यात्मिक स्तरावर होण्यासाठी मार्गदर्शन करणे; चित्रकला, मूर्तीकला, संगीतकला आदींविषयी अभ्यास आणि संशोधनकार्य करण्यासाठी दिशादर्शन करणार्‍या साधक-कलाकारांना कलांच्या संदर्भात मार्गदर्शन करणे; राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यांच्या संदर्भात आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करणे आदी सेवा ते अधूनमधून विश्रांती घेऊनही दिवसातून ४ – ५ घंटे करू शकत आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या किंवा त्यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या संस्थांचे कार्य त्यांच्याच कृपाशीर्वादाने उत्तरोत्तर वृद्धींगत होत आहे.

स्वतःवर महामृत्यूयोगाची काळी छाया पडलेली असतांनाही अखिल मानवजातीच्या उद्धाराच्या निर्मळ आकांक्षेपोटी चैतन्याच्या बळावर कार्यरत रहाणार्‍या परात्पर गुरु डॉक्टरांच्या दैवीपणाची प्रचीतीही यातून येते. सर्वच साधक, राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्यासमोर महान आदर्श ठेवणार्‍या परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी त्रिवार वंदन !

– (पू.) संदीप आळशी

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment