महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ? (भाग ४)

Article also available in :

सनातन गेली अनेक वर्षे सांगत असलेला आपत्काळ दाराच्या उंबरठ्यावर उभा आहे. कधीही तो आता प्रवेश करू शकतो. गेल्या वर्षभरापासून चालू असलेले कोरोना महामारीचे संकट ही आपत्काळाची एक छोटीशी झलक आहे. प्रत्यक्षातील आपत्काळ याहून कितीतरी पटींनी भयानक आणि अमानुष असणार आहे. त्याची विविध रूपे असणार आहेत. यात मानवनिर्मित, तसेच नैसर्गिक प्रकार असणार आहेत. यातील काहींची माहिती आपण या लेखमालिकेत पहात आहोत. या आपत्काळात स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव करण्यासाठी काय करू शकतो, याची थोडीफार माहिती या लेखमालिकेतून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आजच्या लेखात भूकंपाविषयी माहिती देण्यात आली आहे. भूकंप येण्यापूर्वीची लक्षणे, भूकंप येण्यापूर्वी करायच्या काही सिद्धता, प्रत्यक्ष भूकंप आल्यास काय करायचे आणि भूकंप झाल्यावर काय करावे, याविषयीची माहिती देण्यात आली आहे.

भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://www.sanatan.org/mr/a/77458.html

 

२. नैसर्गिक आपत्ती

२ अ. भूकंप

२ अ १. भूकंपाची सर्वसाधारण लक्षणे

भूकंप होत असतांना खालीलपैकी एक वा अधिक लक्षणे अनुभवण्यास मिळतात.

अ. भूमीतून गुरगुर असा आवाज येतो.

आ. मांडणीतील भांडी हादरतात.

इ. भिंतीचा गिलावा तडकून त्याचे पोपडे खाली पडतात.

इ. भिंतींना तडे जातात, दुर्बल घरे आणि भिंती ढासळतात.

उ. भूपृष्ठावर भौगोलिक पालट होतात. भूकंपामुळे भूपृष्ठाचा भाग मागे-पुढे किंवा वर-खाली होतो.

ऊ. रस्त्यांना भेगा पडणे, तसेच कडे, दरडी आणि पूल कोसळतात.

ए. आगगाडीचे रूळ वाकतात किंवा वेडेवाकडे होतात.

ऐ. धरणांच्या भक्कम भिंतींना तडे जातात.

ओ. सागरी भूकंपामुळे ‘सुनामी लाटा’ निर्माण होतात. या शेकडो फूट उंचीच्या लाटा समुद्रकिनारी हाहाःकार उडवून देतात.

२ अ २. भूकंपाच्या आधीच भूकंपापासून रक्षण होण्यासाठी करायच्या पूर्वसिद्धता

अ. सावध, समयसूचकता आणि धीर ठेवून वागण्याचे महत्त्व

भूकंप केव्हा, कुठे आणि किती क्षमतेचा होईल, याचे पूर्वानुमान करणे शक्य नाही. त्यामुळे आपण नेहमी सावध, समयसूचकता आणि धीर यांद्वारे वागलो, तर जीवित अन् वित्त हानी टळू अथवा अल्प होऊ शकते. त्यामुळे लोकांना भूकंप किंवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तींविषयी वैज्ञानिकदृष्ट्या जागृत करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. भूकंपात होणारी पडझड, भीती आणि चेंगराचेंगरी यामुळेच मुख्यत: माणसे मृत्यूमुखी पडतात.

आ. भूकंपाची तीव्रता समजण्यासाठी घरात घंटा लटकवणे

भूकंपाची तीव्रता समजण्यासाठी घरात लहान घंटा लटकवून ठेवा. भूकंप होतांना या घंटेचे कंपन अधिक प्रमाणात झाल्यास भूकंपाची तीव्रता अधिक असल्याचे लक्षात येते.

इ. भूकंपाच्या वेळी लपण्याच्या सुरक्षित जागा शोधून ठेवा

या वेळी घरातील कोपरे, जाड पटलाखालील जागा, बाकांच्या कमानी या सुरक्षित जागा असतात. याखेरीज धोकादायक जागाही निवडून ठेवा आणि भूकंपाच्या वेळी त्यांच्यापासून दूर रहा.

ई. उंचावरील आणि जड सामानांविषयी हे करा !

घरात जड सामान उंचावर ठेवू नये; कारण ते अंगावर पडून धोका उत्पन्न होऊ शकतो. भूकंपाच्या वेळी भिंतीवरील फळींवर ठेवलेले साहित्य, कपाटे किंवा अन्य फर्निचर पडण्याची शक्यता असल्याने ते भिंतींना खिळे ठोकून जखडून ठेवा.

उ. काचेच्या वस्तू कुलुपबंद कपाटात ठेवा !

मोठ्या वस्तू किंवा नाजूक अन् मौल्यवान वस्तू कमी उंचीवर ठेवा. काचेच्या किंवा फुटू शकणार्‍या वस्तू कपाटात कुलुप लावून ठेवाव्यात. दारांना काचा असणारी कपाटे, आरसे, तसबिरी आदी शक्यतो ठेवू नये किंवा खाली ठेवावीत.

ऊ. छताला टांगलेली वस्तू, उदा. झुंबर आदी खाली पडू नयेत; म्हणून अधिक घट्टपणे अडकवाव्यात किंवा शक्य असल्यास काढून ठेवाव्यात.

ए. छताला लहान आणि मोठ्या भेगा असल्यास त्या तत्परतेने बुजवून घ्याव्यात.

ऐ. भूकंपानंतर गॅस सिलिंडरचे पाईप तुटून आग लागण्याच्या शक्यतेने आधीच न तुटणारे लवचिक पाईप बसवून घ्यावेत.

२ अ ३. भूकंपाच्या वेळी हे करा !

अ. भूकंप होत असतांना जर इमारत पुष्कळ हलत असेल, तर त्यातून बाहेर पडण्याचा धोका पुष्कळ गंभीर असू शकतो. त्याकरता जाड पटलाखाली (टेबलाखाली) लपणे अथवा तसे शक्य नसल्यास स्वतःची मान आणि डोके स्वतःच्या हाताने झाकून घेऊन रक्षण करावे.

आ. इमारतीतून घाईगडबड न करता बाहेर पडा : जर घर, कार्यालय किंवा एखाद्या इमारतीमध्ये असलात, तर गोंधळ किंवा घाईगडबड न करता तातडीने बाहेर पडावे. या वेळी उद्वाहनाचा (लिफ्टचा) वापर करू नये.

इ. सुरक्षित ठिकाणी थांबा : अधिक तीव्रतेचा भूकंप असल्यास घरात, कार्यालय येथे असल्यास तेथेच रहा. पूर्वी निवडलेल्या सुरक्षित जागेमध्ये जाऊन थांबा. मोठे पटल यांच्या खाली लपा. डोक्याचे रक्षण करण्यासाठी उशीचा वापर करू शकता. खिडकी, दरवाजे यांच्याजवळ उभे रहाणे टाळा.

ई. सर्व विद्युत प्रवाह तात्काळ बंद करा. गॅस सिलिंडर, स्टोव्ह आदी बंद करा.

उ. इमारतीच्या बाहेर किंवा मोकळ्या जागेत असाल, तर तेथेच थांबा. इमारती, वृक्ष, रस्त्यावरचे दिवे, विजेच्या तारा यांच्यापासून दूर रहा.

ऊ. भूकंपाच्या वेळी वाहनात असाल, तर मोकळ्या आणि सुरक्षित जागेत वाहन थांबवा आणि त्यातच रहा.

ए. समुद्रकिनार्‍याजवळ किंवा नदीजवळ असाल, तर एखाद्या उंच जागेवर जा आणि तेथे थांबा.

ऐ. जर डोंगरवर किंवा उतारावर असाल, तर घसरणारे दगड, मोठ्या शिळा आदींपासून स्वतःला सुरक्षित ठेवा.

२ अ ४. भूकंप होऊन गेल्यानंतरची स्थिती

जिकडे तिकडे इमारती कोसळलेल्या असतात. घायाळ अवस्थेत सर्वजण साहाय्यासाठी सैरावैरा पळत असतात. सर्वत्र धूळीचे ढग पसरलेले असतात. कित्येक जण ढिगार्‍याखाली गाडले गेलेले असतात, तर सहस्रो माणसे मृत पावलेली असतात. जे कुणी अर्धवट कोसळलेल्या इमारतीत अडकलेले असतात, त्यांचे मनोधैर्य पार खचलेले असते. घायाळ आणि जिवंत माणसे साहाय्यासाठी भरभर दूरध्वनी करायचा प्रयत्न करत असतात; परंतु काही भागात दूरध्वनी आणि भ्रमणभाषही बंद पडतात. वीज पुरवठा खंडीत होतोच आणि रस्तेही बंद झाल्यामुळे रुग्णवाहिका, अग्नीशमनदल, सेवाभावी संस्थांची वाहने वेळेवर पोचू शकत नाहीत.

२ अ ५. भूकंप होऊन गेल्यानंतर हे करा !

अ. प्रथमोपचार

भूकंपानंतर प्रथम आपण स्वतःला काही दुखापती झाल्या आहेत का ? हे पाहून आवश्यकतेनुसार प्रथमोपचार करावेत अथवा करून घ्यावेत.

आ. इमारत असुरक्षित असल्यास बाहेर पडा

घराची आणि इमारतीची नीट तपासणी करा. त्यांची स्थिती चांगली नसल्याचे, ते असुरक्षित झाली असल्यास घरातील आणि इमारतीतील प्रत्येकाला बाहेर काढा; कारण मोठ्या भूकंपानंतर लहान लहान धक्के पुनःपुन्हा बसू शकतात. त्यामुळे घराची आणि इमारतीची हानी होऊ शकते.

इ. ‘इमर्जन्सी किट’चा वापर करणे

आपण भूकंपाला तोंड देण्याची पूर्वसिद्धता म्हणून आपण जो एक संच (आणीबाणी संच म्हणजेच ‘इमर्जन्सी किट’) बनवलेला असतो, त्यातील विजेरी (बॅटरी) आपल्या हातातच ठेवावी. त्यामुळे वीज नसेल, तेव्हा आपण गोंधळून जाणार नाही आणि संचातील वस्तू अथवा अन्य आवश्यक वस्तू आपण चटकन शोधू शकतो.

ई. गॅस गळती, ज्वालाग्राही पदार्थ सांडलेले आहे का ? याची निश्‍चिती करा !

आपल्या स्वयंपाकघरात गॅस गळती झालेली आहे का ? हे पहा. याचसमवेत स्वयंपाकघरात, तसेच घरात इतरत्र रॉकेल, गोडे तेल यांसारखे ज्वालाग्राही पदार्थ सांडलेले नाहीत ना, याची खात्री करा. ते तपासल्याविना विजेच्या दिव्याचे बटन, काडेपेटी, लायटर आणि गॅस शेगडी पेटवू नका.

उ. पायात चपला आणि डोक्यावर शिरस्त्राण घाला !

जर आपणास शक्य झाल्यास पायात चपला किंवा बूट घालावेत; कारण पादत्राणे न वापरता फिरतांना भूकंपामुळे पडझड झाल्याने पसरलेले काचेचे तुकडे, पत्रे इत्यादी वस्तूंमुळे पायास दुखापत होऊ शकते. शक्य असल्यास डोक्यावर शिरस्त्राण वापरा.

ऊ. शौचालय वापरण्या पूर्वी घ्यायची काळजी

शौचालयात जाण्यापूर्वी मलनिःसारण वाहिन्या सुस्थितीत आहेत का ? हे आधी तपासा.

ए. पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवा !

घरातील पाळीव प्राणी कुत्रा, मांजर अस्वस्थ होऊन ओरडू लागतात. अशा वेळी त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावे. अन्यथा हे प्राणी सैरावैरा पळून या परिस्थितीत ते हरवूही शकतात.

ऐ. वीज नसल्यास बॅटरीवर चालणार्‍या रेडिओद्वारे सूचना ऐका !

भूकंपानंतर गेलेली वीज पुन्हा येण्यास बराच कालावधी जाऊ शकतो. अशा वेळी घरातील बॅटरीवर चालणारा रेडिओ पुष्कळ उपयोगी पडतो. आपल्याला रेडिओवरून वेळोवेळी दिल्या जाणार्‍या बातम्या आणि सूचना समजतात.

ओ. वाहने वापरण्या पूर्वी घ्यायची काळजी

आपली वाहने अत्यंत आवश्यकता असल्याविना रस्त्यावर आणू नका. पडझड झालेल्या भागात बचाव आणि साहाय्य कार्यासाठी, तसेच दळणवळणाच्या हालचाली सुरळीत होण्यासाठी रस्त्यांची आवश्यकता असते.

औ. सरकारी यंत्रणांना साहाय्य करा

आपल्या आजूबाजूच्या इमारती कोसळल्यामुळे पुष्कळ माणसे मृत्यूमुखी पडलेली असतात. मुख्यत: काहींचे मृतदेह ढिगार्‍याखाली चिरडल्यामुळे ओळखता येण्याच्या स्थितीत नसतात. या प्रसंगात त्यांच्या घरच्या माणसांची मनस्थिती पुष्कळच नाजूक असते. त्यामुळे आपण मृतांची ओळख पटवण्याच्या कामात तेथे साहाय्यकार्य करणारे स्वयंसेवक, पोलीस, अग्नीशमन दलाचे कर्मचारी यांना साहाय्य केले पाहिजे.

अं. समुद्रकिनार्‍यापासून दूर रहा. भूकंपानंतर सुनामी येऊ शकते.

अ:. आपल्याला घर रिकामे करावे लागले, तर आपण कुठे आहोत, हे सांगणारा संदेश सोडून जा.

क. शक्यतो पूल / उड्डाणपूल पार करण्याचा प्रयत्न करू नका, कदाचित् त्यांची हानी झालेली असेल.

ख. ढासळलेल्या इमारतींमध्ये कुणीही शक्यतो प्रवेश करू नये.

२ अ ६. ढिगार्‍याखाली अडकल्यास हे करा !

जर आपण ढिगार्‍यामध्ये अडकला असाल, तर काडेपेटी वापरू नका. पडझडीमुळे गॅस गळती झाली असल्यास काडेपेटी पेटवली, तर आग लागून अपघात होऊ शकतो. शक्य असल्यास कपड्याने आपले तोंड झाकून ठेवा. साहाय्यासाठी पाईप किंवा भिंतीवर आवाज करा, शिटी वाजवा, केवळ शेवटचा पर्याय म्हणून ओरडा. अशाने आपली ऊर्जा जतन होईल.

Leave a Comment