महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ? (भाग ७)

Article also available in :

एरव्ही देशात हिवाळ्यामध्ये शीतलहर येत असते. हिमालयात तर तापमान शून्याच्या खाली ४० सेल्सियसपर्यंत गेलेले असते. सध्याच्या आत्पकाळामध्ये शीतलहर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकतेच अमेरिकेतील टेक्सासमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली. त्यातच येथील वीजपुरवठ्यामध्ये मोठा बिघाड झाल्याने नागरिकांना हिटरचा वापर करता आला नाही. नळाचे पाणी गोठल्याने पाणीपुरवठाही बंद झाला होता. अन्न बनवण्यासाठी विजेच्या उपकरणांचाही वापर करता न आल्याने येथील नागरिकांची काही दिवस ससेहोलपट झाली. याला आपत्काळच म्हणावा लागेल. अशी स्थिती सर्वत्र झाल्यास त्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानीही होऊ शकते. या लेखात भारतात शीतलहर आल्यावर साधारणतः काय उपाययोजना करता येईल, याची माहिती देण्यात आली आहे.

भाग ६ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://www.sanatan.org/mr/a/77741.html

२ ई. शीतलहर

२ ई १. शीतलहर म्हणजे काय ?

‘सामान्यतः वातावरणातील तापमान उणे शून्य सेल्सियसपर्यंत गेल्यावर त्याला ‘शीतलहर’ आहे, असे म्हटले जाते.

२ ई २. शीतलहरीमुळे होणारे त्रास

२ ई २ अ . ‘हायपोथर्मिया’पासून सतर्क रहावे !

अधिक गारठ्यामुळे काही जणांना ‘हायपोथर्मिया’चा त्रास होऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीच्या शरिराचे एक सामान्य तापमान असते, जे शरिराकडून नियंत्रित केले जाते. जेव्हा या सामान्य तापमानाच्या खाली शरिराचे तापमान गेले, तर त्याला ‘हायपोथर्मिया’ म्हटले जाते. हा प्राणघातक ठरू शकतो; कारण या तापमानाला तोंड देण्यासाठी आवश्यक उष्णता शरीर निर्माण करू शकत नाही. विशेषतः नवजात बालके आणि वृद्ध यांना याचा धोका अधिक असतो. त्यामुळे कुणाला अधिक गारठा होऊन हुडहुडी भरत असेल, त्याला अधिक उष्णता निर्माण होण्यासाठी कपडे, कांबळे द्यावेत. त्याचे कपडे भिजले असतील, तर ते पालटावेत. उष्णता निर्माण करणारे पेय पिण्यास द्यावे. आवश्यकतेनुसार आधुनिक वैद्यांचा सल्ला घ्यावा.

२ ई ३. शीतलहरीपासून रक्षण होण्यासाठी करायची पूर्वसिद्धता

थंडीच्या दिवसांत घालायच्या कपड्यांचा पुरेसा साठा करून ठेवावा, उदा. स्वेटर किंवा जॅकेट, मफलर, शाल, कानटोपी, हात आणि पाय मोजे, गोधडी, रजई, कांबळे (ब्लँकेट) आदी. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ते पुरतील, असे पहावे. वृद्धांना थंडीचा अधिक त्रास होऊ शकत असल्याने त्यांच्यासाठी पुरेसे कपडे आहेत ना, ते पहावे.

२ ई ४. प्रत्यक्ष शीतलहर असतांना काय करावे ?

अ. थंडीमुळे जलवाहिन्यांमधील पाणी गोठण्याची शक्यता असल्याने या काळात घरात पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा.

आ. ओले कपडे घालू नये. काही कारणाने कपडे ओले झाले, तर ते पालटून सुके कपडे घालावे.

इ. नियमित उष्ण पेय आणि पदार्थ खावेत.

ई. मद्यपान करू नये. ते केल्यामुळे शरिरातील उष्णता न्यून होते.

उ. थंडीमुळे हातापायाची बोटे, कानाच्या पाळ्या, नाकाचे टोक आदी सुन्न होऊ शकत असल्याने त्याकडे लक्ष द्यावे आणि त्यांना उष्णता कशी मिळेल, ते पहावे.

ऊ. थंडीमुळे सुन्न पडलेल्या भागांचे मर्दन करू नये. मर्दन केल्यास हानी होऊ शकते.

ए. सुन्न पडलेला भाग, उदा. हातपाय आदी कोमट (अती उष्ण नव्हे) पाण्यामध्ये बुडवून ठेवू शकतो.

ऐ. शीतलहरच्या काळात शक्यतो घराबाहेर पडू नये. बाहेर गेल्यानंतर कापरे भरत असल्यास तात्काळ घरी परत यावे.

ओ. घरामध्ये शक्य असल्यास हिटरचा वापर करावा.

औ. दूरचित्रवाणी किंवा नभोवाणी यांवरील हवामानविषयीची माहिती, तसेच त्याविषयी देण्यात येणार्‍या सूचनांकडे लक्ष देऊन त्यांचे पालन करावे.’

संदर्भ : pocketbook-do-dont-hindi

Leave a Comment