महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ? (भाग ९)

Article also available in :

आतापर्यंत आपण या लेखमालेमध्ये विविध आपत्ती आणि त्यांच्यापासून बचाव कसा करायचा, याविषयीची सूत्रे पाहिली. या लेखामध्ये या सर्व आपत्तींच्या संदर्भात काही सामायिक सूचना आहेत. त्या लक्षात ठेवून आपत्तीपूर्वी काही सिद्धता करता येतील.

भाग ८. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://www.sanatan.org/mr/a/78576.html

 

३. विविध आपत्तींच्या संदर्भातील सामायिक सूचना

विविध आपत्तींच्या वेळी काही कृती करणे या सामायिक असणार आहेत. त्या लक्षात घेऊन त्यानुसार प्रत्येकाने सिद्धता केल्यास स्वतःचे, कुटुंबांचे, तसेच शेजार्‍यांचे रक्षण होऊ शकते. तसेच कमीत कमी हानी आणि त्रास होऊ शकतो.

३ अ. आणीबाणीत कसे वागायचे, याचा सराव करा !

३ अ १. आणीबाणीच्या काळात घरातून बाहेर कसे पडायचे किंवा घरातच सुरक्षित ठिकाणी कसे थांबायचे, तसेच प्रथमोपचार कसा करायचा, याचे कुटुंबियांतील प्रत्येकाने प्रशिक्षण घेऊन ठेवावे आणि त्याचा नियमित सराव करावा.

३ अ २. आपत्कालीन स्थितीत कुटुंबासह शेजारी यांनी काय केले पाहिजे, याविषयी चर्चा करून कृती आराखडा ठरवा. त्याचाही सराव करून ठेवा. गॅस सिलिंडर, मुख्य विद्युत् प्रवाह, पाण्याच्या नळाची मुख्य कळ आदी बंद करण्याविषयी प्रत्येकाला माहिती असावी.

३ अ ३. ‘आणीबाणी संच’(Emergency Kit) : हा संच झटकन तुमच्यासमवेत घेऊन तुम्ही घराच्या बाहेर पडू शकता. हा संच ठेवण्याची जागा ठरवा आणि त्याची सर्वांना माहिती द्या. यामध्ये

अ. बॅटरीवर चालणारी विजेरी

आ. अतिरिक्त बॅटर्‍या

इ. बॅटरीवर चालणारा रेडिओ

ई. प्रथमोपचार पेटी

उ. किमान ३ दिवस पुरेल इतका सुका खाऊ आणि पिण्यासाठी पाणी

ऊ. जलरोधक पेटीत मेणबत्त्या आणि काडेपेटी

ए. सुरी

ऐ. क्लोरीनच्या गोळ्या

ओ. महत्त्वाची कागदपत्रे (रेशन कार्ड, आधार कार्ड इ.)

औ. रोख पैसे

अं. जाड दोरी

आपत्तीच्या स्वरूपानुसार आणि आपल्या गरजांनुसार यांत अन्य वस्तू ठेवाव्यात, उदाहरणार्थ स्वत:ची औषधे. या वस्तू एका बॅगेत भरून ती बॅग समवेत रहाणार्‍या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ठाऊक असेल, अशा ठिकाणी ठेवावी.

३ अ ४. आपत्काळात कुटुंबियांपासून विलग झाल्यावर पुन्हा भेटण्यासाठी हे करा !

भूकंप, पूर आदींमुळे लहान मुले घरात किंवा बाहेर असल्यास ते विलग होऊ शकतात. अशा वेळी नेमके काय करावे, याविषयी मुलांना सांगावे. ते संपर्कात कसे रहातील, याचे नियोजन करा. कुठे एकत्र यायचे, याची २ स्थाने निश्‍चित करा. पहिली जागा घराच्या जवळच असावी. दुसरी जागा घरापासून थोडी दूर असावी.

३ अ ५. आपत्कालीन परिस्थितीसाठी आपले वाहन सिद्ध ठेवा !

वाहन दुरुस्त करणार्‍यांकडून स्वतःच्या वाहनाच्या खालील गोष्टी तपासा !

अ. बॅटरी आणि इग्निशन (गाडी चालू करणारी) प्रणाली

आ. ब्रेक

इ. एक्झॉस्ट सिस्टम

ई. इंधन आणि एअर फिल्टर

उ. हिटर आणि वायपर

ऊ. हेड लाईट्स आणि चमकणारे धोका दाखवणारे दिवे

ए. तेल (ऑईल)

ऐ. पेट्रोल किंवा डिझेल टाकी भरलेली ठेवा !

ओ. चांगले टायर लावून घ्या !

३ अ ६. वाहनाने प्रवास करत असतांना घ्यायची काळजी !

अ. ‘जर गाडीवर विजेची तार पडली, तर शॉक लागण्याचा धोका आहे. प्रशिक्षित व्यक्तीने वायर काढेपर्यंत आतच रहा.

आ. आपत्कालीन स्थितीत वाहन चालवतांना त्याच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण झाल्यास सुरक्षित ठिकाणी गाडी थांबवा आणि हॅन्डब्रेक लावून घ्या.’

३ अ ७. दूरदर्शन आणि रेडिओ यांवरून भूकंपाच्या संदर्भातील अद्ययावत माहिती सतत दिली जात असते. या माध्यमांद्वारे देण्यात आलेल्या बातम्या अन् सूचना ऐकाव्यात.

३ अ ८. सरकारी यंत्रणांचे साहाय्य घ्या !

आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याकरता सरकार, सैन्यदल, पोलीस, राज्य राखीव दल, रेड क्रॉस, अग्नीशमन दल यांच्या यंत्रणा युद्धपातळीवर कार्य करत असतात. आपल्या जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे साहाय्य घेण्यासाठी ११२ या क्रमांकावर संपर्क करावा. या समवेतच काही ठिकाणी स्वयंसेवी संघटनाही कार्यरत असतात. आपत्कालीन परिस्थितीत यांचे साहाय्य घ्या !

३ अ ९. अफवांवर विश्‍वास ठेवू नका !

आपत्कालीन परिस्थितीत शांत राहून कृती करा अन् इतरांना धीर द्या. अफवांवर विश्‍वास ठेवू नका.

३ अ १०. संपत्तीचा विमा उतरवून ठेवा !

‘ज्यांना शक्य असेल, त्यांनी आपल्या संपत्तीचा योग्य विमा उतरवावा, ज्यामध्ये आपत्ती अंतर्भूत असेल.’

३ अ ११. इतरांना साहाय्य करणे

अ. साहाय्य करतांना भान महत्त्वाचे ! : लोकांच्या साहाय्याला धावून जाणे, ही प्रवृत्ती मुळात चांगली असली; तरी वेळेचे भान ठेवून आणि आपल्याकडे कोणते कौशल्य आहे, याचा विचार करून मगच साहाय्यासाठी धावून जाणे उत्तम होय. आणीबाणीच्या परिस्थितीत अतीउत्साह दाखवणार्‍या विरांना आवरावे लागते.

आ. प्रथमोपचार : घायाळ व्यक्तीला प्रथम योग्य प्रथमोपचार प्रदान करावेत. व्यक्ती अत्यवस्थ असली, तरच तिला तेथून त्वरित योग्य ठिकाणी हालवावे.

Leave a Comment