भगवान कार्तिकेयाचे स्वरूप असणारे तेजस्वी नक्षत्र : कृत्तिका !

Article also available in :

कृत्तिका नक्षत्राचा कार्तिक मासाशी असलेला संबंध आणि कृत्तिका नक्षत्राची वैशिष्ट्ये याचे विश्‍लेषण पुढे दिले आहे.

 

१. कार्तिक मासाचा कृत्तिका नक्षत्राशी असलेला संबंध

​भारतीय कालगणनेतील चैत्रादी मासांची नावे खगोल शास्त्रावर आधारीत आहेत. कार्तिक मासात सूर्यास्त झाल्यावर कृत्तिका नक्षत्र पूर्वक्षितिजावर उदय पावते; तसेच कार्तिक मासात पौर्णिमा तिथीच्या दरम्यान चंद्र कृत्तिका नक्षत्रात असतो. कृत्तिका नक्षत्राचा संबंध असल्यामुळे या मासाला ‘कार्तिक’ हे नाव दिले गेले.

श्री. राज कर्वे

२. कृत्तिका नक्षत्राचा भगवान कार्तिकेयाच्या जन्माशी असलेला संबंध

​ब्रह्मपुराणानुसार एका प्रसंगी अग्निदेवाने शिवाचे तेज ग्रहण केले. शिवतेजाने युक्त अग्नीला पाहून सहा कृत्तिका अग्नीकडे आकर्षित झाल्या. शिवतेजाच्या योगाने सहा कृत्तिकांपासून सहा मुखे असणारा परमतेजस्वी बालक ‘स्कंद’ जन्माला आला. कृत्तिकांपासून जन्म झाल्याने तो ‘कार्तिकेय’ म्हणून प्रसिद्ध झाला. त्याने बलाढ्य दैत्य तारकासुराचा वध केला.

२ अ. विविध नावे

कार्तिकेय हा देवांचा सेनापती असून त्याची सुब्रह्मण्य, कुमार, मुरुगन, षडानन आदी नावेही प्रचलित आहे.

कृत्तिका नक्षत्राची आकृती (आकृतीतील ठिपके हे तार्‍यांचे दर्शक आहेत.)

३. कृत्तिका नक्षत्राशी संबंधित वैशिष्ट्ये

कृत्तिका नक्षत्रात ६ मुख्य तारे आहेत. नक्षत्राची आकृती धारदार वस्तर्‍यासारखी आहे. आकाशात या नक्षत्राकडे पाहिल्यावर ‘त्यातून वाफा बाहेर पडत आहेत’, असे वाटते. कार्तिक मासात हे नक्षत्र रात्रभर आकाशात दिसते. कृत्तिका नक्षत्राची देवता अग्नि आहे. यज्ञाचा हविर्भाग देवतांपर्यंत पोचवणार्‍या अग्नीला देवतांचे मुख मानले जाते. प्राचीन काळी कृत्तिका हे आद्यनक्षत्र होते; म्हणजे कृत्तिका नक्षत्राला नक्षत्रचक्राचा आरंभ मानले जायचे. कृत्तिका नक्षत्राला कालपुरुषाचे शिर मानले जाते.

 

४. कृत्तिका नक्षत्रावर जन्म झालेल्या व्यक्तींमध्ये असणारी वैशिष्ट्ये

​कृत्तिका नक्षत्राचा स्वामी रवि ग्रह आहे. कृत्तिका हे पित्तप्रकृतीचे नक्षत्र असल्याने या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती सशक्त आणि पीळदार शरिराच्या, उत्तम पचनशक्ती अन् रोगप्रतिकारशक्ती असलेल्या असतात. त्यांची शारीरिक क्षमता पुष्कळ असते, दृष्टी भेदक असते आणि त्वचा लालसर असते. कृत्तिका नक्षत्रांच्या व्यक्तींमध्ये आत्मविश्‍वास उत्तम असल्याने त्यांच्यात प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ असते. त्यांचा स्वभाव महत्त्वाकांक्षी, धैर्यवान, आव्हान स्वीकारणारा आणि प्रयत्नवादी असतो. इच्छित कार्याला मूर्त आणि भव्य रूप देण्याची क्षमता या व्यक्तींमध्ये असते. युद्ध, सैन्य, राजकारण, जागतिक घडामोडी, उद्योग, भौतिक विज्ञान, खेळ हे त्यांचे आवडीचे विषय असतात. तेजतत्त्वाने युक्त असलेले हे नक्षत्र पराक्रमी आणि नेतृत्वगुणाने युक्त आहे. राजे, सत्ताधीश, पुढारी, सेनापती, वैद्य, उद्योजक, तंत्रज्ञ, उपासक यांसाठी नक्षत्र अनुकूल आहे. हे नक्षत्र उच्चपदावर पोचवणारे आणि नावलौकिक देणारे आहे.

 

५. सामाजिक दृष्टीकोनातून कृत्तिका नक्षत्राची वैशिष्ट्ये

​कृत्तिका समष्टी प्रकृतीचे नक्षत्र आहे. सध्याच्या काळानुसार आवश्यक असलेल्या धर्मरक्षणाच्या कार्यासाठी कृत्तिका नक्षत्र पूरक आहे. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींमध्ये आत्मविश्‍वास, प्रभावी वक्तृत्व, नेतृत्व, संघटनकौशल्य, जिद्द आदी गुण असल्याने त्या वैचारिक प्रतिवाद करणे, जाहीर सभांमध्ये श्रोत्यांना संबोधित करणे, देवतांचे होणारे विडंबन रोखणे, धर्मप्रेमींचे संघटन करणे, नेतृत्व करणे आदी कार्य उत्तमरित्या करू शकतात.

– श्री. राज धनंजय कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१५.११.२०२०)

 

कार्तिक पौर्णिमेला कृत्तिका नक्षत्राच्या रूपात होणारे भगवान कार्तिकेयाचे दर्शन !

​कार्तिक पौर्णिमेला कृत्तिका नक्षत्रावर भगवान कार्तिकेयाचेे दर्शन घेण्यास विशेष महत्त्व आहे. या एकाच दिवशी स्त्रिया कार्तिकेयाचे दर्शन घेऊ शकतात. ‘या दिवशी कार्तिकेयाचे दर्शन घेतल्याने वैवाहिक जीवन सुखी होते’, अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी भाविक मोठ्या संख्येने कार्तिकेयाच्या मंदिरात दर्शनासाठी जातात. पृथ्वीतलावर हा दर्शनसोहळा चालू असतांनाच आकाशातही भगवान कार्तिकेय कृत्तिका नक्षत्राच्या रूपात आपल्याला रात्रभर दर्शन देतात. ‘कृत्तिका नक्षत्राजवळ असलेला पौर्णिमेचा चंद्र’, हे दृश्य दिव्यतेची प्रचीती देते. युगायुगांपासून भगवान कार्तिकेय कृत्तिका नक्षत्राच्या रूपात आपल्याला तेज, सामर्थ्य आणि धैर्य प्रदान करत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment