पतीसुख आणि सर्व प्रकारचे वैभव प्राप्त करून देणारे कोकिला व्रत !

१. कोकिलाव्रत कधी करावे ?

कोकिलाव्रत हे ज्या वर्षी आषाढ महिना अधिक येतो, त्या वर्षी करतात. अधिक आषाढ महिना १९ वर्षांनी येतो. या वर्षी अधिक आषाढ मास आहे. अधिक आषाढ संपल्यावर निज आषाढ पौर्णिमा ते श्रावण पौर्णिमा असा महिनाभर हे व्रत करतात. ३०.७.२०१५ पासून २९.८.२०१५ पर्यंत एक मास कोकिलाव्रत आहे.

 

२. कोकिलाव्रत कसे करावे ?

कोकिळाव्रत हे स्त्रियांंनी करायचे व्रत आहे.

२ अ. सुगंधी उटणे लावून स्नान करणे

कोकिळाव्रतात सुगंधी उटण्याने स्नान करावे. यामध्ये पहिले आठ दिवस तीळ आणि आवळा यांचा कल्क (लेप), नंतर आठ दिवस सर्वौषधी कल्क (सर्वौषधी – कोष्ट, जटामांसी, हळद, वेखंड, चंदन, नागरमोथा, शिलाजित, मोरवेल), नंतर आठ दिवस वेखंडाचे चूर्ण, त्यानंतर सर्वौषधी कल्क लावून स्नान करावे. सनातन-निर्मित सुगंधी उटणे लावल्यानेही लाभ होतात.

वेगवेगळी सुगंधी उटणी लावून स्त्रियांनी नदी, तलाव या ठिकाणी किंवा थंड पाण्याने स्नान करावे. स्नान करतांना नद्यांची नावे उच्चारावीत.

२ आ. प्रतिदिन सूर्याला नमस्कार करून अर्घ्य द्यावे.

२ इ. दिवसा फलाहार करून रात्री उपवास सोडावा.

२ ई. कोकिळेच्या प्रतिमेचे पूजन

Kokila

प्रतिदिन कोकिळेच्या सुवर्ण प्रतिमेची किंवा तिळाच्या पिठाच्या प्रतिमेची षोडशोपचार पूजा करावी. कोकिला व्रतात मादी कोकिळेची पूजा करतात; कारण ते पार्वतीचे प्रतीक समजले जाते. कोकिळेमध्ये नर ओरडतो, मादी ओरडत नाही. नर कोकिळ काळाकुट्ट निळसर रंगाची झाक असलेला कावळ्याच्या आकाराचा; परंतु सुटसुटीत आणि लांबट शेपूट असलेला असतो. तो कुऽहू ऽऽ कूऽहू ऽऽ असे खालच्या पट्टीतून वरच्या पट्टीत ओरडतो. कोकिळ मादीचा रंग भुरकट असतो.

पक्षी वसंतऋतूत झाडांना नवीन पालवी आली की, गातो. पहाटे कोकिळेच्या कुऽहू ने सुरुवात होते. कोकिळ पक्षी सहसा दिसत नाही. तो एका झाडावरून दुसर्‍या झाडावर जातांना उडतांना दिसतो. तो फार लाजरा पक्षी आहे. कोकिळ भारतात सर्वत्र आढळतो. त्याला उष्ण हवामान आवडते.

व्रतासाठी सोन्याची कोकिला प्रतिमा केली, तर तिच्या पाठीवर रत्ने बसवतात. तिचे पाय चांदीचे करतात. चांदीचा छोटा आम्रवृक्ष करून त्यावर ही प्रतिमा बसवतात. ज्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य नाही, त्यांनी तिळाच्या पिठाची प्रतिमा दुधात, तुपात किंवा पाकात घट्ट मळून करावी. ही पूजा सायंकाळीच करायची असते.

२ उ. उद्यापन

श्रावण पौर्णिमेला होमहवन करून दांपत्य भोजन आणि कोकिळा प्रतिमा, तसेच अन्य दाने देऊन उद्यापन करावे.

 

३. कोकिळेचा आवाज ऐकणे

कोकिलाव्रतामध्ये कोकिळेचा आवाज ऐकण्याचे महत्त्व आहे. कोकिळेचा आवाज ऐकायला मिळाला नाही, तर व्रत करणार्‍या व्यक्तीने रात्रीही उपवासाचे पदार्थ (शक्यतो न शिजवलेले) खावेत.

 

४. महिनाभर व्रत करता न येणार्‍यांसाठी सांगितलेला पर्याय

ज्यांना महिनाभर कोकिळाव्रत करणे शक्य नाही, त्यांनी श्रावणातील शुद्ध त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमा या तीन दिवशी व्रत करावे आणि पौर्णिमेस उद्यापन करावे. व्रताच्या मासात

३ दिवसांचे व्रत तीन वेळा करण्याचाही पर्याय सांगितला आहे.

 

५. व्रतस्थ स्त्रीने पाळावयाचे नियम

व्रतस्थ स्त्रीने ब्रम्हचर्य पाळावे. प्रवास करू नये. चैनीचे पदार्थ खाऊ नयेत. करमणुकीचे कार्यक्रम पाहू नयेत किंवा करू नयेत. अनावश्यक बोलू नये. देवीच्या चिंतनात आणि नामात दिवस घालवावा. सोयर, सुतक आणि मासिक पाळीचे दिवस या व्रताला वर्ज्य आहेत.

 

६. कोकिलाव्रत केल्याने होणारे लाभ

अधिक आषाढ मासानंतरच्या निज आषाढात जी स्त्री महिनाभर कोकिळेचे दर्शन घेतल्याविना अन्न ग्रहण करणार नाही आणि व्रतस्थ राहील, तिला पतीसुख आणि सर्व प्रकारचे वैभव प्राप्त होईल, असे भगवान शंकराने देवी सतीला सांगितले.

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.६.२०१५)

 

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’