‘महापुरामुळे पूरग्रस्त क्षेत्रातील घर सोडून सुरक्षित ठिकाणी जातांना काय करावे ?, ‘पूर ओसरल्यानंतर घ्यावयाची दक्षता’, या संदर्भातील मार्गदर्शक सूत्रे – भाग ५

Article also available in :

सर्वत्रच्या नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती

वर्ष २०१९ मध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांतील काही शहरांत महापूर आल्यानंतर ‘योग्य कृती काय करावी ?’ याचे ज्ञान नसल्याने अनेक नागरिक गोंधळून गेले. अशा प्रसंगी नागरिकांकडून अयोग्य कृती करण्याची वा निर्णय घेतला जाण्याचीही शक्यता असते. असे होऊ नये, यासाठी ‘महापुरामुळे घर सोडून सुरक्षित ठिकाणी जातांना काय करावे ?, तसेच पूर ओसरल्यानंतर घ्यावयाची दक्षता’, या संदर्भातील मार्गदर्शक सूत्रे पुढे दिली आहेत.

या लेखाचा आधीचा भाग ४ वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

१२. महापुरामुळे पूरग्रस्त क्षेत्रातील घर सोडून सुरक्षित ठिकाणी जातांना काय करावे ?

अ. घराबाहेर जाण्याचा प्रसंग आला, तर लहान मुले, महिला आणि वृद्ध व्यक्ती यांना प्रथम पाठवावे.

आ. घरातील विद्युत् प्रवाहाची मुख्य कळ (मेन स्विच) बंद करून विद्युत् प्रवाह खंडित करावा. दूरचित्रवाणी संच, मिक्सर आदी उपकरणांची पिन ‘सॉकेट’मधून काढून ठेवावी.

इ. ‘शीतकपाट (फ्रिज), धुलाईयंत्र (वॉशिंग मशीन), भ्रमणसंगणक (लॅपटॉप), दूरदर्शन संच आदी उपकरणांमध्ये पाणी जाऊ नये’, यासाठी ती सुरक्षित ठिकाणी हलवावीत.

ई. घरातील लाकडी साहित्य शक्यतो उंचावर ठेवावे. पाण्यात भिजून खराब होतील, अशी कागदपत्रे, तसेच मौल्यवान वस्तू एका प्लास्टिक पिशवीत घालून स्वतःसह घ्याव्यात.

उ. घराची दारे आणि खिडक्या व्यवस्थित बंद कराव्यात. कपाटाची दारेही पूर्ण बंद करावीत.

ऊ. शक्यतो शीतकपाट रिकामे करून ते बंद करावे. स्वयंपाकघरातील ‘गॅस सिलिंडर’ची मुख्य कळ बंद करावी.

ए. घरी कोणतेही नाशवंत पदार्थ (उदा. भाज्या, फळे, दूध) ठेवू नयेत.

ऐ. बाहेरची गटारे तुंबल्यास प्रसाधनगृहातील कमोडमधून अस्वच्छ पाणी घरात येते. त्यामुळे घर बंद करून जातांना किंवा पाण्याचा प्रवाह वाढल्यास सिमेंटच्या पोत्यात वाळू भरून ते पोते भारतीय शौचालयाच्या किंवा कमोडच्या भांड्यात ठेवावे. त्यामुळे अस्वच्छ पाणी घरात येणार नाही.

ओ. स्थलांतरित होतांना स्वतःसमवेत पुरेसे कपडे, तसेच अन्य जीवनावश्यक वस्तू घ्याव्यात.

 

१३. पूरस्थितीत घराबाहेर वावरतांना ही काळजी घ्या !

अ. वाहत्या पाण्यातून चालत जाऊ नये. पाण्यातून चालणे आवश्यक असेल, तर जेथे वहाते पाणी नाही, अशा ठिकाणी पाण्यातून चालावे. पाय ठेवणार असलेली भूमी टणक असल्याची निश्चिती करण्यासाठी काठीचा वापर करावा.

आ. पुराचे पाणी असलेल्या जागेत वाहन चालवू नये. चारचाकी वाहनाच्या आजूबाजूला पुराच्या पाण्याची पातळी वाढत असेल, तर वाहन तेथेच ठेवून उंच ठिकाणी जाणे श्रेयस्कर आहे.

इ. पावसाने सर्वत्र ओल झाली असल्यास कोणत्याही विजेच्या खांबाला स्पर्श करू नये. परिसरातील झाडे पडली असतील अथवा वीजवाहक तारा तुटल्या असतील, तर त्यांना स्पर्श करू नये. अग्नीशमन दल आणि विद्युत् खाते यांना कळवावे. रस्त्यावर पडलेली झाडे-झुडपे यांना स्पर्श करणे टाळावे; कारण त्या झाडांवर वीजवाहक तारा पडल्या असण्याची शक्यता असते.

 

१४. पूर ओसरल्यानंतर घ्यावयाची दक्षता

अ. पाणी ओसरू लागल्यानंतर इतरत्र स्थलांतरित झालेले नागरिक आपल्या घरी परतू लागतात. ‘आपले क्षेत्र वा गाव पुनर्वसनासाठी सुरक्षित आहे’, असे प्रशासनाने जाहीर केल्यानंतरच घरी जावे.

आ. मातीचे घर असल्यास ‘ते सुरक्षित आहे का ?’, याची अनुभवी व्यक्तीकडून निश्चिती करून घ्यावी.

इ. विद्युत् महामंडळाने वीज वापरण्याची सूचना केल्याविना विद्युत् पुरवठा चालू करू नये. विद्युत् प्रवाह चालू केल्यानंतर ‘तो विनाअडथळा चालू झाला आहे का ?’, हे प्रथम पहावे. त्यानंतर ३ – ४ दिवसांनी घरातील उपकरणे विद्युत् पुरवठ्याला जोडावीत.

ई. वाहने, विद्युत् उपकरणे, तसेच घरातील साहित्य नवीन असल्यास आणि त्यांचा विमा (इन्शुअरन्स) उतरवलेला असेल अन् नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली हानीभरपाई मिळणार असेल, तर ‘विमा प्रतिनिधी स्वतः येऊन छायाचित्रे घेऊन पंचनामा करतील’, असे पहावे. तसे न झाल्यास विमा प्रतिनिधींचे मार्गदर्शन घेऊन हानी झालेल्या वस्तूंची आवराआवर करण्यापूर्वी त्यांची प्रथम छायाचित्रे काढावीत आणि त्यांचा पंचनामा करून घ्यावा.

उ. सिलिंडरमधून गॅसची गळती होत असल्यास विद्युत् प्रवाहाचे मुख्य बटण (मेन स्विच) बंद करावे. त्या वेळी घरातील पंखा, दंडदीप आदी चालू असल्यास ते बंद न करता चालू स्थितीतच ठेवावेत; पण कोणतीही विद्युत उपकरणे चालू करू नयेत अन्यथा ‘स्फोट’ होऊ शकतो.

सिलिंडर उघड्यावर, म्हणजे वार्‍याच्या संपर्कात येईल, अशा ठिकाणी (उदा. आगाशीत) ठेवावा. घरात गॅसचा वास पसरला असल्यास विजेची कळ दाबू नये. घराच्या खिडक्या आणि दारे उघडावीत. यामुळे घरात पसरलेला गॅस वार्‍यासमवेत बाहेर निघून जाईल.

ऊ. घराच्या भिंती, विद्युत् उपकरणे (पंखे, दिवे, धुलाई यंत्र, मिक्सर), तसेच कळफलक (स्विच बोर्ड) ओला असतांना वीजप्रवाह चालू करणे अतिशय धोकादायक आहे. यामुळे विजेचा धक्का (शॉक) बसू शकतो. घर कोरडे झाल्यानंतर, तसेच विद्युत् तज्ञाने (‘इलेक्ट्रिशियन’ने) तपासणी केल्यानंतरच वीजप्रवाह चालू करावा.

ए. पुराच्या पाण्यासह साप, विंचू, घुशी, बेडूक किंवा उंदीर असे प्राणी घरात येण्याची शक्यता असते. त्यामुळे खाली ठेवलेले, तसेच अडगळीत असलेले साहित्य काळजीपूर्वक हलवावे.

ऐ. घरात चिखल झाला असेल, तर तो स्वच्छ करतांना आणि तेथील साहित्य हलवतांना पायांत जाड बूट घालणे, हातमोजे घालणे इत्यादी काळजी घ्यावी. जेणेकरून चिखलात धारदार वस्तू (कात्री, सुरी) असल्यास दुखापत होणार नाही, तसेच विषारी जीव-जंतूंपासून रक्षण होईल.

ओ. पुराच्या पाण्याच्या संपर्कात आलेल्या वस्तूंचा (उदा. लाकडी फर्निचर, कपडे, भांडी इत्यादींचा) वापर करण्यापूर्वी त्या स्वच्छ पुसून वा धुवून घ्याव्यात. घरातील लोखंडी साहित्याला (कपाट, पलंग, आसंद्या इत्यादींना) गंज येऊ नये, यासाठी ते कोरड्या कापडाने व्यवस्थित पुसून घ्यावे.

औ. लादीच्या स्वच्छतेसाठी ‘लायझॉल’सारख्या जंतूनाशक रसायनाचा वापर करता येईल. कडुनिंबाची पाने आणि कापूर जाळून घरात धूप दाखवावा. यामुळे वातावरण शुद्ध होऊन घराचे निर्जंतुकीकरण होईल.

अं. पिण्याचे पाणी प्रतिदिन १० मिनिटे उकळून घ्यावे. पुराच्या पाण्यात भिजलेले खाद्यपदार्थ खाऊ नयेत.

क. घरातील औषधे पाणी लागून ओली झाली असल्यास त्यांचा वापर करू नये. औषधे कोरडी असल्यास ती वापरता येतील.

ख. आसपासच्या परिसरात पुराचे पाणी साठू देऊ नये.

ग. देवघरातील देवतांच्या मूर्तींची पूजा : देवघरातील देवतांच्या मूर्तींवर पंचगव्याने (गायीचे दूध, दही, तूप, मूत्र आणि शेण यांनी) अभिषेक करावा. त्यानंतर मूर्तींवर पंचामृताने (दूध, दही, तूप, मध आणि साखर यांनी) अभिषेक आणि जलाभिषेक करून पूर्वीप्रमाणे पूजा चालू करावी.

घ. देवघरातील देवता आणि संत यांच्या चित्रांची पूजा : ही करण्यापूर्वी वरीलप्रमाणे उपचार करणे आवश्यक नाही. त्यांची नेहमीप्रमाणे पूजा करू शकतो.

आपत्तींच्या प्रसंगी ‘राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा’च्या (‘नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲथोरिटी’च्या) ०११-१०७८ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून मार्गदर्शन घेता येईल.

 

१५. पूरस्थितीत घरातून बाहेर पडतांना स्वतःसह ठेवायचे साहित्य

अ. मौल्यवान वस्तू, महत्त्वाची कागदपत्रे आणि रोख रक्कम

आ. प्रथमोपचार पेटी, औषधे, डास प्रतिबंधक उदबत्ती किंवा ‘ओडोमॉस’

इ. बचावाचे साहित्य (जीवरक्षक (लाईफ) जाकीट, टायर ट्युब इत्यादी), विजेरी (टॉर्च), तसेच शिट्टी

ई. आपल्या उपास्यदेवतेचे चित्र

उ. भ्रमणभाष आणि त्याचा चार्जर

ऊ. छत्री, रेनकोट, तसेच पावसाळ्यात वापरायचे बूट

ए. आवश्यक कपडे, तसेच अन्य जीवनावश्यक वस्तू

ऐ. सुका खाऊ आणि पाण्याच्या बाटल्या

(प्रस्तुत लेखमालिकेचे सर्वाधिकार (कॉपीराईट) ‘सनातन भारतीय संस्कृती संस्थे’कडे संरक्षित आहेत.)

वाचकांना आवाहन !

महापुराच्या दृष्टीने काही मार्गदर्शक सूत्रे येथे दिली आहेत. या  अनुषंगाने वाचकांना काही सूत्रे सुचवायची असल्यास त्यांनी ती खालील संगणकीय किंवा टपाल पत्त्यावर पाठवावीत, ही विनंती ! यामुळे हा विषय समाजापुढे सखोलपणे मांडण्यास साहाय्य होईल.

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

 

Leave a Comment