‘प्रत्यक्ष महापुराची स्थिती उद्भवल्यास कोणती काळजी घ्यावी ?’, या संदर्भातील मार्गदर्शक सूत्रे – भाग ४

Article also available in :

सर्वत्रच्या नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती

वर्ष २०१९ मध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांतील काही शहरांत महापूर आल्यानंतर ‘योग्य कृती काय करावी ?’ याचे ज्ञान नसल्याने अनेक नागरिक गोंधळून गेले. अशा प्रसंगी नागरिकांकडून अयोग्य कृती करण्याची वा निर्णय घेतला जाण्याचीही शक्यता असते. असे होऊ नये, यासाठी ‘प्रत्यक्ष महापुराची स्थिती उद्भवल्यास कोणती काळजी घ्यावी ? महापुरामुळे घर सोडून सुरक्षित ठिकाणी जातांना काय करावे ?, तसेच पूर ओसरल्यानंतर घ्यावयाची दक्षता’, या संदर्भातील मार्गदर्शक सूत्रे पुढे दिली आहेत.

या लेखाचा आधीचा भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

९. प्रत्यक्ष महापुराची स्थिती उद्भवल्यास पुढील दक्षता घेऊन सुरक्षित रहा !

अ. पाण्याचा वापर काटकसरीने करावा. उकळलेले आणि निर्जंतुक पाणी प्यावे. शक्यतो शिळे अन्न खाऊ नये, तसेच अन्न झाकून ठेवावे.

आ. विद्युत् उपकरणे पाण्याखाली जात असल्यास त्यांचा विद्युत् प्रवाह त्वरित बंद करावा. अशा परिस्थितीत त्यांचा वापर करू नये.

इ. घरात पाणी आले असल्यास विजेच्या खांबातून घरात येणारा विद्युत् प्रवाह खंडित करावा. पाणी आणि वीज यांचा एकमेकांशी संपर्क आल्यास विजेचा झटका बसू शकतो.

ई. घराच्या तळमजल्यावर पाणी आले, तर त्यापासून वाचण्यासाठी उंचावरील ठिकाणी (पहिला मजला, दुसरा मजला, आगाशी येथे) रहायला जाणे टाळावे. याचे कारण म्हणजे पुढे पाण्याची पातळी आणखी वाढल्यास घरातून बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी जाणे अशक्य होते. त्यामुळे शासनाने पूरग्रस्तांसाठी बनवलेल्या आश्रयस्थानी अगोदरच (पाण्याची पातळी अल्प असतांना) जावे.

उ. भ्रमणभाषचा अतिवापर टाळून आवश्यक त्या कारणांसाठीच त्याचा वापर करावा. सध्या घरात सर्वांकडे भ्रमणभाष असल्याने संपर्कासाठी एकाच भ्रमणभाष वापरू शकतो. जेणेकरून एकाच वेळी सर्वांच्या भ्रमणभाषच्या बॅटर्‍या ‘डिस्चार्ज’ होऊन अडचण येणार नाही.

ऊ. पुराच्या पाण्यात वाहने फसणे, वाहनांची कोंडी होणे अशा घटना घडतात. त्यामुळे पूरग्रस्त क्षेत्रात दुचाकी वा चारचाकी वाहने नेऊ नयेत. घरी किंवा अन्यत्र ही वाहने ठेवल्यास ती साखळीने बांधून ठेवावीत, म्हणजे ती पाण्याच्या प्रवाहानेे वाहून जाणार नाहीत.

ए. घरातील लहान मुले, वृद्ध, तसेच अपंग यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे आणि त्यांना धीर द्यावा.

ऐ. आपत्कालीन स्थितीत काही अफवा सर्वत्र प्रसारित केल्या जातात. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये. शासनाने अधिकृतरित्या प्रसारित केलेली माहिती ग्राह्य धरावी.

 

१०. आरोग्याच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी !

१० अ. ‘साथीचे रोग होऊ नयेत’, याची काळजी घेणे

अतीवृष्टीमुळे सर्वत्र ओल आणि आर्द्रता निर्माण होते. सूर्य ढगाआड झाकला गेल्याने स्वच्छ सूर्यप्रकाशाचा अभाव असतो. त्यामुळे रोगजंतू पसरून साथीचे आजार होण्याची शक्यता बळावते. त्यामुळे या काळात अशुद्ध पाण्यामुळे होणारे रोग (कावीळ, विषमज्वर (टायफॉईड), अतिसार (डायरिया), लेप्टोस्पायरोसीस इत्यादी) होऊ शकतात. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

१० आ. डास प्रतिबंधक उदबत्ती वापरणे

महापुराच्या वेळी डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे हिवताप (मलेरिया’), ‘डेंग्यू’ यांसारखे आजार होऊ शकतात. डासांचा प्रादुर्भाव वाढला असल्यास मच्छरदाणीचा किंवा डास प्रतिबंधक उदबत्ती, डास चावू नयेत, यासाठी लावायचे मलम (उदा. ‘ओडोमॉस’) आदींचा वापर करता येईल.

 

११. आध्यात्मिक स्तरावर करायचे प्रयत्न !

११ अ. देवाला प्रार्थना करणे

भगवान श्रीकृष्ण, ग्रामदेवता, स्थानदेवता आणि वास्तूदेवता यांना प्रत्येक १५ मिनिटांनी किंवा अर्ध्या घंट्याने मनोभावे प्रार्थना करावी, ‘हे देवा, आम्ही तुला शरण आलो आहोत. तूच आम्हाला तारून ने. माझ्याकडून तुझा नामजप सातत्याने होऊ दे. मी, माझे कुटुंबीय आणि माझे घर यांच्याभोवती तुझ्या नामजपाचे संरक्षक-कवच निर्माण होऊ दे.’

११ आ. अधिकाधिक नामजप करणे

दिवसभरातील अधिकाधिक वेळ भगवान श्रीकृष्ण वा कुलदेवता अथवा इष्टदेवता यांचा नामजप करावा. कलियुगात ‘देवतेचे नाम हाच आधार’ असल्याने मनातल्या मनात नामजप चालू ठेवावा. नामजप लावण्याची सोय असल्यास भ्रमणभाषवर वा स्पीकरवर लावावा. यामुळे त्याची आठवण राहील.

११ इ. इतरांना सहकार्य करतांना भाव कसा ठेवावा ?

या आपत्तीमध्ये सर्वांनी एकमेकांना सहकार्य करावे, तसेच मानसिक आधार देऊन भगवंतावरील श्रद्धा वाढण्यासाठी प्रयत्न करावेत. ‘सामाजिक बंधुत्व पाळणे’, हे प्रत्येकाचे धर्मकर्तव्यच आहे; पण इतरांना साहाय्य करतांना ‘मी साहाय्य करत नसून देवच माझ्याकडून हे करून घेत आहे’, या भावाने नामजप करत साहाय्य करावे. त्यामुळे आपल्या मनात कर्तेपणाचे विचार येणार नाहीत, तसेच त्या व्यक्तीशी देवाणघेवाण हिशोबही निर्माण होणार नाही.

(प्रस्तुत लेखमालिकेचे सर्वाधिकार (कॉपीराईट) ‘सनातन भारतीय संस्कृती संस्थे’कडे संरक्षित आहेत.)

वाचकांना आवाहन !

महापुराच्या दृष्टीने काही मार्गदर्शक सूत्रे येथे दिली आहेत. या अनुषंगाने वाचकांना काही सूत्रे सुचवायची असल्यास त्यांनी ती खालील संगणकीय किंवा टपाल पत्त्यावर पाठवावीत, ही विनंती ! यामुळे हा विषय समाजापुढे सखोलपणे मांडण्यास साहाय्य होईल.

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment