अनुपम प्रीतीने सर्वांना ईश्‍वरप्राप्तीच्या समान धाग्यात गुंफणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

Article also available in :

परात्पर गुरु डॉक्टरांच्या अनपेक्षित दर्शनाने आनंदलेले साधक

‘सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करणार्‍या कित्येक साधकांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना एकदाही पाहिलेले नाही. असे असूनही ते सर्व परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेली साधना अत्यंत श्रद्धापूर्वक करत आहेत. बाहेर मोहमायेचे प्रबळ जाळे असतांना केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धेपोटी सनातन संस्थेचे साधक सर्व मोह त्यागून ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करत आहेत. साम्यवाद, निधर्मीवाद, नास्तिकतावाद जोपासणे, हे समाजात प्रतिष्ठेचे झाले असतांना सनातन संस्थेचे साधक स्वतः धर्मनिष्ठ राहून समाजालाही धर्माधिष्ठित होण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. यासाठी नास्तिक, पुरोगामी यांच्या विरोधाला सक्षमपणे सामोरे जायलाही ते सिद्ध आहेत. सनातन संस्थेच्या संपर्कात येण्यापूर्वी मायेच्याच विश्‍वाचा एक घटक असलेल्यांना असे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासाठी बळ कोण देते ?

सनातन संस्थेच्या कठीण काळात समाजात वावरतांना, साधना-सेवा करत असतांना समाजाची टीका, परिचितांचे टोमणे, प्रसंगी घरातील सदस्यांचा वैचारिक विरोध सहन करूनही सनातन संस्थेेने सांगितलेल्या साधनेशी साधक एकनिष्ठ आहेत. साधना करत असल्यामुळे वातावरणातील वाईट शक्तींचे तीव्र त्रासही साधकांना भोगावे लागत आहेत. असह्य त्रास भोगूनही साधकांनी साधना करणे सोडलेले नाही. उलट त्रासातही साधक जोमाने साधना करत आहेत. हे सारे कशामुळे घडत आहे ? अशी कोणती शक्ती आहे, जी साधकांना परात्पर गुरु डॉक्टरांशी जोडून ठेवते ? साधकांना साधनेशी जोडून ठेवणारी, कठीण काळात मनोबळ देणारी ती शक्ती म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांची साधकांवर असलेली प्रीतीच आहे ! समष्टीप्रती उच्च प्रीती, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे एक वैशिष्ट्य आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या अवतारी समष्टी संतांच्या संदर्भात त्यांची प्रत्येक उक्ती, कृती, विचार यांतून समष्टी कल्याणाची तळमळ ओतप्रोत दिसून येते. समष्टीप्रती असलेल्या प्रीतीमुळे सर्वांना वात्सल्यमय कृपाछत्र अनुभवता येते. याच प्रीतीच्या चैतन्यमय धाग्याने आज सारा सनातन परिवार घट्ट बांधला गेला आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समष्टीवरील प्रीतीचा अल्पसा परिचय वाचकांना करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. श्री गुरूंची महती वर्णन करण्यासाठी ईश्‍वरानेच बुद्धी आणि भक्ती प्रदान करावी, अशी त्याच्या चरणी प्रार्थना !

 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रीतीची व्यापकता

संघटनात्मक, प्रांतीय, धार्मिक बंधने नाहीत !

परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रीतीला संघटनात्मक, प्रांतीय, धार्मिक अशी कोणतीच बंधने नाहीत. सनातन संस्थेच्या साधकांची साधना चांगली व्हावी, यासाठी ते जेवढे प्रयत्न करतात, तेवढेच प्रयत्न अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांनी साधना करावी, यासाठी करतात. अडचणीत असलेल्या हिंदुत्वनिष्ठांना आधार देण्याविषयी त्यांनी वेळोवेळी साधकांना सांगितले आहे. विदेशातून हिंदु धर्माविषयी जाणून घेण्यासाठी आलेल्या अहिंदू जिज्ञासूंच्या हिंदु धर्मविषयक शंकांचे त्यांनी घंटोनघंटे शंकानिरसन केलेले आहे.

विरोधकांविषयीही वैयक्तिक आकस नाही !

सनातन संस्थेला अनेकांनी अनेक मार्गांनी विरोध केला. या सर्व विरोधकांविषयीही त्यांच्या मनात कोणताही वैयक्तिक आकस नाही. ईश्‍वरप्राप्तीसाठी प्रयत्न करणार्‍या साधकांना त्रास दिल्याचे मोठे पाप लागते. ते पाप त्या व्यक्तीला लागू नये, यासाठी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांतून त्यांचा प्रतिवाद केला जातो. ‘त्याची चूक कळून त्याचे नैतिक अधःपतन टळावे’, ‘विरोधकांचीही हानी होऊ नये’, हा विचार ही त्यांची प्रीतीच आहे !

विकल्पांमुळे सोडून गेलेल्या साधकांविषयीही आपलेपणा

साधनेपासून दुरावलेल्या साधकांविषयी त्यांच्या मनात कधीच आकस निर्माण होत नाही. विकल्पांमुळे दुरावलेले साधक काही काळाने परत आल्यानंतरही परात्पर गुरु डॉक्टर त्यांना तितक्याच सहजतेने आपलेसे करतात.

 

१. परात्पर गुरूंच्या प्रीतीची वैशिष्ट्ये

१ अ. काही क्षणांच्या सहवासानेही समोरच्याला आपलेसे करणे

परात्पर गुरु डॉक्टरांच्या केवळ एकदा संपर्कात आलेली व्यक्तीही त्यांचीच होऊन जाते, हे साधकांनीच अनुभवले आहे असे नाही, तर समाजातील धर्माभिमानी, अन्य संप्रदायांतील संत यांनीही अनुभवले आहे. जिज्ञासू, साधक, धर्माभिमानी यांना ते त्यांच्या सहवासात इतके प्रेम देतात, आपुलकीची वागणूक देतात की, आपण त्यांचे कधी होऊन गेलो, हे कळतच नाही. बाहेरचे काही संत आणि धर्माभिमानी यांनाही रामनाथी आश्रमात आल्यानंतर माहेरी आल्यासारखे वाटतेे. याचे कारण आश्रमात ठायी ठायी परात्पर गुरु डॉक्टरांनी रुजवलेली प्रीती आहे. खरेतर परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रीतीची स्पंदनेच संपूर्ण आश्रमात जाणवतात, जी बाहेरचे संत आणि धर्माभिमानी यांच्यात आश्रमाप्रती जवळीक निर्माण करतात.

१ आ. स्वतःप्रमाणेच प्रीती इतरांमध्ये रुजवणे

परात्पर गुरु डॉक्टरांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी त्यांच्यातील प्रीती सनातन संस्थेच्या सहस्रो साधकांमध्येही रुजवली आहे. आपल्या मूळ निवासापासून कित्येक किलोमीटर दूर जाऊन सेवा करणारे सनातन संस्थेचे साधक आज अनोख्या कुटुंबभावनेने एकमेकांशी जोडले गेले आहेत. सध्याच्या काळात दोन सख्ख्या भावांचेही एकमेकांशी पटत नाही, अशा काळात सनातन संस्थेच्या आश्रमांमध्ये शेकडो साधक गुण्या-गोविंदाने एकत्र रहात आहेत. याचे कारण परात्पर गुरु डॉक्टरांतील प्रीतीचा अंश त्यांनी साधकांमध्येही रुजवला आहे, हेच आहे. गेली अनेक वर्षे परात्पर गुरु डॉक्टर त्यांच्या रहात्या खोलीतून बाहेरही पडलेले नाहीत. अशा वेळी त्यांनी वेळोवेळी सांगितलेल्या साधनेतील सूत्रांच्या आधारे सनातन संस्थेचे मार्गदर्शक साधक आणि संत सर्वत्रच्या साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करत आहेत. या सर्व माध्यमांतूनही साधक परात्पर गुरु डॉक्टरांची प्रीतीच अनुभवत आहेत. त्यांच्या प्रीतीला स्थळ-काळाचे बंधन नाही.

परात्पर गुरु डॉक्टरांची जशी संत, साधक, धर्माभिमानी, समाज अशी सर्वांवर प्रीती आहे, तशाच प्रकारे आता साधकही समाजात प्रसार करत असतांना प्रेमभावाने सर्वांना आपलेसे करतात.

१ इ. स्वतःचे सर्वस्व साधकांसाठीच समर्पित असूनही साधकांना
स्वतःत न अडकवता ईश्‍वरी तत्त्वाशी एकरूप होण्याची शिकवण देणे

समष्टी कल्याणाचे कार्य आरंभलेले असल्याने परात्पर गुरु डॉक्टरांवर वाईट शक्तींची अनेक आक्रमणे होत असतात. त्यांचा देह देवासुर युद्धाची युद्धभूमीच झाला आहे. स्थुलातून आणि सूक्ष्मातूनही साधकांची सर्वतोपरी काळजी घेत असतांना आणि स्वतःचे सर्वस्व साधकांच्या कल्याणासाठीच पणाला लावलेले असतांनाही ते साधकांना ‘माझ्यात न अडकता कृष्णाकडे जा’, अशी शिकवण देतात. त्यांची साधकांवर प्रीती असली, तरी ‘साधकांनी मात्र तत्त्वाशी एकरूप व्हावे, सर्वव्यापी ईश्‍वराला भजावे’, अशी त्यांची शिकवण आहे. अर्थात् साधकांनाही ‘गुरुमाऊली प्राणाहूनही प्रिय आहे’, हे वेगळे सांगायला नको !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील प्रीतीमुळे दैवी बालके स्वतःहून आकर्षित होतात ! चि. न्योम सावंत (वय १० मास, मुंबई) स्वतः परात्पर गुरु डॉक्टरांकडे झेपावला, तेव्हा त्याच्या वडिलांनाही आश्‍चर्य वाटले !

या प्रेमाला उपमा नाही । हे देवाघरचे लेणे । जे कधी कुणी ना दिधले । ते तू प्रेम मज दिधले ॥

अन्नप्राशनविधीच्या वेळी बाळाला भरवतांना परात्पर गुरु डॉक्टर (वर्ष २०१४)
दुर्धर व्याधीने निधन झालेल्या सनातनच्या आश्रमातील साधिकेच्या पार्थिवावर परात्पर गुरु डॉक्टरांनी चंदनकाष्ठ ठेवले, तो हृदयस्पर्शी क्षण ! (वर्ष २००८)

 

२. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि साधक यांच्यात असलेले अतूट नाते !

  • एका प्रसंगी एक साधिका तिला पडलेले स्वप्न परात्पर गुरु डॉक्टरांना सांगत होती. त्या स्वप्नात परात्पर गुरु डॉक्टर तिला सोडून गेल्याचे तिला दिसले. तिचे ते वाक्य सांगून पूर्ण होण्यापूर्वीच परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘मी माझ्या साधकांना कधीच सोडून जात नाही.’’ नंतर संवाद पूर्ण होईपर्यंत त्यांनी हेच वाक्य २-३ वेळा उच्चारले.
  • एकदा आश्रमात आलेल्या एका संतांना निरोप देऊन परात्पर गुरु डॉक्टर त्यांच्या निवासकक्षाकडे निघाले होते. तेव्हा मार्गिकेतील काही साधकांनी त्यांना हात हलवून ‘टाटा’ केला. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले होते, ‘‘निरोप कसला माझा घेता । जेथे साधक तेथे मी आता ॥’
  • परात्पर गुरुदेवांसाठी साधकच सर्वस्व आहेत. ‘मला सर्व फुलांत ‘साधक फूल’ सर्वांत प्रिय आहे’, असे त्यांनी एकदा म्हटले होते.
    ‘तुम्हा सर्व साधकांचे आणि तुमच्या कुटुंबाचेही दायित्व माझ्यावर आहे.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले (सावंतवाडी येथील मंदिरात साधकांना केलेले मार्गदर्शन)

खरेच, ‘साधकांसाठी किती करू नी काय काय करू’, असे त्यांना वाटत असते. त्यांनी साधकांचा हात सोडण्यासाठी नाही, तर जन्मोजन्मी साथ देण्यासाठी, मोक्षप्राप्तीपर्यंत वाटचाल करण्यासाठीच धरला आहे !

 

३. सर्व स्तरांतील, सर्व वयोगटांतील साधकांवर कृपाछत्र असणे

‘परात्पर गुरु डॉक्टरांचे गरीब – श्रीमंत, शिक्षित – अशिक्षित, लहान – मोठे आदी सर्व साधकांवर कृपाछत्र आहे. हे मी स्वतः अनुभवले आहे. प्रत्येकाला ते आवश्यकतेप्रमाणे साहाय्य करतात. त्यांना आध्यात्मिक त्रासांवर नामजपादी उपाय सांगतात. त्यांच्या कृपाछत्राखाली वावरणारा साधक नेहमीच आनंदी असतो.’

– श्री. प्रकाश रा. मराठे, रामनाथी, गोवा.

 

४. साधकांचे आनंदाचे क्षण साजरे करणे

४ अ. साधिकेच्या आश्रमातील पहिल्या वाढदिवसाला तिला हवी त्या प्रकारची साडी देणे

‘आश्रमातील कु. कनकमहालक्ष्मी देवकर हिला साडी नेसायला आवडते; परंतु तिच्याकडे साडी नव्हती. हे परम पूज्यांना कळल्यावर त्यांनी तिला साडी देण्याविषयी लगेच साधिकांना सांगितले. काही दिवसांनी तिचा आश्रमात पहिल्यांदाच वाढदिवस साजरा होणार होता.

तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘आज कनकमहालक्ष्मीचा वाढदिवस आहे ना ! तिला आपण आज साडी भेट देऊया. तिच्याजवळ साडी नाही ना ! तिला जो रंग आवडतो, त्या रंगाची साडी तिला निवडून घेता येईल. आश्रमातील पहिल्या वाढदिवसाला (तिला) पहिली साडी मिळेल !’’

– कु. वैभवी सुनील भोवर (वय १६ वर्षे) (२३.६.२०१३))

अशा प्रकारे आश्रमातील सर्व साधकांचे वाढदिवस साजरे केले जातात. साधकाच्या वाढदिवसानिमित्त आश्रमातील भोजनकक्षातील फलकावर साधकाचे नाव लिहून त्याला शुभेच्छा दिल्या जातात. त्यामुळे सर्वच साधकांना त्या साधकाच्या वाढदिवसाविषयी कळते. त्या साधकासमवेत सेवा करणारे साधक त्याच्यासाठी स्वहस्ते छानसे शुभेच्छापत्र बनवतात. त्याची गुणवैशिष्ट्ये वर्णन करणारे काव्य केले जाते. आश्रमातील अनेक साधक साधनेसाठी शुभेच्छा देतात. अशा प्रकारे त्या साधकाचा वाढदिवस अत्यंत आनंदाने साजरा केला जातो.

४ आ. विवाह, मौजीबंधन आदी मंगल कार्यांनंतरही परात्पर गुरु डॉक्टर नवदांपत्याला अथवा संबंधित कुटुंबियांना भेटून आशीर्वाद देतात. जीवनाच्या नव्या पर्वाचा आरंभ करतांना गुरूंचे हे अनमोल आशीर्वाद साधकही हृदयमंदिरात साठवून ठेवतात.

 

५. साधक घरी जातांना त्याच्या समवेत सर्वांना खाऊ पाठवणे

५ अ. साधकांना त्यांच्या आवडीनुसार खाऊ देणे

‘परात्पर गुरु डॉक्टर अनेक साधकांना खाऊ द्यायला सांगतात. तेव्हा ते तरुण, लहान मुले, वयस्कर यांचा विचार करून त्यांना आवडेल असा खाऊ देतात. ‘गोड आवडते कि तिखट ?’, तेही विचारून घेतात. त्रास असलेल्या साधकांची चौकशी करून त्यांनाही ते खाऊ पाठवतात. ते आश्रमातून घरी जाणार्‍या साधकासमवेत त्याच्या घरचे, तसेच तेथील संत आणि धर्माभिमानी अशा सगळ्यांना खाऊ द्यायला सांगतात. एवढेच नव्हे, तर त्या साधकाच्या गावातील साधकांनाही ते आवर्जून खाऊ पाठवायला सांगतात.’

– श्री. प्रकाश रा. मराठे, गोवा.

सनातनचे अनेक साधक विविध जिल्ह्यांत, विविध राज्यांत धर्मप्रसारासाठी जातात. अशा वेळेला इतर प्रांतात गेल्यावर तेथे जे उपलब्ध होईल, ते प्रसाद म्हणून ग्रहण करून ते आनंदाने धर्मप्रसार करत असतात. अखिल भारतीय हिंदू अधिवेशन किंवा साधनाविषयक शिबिर यांच्या निमित्ताने जेव्हा सर्वत्रचे साधक रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात एकत्र येतात, तेव्हा काही कारणाने दूर गेलेली लेकरे घरी परतल्यानंतर आईला जसा आनंद होतो, तशाच आनंदाने विविध पदार्थ केले जातात. वर्षातून कधीतरी गुरुमाऊलीच्या कुशीत येणार्‍या या साधकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन निरनिराळे पदार्थ बनवून त्यांना खाऊ घालण्याची शिकवणही परात्पर गुरु डॉ. आठवले यांचीच ! घरी राहून प्रसारसेवा करणार्‍यांना किंवा आश्रमांत राहून धर्मसेवा करणार्‍या साधकांना आपसूकच काही ना काही कारणाने गोडधोड दिले जाते. जे साधक बाहेरच्या प्रांतांत जाऊन धर्मसेवा करतात, त्यांचे प.पू. डॉक्टरांना विशेष कौतुक आहे.

अशा एक ना अनेक प्रसंगांत गुरुदेव साधकांची माऊली बनले आहेत. सख्खे कुटुंबीयही करू शकणार नाहीत, इतके प्रेम केवळ तेच करू शकतात ! त्यांच्या प्रीतीचे प्रसंग व्यक्त करण्यास शब्दही असमर्थ आहेत. केवळ ती वात्सल्यमय प्रीती अनुभवून त्यांच्या प्रीतीसागरातील क्षणमोती मनमंदिरात साठवून ठेवणे, इतकेच आपण करू शकतो. हे गुरुमाऊली, कृतज्ञता काय व्यक्त करणार ? आम्हाला आपल्या प्रीतीच्या बंधनात ठेवावे, आपली चरणी स्थान द्यावे, हीच प्रार्थना !

 

६. साधिकेच्या प्राणांचे रक्षण होण्यासाठी स्वतःचे आयुष्य तिला देण्याची इच्छा व्यक्त करणे

सनातनच्या ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका कु. दीपाली मतकर यांची प्रकृती ऑक्टोबर २०१६ मध्ये अत्यंत गंभीर होती. त्यांच्यावरील हे प्राणांतिक संकट दूर होण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी संतांना नामजप करण्यास सांगितला. महर्षींनाही कु. दीपाली यांच्या प्रकृतीसाठी परिहार विचारून यज्ञ करण्यात आला. असे असूनही कु. दीपाली मतकर यांची प्रकृती सुधारल्यावर जेव्हा त्या परात्पर गुरु डॉक्टरांना भेटायला आल्या, तेव्हा झालेला अत्यंत हृदयस्पर्शी संवाद –

परात्पर गुरु डॉक्टर : मला माझी एक चूक लक्षात आली. तुझी स्थिती गंभीर असल्याचे समजल्यावर मला वाटले, ‘माझे आयुष्य तुला द्यावे’; पण नंतर लक्षात आले, संतांच्या सांगण्याप्रमाणे आता माझे आयुष्य फारतर २ – ३ वर्षेच आहे. तेवढेच आयुष्य तुला देऊन काय उपयोग ? तुला अजून ५० – ६० वर्षे कार्य करायचे आहे.’’

कु. दीपाली मतकर : तुमच्यामुळेच मी जिवंत आहे. तुमच्या कृपेमुळेच महर्षि, संत आणि साधक नामजपादी उपाय करत होते. ‘परम गुरुजीच (प.पू. डॉक्टरच) वाचवू शकतात’, असे महर्षि म्हणाल्याचे सद्गुरु गाडगीळकाकूंनी सांगितले, म्हणजे तुमच्यामुळेच मी जिवंत आहे. (‘तेव्हा मला फार कृतज्ञता वाटत होती. मीच नाही, तर सर्व साधक या घोर कलियुगात गुरुमाऊलीमुळेच सुरक्षित आहेत. त्यांच्या कृपेमुळेच श्‍वास घेत आहेत. साधकांचे सर्व त्रास ते आपल्यावर घेत आहेत.’ – कु. दीपाली मतकर)

 

७. विवाह सुनिश्‍चित झालेल्या साधिकेला आवडते, ते सर्व देण्यास सांगणे

‘वर्ष २००६ मध्ये एका साधिकेचा विवाह सुनिश्‍चित झाला होता. तिला भेटण्यासाठी मी जाणार होते. मी निघण्यापूर्वी प.पू. डॉक्टरांनी मला बोलावून थोडे पैसे दिले आणि म्हणाले, ‘‘तुम्ही दोघी बाहेर खरेदीला जाणार आहात. तेव्हा तिला काय आवडते, ते घेऊन द्या. बाहेर जाणार असल्याने खाण्या-पिण्यासाठी हे पैसे वापरा. काही उणे पडू देऊ नका. हल्ली किती पैसे लागतात मला ठाऊक नाही. आणखी हवेत तर सांगा. आईस्क्रीम किंवा जे काही तिला आवडते, ते तिला द्या. आपल्या वतीने तिचे केळवणही करा. आपण नाहीतर तिचे कोण कौतुक करणार ?’

– सौ. मनीषा पानसरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

आताही आश्रमातील साधकांचे विवाहापूर्वी केळवण केले जाते. त्या वेळी साधकाच्या विभागातील साधक एकत्र येऊन त्या साधकांना पुढील वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा देतात.

 

८. रुग्ण साधकांची सर्वतोपरी काळजी घेणारे भक्तवत्सल !

तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो । तुम्ही हो बंधू, सखा तुम्ही हो ॥
तुम ही हो साथी, तुम ही सहारे । कोई ना अपना सिवा तुम्हारे ॥

बेळगाव (कर्नाटक) येथील पू. (डॉ.) नीलकंठ दीक्षित (वय ९१ वर्षे) यांना ‘व्हिलचेअर’वरून नेतांना परात्पर गुरु डॉक्टर. समवेत सौ. विजया दीक्षित

८ अ. रुग्णावस्थेतील साधकाला काही उणे पडायला नको; म्हणून सतत त्याची विचारपूस करणे

‘रुग्णाईत साधकाला भेटण्यासाठी स्वतःला पायर्‍या चढणे शक्य नसतांनाही परात्पर गुरु डॉ. आठवले दादरा (जिना) चढून रुग्णाईत साधकाला भेटतात. त्याला भेटून ते ‘त्याला काही अडचण आहे का ?’ आदी विचारपूस करतात. त्याला आवडतात, ते पदार्थ बनवून द्यायला सांगतात. त्या साधकाला काही उणे पडायला नको; म्हणून ते काळजी घेतात. तसेच निरनिराळ्या उपायपद्धती शोधून त्या साधकाला लवकर बरे करतात.’ – कु. तृप्ती गावडे, रामनाथी, गोवा. (१०.५.२०१८)

८ आ. साधिकेला मरणयातना होऊ नयेत, यासाठी स्वत: नामजपादी उपाय करून साधिकेचा प्राण वरवर सरकवणे

दुर्धर व्याधी असलेल्या एका साधिकेच्या मृत्यूसमयी तिच्या वेदना सुसह्य व्हाव्यात, यासाठी प.पू. डॉक्टरांनी स्वतः नामजप केला. त्यामुळे मृत्यूसमयी कोणत्याही प्रकारच्या यातना न होता आनंदाने तिला मृत्यूला कवटाळता आले. प.पू. डॉक्टरांच्या प्रीतीमुळे अनेक साधकांचे जीवन आणि मरण सुसह्य झाले आहे.’ – कु. मधुरा भोसले, रामनाथी, गोवा. (८.१.२०१३)

८ इ. त्वचारोगामुळे जर्जर झालेला विदेशातील एक साधक आपल्या आजारामुळे इतरांना किळस वाटू नये, यासाठी पूर्ण शरीर झाकून ठेवायचा. त्याला प.पू. डॉक्टरांसमोर जायला संकोच वाटत असतांना प.पू. डॉक्टरांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. त्याला पायांतील मोजे काढायला लावून त्याच्या व्याधीचे स्वरूप पाहिले. त्यांच्या या प्रेमामुळे त्या साधकामध्ये जगण्याची नवी उमेद निर्माण झाली.

– श्री. योगेश जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

९. आताही सनातनच्या आश्रमात साधकांची
अत्यंत प्रेमाने आणि आपलेपणाने काळजी घेतली जाते !

परात्पर गुरु डॉक्टरांच्या शिकवणीमुळे सनातनच्या आश्रमांतील सर्वच साधक हे रुग्णाईत आणि वयस्कर साधकांची अत्यंत आपुलकीने काळजी घेतात. त्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांच्या पथ्यानुसार आहार देणे अशी सर्व काळजी घेतली जाते. खोलीत झोपून रहावे लागल्यास त्याला भेटून साधनाविषयक सूत्रे सांगून प्रोत्साहित करणे, वाचनासाठी काही ग्रंथ उपलब्ध करून देणे, हेही ओघानेच होते. गेल्या काही वर्षांपूर्वीच परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितले आहे की, येत्या काळात सनातन वानप्रस्थाश्रमाचीही स्थापना करणार आहे. ज्या साधकांनी जन्मभर ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना केली आहे, त्या साधकांचे मन उतारवयातही मायेत रमत नाही. अशा साधकांची शेवटपर्यंत काळजी घेता यावी आणि त्यांना साधनेचे वातावरण लाभावे, हा त्यामागील उद्देश आहे. खरंच, या प्रेमाला उपमाच नाही !

९ अ. गुरुदेवांनी साधकांची वाट पहात रात्री अडीच वाजेपर्यंत
जागे राहून बाहेरून आलेल्या साधकांना स्वतःच जेवायला वाढणे

वर्ष १९९९ मध्ये गुरुपौर्णिमा झाल्यानंतर आम्ही मुंबई येथे पुढील सेवा शिकण्यासाठी गेलो होतो. एकदा आम्हाला एका साधकाच्या घरून सेवा आटोपून सेवाकेंद्रात परतायला रात्रीचे अडीच वाजले. आम्ही सायंकाळी चहा आणि अल्पाहार घेतला होता अन् त्या साधकाकडे थोडा खाऊ खाल्ला होता. रात्री टॅक्सीतून उतरल्यावर आम्ही पाहिले, तर गुरुदेवांंच्या खोलीतील दिवा चालू होता आणि ते आमची वाट पहात जागे होते. आम्ही उद्वाहकातून (लिफ्टने) वर आलो. तेव्हा ते उद्वाहकापाशी येऊन थांबले होते. ते आम्हाला म्हणाले, ‘‘हात-पाय धुऊन जेवायला या.’’ तेव्हा आम्ही दोघांनी ‘आमचे जेवण झाले आहे’, असे खोटेच सांगितले. त्या वेळी आमचे काही न ऐकता ते आम्हाला स्वयंपाकघरात घेऊन गेले. तेथे पटलावर दोन ताटे वाढून ठेवली होती. गुरुदेवांनी आम्हाला बसायला सांगून स्वतःच जेवण वाढले. ‘‘आम्ही वाढून घेतो. तुम्ही झोपायला जा’’, असे सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘तुम्ही प्रतिदिन जागरण करता. मी एक दिवस जागरण केले; म्हणून काय झाले ? स्वयंपाकघरात सेवा करणार्‍या साधिकांना सकाळी लवकर उठून येथून नोकरीसाठी जाणार्‍या साधकांसाठी जेवणाचा डबा आणि अल्पाहार करावा लागतो. त्या दमतात; म्हणून मी त्यांना झोपायला सांगितले आणि मी थांबलो. आता उद्यापासून सायंकाळी जातांना समवेत जेवणाचा डबा घेऊन जा; म्हणजे असे खोटे बोलावे लागणार नाही.’’ तेव्हा आमच्या डोळ्यांत अश्रू आले. एवढे प्रेम आणि काळजी घरातीलही कुणी करणार नाहीत.’

– कु. शशिकला कृ. आचार्य, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.११.२०१६)

९ आ. पावसात भिजलेल्या साधकाला सभास्थानी जाण्यासाठी स्वतःची विजार (पॅन्ट) देऊ करणे

‘परात्पर गुरु डॉक्टर पूर्वी जिल्ह्याजिल्ह्यांत ‘जाहीर सभा’ घेत असत. जत (जिल्हा सांगली) येथील सभेच्या एक घंटा आधी वारा-वादळ आणि पाऊस चालू झाल्यामुळे मैदानाऐवजी शाळेच्या सभागृहात सभा घेण्याचे ठरले. त्यामुळे व्यासपीठ, कापडी फलक आणि कनात इत्यादी काढतांना आम्ही आठ-दहा साधक पावसात नखशिखांत भिजलो होतो. शाळेच्या सभागृहात सभा चालू होण्यापूर्वी कपडे पालटण्यासाठी आम्ही श्री. होमकरकाका यांच्या घरी गेलो होतो. त्यांची उंची कमी असल्यामुळे त्यांनी दिलेला पायजमा मला पुष्कळ आखूड झाला होता. तेथे उपस्थित अन्य साधकांच्या हा भाग लक्षात आला नाही. त्यामुळे तो आखूड पायजमा घालून तसाच मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत गेलो. मला पहाताच परात्पर गुरु डॉक्टर पटकन उठले आणि माझ्या बाजूला उभे राहून हाताने त्यांची आणि माझी उंची मोजू लागले. ते काय करत आहेत, हे मला कळत नव्हते. नंतर ते म्हणाले, ‘‘हा पायजमा तुम्हाला पुष्कळ आखूड होतो. माझ्या पॅन्टची उंची तुम्हाला जुळेल, मी तुम्हाला घालायला माझी पॅन्ट देतो. असा आखूड पायजमा घालून सभेच्या ठिकाणी येऊ नका.’’ त्या वेळी तेथे त्यांचे वाहन चालवण्याची सेवा करणारे साधक श्री. प्रमोद बेंद्रे होते. ते पटकन म्हणाले, ‘‘नको, परात्पर गुरु डॉक्टर ! मी माझी पॅन्ट देतो, त्यांना होईल.’’ त्याप्रमाणे मी श्री. बेन्द्रे यांची पॅन्ट घातली. या छोट्याशा प्रसंगातून ‘परात्पर गुरु डॉक्टर इतरांचा कसा विचार करतात’, हे प्रत्यक्ष पहायला मिळाले.’

– डॉ. चारुदत्त पिंगळे (आताचे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे), हिंदु जनजागृती समिती (५.४.२०१७)

९ इ. साधकांवर उपचार करण्यास प्राधान्य देणे

‘कुडाळचे वैद्य सुविनय दामले उपचार करण्यासाठी आश्रमात आले होते. मला अनेक व्याधी असल्याने वैद्य मेघराज पराडकरने विचारले, ‘‘तुमच्यावरही उपचार करायला वैद्यांना सांगू का ?’’ तेव्हा माझ्याकडून सहजपणे बोलले गेले, ‘‘माझे आयुष्य संपत आल्यामुळे वैद्य दामले यांना साधकांवर उपचार करू दे. साधकांचे अजून पुष्कळ आयुष्य आहे. त्यांना उपचारांचा बरीच वर्षे लाभ होईल.’’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
लादी गुळगुळीत असल्यास पाणी सांडल्यानंतर पाय घसरू शकतो, यासाठी आश्रमात ताटे धुतात, त्या ठिकाणची लादी थोडी खडबडीत बसवण्यात आली आहे. ते स्वतः पहातांना परात्पर गुरु डॉक्टर ! समवेत सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

९ ई. चालक साधकाला स्वतःच्या हाताने घास भरवणारे परात्पर गुरु डॉक्टर !

‘मी परात्पर गुरु डॉक्टरांसमवेत पुण्याला जात होतो. वेळेत पोचायचे असल्यामुळे जेवणाचा डबा मधेेच थांबून खाणे शक्य नव्हते. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘मी एकेक घास मोडून देतो. तू खात खात गाडी चालव.’’ ते एकेक घास मोडून देत होते आणि मी खात खात गाडी चालवत होतो. मध्येच वाहतुकीची कोंडी झाली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘पुष्कळ दाटी आहे. हात सोडू नकोस. तू तोंड उघड. मी घास घालतो.’’ प.पू. डॉक्टरांच्या हातून खल्लेला घास तो जीवनातील सवोर्र्च्च आनंदाचा क्षण बनून राहिला.’

– श्री. पाटील (२३.३.२००४)

९ ए. सर्व साधक वातानुकूलित यंत्र वापरत नसल्याने स्वतःही उष्मा होत असूनही वातानुकूलन यंत्र न वापरणे

पुष्कळ उष्मा असूनही परात्पर गुरु डॉक्टर त्यांच्या निवासकक्षातील वातानुकूलित यंत्र (ए.सी.) वापरत नाहीत. त्या विषयी त्यांना विचारले असता ‘सवर्र् साधकांसाठी वातानुकूलित यंत्रे नाहीत; म्हणून मीही वापरत नाही’, असे  त्यांनी सांगितले. परात्पर गुरु डॉक्टरांच्या बोलण्यातून त्यांची साधकांप्रती असलेली प्रीती कशी आहे, हे मला अनुभवता आले. विशेष म्हणजे ‘सुविधा असूनही साधकांच्या प्रेमापोटी, सर्वांनाच त्या मिळत नसल्याने त्या न वापरणे’, हा त्यांचा मोठेपणा आहे !’

– श्री. प्रकाश मराठे

९ ऐ. साधकाच्या वेदनांची तीव्रता लक्षात येण्यासाठी स्वतः चिरे तासणे

‘वर्ष २००३ मध्ये एकदा बांधकाम विभागातील एका साधकाला चिरे तासण्यामुळे हाताला घट्टे पडले. त्या साधकाच्या हातावरील घट्टे पाहून प.पू. डॉक्टरांच्या नेत्रांमध्ये अश्रू आले. त्यानंतर त्यांनी स्वतः चिरे तासण्याची सेवा केली. त्यामुळे प.पू. डॉक्टरांच्या हातालाही घट्टे पडले. सहसाधकाला होणार्‍या वेदनेची तीव्रता लक्षात यावी; म्हणून स्वतः प.पू. डॉक्टरांनी ती सेवा करून पाहिली.’

– सौ. श्रद्धा, रामनाथी, गोवा. (२८.६.२०१४)

९ ओ. साधकांशी आदराने वागणे

‘साधक आश्रमातील मार्गिकेतून जात असतांना चुकून परात्पर गुरु डॉ. आठवले समोर आले, तर ते प्रथम साधकांना जाण्यासाठी आदराने मार्ग देतात. कक्षात या सर्व गोष्टींवरून ‘आपण त्यांना आदर देण्याऐवजी त्यांचाच आपल्याप्रतीचा आदरभाव पुष्कळ आहे’, असे मला प्रकर्षाने जाणवले.’

– डॉ. अजय गणपतराव जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.५.२०१७)

१०. प्रीतीला इतर वैशिष्ट्यांची सुंदर जोड

१० अ. साधकांच्या साधनेची हानी टाळण्यासाठी अवलंबलेली तत्त्वनिष्ठा

एखाद्या साधकाच्या स्वभावदोषांमुळे अथवा अहंमुळे त्याच्याकडून साधनेत चुका होत असतील आणि तो ईश्‍वरापासून दूर जात असेल, तर ते प्रसंगी कठोर होऊन स्वभावदोषांशी लढण्याची जाणीव करून देतात. एकाच प्रकारच्या चुका वारंवार होऊ लागल्यावर परात्पर गुरु डॉक्टर संबंधित साधकांना आश्रमातील फलकावर चूक लिहून प्रायश्‍चित्त घेण्यास सांगतात. परात्पर गुरु डॉक्टरांनी वेळोवेळी दिलेला ‘फलक/प्रायश्‍चित्त’ हा निरोप तो दोष घालवण्यासाठी वरदानच ठरतो; कारण त्या चुकीच्या संदर्भात गांभीर्याने प्रक्रिया केल्यानंतर पुन्हा तशी चूक होत नाही.

साधकाच्या साधनेची हानी टाळण्यासाठी प्रसंगी गुरूंनी बोललेले कठोर शब्द हीदेखील त्या साधकावरील गुरूंची प्रीतीच आहे. परात्पर गुरुदेवांनी सांगितलेली स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवून आज कित्येक साधकांचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन सकारात्मक अन् आनंदी झाला आहे.

१० आ. अखिल मानवजातीचे मूलभूत भले करण्याची तळमळ

मानवी जीवनात अनेक समस्या येतात. राष्ट्र आणि धर्म यांसमोरही सद्यःस्थितीत अनेक समस्या आहेत. असे असूनही एकेका समस्येवर कोणता उपाय योजावा, यासाठी वेळ न घालवता साधना केल्यानेच व्यक्तीचे मूलभूत भले होणार आहे, हे परात्पर गुरु डॉक्टर वारंवार मनावर बिंबवतात. अखिल मानवजातीला पुढील सहस्रो वर्षे मार्गदर्शन करण्यासाठी ते अखंड ग्रंथलिखाणाचे कार्य करत आहेत. प्राणशक्ती अत्यल्प असतांनाही ते तशाही स्थितीत ग्रंथलिखाणाचे कार्य पूर्ण करण्याला प्राधान्य देतात. वास्तविक त्यांच्याएवढी उच्च आध्यात्मिक स्थिती प्राप्त झालेल्या अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींना इतक्या कठीण स्थितीत सेवा करण्याची काय आवश्यकता आहे ? परंतु अखिल मानवजातीचे भले व्हावे, यासाठी ते अजूनही ग्रंथलिखाण करत आहेत. त्यांच्या या प्रीतीला उपमाच नाही !

या आणि यांसारख्या अनेक दैवी गुणवैशिष्ट्यांचा समुच्चय त्यांच्या ठायी आहे. या सार्‍या दैवी लक्षणांचे कोंदण त्यांच्या प्रीतीला आहे. त्यामुळेच त्यांना सर्व आपलेसे वाटतात आणि सर्वांना परात्पर गुरु डॉक्टर आपलेसे वाटतात. अशी ही गुरु-शिष्यांतील प्रीतीची अनोखी देवाण-घेवाण आहे. गेली अनेक वर्षे आम्ही साधक श्रीगुरूंच्या प्रीतीच्या सागरात आहोत. या सागरातील काही मोतीच येथे कथन करता आले. आमच्यावर शब्दांच्या पलीकडे कृपावर्षाव करणार्‍या श्रीगुरूंची महती शब्दांत वर्णन करण्यासाठी आमची वाणी असमर्थ आहे. त्यांच्या कृपाछत्राखाली साधना करून त्या प्रीतीच्या वर्षावाची अनुभूती घेणे, हेच त्यांना समजणे आहे !’

संकलक : कु. सायली डिंगरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.५.२०२०)

ईश्‍वराचे त्याच्या भक्तांवर अलोट प्रेम असते. भक्तांच्या उद्धारासाठीच पुनःपुन्हा अवतार घेणारा तो भगवंत भक्ताच्या बंधनात आहे. संत जनाबाईंच्या घरी दळण दळणारा, संत एकनाथांच्या घरी पाणी भरणारा, भक्तांच्या हाकेला सत्वर ‘ओ’ देणारा करूणाकर ईश्‍वर स्वतःच भक्तांची सेवा करत असतो. जातीव्यवस्थेची बंधने अत्यंत कठोर असलेल्या काळात रणरणत्या उन्हात पाय भाजत असलेल्या एका मागासवर्गीय महिलेच्या मुलाला सवर्ण संत एकनाथ महाराजांनी कडेवर घेतले होते. रामेश्‍वरक्षेत्री नाथांनी तहानेने तळमळणार्‍या गाढवाला गंगाजल पाजले, आदी कथा सर्वश्रृत आहे. आता परात्पर गुरु डॉक्टरांच्या रूपात त्या श्रीहरिचेच दर्शन होते ! खरेच भक्ताघरी राबणारा तो श्रीहरिच त्याच्या अवतारत्वाच्या विविध कला साधकांना गुरुरूपात दाखवत आहे. इतरांसाठी कसा त्याग करता आला पाहिजे, याची अप्रत्यक्ष शिकवणच जणू श्रीगुरूंनी त्यांच्या आचरणातून दिली आहे. श्रीगुरूंची प्रत्येक कृती, त्यांचा प्रत्येक शब्द, त्यांच्या मनातील प्रत्येक विचार साधकांना कसे निरंतर शिकवत असतो, याची पदोपदी अनुभूती येते. शब्दातील आणि शब्दातीत, स्थुलातील आणि सूक्ष्मातील श्रीगुरूंची प्रत्येक कृती समष्टीला दिशादर्शक असते ! असे भक्तवत्सल श्रीगुरु आम्हाला लाभले, हे आम्हा साधकांचे थोर भाग्य आहे ! त्यांच्या चरणी अनंत अनंत कृतज्ञता !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment