महामारी रोखण्यासाठी ‘महायंत्रां’च्या वापरावर बंदी घातली पाहिजे ! – पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चनलानंद सरस्वती

पुरी (ओडिशा) – कोरोनासारखी महामारी येण्याचे एक कारण म्हणजे ‘महायंत्रां’चा (म्हणजे अणूबॉम्ब, विनाशासाठी जैविक जंतूंची निर्मिती, कारखान्यांमधील प्रदूषण करणारी मानवनिर्मित यंंत्रे) अयोग्य वापर होय. जर महामारीला रोखायचे असेल, तर अशा महायंत्रांवर बंदी घातली पाहिजे, असे प्रतिपादन पुरीच्या पुर्वाम्नाय गोवर्धन पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांनी केले. ‘कोरोना महामारीमुळे जग भयभीत झाले आहे. याची वैज्ञानिकदृष्ट्या आणि नैसर्गिकदृष्ट्या कारणे काय आहेत आणि त्याचे निवारण कसे करायचे ?’, असा प्रश्‍न त्यांना विचारण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

 

शंकराचार्य यांनी मांडलेली सूत्रे

१. मनुस्मृतीमध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे की, जेव्हा मनुष्याचे विचार महामारी पसरवण्याचे, आर्थिक महासत्ता बनण्याचे, तसेच वर्णसंकर करण्याचे असतील, म्हणजेच जगाच्या कल्याणाचे विचार नसतील, तेव्हा महायंत्रांवर बंदी घातली पाहिजे.

२. महायंत्रांच्या वापरामुळे गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी आदी नद्या प्रदूषित झाल्या आहेत. डोंगर आणि वने यांचा र्‍हास झाला आहे. लोक देवाला विसरले आहेत. एकत्र कुटुंब पद्धतीचा र्‍हास झाला आहे आणि मनुष्य केवळ मुलांना जन्म देण्याचे यंत्र बनले आहे. हे सर्व काय आहे ? ही विकृती आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या आपत्ती येतात आणि त्यांच्या निवारणासाठी महायंत्रांवर बंदी घातली पाहिजे.

३. विकासाच्या नावाखाली सध्या मनुष्य वेदशास्त्र संमतीनुसार न वागता स्वतःच्या मनाने वागत आहेे. त्यामुळे जग विनाशाच्या वाटेवरून चालत आहे. विकासाच्या नावाखाली पृथ्वीवरील प्रदूषण वाढले आहे. मनुष्याला स्वास्थ्य हवे असेल, तर वेदांनी सांगितलेल्या गोष्टींचेच आचरण करून पृथ्वीचे संतुलन राखावे लागेल.’’

 

सनातन पद्धतीनुसार आचरण हवे !

शंकराचार्य पुढे म्हणाले, ‘‘मनुष्याचे आरोग्य चांगले रहाण्यासाठी मनुष्याचा आहार आणि विहार सनातन पद्धतीनुसार असायला हवा. त्यासाठी हातपाय धुवून घरात येणे, नमस्कार करणे, हस्तांदोलन न करणे, गोमय, गोमूत्र यांचा वापर, शेणाने भूमी सारवून त्यावर गवतापासून सिद्ध केलेल्या चटईवर झोपणे, गोवर्‍या वापरून जेवण करणे आदी सनातन पद्धतीनुसार सांगितलेल्या गोष्टींचे आचरण करायला पाहिजे; मात्र आज या सनातन पद्धतीच्या आचरणाला रूढी, परंपरा असे संबोधून त्यांची हेटाळणी केली जाते. त्यास जातीपातीचे शिक्के मारले जातात आणि असे आचरण करणार्‍याला न्यून लेखले जाते.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment