धर्मासंबंधी टीका किंवा अयोग्य विचार आणि त्यांचे खंडण (भाग ३)

५. देवता, मूर्तीपूजा इत्यादींविषयी असणारे अज्ञान

५ अ. म्हणे, हिंदु धर्मात वैदिक धर्माच्या इंद्रवरुणादी
देवांचे स्थान शिव, विष्णु यांच्यासारख्या लौकिक देवतांनी घेतले !

अयोग्य विचार

‘या हिंदु धर्माचे प्रमुख गुणविशेष पुढीलप्रमाणे आहेत – प्रतिष्ठित वैदिक धर्माच्या इंद्रवरुणादी देवांचे स्थान शिव, विष्णु यांच्यासारख्या लौकिक देवतांनी घेतले.’ (२०)

 

खंडण
१. देवतांमध्ये कार्यानुमेय कनिष्ठ आणि उच्च देवता असून उच्च देवतांनी कनिष्ठ देवतांची जागा घेणे हे असत्य असणे

इंद्रादी देवतांची जागा शिव-श्रीविष्णूसारख्या लौकिक देवतांनी घेतलेली नाही. त्या वेगवेगळ्या देवता आहेत. देवतांमध्ये कनिष्ठ आणि उच्च देवता, असे कार्यानुसार प्रकार आहेत. इंद्र, वरुण इत्यादी देवता कनिष्ठ देवता आहेत आणि शिव, कृष्ण, गणपति यांसारख्या देवता उच्च देवता आहेत.

 

२. श्रीविष्णूचे कार्य

श्रीविष्णु साधू-सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचा नाश यासाठी वेळोवेळी अवतार घेतो, त्याप्रमाणेच कलियुगात सर्वत्र अनाचार झाल्यावरही तो ‘कल्की’ या दहाव्या अवतारात प्रकट होईल. (महाभागवत, द्वितीय खंड, द्वादश स्कंध, अध्याय २, श्लोक १७ ते २०) ऋग्वेदाच्या मंडल २, सूक्त १, ऋचा ३ यामध्ये अग्नीच्या रूपांमध्ये विष्णु, ब्रह्मा आणि अन्य देवता यांचे वर्णन आहे.

 

३. इंद्राचे कार्य

इंद्र हे एक पद आहे. तो दिक्पाल देवतांमध्ये मुख्य आहे. ‘तो स्वर्गलोकात रहाणार्‍या देवतांचा अधिपती आहे’, असे म्हटले जाते. तो पालनकर्ता आहे. तो मृत्यूला दूर करतो. तो कर्मशक्तीचे प्रतीक असल्याने त्याला यज्ञाचा हवीर्भाग दिला जातो; मात्र सामर्थ्य वाढल्यामुळे इंद्राचा अहंकार वाढला आणि ‘मीच सर्वांत श्रेष्ठ’, असे त्याला वाटू लागले; म्हणून श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून इंद्राचे गर्वहरण केले.

उत्पत्ती, स्थिती आणि लय या कार्यांसाठी अनुक्रमे ब्रह्मा, श्रीविष्णु आणि शिव यांची योजना नारायणतत्त्वापासून झाली आहे. त्या मुख्य देवता आहेत. वास्तविक आदीअनादी असा श्रीकृष्ण हाच मूल स्वरूपातून असून प्रलयानंतरही केवळ तोच रहातो. तोच विराट स्वरूप असून त्याच्यामध्ये सर्व देवता समाविष्ट आहेत, असे भगवद्गीता (अध्याय ११, श्लोक १४, १५) सांगते.

 

५ आ. म्हणे, हिंदु धर्माचे शैव, वैष्णव इत्यादी भिन्न धर्मपंथांच्या रूपाने विखंडन झाले !

अयोग्य विचार

‘याच कालखंडात हिंदु धर्माचे शैव, वैष्णव इत्यादी भिन्न धर्मपंथांच्या रूपाने होणारे विखंडन बद्धमूल झाले.’ (२१)

 

खंडण

शैव आणि वैष्णव वेगळे नसल्याचे श्रीविष्णूने स्पष्ट करणे

भागवतात प्रजापती दक्षाने यज्ञात शंकराला हवीर्भाग देण्यास नकार दिला, त्या वेळी श्रीविष्णूचे ‘शिव आणि मी वेगळा नाही’ याविषयी सहा श्लोक आहेत. याच संदर्भात आद्य शंकराचार्यांप्रमाणेच थोर अद्वैतवादी असलेल्या अपय्या दीक्षित यांनी एक सुंदर श्लोक दिलेला आहे –

पुरारौ च मुरारौ च न भेदः पारमार्थिकः ।

तथाऽपि मामकी भक्तीः चंद्रचूडे प्रघावती ।।

अर्थ : ज्याला जे रूप आवडते, ते त्याने घ्यावे. पुरारी (शिव) आणि मुरारी (विष्णु) मध्ये कोणताही पारमार्थिक भेद नाही; कारण अंती सर्व एकाच भगवंताची रूपे आहेत.

यामुळे जे शास्त्रसंमत आहे, त्यानुसारच समाजाने आचरण केले पाहिजे. पुढे अशाच प्रकारे विविध देवतांच्या भक्तांमध्ये एकमेकांविषयी द्वेष वाढीस लागल्याने आदी शंकराचार्यांनी पंचायत पूजेचे महत्त्व त्यांना पटवून वाद मिटवला. यातून मानवातील दोषांमुळे असे वाद निर्माण होतात, हे स्पष्ट होते. मात्र यामुळे ‘हिंदु धर्माचे शैव, वैष्णव इत्यादी भिन्न धर्मपंथांच्या रूपाने होणारे विखंडन बद्धमूल झाले’, हे म्हणणे चुकीचे आहे. वास्तविक याप्रकारचे वाद केवळ काही काळ अस्तित्वात होते, आज ते अस्तिवात नाहीत.

 

५ इ. म्हणे, हिंदू धर्म हा अनेक देव आणि अनेक गुरु यांचे गौडबंगाल आहे !

टीका

‘हिंदू धर्म हा अनेक देव आणि अनेक गुरु यांचे गौडबंगाल आहे.’ – तथाकथित पाश्चात्त्य पंडित

 

खंडण

केवळ हिंदु धर्मच जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्ती देत असल्याने अनेक मार्गदर्शक गुरु असणे; परंतु सर्व गुरु ईश्वराशी तादात्म्य पावलेले (एकरूप) असणे

‘भूतलावर सर्वत्र एका विषयाचे अनेक शिक्षक असतात अन् ते तो विषय कित्येक विद्यार्थ्यांना शिकवतात. मग जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्ती देणार्‍या अध्यात्मशास्त्राचे मार्गदर्शक गुरु अनेक असणे यांत गौडबंगाल ते कसले ? हीतर सर्वसाधारण गोष्ट आहे. असे असले, तरी अध्यात्मशास्त्र शिकवणारे सर्व गुरु ईश्वराशी तादात्म्य पावलेले (एकरूप) असतात.

`व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’, हा अध्यात्माचा एक मूलभूत सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार हिंदू धर्मात अनेक देव आणि अनेक गुरु आहेत. (सूत्र क्र. `७ आ’ पहा.)

 

५ ई. मूर्तीपूजेविषयी असणारे अज्ञान

इंद्र, वरुण इत्यादी वेदकालीन देवता होत. पुढे उपनिषदकाळात परब्रह्माची कल्पना दृढ होऊन त्याचे अविरत चिंतन, हेच पूजेचे स्वरूप ठरले. पुढे मूर्तीपूजा चालू झाली; कारण सामान्य मनुष्याला अमूर्त, निर्गुण परमेश्वराची उपासना करणे कठीण वाटायला लागले. मूर्तीपूजेविषयीचा एक अयोग्य विचार पुढे दिला आहे.

 

५ ई १. म्हणे, हिंदूंनी शिवलिंगपूजा स्वीकारली; परंतु इतर देवतांच्या मूर्ती निर्माण केल्या !

अयोग्य विचार

‘शिवलिंगपूजा हिंदु लोकांनी स्वीकारली. इतर देवतांच्या मात्र मानवी रूपांतल्या मूर्ती निर्माण झाल्या.’ (२२)

 

खंडण

साधनेमुळे सूक्ष्म-दृष्टी प्राप्त झालेल्या ऋषीमुनींना देवतांचे दर्शन होऊन त्यांनी त्यांची वर्णनानुरूप मूर्ती निर्माण करणे.

अ. हिंदु म्हणजेच आर्य. आर्य भारतातीलच असल्यामुळे ‘शिवलिंगपूजा हिंदु लोकांनी स्वीकारली’, असे झालेले नाही.

आ. साधनेमुळे सूक्ष्म-दृष्टी प्राप्त झालेल्या ऋषीमुनींना देवतांचे दर्शन झाले आणि त्यांनी त्यांची वर्णने लिहिली. त्यानुसार मूर्ती निर्माण झाल्या. श्रीविष्णूचे पहिले चार अवतार (मत्स्य, कूर्म, वराह आणि नृसिंह) मानवी रूपांतील नाहीत. तसेच अनेक देवतांची रूपे मानवापेक्षा भिन्न आहेत.

 

६. धर्मद्रोही विचारवंतांनी आर्यांवर, म्हणजेच हिंदूंवर केलेले आरोप अन् त्या आरोपांचे खंडण

६ अ. पाश्चात्त्य पंडितांनी आर्य आक्रमणाचा सिद्धांत मांडून केलेले इतिहासाचे विद्रूपीकरण

`मॅक्सम्युलरसारख्या युरोपच्या भाषातज्ञांनी आर्य आक्रमणाच्या सिद्धांताची मांडणी केली. हिंदूस्थान आणि युरोप येथे भाषांमध्ये त्यांना जे सादृश्य आढळले, त्या आधारे ते आर्य आक्रमणाचा सिद्धांत मांडतात. १७८४ मध्ये बंगालचा न्यायाधीश सर विल्यम जोन्स याने संस्कृत आणि युरोपियन भाषांमध्ये असलेल्या सादृश्यांची नोंद केली. विशेषतः अभिजात ग्रीक भाषेशी संस्कृतची तुलना केली; परंतु तरीही ‘आर्य’ म्हणजे वरच्या वंशाचे आणि अनार्य म्हणजे शूद्र, दलित इत्यादी अर्थाने आर्य-अनार्य हा सिद्धांत दृढ होऊन आमची सनातन हिंदू संस्कृतीच पंगू झाली आहे. यामुळे या सिद्धांताचा प्रतिवाद आवश्यक ठरतो.

 

६ अ १. म्हणे, सिंधु संस्कृतीच्या लोकांची भाषा द्रवीड होती आणि खिस्त पूर्व १५०० मध्ये आर्यांच्या टोळ्यांनी वायव्येच्या खैबर खिंडीतून येऊन द्रविडांवर आक्रमण केले !

टीका

‘सिंधु संस्कृती ही वैदिक पूर्व काळातील होती. सिंधु संस्कृतीच्या लोकांची भाषा द्रवीड होती. खिस्त पूर्व १५०० मध्ये आर्यांच्या टोळ्यांनी वायव्येच्या खैबर खिंडीतून येऊन द्रविडांवर आक्रमण केले आणि सिंधु संस्कृतीचा विध्वंस केला. याचा अर्थ सिंधु संस्कृतीच्या विनाशानंतरच आर्यांचे वेदादी वाङ्मय झाले. सिंधु संस्कृतीचा अंत झाल्यावरच वैदिक वाङ्मयाची विशेषतः ऋग्वेदाची रचना झाली असली पाहिजे. खिस्त पूर्व १२०० हा ऋग्वेद रचनेचा काळ आहे.’ – मॅक्सम्युलर आणि अन्य पाश्चात्त्य संशोधक

 

खंडण
अ. सिंधु संस्कृती हीच वैदिक संस्कृती असून सिंधु संस्कृतीची भाषा संस्कृतसारखीच असल्याचे सिद्ध होणे

१. ‘सिंधु संस्कृती ही लक्षावधी मैलांच्या भूप्रदेशावर पसरली होती. ती प्राचीन जगातली सर्वाधिक मोठी संस्कृती होती !

सिंधुच्या खोर्‍यातील लोकांनी सुमेरियन आणि मेसोपोटेमिया यांच्याशी व्यापार केला होता. या खोर्‍यात सापडलेले अवशेष तुर्केमेनियॉ येथे सापडले. `सिंधु संस्कृतीच्या लोकांची भाषा द्रवीड होती’, याला कोणतेही प्रमाण नाही. सहस्रो वर्षांच्या इतिहासात अभावानेही कुठे पुरावा नाही. तीन सहस्र वर्षांपासून द्रविडी भाषा अस्तित्वात असल्याचा कोणताही पुरावा नाही; परंतु न्यूनतम ४००० वर्षांपूर्वीची ही सिंधु संस्कृती असल्याचा निर्वाळा सगळे देतात.

२. भारतातले एस्.आर्. राव, अमेरिकेचे सुभाष काक आणि अन्य संशोधक यांनी सिंधु संस्कृतीची भाषा संस्कृतसारखीच असल्याचे सिद्ध केले. हडप्पा संस्कृती ही वैदिक युगाच्या सूत्रकाळातील असल्याचे त्यांनी प्रमाणशीर सिद्ध केले. हडप्पा आणि सिंधु संस्कृती या वैदिक संस्कृतीच होत्या. वैदिक संस्कृतीचीच ती नगरे होती. ऋग्वेदात कुठेही आर्य आक्रमणाचा अभावानेही उल्लेख नाही; परंतु आर्य आक्रमणाचा सिद्धांत उचलून धरू पहाणारे दुष्ट हेतूने प्रवृत्त झालेले संशोधक सांगतात की, सिंधु संस्कृती ही वैदिक पूर्व काळातील होती.

 

आ. आर्यांचे आक्रमण थोतांड असणे

आर्कियॉलॉजीने, तसेच प्राचीन गणित, संगणक, विज्ञान, खगोलशास्त्र यांनी आधुनिक पाश्चात्त्य आणि पौर्वात्य पंडितांसमोर आर्य आक्रमणासंबंधीच नव्हे, तर सिंधु संस्कृतीही वेदपूर्वकाळची होती, या संदर्भात विलक्षण प्रश्न निर्माण केले आहेत. या संदर्भात विशेषतः उत्खननाची आणि वैदिक वाङ्मयाची, विशेषतः ऋग्वेदाची काळजीपूर्वक पहाणी केल्यानंतर ‘आर्य आक्रमण’ ही कशी लोणकढी थाप आहे, ते सहज लक्षात येते. याविषयी नटवरलाल सांगतात –

१. हडप्पा, मोहिंजोदडो आणि उत्खननात सापडलेली अन्य नगरे, ही आर्य संस्कृतीची नगरे आहेत. तसेच इराणच्या सरहद्दीपासून पूर्वेला उत्तरप्रदेशापर्यंत ठिकठिकाणी यज्ञशाळा आढळलेल्या आहेत. याचा अर्थ ते यज्ञसंस्कृतीचे अनुयायी आहेत. यज्ञस्थंडिलांवर रचलेले ‘सुलभसूत्र’ हा जगातला सर्वाधिक प्राचीन गणिताचा ग्रंथ आहे. त्यात वैदिक यज्ञस्थंडिलांचे विस्ताराने आणि बारीक वर्णन आहे. जर यज्ञस्थंडिलाची रचना हडप्पाच्या स्थानिक द्रविड लोकांनी केली, तर आक्रमक आर्यांनी यज्ञसंस्था भारतात आणली, हे पाश्चात्त्यांचे म्हणणे विसंगत नाही का ? इतिहासाच्या पुस्तकात अशा अनंत विसंगती आहेत.

२. १९५८ मध्ये सॅन प्रन्सिस्कोचा हॅरि हीक हा संशोधक दिल्लीला आला. त्या आसमंतात त्याला धातूचा तुकडा सापडला. त्यावर आर्यांचे मस्तक सुंदर रीतीने कोरलेले होते. ते वसिष्ठांचे मस्तक होते. पुढे तीस वर्षे त्याचे मित्र डॉ. रॉबर्ट अन्डरसन यांनी अमेरिका आणि स्वित्झरलँड यांच्या प्रयोगशाळेत त्यावर प्रयोग केले. खिस्त पूर्व ३७०० च्या आधीचा काळ त्यांनी निश्चित केला. याचा अर्थ आर्याच्या काल्पनिक आक्रमणांच्या पूर्वीचा तो २००० वर्षांचा काळ ठरतो. ते मस्तक ऋग्वेदातल्या वसिष्ठांच्या वर्णनाशी नेमके जुळते.

३. आर्कियॉलॉजी (Archaeology), गणित (Mathematics), अ‍ॅस्ट्रॉनॉमी (Astronomy) आणि मेटालर्जी (Metallurgy) या शास्त्रांवरून निःसंदिग्ध प्रमाणित झाले आहे की, इ.स. पूर्व ४००० च्या आधीच आर्य हिंदुस्थानमध्ये होते. त्यांची संस्कृती ही सर्वोच्च आहे. द्रविड हे आर्य संस्कृतीचाच एक भाग आहेत. यामुळे आर्य आणि द्रविड हा काल्पनिक संघर्ष म्हणजे आधुनिकांची एक थाप आहे. या काल्पनिकतेमुळे (Myth) भारताच्या लोकांमध्ये दुही माजली. दक्षिण भारताविरुद्ध उत्तर भारत हा संघर्ष पेटवला गेला. वास्तविक प्राचीन इजिप्त, मेसोपोटेमिया आणि तथाकथित हिंदु संस्कृती यांचा उद्गम होण्याआधीच सहस्रो वर्षे वैदिक संस्कृती अस्तित्वात होती.

 

इ. आर्य वंशाची संकल्पना चुकीची असल्याचे मॅक्सम्युलरने मान्य करूनही त्याची दखल कोणीही न घेणे

मॅक्सम्युलर आपला सिद्धांत बायबलमधील विश्वनिर्मितीचे वर्ष, भाषिक आणि वाङ्मयीन या पुराव्यांच्या आधारावर मांडतो. यामुळेच इ.स. पूर्व १२०० हा ऋग्वेद रचनेचा काळ आहे, असे तो देतो. या सिद्धांताच्या संदर्भात भूगर्भशास्त्राने थोडा उशिरा प्रवेश केला; मात्र आर्य-द्रविड सिद्धांत हाच चुकीचा नसून आर्य भारताचे मूलनिवासी आहेत, हे स्पष्ट झालेले आहे. यामुळे मॅक्सम्युलरचा सिद्धांत चुकीचा आहे. तसेच पौर्वात्य संस्कृतीचा अभ्यास करणार्‍या अनेक पाश्चात्त्य संशोधकांनी (orientalists) जेव्हा त्याला ठणकावले, तेव्हा त्याने `Biography of Words’ या ग्रंथात तो प्रमाद असल्याचे मान्य केले. तो म्हणतो, “मी ‘आर्य’ शब्द वापरतो, तेव्हा तो वंश वा जाती या अर्थाने नव्हे, तर तो गुणवाचक अर्थाने वापरतो. म्हणजे चारित्र्यवान, संयमी, सद्गुण संपन्न असा जो कोणी असेल, तो ‘आर्य’ ! आणि तसा नसेल तो `अनार्य’’. मॅक्समुलरने तो प्रमाद घोषित केला. त्याची कुणीच दखल घेतली नाही.’

 

ई. सर्व मानवजातीच्या संस्कृतीचे मूळ स्थान हिंदुस्थानच असणे

`सिंधमधील उत्खननात सापडलेल्या वस्तूंवरून पाश्चात्त्य पंडित सांगत आहेत की, सगळ्या मानवजातीच्या संस्कृतीचे मूळ स्थान हिंदुस्थानच आहे.’ – डॉ. हॉल – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (२३)

 

६ आ. म्हणे, आर्यांनी विस्तारीकरणाच्या वेळी अरण्ये नष्ट करण्यासाठी अग्नीचा वापर केला !

टीका

‘पश्चिमेपासून पूर्वेपर्यंतच्या आर्यांच्या विस्तारीकरणात ‘अग्नी’ हा अरण्ये नष्ट करण्याचे प्रतिनिधित्व करणारा होता, हे उघड आहे.’ (Agni was obviously an agent of deforestation in the Aryan expansion from West to East, which at first, stayed north of the Ganga.) – स्टाल (एक युरोपिय लेखक)

(संदर्भ : ‘भारतीय कलातत्त्व कोष’ (एनसायक्लोपिडीया), संपादिका : बेट्टेना-बाल्टीमेर)

 

खंडण
१. ‘आर्यांचे विस्तारीकरण’ हा अपसमज

‘आर्यांचे विस्तारीकरण’ हा सिद्धांतच मूल स्वरूपात चुकीचा आहे. वास्तविक ‘विस्तारीकरण कोणासाठी’, हा प्रश्न निर्माण होतो; कारण

अ. ते भारताचे मूल निवासी आहेत, हे संशोधनाअंती स्पष्ट झालेले आहे.

आ. तसेच यज्ञकर्ते ऋषीमुनी गावोगावी आदीवासी भागांत जाऊन तेथे यज्ञाचे प्रयोजन करत आणि तेथील लोकांना शिकवण देत असत. याचसाठी अगस्ती ऋषी काशीहून विंध्याचलाकडे गेले. ‘अशा ठिकाणी ऋषीमुनींनी जंगले तोडून आपल्या वस्त्या उभ्या केल्या’, असे कोणतेही संदर्भ नाहीत. त्या वेळी तेथील जागेची स्वच्छता करून यज्ञ केले जायचे; परंतु यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली नाही. अशा या यज्ञात हवीर्भागासाठी अग्नीचा समिधाद्वारे वापर केला जात असे.

यावरून आर्यांच्या विस्तारीकरणाचा सिद्धांतच चुकीचा आहे, हे स्पष्ट होते.

 

२. आर्यांनी अग्नी हा अरण्ये नष्ट करण्यासाठी उपयोगात आणला नसून तो देवतांना प्रसन्न करण्यासाठी उपयोगात आणणे

भारतीय वैदिक संस्कृतीत अग्नी हे पंचमहाभूतांतील (आकाश आणि वायू या अव्यक्त तत्त्वांनंतर) प्रथम व्यक्त स्वरूप असून तो ज्ञानाचे प्रतीक आहे; म्हणून यज्ञामध्ये त्याची प्रथम पूजा केली जाते. अग्नी हा ऊर्ध्वगामी आहे आणि तो त्याच्या संपर्कात येणार्‍या सर्व गोष्टी पवित्र करतो. तो पृथ्वीपासून अंतरिक्षापर्यंत सर्व विश्वात आहे. तो देवतांचा अग्रणी म्हटला जातो. यज्ञातील हवीर्भाग त्या त्या देवतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य तो करतो, ही अग्नीची श्रेष्ठता आहे. अग्नीची ही श्रेष्ठता ओळखलेले आर्य त्याचा उपयोग जंगले नष्ट करण्यासाठी करतील कि कल्याणासाठी करतील ?

याउलट आज भोगवादी संस्कृतीमुळे मोठमोठ्या वस्त्या उभ्या करण्यासाठी आणि भौतिक सुखासाठी जंगले नष्ट करून पर्वतही उजाड केले जात आहेत.

 

६ इ. गोमांसभक्षणाविषयी केलेले आरोप

६ इ १. म्हणे, आर्य लोक गोमांसभक्षक होते !

टीका

`आर्य लोक गोमांसभक्षक होते; म्हणून खाण्याकरता कृष्ण आदी गोपाळ गायींचे कळप राखीत.’ – धर्मद्रोही चिं.वि. वैद्य

 

खंडण

`श्रीकृष्ण नंदकुळात राहिला होता. ते `वैश्यकुळ’ होते. गोरक्षण हा वैश्यांचा धर्म आहे.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

 

६ इ २. म्हणे, हिंदू गोमांसभक्षक होते !

टीका

जन्माने हिंदु असलेले काही हिंदुद्रोही म्हणतात, ‘प्राचीन भारतातील हिंदु लोक गोमांसभक्षक होते आणि ही गोष्ट दडवून ठेवली गेली.’

 

खंडण

`समजा ५,००० वर्षांपूर्वी भारतातील लोक गोमांस खात होते, तर कशाकरता आणि कुणी ही वस्तूस्थिती दडवून ठेवली ? गायीमध्ये ३३ कोटी देवता आहेत; म्हणून हिंदु गायीला अत्यंत पवित्र मानतात. ५,००० वर्षांपूर्वी ते गोमांस खात होते, हे क्षणभर जरी मानले, तरी आज हिंदु गायीला पवित्र मानतात, हे कसे नाकारता येईल ?

जगात सत्त्व, रज आणि तम अशा त्रिगुणात्मक वृत्तीचे लोक असतात आणि आपल्यातील प्रधान गुणाप्रमाणे ते भोजन करतात. असे लोक पूर्वीही होते आणि आजही आहेत. त्यात विशेष असे काही नाही.

भारतीय असूनही भारतियांविषयी अशी अज्ञानमूलक आणि अश्लाघ्य विधाने करणे अतिशय अयोग्य आहे आणि तितकेच ते दुर्दैवीही आहे.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (२५)

 

७. धार्मिक पदांच्या नेमणुकीसंबंधी निरर्थक बडबड आणि त्याचे खंडण

अयोग्य विचार

‘पुरोहित, धर्मशास्त्री, धर्माधिकारी, शंकराचार्य यांची पदे ही डॉक्टर, इंजिनिअर यांच्याप्रमाणे परीक्षा घेऊन भरली जावीत !’ – प्रा. हरि नरके

 

खंडण

धर्माचार्यांची निवड ही केवळ बौद्धिक कुवतीवर अवलंबून नसते, तर त्यांच्याकडे आध्यात्मिक सामर्थ्य असणेही महत्त्वाचे असते. हे आध्यात्मिक सामर्थ्य केवळ साधनेने प्राप्त होते अन् संतच ते सूक्ष्मातून जाणू शकतात.

 

८. महान हिंदु धर्माची अन्य धर्मांशी तुलना करणारे पाश्चात्त्य पंडित !

टीका

‘हिंदु धर्माला जर काही बौद्धिक अंग असेल, तर ते वेदांताचे आहे. देव, इंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडचा केवळ वेदांत तिथे आहे. त्यामुळे काही अन्य धर्मांचे खंडण होत नाही.’ – तथाकथित पाश्चात्त्य पंडित

 

खंडण

हिंदु धर्म अनादी असणे : हिंदु धर्म अनादी आहे, तर अन्य धर्म गेल्या २-३ सहस्र वर्षांत निर्माण झाले आहेत. त्यामुळे त्यांचे हिंदु धर्मात खंडण नाही; मात्र हिंदु धर्माची तत्त्वे वापरून अन्य धर्मांचे खंडण सहज करता येते.

 

संदर्भसूची

(कंसातील आकडे संदर्भक्रमांक आहेत.)

भारतीय संस्कृतिकोश.

प्रकाशक : पं. महादेवशास्त्री जोशी, कार्यवाह, भारतीय संस्कृतिकोश मंडळ, ४१० शनिवार पेठ, पुणे ४११ ०३०.

प्रथमावृत्ती : खंड ३ ते १०

(१ ते १५ आणि २० ते २२) खंड १०, पृष्ठ ३४७-३५०

(१७) खंड ४, पृष्ठ ५६०

जीवनाचे अंतरंग – भाग २ रा.

लेखक : सी.डब्ल्यू. लेडबीटर.

अनुवादक : दि.अ. घैसास.

प्रकाशक : गो.वा. चिपळूणकर, कोषाध्यक्ष, मराठी थिऑसॉफिकल फेडरेशन, गणेशवाडी, डेक्कन जिमखाना, पुणे ४. पृष्ठ ४५. (१६)

साप्ताहिक ‘सनातन चिंतन’

(१८) १३.३.२००८

(२३) २७.१२.२००७, ४.३.२०१०

(२४) २९.५.२००८

घनगर्जित

(१९) फेब्रुवारी, २००८

(२५) एप्रिल, २००७

(?) संदर्भ ज्ञात नाही.

प्रकाशक – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी समस्त वाङ्मय प्रकाशन.

प्रकाशनस्थळ : गुरुदेव आश्रम, मु.पो. वडाळामहादेव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र ४१३ ७३९

4 thoughts on “धर्मासंबंधी टीका किंवा अयोग्य विचार आणि त्यांचे खंडण (भाग ३)”

 1. उपनिषदकाळात परब्रह्माची कल्पना दृढ होऊन त्याचे अविरत चिंतन, हेच पूजेचे स्वरूप ठरले. पुढे मूर्तीपूजा चालू झाली; मूर्ती पूजा नक्की कधी व कशी सुरु जाली ?

  Reply
  • नमस्कार नाडकरणीजी,

   मूर्तीपूजेचा प्रारंभ त्रेतायुगापासून झाला.

   Reply
 2. जर मनुष्य जन्माचे अंतिम ध्येय मोक्ष असेल तर मग बाकीच्या गोष्टीची (धर्म , पूजा ,कर्मकांड इ . )गरज कितपत योग्य आहे ?

  Reply
  • नमस्कार,

   मोक्ष प्राप्तीसाठी जीव शुद्ध असावा लागतो. एखाद्या जीवाभोवती त्याच्या मागील कित्येक जन्मांच्या संस्कारांचे आवरण तयार झालेले असते. ते नष्ट करण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. साधनेत विविध टप्पे असतात. सगुणातून निर्गुणाकडे जायचे असते. सगुणातील साधना म्हणजे धर्माचरण, आचारपालन, कर्मकांड (पूजा-अर्चा करणे, सण-उत्सव साजरे करणे, व्रत-वैकल्य करणे), मंदिरात जाणे इत्यादी. निर्गण म्हणजे चराचरात र्इश्वराचे अस्तित्व अनुभवणे. पण सगुणातील साधना केल्याशिवाय निर्गुण र्इश्वराची भक्ती करणे खूप कठीण असते. त्यामुळे सगुण साधनेलाही तितकेच महत्त्व आहे.

   आपली,
   सनातन संस्था

   Reply

Leave a Comment