‘आयुर्गोवा कोविड-१९’ हे अ‍ॅप कार्यान्वित केल्याविषयी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांचे सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून अभिनंदन !

रामनाथी – गोव्यातील लोकांमध्ये कोरोनाविषयी जागृती निर्माण करणे आणि या परिस्थितीत आयुर्वेदाचा कसा उपयोग होऊ शकतो ?, याची माहिती देण्यासाठी गोवा शासनाने ‘गामा’ या वैद्यांच्या संघटनेने बनवलेले ‘आयुर्गोवा कोविड-१९’ हे अ‍ॅप कार्यान्वित केले आहे. भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा असलेल्या आयुर्वेदाचे उत्थापन करण्यासाठी सरकारी पातळीवर होत असलेले हे प्रयत्न अभिनंदनीय आहेत. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी या प्रयत्नांसाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री श्री. विश्‍वजीत राणे यांचे एका पत्राद्वारे अभिनंदन केले आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री श्री. विश्‍वजीत राणे

‘राज्यातील नागरिकांसाठी असा उपक्रम राबवणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले, याविषयी सनातन संस्थेकडून आपले मन:पूर्वक अभिनंदन ! गोवा शासनाने काळाची आवश्यकता लक्षात घेऊन तातडीने गोव्यात व्हायरोलॉजी लॅब स्थापन करून त्यामध्ये तत्परतेने चाचण्या चालू केल्या. आपण जनतहितासाठी तत्परतेने केलेली कृती वाखाणण्याजोगी आहे’, अशा शब्दांत सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

‘सध्याही अवघ्या विश्‍वात कोरोना विषाणूच्या निमित्ताने एकूण मानवजातीला दिनचर्या, आहार-विहार, आरोग्य यांसाठी आयुर्वेद आचरणात आणण्याची नितांत आवश्यकता आहे. त्याचा आरंभ आपण चालू केलेल्या या उपक्रमाने होईल, अशी आशा आहे. विश्‍वगुरुपदाकडे वाटचाल करणार्‍या भारतात गोवा राज्याने आयुर्वेदीय परंपरेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले, हे स्तुत्य आहे. हा उपक्रम केवळ देशभरासाठी नव्हे, तर विश्‍वासाठी पथदर्शक ठरावा, या शुभेच्छा !’, असे हिंदु जनजागृती समितीचे गोवा समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

श्री. श्रीपाद नाईक

 

कोरोनावर उपाय शोधण्यासाठी कृतीदलाची स्थापना केल्याविषयी
सनातन संस्थेच्या वतीने केंद्रीय आयुषमंत्री श्री. श्रीपाद नाईक यांचे अभिनंदन !

‘आयुर्वेदाच्या साहाय्याने कोरोनाच्या संकटातून लवकर बाहेर पडता यावे, यासाठी आयुष मंत्रालयाकडून होत असलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. भारतीय परंपरेनुसार आयुर्वेद हा पाचवा वेद मानला जातो. आपले ऋषीमुनी आणि संत यांनी तप अन् साधना यांच्याआधारे आयुर्वेदामध्ये माणूस, समाज आणि सृष्टी यांचे सर्वांगीण स्वास्थ्य निरोगी रहाण्याविषयी सखोल माहिती दिली आहे. हे ज्ञान विश्‍वासाठी देणगी आहे. आयुष मंत्रालयाच्या प्रयत्नांना गती मिळून कोरोना विषाणूने निर्माण केलेल्या या संकटात देशवासियांचे रक्षण करण्यासाठी, तसेच आयुर्वेदाच्या प्रसारासाठी ईश्‍वर आपणांस बळ प्रदान करो, ही ईश्‍वरचरणी प्रार्थना !’, असे सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी पत्राद्वारे आयुषमंत्री श्री. श्रीपाद नाईक यांना कळवले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment