धर्मासंबंधी टीका किंवा अयोग्य विचार आणि त्यांचे खंडण (भाग २)

२. हिंदु धर्माविषयी केलेला अपप्रचार !

२ अ. म्हणे, हिंदु धर्मात अर्थ नाही !

टीका

`हिंदु धर्म हा काही बौद्धिक नाही. तो अंधश्रद्धेसारखा आहे.’ – तथाकथित पाश्चात्त्य पंडित

 

खंडण

हिंदु धर्म बुद्धीच्या पलीकडे असणार्‍या बर्‍याच गोष्टींचा उलगडा करतो आणि त्यांची अनुभूती कशी घ्यायची, हेही शिकवतो. जरी अध्यात्माची अनेक तत्त्वे या धर्मात सांगितली असली, तरी आधुनिक सुशिक्षित बुद्धीवंताने त्याचे प्रतिनिधीत्व करावे, असे तिथे काही नाही.

 

२ आ. म्हणे, बहुजन समाजात हिंदु धर्म, तसेच
विशेषतः ब्राह्मण यांच्याविरुद्ध क्षोभक चळवळी निर्माण होत आहेत !

अयोग्य विचार

‘२१ व्या शतकात बहुजन समाजात हिंदु धर्म, तसेच विशेषतः ब्राह्मण यांच्याविरुद्ध क्षोभक चळवळी निर्माण होत आहेत.’ (?)

 

खंडण
१. गुरु, ऋषी आणि ब्राह्मण यांनी आपल्या तपःश्चर्येने महान शक्ती मिळवून ती शक्ती निरपेक्ष राहून ‘समाजाचे कल्याण व्हावे’, यासाठी वापरणे

इंग्रजांच्या ‘फोडा आणि राज्य करा’, या धोरणामुळे समाजामध्ये फूट पडली. तीच नीती स्वातंत्र्यानंतर आजही अधर्मी राजकारणी लोकांनी अवलंबल्यामुळे हिंदु धर्माविरुद्ध, विशेषतः ब्राह्मणांविरुद्ध चळवळींनी वेग पकडला आहे. या चळवळी अयोग्य आहेत.

पूर्वीपासून ब्राह्मणांकडे कोणतीही सत्ता नव्हती. असे असूनही ‘त्यांनी खालच्या लोकांवर अन्याय केला आणि स्वार्थ साधला’, असे म्हणून त्यांच्यावर आग पाखडली जात आहे. वास्तविक त्यांनी तसे केले असते, तर ते श्रीमंत झाले असते; मात्र तसे दिसून येत नाही. गुरु, ऋषी आणि ब्राह्मण हे भारतीय संस्कृतीत महान मानले जातात. त्यांनी आपल्या तपःश्चर्येने महान शक्ती मिळवली आणि निरपेक्ष राहून ‘समाजाचे कल्याण व्हावे’, यासाठी ती शक्ती वापरली. त्यांच्या महानतेची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

अ. पूर्वी ऋषीमुनी, यज्ञयाग करणारे ब्राह्मण गावोगावी जायचे आणि यज्ञाच्या निमित्ताने लोकांना धर्माचरण शिकवायचे. यामुळेच खेड्यातील जनता ही केवळ आजच्या भाषेत पुस्तकी पंडित नसली, तरी आपल्या धर्माप्रमाणे कर्तव्यकर्मे करून आणि नीतीमत्तेचे पालन करून परिपूर्ण स्वायत्त असे आनंदी जीवन जगत होती.

आ. वेन नावाचा राजा जनतेला त्रास देऊ लागल्यावर ब्राह्मणांनी त्याला मारून त्याच्या ठिकाणी त्याच्या मुलाला राज्यावर बसवले, ते स्वतः राज्यावर बसले नाहीत.

इ. वेळ आल्यावर पंतप्रधानपद सांभाळून पेशव्यांनी रणांगणावर पराक्रम गाजवला आणि अटकेपार झेंडा फडकवला.

ई. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यातही लो. टिळक, स्वा. सावरकर, चापेकर, वासुदेव बळवंत फडके यांसारख्यांनी आपले जीवन समर्पित केले.

या ब्राह्मणशक्तीचा अवमान झाल्यावर पूर्ण यादवकुळाचा नाश झाला, हेही तितकेच सत्य आहे. यावरून ‘नाहक ब्राह्मणद्वेष करणार्‍याचीच हानी होते’, हे लक्षात ठेवून ब्राह्मणांवर आगपाखड करणार्‍यांनी उलट स्वतःची आध्यात्मिक उन्नती कशी होईल, याकडे लक्ष द्यावे.

२. डॉ. आंबेडकरांनी पुणे येथे विद्यार्थ्यांना उद्धेशून केलेल्या भाषणात सांगितले, ‘कितीही पदव्या घेतल्या, तरी त्या शिक्षणाला अर्थ रहाणार नाही. नीतीमूल्यांचे आचरण करून व्यक्तीमत्त्व उंचावणे महत्त्वाचे आहे. त्याविना समाजात मान्यता लाभत नाही.’ यावरून डॉ. आंबेडकरांनी ब्राह्मणांचा द्वेष केलेला नाही, उलट त्यांचे मर्म जाणून त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य तो उपदेश केला, हे दिसून येते.

 

२ इ. म्हणे, धर्मामध्ये दोष आहेत !

अयोग्य विचार

‘काही ठिकाणी दिसणारे दोष क्षणभर बाजूस ठेवले, तर एकंदरित पहाता धर्माचा मुळीच संबंध नसलेल्या समाजापेक्षा धर्माच्या पंखाखाली असणारा समाज बर्‍यापैकी जीवन जगतो, असेच म्हणावे लागेल.’ (१६)

 

खंडण
धर्म अपौरुषेय असल्याने गुणातीत असणे, तसेच धर्म सर्वांचेच आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक कल्याण करणारा असल्यामुळे तो दोषनिवारक आणि मार्गदर्शक असणे

‘धर्मात काही ठिकाणी दिसणारे दोष क्षणभर बाजूस ठेवले तर’, या विधानामुळे ‘धर्मात काहीतरी दोष आहेतच’, असे वाटू शकते. वास्तविक काही ठिकाणी दिसणारे दोष हे मूळ धर्मातील नाहीत; कारण धर्म अपौरुषेय असल्याने गुणातीत असून त्यात कोणतेही दोष असणे शक्यच नाही. दोष हे सत्त्व, रज आणि तम या गुणांमुळे असतात अन् ते दोष माणसात असतात. तर धर्म सर्वांचेच आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक कल्याण करणारा असल्यामुळे तो दोषनिवारक आणि मार्गदर्शक आहे. काळानुरूप समाजाला धर्माचरणाचा विसर पडत गेला, तसेच काही अनिष्ट प्रथा, रूढी आणि परंपरा या त्या-त्या ठिकाणी कडवेपणाने पाळल्या जाऊ लागल्या. म्हणजेच धर्मातील दोषांमुळे ही परिस्थिती निर्माण झालेली नसून समाजातील दोषांमुळे ही परिस्थिती निर्माण होते, हे उघड आहे.

 

२ ई. म्हणे, धर्माने इहलोकी इष्टसिद्धी होणे अशक्य !

अयोग्य विचार

‘धर्माने इहलोकी इष्टसिद्धी झाली नाही, तर परलोकी तरी निश्चितच होईल’, असे सर्व धर्मग्रंथ माणसाला आश्वासन देतात.’ (१७)

 

खंडण

वरील विचारात धर्माने इहलोकी इष्टसिद्धी होऊ न शकण्यामागील कारण स्पष्ट केले नसल्याने धर्माने इहलोकी इष्टसिद्धी होण्याविषयी शंका निर्माण होते; म्हणून हा विचार अयोग्य वाटतो.

धर्माचरण करणार्‍याच्या दृष्टीने इष्टसिद्धी म्हणजे ईश्वरप्राप्ती होय. इहलोकी व्यक्तीने धर्माचरण केल्यामुळे तिचे जन्मोजन्मींचे असलेले संचित कर्म अल्प होत जाते. संचित शून्य झाले की, व्यक्तीला ईश्वरप्राप्ती होते. हे वर्तमान जन्मात घडू शकते. मात्र संचित कर्म पुष्कळ प्रमाणात असणे, व्यक्तीची साधनेतील प्रगतीची गती अल्प असणे इत्यादींमुळे मृत्यूपर्यंत धर्माचरणाने संचित कर्म अल्प होईल; पण शून्य होईलच, असे सांगू शकत नाही. सर्वसाधारणतः अशा व्यक्तीला मृत्यूनंतर उच्च लोकात स्थान मिळते अन् तेथे तिची साधना चालू राहून तिला अंती ईश्वरप्राप्ती होते.

 

२ उ. सनातन धर्मातील तत्त्वे शाश्वत अन् अनादी असून सहस्रो
वर्षांनंतरही ती मार्गदर्शक असल्याने त्यात पालट करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही !

टीका

‘हिंदु धर्म नित्य पालटणारा, नूतनीकरण करणारा आहे.’ ( it is an ever changing, renewing set up) – तथाकथित नवहिंदुत्ववादी नेते

 

खंडण

हिंदु धर्म हा सनातन, म्हणजे नित्य नूतन असा आहे. म्हणजे त्यातील तत्त्वे शाश्वत आणि अनादी असली, तरी त्याच्या आचारधर्मात युगानुसार नाविन्यता आहे. त्यामुळे तत्त्वांमध्ये पालट करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आज सहस्रावधी वर्षांनंतरही हिंदु धर्माची तत्त्वे समाजाला मार्गदर्शक ठरतात. काळाच्या ओघात ती नष्ट झालेली नाहीत अथवा जुनाट झालेली नाहीत.

 

३. हिंदु संस्कृतीला कनिष्ठ समजणारे तथाकथित विचारवंत !

३ अ. म्हणे, हिंदु संस्कृती म्हणजे भोळसट समजुती आणि कर्मकांड !

टीका

`भोळसट समजुती आणि कर्मकांड यांच्या जंजाळात सत्याचा नैर्सिगक दिव्य प्रकाश व्यक्त होणार नाही’, हे दाखवण्याकरता भारताचे उदाहरण दिले आहे.’ – प्रोफेसर हलबर्ट, विश्वकोशातील ‘ब्राह्मण’ या लेखाचे लेखक.

 

खंडण
भौतिक सुखांमध्ये रममाण असणार्‍या पाश्चात्त्यांना इंद्रियनिग्रह करून समाजाच्या कल्याणासाठी झटणार्‍या ऋषीमुनींचे महनीयत्व कळणे अशक्य

हिंदु संस्कृती म्हणजे भोळसट समजुती किंवा कर्मकांडांचे जंजाळ नसून तिला धर्मशास्त्राचा आधार आहे. तिच्या आचरणाने मानवाचे जीवन आनंदमय होते. हे जाणून न घेता ‘भोळसट समजुती आणि कर्मकांड यांच्या जंजाळात सत्याचा नैसर्गिक दिव्य प्रकाश व्यक्त होणार नाही’, हे भारताच्या उदाहरणावरून स्पष्ट करू इच्छिणार्‍या प्रोफेसर हलबर्ट यांचा हिंदु संस्कृतीचा अभ्यास किती अत्यल्प आहे, ते लक्षात येते. मुळात केवळ भौतिक सुखांमध्ये रममाण असणार्‍या पाश्चात्त्य संस्कृतीतील प्रोफेसर हलबर्ट यांना अयाचित वृत्तीने इंद्रियनिग्रह करून समाजाच्या कल्याणासाठी झटणार्‍या ऋषीमुनींचे महनीयत्व काय कळणार ?

 

३ आ. म्हणे, ग्रीक संस्कृती ही वैदिक (हिंदु) संस्कृतीपेक्षा श्रेष्ठ आहे !

टीका

ग्रीक संस्कृती ही वैदिक (हिंदु) संस्कृतीपेक्षा श्रेष्ठ आहे. जी काही उच्च तत्त्वे वैदिक साहित्यांत आहेत, ती सगळी ग्रीकांपासून उचलली.

 

खंडण
सनातन हिंदु संस्कृती ही ग्रीक संस्कृतीपेक्षाही अत्यंत प्राचीन असणे

प्रत्यक्षात सनातन हिंदु संस्कृती ही ग्रीक संस्कृतीपेक्षाही अत्यंत प्राचीन आहे. तक्षशीला आणि नालंदा यांसारख्या विश्वविद्यालयांतून पूर्वी अनेक परदेशी शिकून येथील संस्कृती त्यांच्याकडे नेत होते, हे स्पष्ट आहे. जर ग्रीक संस्कृती इतकी श्रेष्ठ होती, तर ती नष्ट का झाली ?

 

३ इ. हिंदु संस्कृतीला आदिवासी आणि धर्मविध्वंसाकरता
अधिक प्रयत्न करणार्‍या संस्कृतीला प्रगत समजणारे आधुनिक !

टीका

`हिंदुचे शास्त्र हे आदिवासी आणि जंगली आहे. त्यामुळे आजच्या अतीप्रगतशील अमेरिकी लोकांकरता त्याचा काही उपयोग नाही.’ – आधुनिक वैज्ञानिक

 

खंडण
अमेरिकेत संपूर्ण अत्याधुनिक विज्ञान हाताशी असतांना देशाच्या पश्चिमी संस्थानात पाण्याचा पुरवठा नसणे आणि चंगळवादाचे दुष्परिणाम दिसून आल्यामुळे पाश्चात्त्य लोकही आता सनातन हिंदु धर्माकडे वळणे

`अमेरिका भौतिक प्रगतीच्या शिखरावर आहे. संपूर्ण अत्याधुनिक विज्ञान तिच्या हाती आहे. असे असतांनाही आजचे अमेरिकेचे श्रेष्ठ वैज्ञानिक त्या देशाच्या पश्चिमी संस्थानात पाण्याचा पुरवठा का करू शकत नाहीत ? तिथल्या लोकांना `पाणी पाणी’ असा टाहो का फोडावा लागतो ? जीवनाला आवश्यक असलेले वृक्ष तोडणार्‍याला अपराधी मानणारी हिंदु संस्कृती श्रेष्ठ कि घनदाट जंगले तोडून तिथे ८०-८० मजली टोलेजंग इमारती आणि अतिप्रचंड राक्षसी कारखाने उभे करणारी संस्कृती (अमेरिकन, रशियन, पश्चिमी अत्याधुनिक संस्कृती) श्रेष्ठ ?

 

‘ग्लोबल वॉर्मिंग’, प्रदूषण, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, मंदी इत्यादी संकटांना सामोरे जाणार्‍या, तसेच एकूणच समाजाची नैतिक घसरण झाल्याने विनाशाकडे चाललेल्या अमेरिकी समाजाला ‘प्रगत’ म्हणणे आणि सकळांचे हित पहाणार्‍या हिंदु धर्मशास्त्राला ‘जंगली’ म्हणून हिणवणे कितपत योग्य आहे ? चंगळवादाचे दुष्परिणाम दिसून आल्यामुळे पाश्चात्त्य लोकही आता सनातन हिंदु धर्माकडे वळत आहेत.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (१८)

 

४. तथाकथित पाश्चात्त्य पंडित आणि
नवहिंदुत्ववादी नेते यांनी हिंदु धर्माचरणाविषयी केलेल्या अर्थहीन टीका

४ अ. हिंदुकडे कोणतेही पुस्तक किंवा शास्त्रग्रंथ नाही, असे हिंदु
धर्माचा अभ्यास नसतांनाही मत मांडणारे आंग्लाळलेले नविंहदुत्ववादी !

टीका

‘जसे खिश्चनांकडे बायबल आहे आणि मुसलमानांकडे कुराण आहे, तसे हिंदुकडे कोणतेही पुस्तक किंवा शास्त्रग्रंथ नाही.’ ( They say, “Just as Christians have Bible and Muslims have Quran, Hindus do not have a Book or Scripture”.) – तथाकथित नवहिंदुत्ववादी नेते

 

खंडण

धर्म सर्वव्यापी असल्यामुळे तो एका ग्रंथात मावणे शक्य नाही; म्हणूनच हिंदु धर्मात केवळ एक धर्मग्रंथ नसून अनेक ग्रंथ आहेत. त्यांच्यात धर्माविषयी अत्यंत सविस्तर ज्ञान दिले आहे. वेद हे हिंदु धर्माचे आधारस्तंभ आहेत आणि ते अपौरुषेय आहेत. त्यामध्येच धर्मशास्त्र दिलेले आहे. तसेच श्रुति-स्मृति, पुराणे, उपनिषद हे त्याचाच भाग आहेत. याचप्रमाणे रामायण, महाभारत हे ग्रंथही वैदिक वाङ्मयाचेच विस्तार करणारे आहे. या एवढ्या वैदिक वाङ्मयावरूनच आपल्याला कोणत्याही समस्येचे निरसन होऊ शकते आणि ते परमात्मप्राप्ती (भगवंताचा साक्षात्कार) करून देऊन जीवन कृतार्थ करते.

 

४ अ १. म्हणे, हिंदूंना शास्त्रग्रंथाची आवश्यकता नाही !
टीका

‘खरे म्हणजे हिंदूंना शास्त्रग्रंथाची आवश्यकता नाही.’ (In fact Hindus do not need it. For Hinduism is not an illiberal, narrow or Sectarian faith.) – तथाकथित नवहिंदुत्ववादी नेते

 

खंडण

हिंदु धर्म हा संकुचित नाही, हे सत्य असले, तरी समाजाला मार्गदर्शन व्हावे, यासाठी शास्त्रग्रंथाची आवश्यकता निश्चितच आहे. शास्त्र कळल्यास धर्माचरणाचे महत्त्व कळते आणि धर्माचरणाने समाजाची सर्वंकष उन्नती होऊ शकते. हिंदु धर्मातच शास्त्रासंबंधी विवेचन आहे. आज हिंदू आपल्या शास्त्र सांगणार्‍या धर्मग्रंथांची उपेक्षा करत असल्यानेच त्यांना स्वतःचे अस्तित्व टिकवून धरणे कठीण झाले आहे.

 

४ आ. म्हणे, हिंदु धर्मात समाजाकरता योजना नाहीत !

टीका

‘तिथे (हिंदु धर्मात) समाजाकरता योजना नाहीत. आधुनिक समस्या अथवा आजच्या मानवी आवश्यकता पुरवण्याचे तिथे सुसंगत असे काही नाही.’ – तथाकथित पाश्चात्त्य पंडित

 

खंडण

समाजाने धर्मपालन सोडल्याने आधुनिक समस्या निर्माण झाल्या आहेत. धर्मपालन केल्यानेच त्या पूर्णपणे सुटू शकतात. इतर सर्व प्रयत्न वरवरचे होत.

 

४ इ. वेदांमध्ये दिलेल्या शास्त्रानुसार (सिद्धांतानुसार)
वागणे, हेच बंधन, नियम, आज्ञा, प्रतिबंध अथवा निषेध असणे

टीका

हिंदु धर्मात काही ठराविक नियम नाहीत, आज्ञा नाहीत, प्रतिबंध नाही अथवा निषेधही नाहीत. हिंदुला श्रद्धेचे, कर्माचे स्वातंत्र्य आहे. अनुसरणाचे स्वातंत्र्य आहे. त्याला जसे रुचेल, तसे त्याने करावे. त्याच्यावर कसलेही बंधन नाही. श्रद्धा ठेवणे, आज्ञा पाळणे, विधी-निषेध आचरणे, असे काहीही त्याच्यावर बंधन नाही.

 

खंडण

हिंदु धर्मात इतर कोणत्याही धर्मांपेक्षा इतके शास्त्रशुद्ध विधी-निषेध आहेत की, इतर धर्मीय त्यांची कल्पनाही करू शकणार नाहीत. वेदांमध्ये दिलेल्या शास्त्रानुसार (सिद्धांतानुसार) वागणे, हेच बंधन, नियम, आज्ञा, प्रतिबंध अथवा निषेध आहेत. शास्त्राची बंधने ही मानवाच्या उत्कर्षासाठीच आहेत.

 

४ ई. धर्माचरणाद्वारे कसे जीवन जगावे, हे धर्मात सांगितलेले असणे

टीका

‘हिंदु धर्मामध्ये व्यक्तीगत अनुभूती, सवयी, आवडी यांचे एकत्रीकरण आहे आणि त्यांच्या जोडीला त्यात प्राचीन परंपरा, रूढी, कुलाचार अन् रितीभाती हेही आहेत.’ (Embracing a unique peculiar conglomeration of partly personal experiences, habits and preferences and partly what has come down by ancient traditions, customs, usage and practices.) – तथाकथित नवहिंदुत्ववादी नेते

 

खंडण

‘हिंदु’ म्हणजे हीन, कनिष्ठ अशा रज-तम गुणांचा नाश करणारा, म्हणजे साधक. मनातील स्वभावदोष आणि अहं यांमुळे निर्माण झालेल्या सवयी अन् आवडी साधनेद्वारे नष्ट करून ईश्वरप्राप्ती करणे, हे मानवाचे मुख्य उद्दिष्ट आहे. धर्माचरणाद्वारे ज्या व्यक्तीगत अनुभूती येतात, त्या इतरांना सांगितल्याने त्यांना प्रोत्साहन मिळते आणि ते धर्माचरण करण्यासाठी उद्युक्त होतात. तसेच हिंदु धर्म हा प्राचीन परंपरा, रूढी, कुलाचार आणि रितीभाती यांनी बनलेला नसून त्यात ‘धर्माचरणाद्वारे कसे जीवन जगावे’, हे सांगितले आहे. यामुळे मानवातील दोष नष्ट होऊन त्याचे जीवन आनंदमय होते, असा हा आमचा धर्म आहे.

 

४ उ. या जन्मात केलेल्या कर्माचे फळ परलोकात भोगावे लागत असूनही ‘परलोक नाही’, असे म्हणणे !

गुरुदेव : ‘परलोक आहे; कारण वेदांमध्ये त्या संबंधात तशी प्रमाणे आहेत. या जन्मात केलेल्या कर्माचे फळ परलोकात भोगावे लागते. हा लोक आहे, याचा अर्थ परलोक आहेच. अन्यथा पूर्वकर्म, कर्मविपाक, कर्मसिद्धांत याला काहीच मूल्य रहाणार नाही. परलोक म्हणजे देवलोकही आहे. रामायण आणि महाभारत यांत परलोकाविषयी अनेक प्रसंग आहेत. त्यांत पृथ्वीवरील लोक देवलोकातील देवाशी व्यवहार करीत असत. राजा दशरथ असुरांशी झालेल्या देवांच्या युद्धात इंद्राच्या साहाय्याला गेला होता. दुष्यंत स्वर्गलोकी इंद्राच्या साहाय्याला गेला होता. तिथून परतताच शकुंतलेला भेटण्यासाठी तो मरिची ऋषींच्या आश्रमात गेला, अशी असंख्य उदाहरणे आहेत. श्रीमद्भगवदगीतेत भगवंत म्हणतात, ‘अविवेकी आणि श्रद्धा नसलेला संशयी मनुष्य परमार्थापासून निश्चित भ्रष्ट होतो. संशयी माणसाला ना हा लोक, ना परलोक आणि ना सुख.’ (अध्याय ५, श्लोक ४०) तिन्ही वेदांत सांगितलेली सकाम कर्मे करणारे, सोमरस पिणारे आणि पापमुक्त लोक आपल्या पुण्याईचे फळ असणार्‍या स्वर्गलोकाला जातात आणि पुण्याई संपल्यावर पुन्हा मर्त्यलोकात येतात. (अध्याय ९, श्लोक २०,२१) यावरून जसा मर्त्यलोक आहे, तसा परलोकही आहे, हे स्पष्ट होते; मात्र काळाच्या प्रभावामुळे बुद्धी क्षीण झालेली असल्याने या आधुनिकांमधे असे संभ्रम निर्माण होतात.

प्रश्नकर्ता : ठीक आहे. त्या काळातील लोकांत देवादिकांशी व्यवहार करण्याचे सामर्थ्य होते. आज ते का नाही ?

प्रा. राजे : याचे उत्तर तुम्हीच जाणता. आज माणूस कुठे आहे ? मद्य, मांस, मैथुनादी वृत्तीत रमणारे भोगवादी आणि भ्रष्टाचारी, स्वैराचारी लिंगपिसाट असेच सर्व लोक आज आहेत.

गुरुदेव : आधुनिकांप्रमाणे प्राचीन कालीन लोकांनाही देवादिकांशी व्यवहार करण्याचे सामर्थ्य नव्हते, असे तुम्हाला म्हणायचे आहे का ?

प्रश्नकर्ता : होय.

गुरुदेव : याचा अर्थ जगातील वैचित्र्य आपण नाकारता आहात.

प्रश्नकर्ता : ते कसे ?

गुरुदेव : आधुनिक काळात चक्रवर्ती राजा नाही. ‘गेल्या सहस्र दीड सहस्र वर्षांत झाला नाही; म्हणून पूर्वी चक्रवर्ती राजेच नव्हते’, असे आधुनिक म्हणतील.

प्रश्नकर्ता : होय.

गुरुदेव : मग राजसूय यज्ञाचे विस्ताराने महाभारतात विधान आहे, त्याचे काय ? ते खोटे ठरवायचे का ? आणि कालांतराने ‘वर्णाश्रम धर्म अत्यंत शिथिल होता’, असेही विधान करण्यात येईल.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (१९), अहमदनगर, महाराष्ट्र – ४१३ ७३९

Leave a Comment