धर्मासंबंधी टीका किंवा अयोग्य विचार आणि त्यांचे खंडण (भाग १)

खंडण करण्यामागील उद्देश

विश्वाच्या आरंभापासून भूतलावर असणारा सनातन वैदिक धर्म (हिंदु धर्म), हिंदूंचे धर्मग्रंथ, देवता, संत, वर्णाश्रमव्यवस्था, अध्यात्म आदींवर अनेकांकडून टीका केली जाते. ही टीका भाषणे, चर्चासत्रे, पुस्तके, वृत्तपत्रे, टिंगलटवाळी आदींद्वारे समाजात प्रसृत केली जाते. मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धतीमुळे अनेकांना ‘ही टीका आहे’, हेच कळत नाही ! अनेकांना ती अयोग्य टीका खरी वाटते, तर अनेकांना ‘ती टीका विखारी आहे’, हे लक्षात येऊनही टीकेचे खंडण सहज उपलब्ध नसल्यामुळे सडेतोड उत्तर देणे शक्य होत नाही. काही वेळा काही विद्वान किंवा अभ्यासक यांच्याकडूनही अज्ञानापोटी किंवा नकळत अयोग्य विचार मांडले जातात.

असे सर्वच अयोग्य विचार आणि टीका यांचा योग्य प्रतिवाद न केल्याने हिंदूंची श्रद्धा डळमळीत होते अन् त्यामुळे धर्महानी होते. ही धर्महानी रोखणे, हे काळानुसार आवश्यक असे धर्मपालनच आहे. ही धर्महानी रोखण्यासाठी हिंदूंना बौद्धिक बळ प्राप्त व्हावे, यासाठी अयोग्य विचार आणि टीका यांचे खंडण ग्रंथात दिले आहे.

 

१. म्हणे, वैदिक धर्माने काळानुसार वाटचाल केली !

सृष्टीच्या उत्पत्तीच्या आधीपासून अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी विद्यमान असणार्‍या वैदिक सनातन हिंदु धर्माची काळानुसार वाटचाल कशी झाली, याविषयी विचारवंतांनी मांडलेले विचार संदर्भासहित प्रस्तूत सूत्रात दिले आहेत. यांतील आम्हाला वाटलेले काही अयोग्य विचार हे ‘अयोग्य विचार’ या मथळ्याखाली मांडून त्यापुढे त्यासंबंधीचे खंडणही केले आहे. अयोग्य न वाटलेले विचार हे ‘विचार’ या मथळ्याखाली मांडले आहेत. यामुळे विषयाची सलगता भंग पावण्याचा थोडा दोष रहात असला, तरी अयोग्य विचारांचे खंडण त्या त्या ठिकाणीच केल्यामुळे वाचकांना विषय समजायला सोपे जाईल.

 

१ अ. वेदकाळापासून चालत आलेला शाश्वत वैदिक धर्म म्हणजेच सध्याचा सनातन हिंदु धर्म

१ अ १. म्हणे, भारतात प्रचलित असलेले लौकिक धर्म आणि आर्यांचा वैदिक धर्म यांच्या संमिश्रणामुळे हिंदु धर्म हळूहळू उदय पावला असावा !
अयोग्य विचार

‘भारतात प्रचलित असलेले लौकिक धर्म (आगम, तंत्रविद्या) आणि आर्यांचा वैदिक धर्म (निगम) यांच्या संमिश्रणामुळे हिंदु धर्म हळूहळू उदय पावला असावा, असे अनुमान करता येते.’

 

खंडण
अ. आर्यांचा सनातन वैदिक धर्म अनादी आणि शाश्वत असणे

सनातन धर्म हा अनादी आणि शाश्वत आहे. आर्यांचा धर्म हाच होता. त्यालाच ‘वैदिक धर्म’ म्हटले आहे; कारण त्याचा अर्थ आत्म्याचे किंवा ईश्वराचे ज्ञान जाणणे, म्हणजेच वेद. तोच सध्याचा सनातन हिंदु धर्म. इतर देशीय लोक सिंधु नदीच्या परिसरातील लोकांना (सिंधु नदीमुळे) ‘हिंदु’ म्हणू लागले. यावरून हिंदु धर्म उदय पावला नसून तो पूर्वीपासूनच आहे, तसे आर्यही पूर्वीपासूनच भारतात आहेत.

 

आ. हडप्पा आणि मोहेंजोदारो येथील नाण्यांवर असणार्‍या वेदऋचांवरून आर्य भारतातीलच असल्याचे सिद्ध होणे

ज्याच्यामुळे हा ‘आर्य वंशा’चा वाद चालू झाला, त्या मॅक्सम्युलरनेसुद्धा तो वाद चुकीचा असल्याचे मान्य केले होते. हडप्पा आणि मोहेंजोदारो येथील नाण्यांवरही वेदऋचा आहेत, हे दिसून आले आहे. यावरून आर्य भारताबाहेरून आलेले नाहीत आणि येथीलच वैदिक संस्कृती आजवर टिकून आहे, हे सिद्ध होते. 

 

इ. आर्य वैदिक संस्कृती आणि लौकिक धर्म वेगळे नसणे

आर्य वैदिक संस्कृती आणि प्रचलित असलेले लौकिक धर्म असे वेगळे भाग नव्हते. याची कारणे पुढीलप्रमाणेही आहेत.

१. आगम म्हणजे उपपत्ती (तात्त्विक ज्ञान), तर निगम म्हणजे तर्कशास्त्र आणि सिद्धांत (प्रायोगिक). हे दोन्ही वेदाचेच भाग आहेत. त्यामुळे त्यांच्यात भेद नसून ते परस्परांशी संलग्न आहेत.

२. तसेच अथर्ववेदात तंत्रविद्या आहे.

 

१ अ २. म्हणे, बरेचसे लौकिक संप्रदाय वेदनिष्ठेच्या सूत्राने एका संघटनेत बांधले गेले आणि हिंदु धर्म उदयास आला !
अयोग्य विचार

‘प्राचीन काळापासून प्रतिष्ठित वैदिक धर्मासह अनेक लौकिक संप्रदाय भारतात अस्तित्वात होते. त्यांनी वैदिक धर्माच्या श्रद्धा आणि आचार यांचा जरी मोठ्या प्रमाणात स्वीकार केला नसला, तरी वेदांविषयीची आपली निष्ठा मात्र नित्य (कायम) ठेवली. वैदिक धर्माचा अपकर्ष चालू झाल्यावर त्या लौकिक संप्रदायांना आपली अस्मिता प्रस्थापित करण्याची संधी प्राप्त झाली. वैदिक धर्माच्या हितचिंतकांनाही नास्तिक पंथांच्या आव्हानास उत्तर देण्यासाठी अशा लोकांचे साहाय्य आवश्यक वाटले. परिणामतः बरेचसे लौकिक संप्रदाय, त्यांच्या देवता आणि आचार यांच्यासह वेदनिष्ठेच्या सूत्राने एका संघटनेत बांधले गेले आणि अशा प्रकारे ऐतिहासिक हिंदु धर्म उदयास आला.’

 

खंडण
अ. भारतात प्रथमपासून वैदिक धर्माचेच आचरण होणे

‘प्राचीन काळापासून प्रतिष्ठित वैदिक धर्मासह अनेक लौकिक संप्रदाय भारतात अस्तित्वात होते’, असे म्हणणे चुकीचे आहे. वास्तविक वैदिक धर्माचेच प्रथमपासून आचरण होत होते. केवळ विविध ठिकाणच्या विविध लोकांनी रूढीप्रमाणे आपापले साधनामार्ग निवडून त्यानुसार ते धर्माचरण करू लागले.

 

आ. हिंदु हा दैवी गुणसंपत्तीने युक्त असून वैदिक धर्माच्या आचरणामुळेच दैवी गुणांचा परिपोष माणसामध्ये होत असल्याने हिंदु धर्म हाच वैदिक धर्म असणे

या जगात मनुष्यांमध्ये दैवी आणि आसुरी अशा दोनच गुणसंपत्तींनी युक्त असे वर्ग आहेत. (गीता, अ. १६) ‘हिंदु’ म्हणजे ‘हिनानि गुणानि दूषयति इति हिंदु ।’ ‘जो आपल्यातील हीन (रज-तम) गुणांचा नाश करून सत्त्वगुणांची वृद्धी स्वतःमध्ये करतो, तो हिंदु होय’, अशी व्याख्या आहे. म्हणजेच हिंदु हा दैवी गुणसंपत्तीने युक्त असतो आणि वैदिक धर्माच्या आचरणामुळेच अशा दैवी गुणांचा परिपोष माणसामध्ये होत असल्याने हिंदु धर्म हाच वैदिक धर्म आहे, हे दिसून येते. आजही १६ संस्कार संपूर्ण भारतात केले जातात. तसेच वेदांचे पठण सर्व ठिकाणी सारख्याच पद्धतीने केले जात असल्याने ते एकसंघ आहे. यामुळे ‘बरेचसे लौकिक संप्रदाय, त्यांच्या देवता आणि आचार यांच्यासह वेदनिष्ठेच्या सूत्राने एका संघटनेत बांधले गेले अन् अशा प्रकारे ऐतिहासिक हिंदु धर्म उदयास आला’, हे म्हणणे योग्य नाही.

 

१ अ ३. म्हणे, इतिहासपूर्व भारतीय धर्म वैदिक आर्य धर्माहून अत्यंत भिन्न होता !
अयोग्य विचार

‘इतिहासपूर्व भारतीय धर्म वैदिक आर्य धर्माहून अत्यंत भिन्न होता आणि त्या सिंधु धर्माचे ऐतिहासिक शिवप्रधान हिंदु धर्माशी असलेले सादृश्य अगदी संशयातीत आहे. हिंदु धर्माच्या इतिहासाच्या दृष्टीने वैदिक आर्यांचा कालखंड हा बराचसा मध्योद्गत (मधल्या कालखंडातील) घटनेच्या स्वरूपाचा आहे. तो कालखंड अतिशय अर्थपूर्ण असला, तरी त्या कालखंडातील धार्मिक विचारप्रणालीने ऐतिहासिक हिंदु धर्माची रचना आणि स्वरूप यांवर प्राणभूत अन् दूरगामी प्रभाव निश्चितपणे पाडलेला नाही. उलटपक्षी वैदिक धर्माने जी विशिष्ट प्रकारची धार्मिक परिस्थिती निर्माण केली होती, तिची प्रतिक्रिया म्हणून ऐतिहासिक हिंदु धर्म उद्भवला, असेच एका अर्थी म्हणता येईल.’

 

खंडण
अ. भारत सोडून इतर कोणत्याही देशांत वेद ज्ञात नसल्याने आणि आर्य हे वैदिक असल्याने आर्य भारतातीलच असल्याचे सिद्ध होणे

ऋषींनी वेद प्रथम ऐकले. वेद म्हणजे ज्ञानाचे साधन. भारत सोडून इतर कोणत्या देशांत वेद ज्ञात आहेत ? आर्य हे वैदिक होते, म्हणजे वेद हे त्यांचे धार्मिक वाङ्मय होते; म्हणून त्यांचा तो धर्म; म्हणून आर्यही भारतातीलच आहेत, हे निर्विवाद सिद्ध होते. त्यामुळे ‘इतिहासपूर्व भारतीय धर्म वैदिक आर्य धर्माहून अत्यंत भिन्न होता’, हे विधान चुकीचे आहे आणि वरील विचारांतील पुढील सर्व विधानेही चुकीची ठरतात.

 

आ. ‘मोहोंजोदारो आणि हडप्पा यांची संस्कृती वैदिक संस्कृतीच होती’, हे पौर्वात्य आणि पाश्चात्त्य संशोधकांनी मान्य करणे

डॉ. फ्रॉंले, राजाराम, भगवान सिंह, आर.डी. बॅनर्जी, वाकणकर इत्यादींनी ‘मोहोंजोदारो आणि हडप्पा यांची संस्कृती वैदिक संस्कृतीच होती’, हे र्निविवादपणे सिद्ध केले. पौर्वात्य आणि पाश्चात्त्य संशोधकांनी ते मान्य केले आहे. यामुळे सिंधु नदीच्या तिरावर असणारा तो सिंधु धर्म, तसेच इतिहासपूर्व भारतीय धर्म, वैदिक आर्य धर्म आणि ऐतिहासिक शिवप्रधान हिंदु धर्म असा कोणताही भेद नाही.

 

इ. लाखो वर्षांपासून हिंदू वेदाध्ययन करत असून लोकांना वेद मुखोद्गत असणे

हिंदूंना वेद शिरोदात्त आहेत. हिंदू वेदाध्ययन करतात. ही परंपरा लाखो वर्षांपासून चालू आहे. लोकांना वेद मुखोद्गत आहेत. त्यामुळे ‘वैदिक धर्माने जी विशिष्ट प्रकारची धार्मिक परिस्थिती निर्माण केली होती, तिची प्रतिक्रिया म्हणून ऐतिहासिक हिंदु धर्म उद्भवला’, असे म्हणणे किती फोल ठरते, हे लक्षात येईल.

 

विचार : ‘तथापि हिंदु धर्माने वैदिक श्रद्धा नि आचार यांच्याकडे पाठ फिरवली नाही.

या कालखंडात हिंदु धर्माने वेदांसंबंधीची आपली निष्ठा ठामपणे प्रतिपादिली. ही वेदनिष्ठा हिंदु धर्माला वेदोत्तर काळात उगम पावलेल्या तथाकथित नास्तिक धर्मपंथांना परिणामकारक रितीने तोंड देण्यास उपयुक्त ठरली.

 

१ अ ४. म्हणे, कालानुक्रमाने मनुस्मृतिविहित वर्णाश्रमधर्म, म्हणजेच ‘समग्र हिंदु धर्म’, असे समीकरण प्रस्थापित झाले !
अयोग्य विचार

‘कालानुक्रमाने मनुस्मृतीविहित वर्णाश्रमधर्म म्हणजेच ‘समग्र हिंदु धर्म’, असे समीकरण प्रस्थापित झाले.’

 

खंडण
वेदात असलेला, गीतेत सांगितलेला आणि मनुस्मृतीत सांगितलेला धर्म यांत भेद नसणे

भगवान श्रीकृष्ण हेच मूल स्वरूप असून तोच पूर्णावतार आहे. तो गीतेत सांगतो, ‘मी हा अविनाशी योग (वेदांमध्ये असलेला) सूर्याला सांगितला. त्याने तो आपला मुलगा मनु याला सांगितला. तो पुढे राजर्षींनी जाणला. तोच मध्यकाळात लुप्त झालेला अविनाशी योग मी तुला सांगत आहे.’ (गीता, अध्याय ४, श्लोक १ ते ३) यामुळे वेदात असलेला धर्म, गीतेत सांगितलेला धर्म आणि मनुस्मृतीत सांगितलेला धर्म यांत भेद नाही, हे स्पष्ट होते. गीता ही वेद आणि उपनिषदे यांचे सार आहे.

खरा वैदिक धर्म हा १६ खांबांवर उभा आहे. चार वेद (ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद), चार आश्रम (ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्याशाश्रम), चार वर्ण (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र) अन् चार पुरुषार्थ (धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष) असे हे १६ खांब आहेत. ‘गुणकर्मांनुसार मी माणसांची विभागणी केली’, असेही भगवंत म्हणतात. (गीता, अध्याय ४, श्लोक १३) चातुर्वर्ण्य व्यवस्था ही वेदरक्षणासाठी आहे. तसेच अशा प्रकारची आश्रम व्यवस्था ही समाज सुव्यस्थित करण्यासाठी केलेली आहे. म्हणजेच आधीपासूनच वर्णाश्रमधर्म व्यवस्था असून ती वैदिक हिंदु धर्माचे अविभाज्य अंग आहे, संपूर्ण धर्म नव्हे. त्यामुळे ‘कालानुक्रमाने मनुस्मृतिविहित वर्णाश्रमधर्म, म्हणजेच ‘समग्र हिंदु धर्म’, असे समीकरण प्रस्थापित झाले’, हे मत चुकीचे ठरते. 

 
 

१ आ. म्हणे, हिंदु धर्माच्या उत्थानासाठी महाभारतादी महाकाव्यांची रचना झाली !

१ आ १. महाभारतादी धर्मग्रंथांना महाकाव्य म्हणणारे महाभाग !
अयोग्य विचार

‘याच कालखंडात हिंदु धर्माच्या उत्थानाच्या दृष्टीने घडलेली महत्त्वाची घटना म्हणजे महाभारतादी महाकाव्यांची रचना.’

 

खंडण
रामायण-महाभारत काल्पनिक काव्य नसून तो इतिहास असल्याचे विज्ञानाने सिद्ध करणे

रामायण-महाभारत ही अन्य काव्यांप्रमाणे काल्पनिक नसून तो इतिहास आहे. रामायणात उल्लेखलेल्या भारत आणि लंका (श्रीलंका) यांना जोडणार्‍या नलसेतूची पुरातनताही आता विज्ञानाने सिद्ध झालेली आहे. द्वारकेच्या उत्खननातूनही महाभारत काळाला पुष्टी मिळाली आहे. तसेच मध्यप्रदेशातील वडनेरचे प्रा. ग.वा. कवीश्वर यांनी महाभारतातील तिथी-दिन-नक्षत्रांचा मेळ उत्तम रितीने घालून दाखवला आहे. यामुळे ‘महाभारतादी महाकाव्ये’, असे म्हणणे, म्हणजे ‘ती काल्पनिक आहेत’, असे भासवून वाचकांच्या मनात इतिहासाविषयी संभ्रम निर्माण करण्यासारखे आहे.

 

१ इ. वेदोत्तर काळी झालेल्या धर्माच्या, म्हणजे खरेतर हिंदूंच्या अपकर्षाची खरी कारणे !

१ इ १. म्हणे, उपनिषदांना ‘वेदान्त’ म्हणतात, म्हणजे ती वैदिक वाङ्मयाचा आणि युगाचा अंत दर्शवतात !
अयोग्य विचार

‘उपनिषदांना ‘वेदान्त’ असे म्हणतात. कालक्रमानुसार ती वैदिक वाङ्मयाचा आणि युगाचा अंत दर्शवतात.’

 

खंडण
‘वेदांच्या शेवटी उपनिषदे’; म्हणून उपनिषदांना ‘वेदान्त’ म्हणतात !

उपनिषदांना ‘वेदान्त’ म्हणतात, याचा अर्थ ‘ती वैदिक वाङ्मयाचा आणि युगाचा अंत दर्शवतात’, असा काढणे याहून काही हास्यास्पद होऊ शकत नाही. बहुधा ‘वेद ± अन्त’ म्हणजे ‘वेदान्त’, असा जावईशोध या संशोधकांनी काढलेला असावा. इथे ‘वेदांचा अन्त’ असा अर्थ नसून ‘वेदांच्या शेवटी उपनिषदे’, असा अर्थ होतो.

 

१ इ २. म्हणे, उपनिषदांनी लोकांना धर्म न शिकवल्यामुळे त्या काळी वैदिक धर्माच्या अपकर्षाला प्रारंभ झाला !
अयोग्य विचार

‘उपनिषदे वैदिक विचारसंकुलाच्या उच्चावस्थेचीही निर्देशक आहेत; परंतु उपनिषदांची श्रेष्ठ ब्रह्मविद्या लोकांना विशेषशी आकलनीय ठरली नाही. उपनिषदांतील तत्त्वज्ञान सामान्य जनांच्या क्षमतेबाहेरचे होते; कारण काळानुसार त्यांची पातळी न्यून (कमी) झाली. त्यांनी लोकांना धर्म शिकवला नाही. त्यामुळे त्या काळी वैदिक धर्माच्या अपकर्षाला प्रारंभ झाला.’

 

खंडण
अ. उपनिषदांमध्ये ब्रह्मविद्या असल्याने ती कठीण आहेत, त्यामुळे ती सर्वांत शेवटी अभ्यासली जाणे

उपनिषदे ही वेदांचे ज्ञानकांड आहेत. त्यात तत्त्वज्ञान आहे. जसे आपण पहिलीतून दुसरीत, दुसरीतून तिसरीत, असे करून शेवटी पदवी परीक्षेचा अभ्यास करतो, तसे वेदांमध्ये उपनिषदे ही शेवटी अभ्यासली जातात. पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्याला पदवी परीक्षेचा अभ्यास कठीण जातो, तसे उपनिषदांमध्ये ब्रह्मविद्या असल्याने ती कठीण आहेत.

 

आ. उपनिषदांनी मानवाला निराकार ब्रह्माकडे, म्हणजेच मोक्षाकडे वळवले !

‘उपनिषदांनी लोकांना धर्म शिकवला नाही आणि त्यामुळे त्या काळी वैदिक धर्माच्या अपकर्षाला प्रारंभ झाला’, असे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे; कारण उपनिषदांचा तो विषयच नव्हे. ‘संहिता’ आणि ‘ब्राह्मण’ यांमध्ये कर्मकांड, म्हणजे धर्माचरण शिकवले आहे. उपनिषदांनी मानवाला निराकार ब्रह्माकडे वळवले, ‘मोक्ष’ या शब्दाचा अर्थ सांगितला. याने वैदिक धर्माचा अपकर्ष होईल कि उत्कर्ष ?

 

१ इ ३. हिंदु धर्माच्या तत्त्वांमध्ये पालट झाला नसून मनुष्याची अधोगती होत गेल्याने कलियुगानुसार उपनिषदांचे अध्यात्मशास्त्र मागे पडून लोक सोप्या भक्तीमार्गाकडे वळणे
अयोग्य विचार

‘उपनिषदांनी अगोदरच संहिता कालखंडातील देवतांच्या स्थानी कैवल्यस्वरूप परब्रह्माची प्रतिष्ठापना केलेली होती. कालांतराने लोक ईश्वराकडे तारक सखा आणि उद्धारकर्ता या नात्याने पाहू लागले. यज्ञविधीचे स्थान पूजाविधीने घेतले. उपनिषदांचे कठोर आणि तपःकर्कश अध्यात्मशास्त्र मागे पडून भावमधुर भक्तीमार्ग लोकप्रिय झाला. नूतन हिंदु विचारप्रणालीवर कर्मसंन्यासापेक्षा कर्मयोगाचा प्रभाव विशेषत्वाने पडलेला दिसतो. लोकसंग्रह म्हणजे समाजाचे स्थैर्य, धारण आणि दृढैक्य हेच धर्माचे एकमेव ध्येय होय, अशी नवीन धर्माची घोषणा होती.’

 

खंडण

सत्ययुगापासून ते आताच्या कलियुगापर्यंत मानवाचा र्‍हास होत गेला. मानवाची शारीरिक, मानसिक, बौद्धीक आणि आध्यात्मिक क्षमता न्यून होत गेली. सत्ययुगात हंस वर्ण होता. तेव्हा सर्वजण सोऽहम् भावात होते. त्रेतायुगात ज्ञानयोग होता. द्वापरयुगात कर्मयोग होता आणि आता कलियुगात भक्तीयोग आहे. याचे कारण हे की, प्रत्येक युगात वेद आकलन करण्याची क्षमता अल्प होत गेली. म्हणून त्यांकडे दुर्लक्ष होत गेले आणि सोप्या योगानुसार मार्गक्रमण होत गेले. त्यामुळेच यज्ञविधीचे स्थान पूजाविधीने घेणे, उपनिषदांचे कठोर आणि तपःकर्कश अध्यात्मशास्त्र मागे पडून भक्तीमार्ग लोकप्रिय होणे, असे होत गेले. म्हणून ‘नूतन हिंदु विचारप्रणालीवर कर्मसंन्यासापेक्षा कर्मयोगाचा प्रभाव विशेषत्वाने पडलेला दिसतो’, असे म्हणणे चुकीचे ठरेल; कारण हिंदु धर्माच्या तत्त्वांमध्ये पालट झाला नाही, तर मनुष्याची अधोगती होत गेल्याने तसा पालट होत गेला. म्हणून ‘लोकसंग्रह म्हणजे समाजाचे स्थैर्य, धारण आणि दृढैक्य हेच धर्माचे एकमेव ध्येय होय, अशी नवीन धर्माची घोषणा होती’, असेही म्हणणे अयोग्य आहे.

 

१ इ ३ अ. वेद हे अपौरुषीय असल्याने ‘लोकांच्या वेदांनी’, असा शब्दप्रयोग करणे अयोग्य !
अयोग्य विचार

‘लोकांच्या देवतांशी संबद्ध असलेल्या भक्तीमार्गाची शिकवण या ‘लोकांच्या वेदांनी’ समाजाच्या अगदी खालच्या थरापर्यंत पोहोचवली.’

 

खंडण

‘लोकांच्या वेदांनी’, असा शब्दप्रयोग करणे चुकीचे आहे; कारण वेद हे अपौरुषीय आहेत.

 

१ इ ४. धर्माच्या अपकर्षाचा काळ – जैन, बौद्ध आणि नास्तिक यांचा काळ

‘त्यानंतरच्या कालखंडात एक फार मोठे विचारमंथन घडून आले आणि नवीन धार्मिक प्रवृत्तींचा उदय झाला. अवैदिक किंवा नास्तिक श्रद्धा आणि आचार यांच्या संघटनेत ही परिस्थिती फार उत्तेजक ठरली आणि जैन अन् बौद्ध धर्मपंथ उदयास आले; परंतु वैदिक धर्माच्या आचार्यांनी वैदिक विचारप्रणाली आणि जीवनपद्धती यांचे पुनःसंघटन करण्यासाठी आणि नास्तिक मतांच्या प्रसारास पायबंद घालण्यासाठी वेदांगांच्या आणि कल्पसूत्रांच्या द्वारे लोकांचे जीवन नियंत्रित करण्याचा एक मोठा प्रयत्न केला.’

 

१ इ ५. धर्मशिक्षणाचा अभाव

‘हिंदु धर्माच्या इतिहासाच्या दृष्टीने १८ वे शतक गत्यवरोधाचे (गती कुंठित होण्याचे) शतक होते. वाङ्मय आणि सिद्धांतविधान यांपैकी एकाही क्षेत्रात त्या काळात कसलीही अर्थपूर्ण क्रियाशीलता व्यक्त झालेली नाही. स्थूलमानाने भारतात ब्रिटिशांच्या राजसत्तेचा प्रारंभ झाल्यापासून हिंदु धर्माला एका नव्याच समस्येला तोंड द्यावे लागले. ही समस्या धर्मशिक्षणाचा अभाव अन् पाश्चात्त्यांचे विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा हिंदूंतील बुद्धीमंतांवर पडलेला प्रभाव यांमुळे उत्पन्न झाली.

 
 

पाश्चात्त्य विद्येच्या प्रभावाची हिंदु समाजातील सुशिक्षितांची प्रतिक्रिया तीन प्रकारची होती.

अ. भारताच्या दैन्याचे मूळ कारण म्हणजे पारंपरिक हिंदु धर्म होय. त्याचा त्याग केला पाहिजे, असा निष्कर्ष काही बुद्धीमंतांनी काढला आणि तो अयोग्य आहे.

आ. हिंदु परंपरा आणि आधुनिक संस्कृती यांच्यातील संघर्षाची दुसरी प्रतिक्रिया हिंदु धर्माचे पुनर्विधान करण्याच्या प्रयत्नांत दिसून येते. ‘कोणत्याही युगातील प्रचोदनाला (विचारधारेला) हिंदु धर्म योग्य प्रतिसाद देऊ शकेल’, या दृढ प्रत्ययातूनच ही प्रवृत्ती उगम पावली आहे. हिंदु धर्माच्या मूलभूत प्रकृतीला धक्का न लावता त्याचा अभिनव आविष्कार केला पाहिजे, तसा तो करणे शक्य आहे, असे या पुनर्विधानवाद्यांचे मत आहे.

मात्र पाश्चात्त्य विद्येचा प्रभाव हिंदु समाजातील अत्यंत अल्प अशा सुशिक्षित लोकांपुरताच मर्यादित आहे. बहुजन समाजाशी त्याचा काहीही संबंध नाही. आधुनिक काळाच्या संदर्भात धर्मासंबंधी काही पुनर्विचार करायला पाहिजे, अशी आवश्यकताच बहुजन समाजाला वाटत नाही.

इ. तिसरी प्रतिक्रिया, हिंदु धर्माच्या श्रद्धा आणि आचार यांचे परिरक्षण झालेच पाहिजे, ही होय. या परिरक्षणवादी लोकांचा असा दृढ विश्वास आहे की, पारंपरिक हिंदु धर्म नष्ट होऊ शकणार नाही. त्यांच्या मते पाश्चात्त्यांच्या अवनतीकारक भौतिकवादाला यशस्वी प्रतिकार करण्यास हिंदूंची आध्यात्मिकता समर्थ आहे. ही प्रतिक्रिया अगदी योग्य आहे. हिंदूंच्या अपकर्षाचे खरे कारण धर्मशिक्षणाचा अभाव हेच आहे.’

 

१ ई. हिंदु धर्मातील पंथ आणि उपपंथ यांच्याविषयीचे
गैरसमज, पंथ निर्माण होण्याची कारणे अन् त्याचे झालेले लाभ 

१ ई १. म्हणे, हिंदु धर्माचा इतिहास म्हणजे निरनिराळ्या हिंदु धर्मपंथांचा इतिहासच !
अयोग्य विचार

‘यवन, शक, पल्हव, कुशाण इत्यादी समुदायांनी त्या कालखंडात भारतावर आक्रमणे केली. त्याच काळात महायान बौद्ध आणि अन्य एकेश्वरवादी असलेल्या विभिन्न पंथांचा उदय झाला. त्यानंतरच हिंदु धर्माचा इतिहास म्हणजे निरनिराळ्या हिंदु धर्मपंथांचा इतिहासच होय; कारण त्या धर्मपंथांव्यतिरिक्त हिंदु धर्माला वेगळे असे व्यक्तीमत्त्वच राहिले नाही. ज्या धर्मात स्पष्टपणे उपलक्षित केलेली आग्रही मते नसतात, त्या धर्मातच सामान्यपणे भिन्न भिन्न धर्मपंथ सहजपणे उदयास येऊ शकतात.’

 

खंडण
अ. हिंदु धर्माचा इतिहास हा कल्पापासून अवतारांच्या इतिहासासह असून तो व्यापक असणे

वैदिक धर्म, म्हणजे हिंदु धर्म हा व्यापक असल्याने त्याचा इतिहास हा केवळ धर्मपंथांच्या इतिहासांपर्यंतच मर्यादित नाही. मूलतः हिंदु धर्माचा इतिहास हा कल्पापासून अवतारांच्या इतिहासासह आहे. यामुळे ‘हिंदु धर्माला त्या धर्मपंथांव्यतिरिक्त वेगळे असे व्यक्तीमत्त्वच उरले नाही’, असे म्हणणे चुकीचे आहे. हे म्हणजे ‘आजोबा, वडील आणि मुलगा इतकाच वंशावळीचा संबंध आहे’, असे म्हणण्यासारखे होईल. वास्तविक वंशावळी सांगतांनासुद्धा गोत्राचा उल्लेख करून त्याचा संबंध मूळ पुरुषांशी जोडला जातो.

आ. हिंदु धर्मात केवळ सत्य सांगितलेले असल्याने आग्रही मते नसणे

हिंदु धर्माचे विविध पंथांमध्ये विखंडन झाले असते, तर ते कधीही एकत्र आले नसते. हिंदु धर्मात केवळ सत्य सांगितलेले असल्याने आग्रही मते असण्याचा प्रश्नच येत नाही. जितक्या प्रकृती तितके साधनामार्ग असल्याने धर्मपंथ वेगवेगळे दिसत असले, तरी त्यांचा उद्देश हा ईश्वरप्राप्ती हाच असल्याने त्यांच्या मूल स्वरूपात भेद रहात नाही. यामुळे ‘ज्या धर्मात स्पष्टपणे उपलक्षित केलेली आग्रही मते नसतात, त्या धर्मातच सामान्यपणे भिन्न भिन्न धर्मपंथ सहजपणे उदयास येऊ शकतात’, हे म्हणणे चुकीचे आहे.

 

१ ई २. म्हणे, हिंदु धर्माचे पंथांच्या आणि उपपंथांच्या रूपाने आणखी विखंडन झाले !
अयोग्य विचार

‘त्यानंतरच्या सहस्र वर्षांच्या कालखंडात हिंदु धर्माचे, पंथांच्या आणि उपपंथांच्या रूपाने आणखी विखंडन झाले.’

 

खंडण

‘हिंदु धर्माचे, पंथांच्या आणि उपपंथांच्या रूपाने आणखी विखंडन झाले’, हे म्हणणे चुकीचे आहे; कारण विखंडन झाले असते, तर ते कधीही एकत्र आले नसते; मात्र सण-उत्सव, कुंभमेळा इत्यादी विविध सांस्कृतिक, सामूहिक कार्यक्रमांच्या वेळी सर्व पंथ एकत्रितपणे आनंदाने सहभागी होतात.

 

१ ई ३. धर्मपंथ काही विशिष्ट सिद्धांतांचा पुरस्कार करण्यासाठी उदयास आले नसून ईश्वरवादाचे विशिष्ट आदर्श आणि भक्तीचे विशिष्ट प्रकार प्रस्थापित करण्यासाठी उदयास आले असणे

‘मात्र एखादा पंथ कितीही जहाल असला, तरी त्याने मूळ हिंदु धर्माचा त्याग न करण्याचे धोरण कटाक्षाने पाळले होते. हे धर्मपंथ काही विशिष्ट सिद्धांतांचा पुरस्कार करण्यासाठी उदयास आले नसून ईश्वरवादाचे विशिष्ट आदर्श आणि भक्तीचे विशिष्ट प्रकार प्रस्थापित करण्यासाठी आले होते. उपनिषदांतील सर्वेश्वरवादी प्रवृत्तीपासून हिंदु धर्म पूर्णपणे कधीच विभक्त राहू शकला नाही. यानंतरच्या कालखंडात हिंदु धर्मात भक्ती हीच प्राणभूत मानली जाऊ लागली. भक्तीपंथाची मुख्य प्रेरणा दक्षिण भारतातल्या नायन्मार आणि आळवार यांच्याकडून मिळाली.

वैष्णवभक्तीचा खरा विकास झाला तो मध्य आणि उत्तर भारतात. १३ व्या शतकापासून १७ व्या शतकापर्यंत रामभक्ती आणि कृष्णभक्ती हे भक्तीवादाचे दोन मुख्य प्रवाह होते. भागवत, निंबार्क, चैतन्य, पुष्टीमार्ग इत्यादी अनेक पंथ त्या प्रवाहात उत्पन्न झाले. शैव पंथातही कापालिक, वीरशैव, लिंगायत इत्यादी अनेक उपपंथ उदयास आले आणि शैव सिद्धांत प्रस्थापित झाले.

 

१ ई ४. पंथ आणि उपपंथ यांच्यामुळे विविध विचारसरणींचे ग्रंथ (उपदर्शने) निर्माण होणे

हिंदु धर्मातील पंथ आणि उपासनामार्ग यांच्या या बहुलीकरणाप्रमाणेच (भरभराट, वाढ) आस्तिक दर्शनांच्या बहुलीकरणाची (मंथन) प्रक्रियाही त्या काळात चालू होती, उदा. वेदान्तदर्शनांचा सर्वांत महत्त्वाचा मूलभूत ग्रंथ म्हणजे बादरायणाची वेदान्तसूत्रे हा होय. त्या सूत्रांचा निरनिराळ्या भाष्यकारांनी वेगवेगळ्या प्रकारे अर्थाविष्कार केल्यामुळे या कामात वेदान्ताच्या निरनिराळ्या उपदर्शनांचा जन्म झाला. वेदान्तसूत्रांचे सर्वांत प्रमुख भाष्यकार म्हणजे शंकराचार्य; परंतु त्यांच्या केवल अद्वैतापेक्षा अकराव्या शतकातील रामानुजांच्या विशिष्ट अद्वैताचे आवाहन अधिक प्रबळ होते, असे दिसून येते. याचे एक कारण हे असले पाहिजे की, अत्यंत लोकप्रिय होत चाललेल्या भक्तीवादाला रामानुजांच्या विशिष्ट अद्वैताने तत्त्वज्ञानीय पीठिका दिली. भक्तीवादाचे एक प्रवर्तक रामानंद हे रामानुज संप्रदायातले होते, ही गोष्ट मोठी सूचक आहे. रामानुजांचे समकालीन निंबार्क हे राधापंथाला तत्त्वज्ञानीय प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे पहिलेच आचार्य होते. वल्लभाचार्यांनी ईश्वरानुग्रहमतावर, म्हणजे पुष्टीमार्गावर भर दिला आहे. त्यांच्या पूर्वीच्या मध्वाचार्यांनी वेदान्ताच्या अधिकृत प्रस्थानत्रयीत द्वैतवादच सिद्ध झाला आहे, असे एक वेगळेच मत मांडले आहे.’

 

१ उ. म्हणे, हिंदु धर्माच्या पुनरुत्थानाचा आरंभ २१ व्या शतकाच्या प्रारंभी झाला !

अयोग्य विचार

‘हिंदु धर्माच्या पुनरुत्थानाचा आरंभ २१ व्या शतकाच्या प्रारंभी झाला.’

 

खंडण

२१ व्या शतकातील आधुनिक काळाच्या संदर्भात हिंदु धर्माचा पुनर्विचार, पुनर्विधान किंवा पुनरुत्थान या संकल्पनाच चुकीच्या आहेत; कारण हिंदु धर्म हा वैदिक धर्म असून तो नित्यनूतन (सनातन) आहे, त्यामुळे तो काळातीत असून कोणत्याही काळात आचरणीय आहे. पिढ्यान्‌पिढ्या धर्माचरण होत नसल्याने, तसेच स्वातंत्र्य मिळूनही आजचे शासन निधर्मीपणाने वागत असल्याने धर्माविषयीचे अज्ञान पसरले आहे. आधुनिक भोगवादी संस्कृतीमुळे समाजावर रज-तमाचे आवरण पसरले आहे. मात्र भारतीय हिंदूंचा मूळ पिंड हा धर्माधिष्ठित असल्याने त्यांच्यावरील आवरण काढण्यासाठी त्यांच्यामध्ये केवळ धर्माचरण आणि नीतीमूल्यांचे महत्त्व रूजवण्याची आवश्यकता आहे. सध्या त्या दृष्टीने समाजातील काही सत्‌प्रवृत्ती आणि संतमहात्मे कार्यरत आहेत.

Leave a Comment