ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या शिकवणीनुसार वासना (अपेक्षा करणे) या दोषावर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न

पू. श्री. शिवाजी वटकर

प्रा. के.वि. बेलसरे लिखित ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय’ हा ग्रंथ वाचला. त्यामध्ये ‘वासना’ या विषयावर महाराजांनी केलेले मार्गदर्शन मी अभ्यासले. याचा मला व्यष्टी साधनेच्या प्रक्रियेत उपयोग झाला. यामुळे ‘वासना’, या दोषावर मात करण्यासाठी मला पुष्कळ साहाय्य झाले. मला प्रा. के.वि. बेलसरे, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि ‘गुरुकृयोगानुसार साधनामार्गाचे जनक’ परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘संत दिसती वेगळाले, परि ते अंतरी मिळाले ।’, याचा अनुभव आला.

वासनेच्या संदर्भात गुरुकृपायोगानुसार व्यष्टी साधनेच्या अंतर्गत सांगितलेल्या उपायांनुसार कृती, मन आणि आध्यात्मिक स्तर यांवरचे जे प्रयत्न परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्याकडून करवून घेतले. ते पुढे देत आहे.

 

१. अनेक प्रयत्न करूनही ‘वासना’ या अहंच्या पैलूवर मात करता न येणे

मागील अनेक वर्षांपासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने माझे व्यष्टी साधनेच्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करण्यासाठीचे प्रयत्न चालू आहेत; मात्र ‘वासना’ या अहंच्या जटील पैलूवर मात करण्यास मी उणे पडत आहे. या दोषामुळे माझ्यातील ‘कर्तेपणा घेणे, सहनशीलता नसणे, काळजी करणे, इतरांचा विचार न करणे, भावनाप्रधानता, पूर्वग्रहदूषित असणे, हट्टीपणा, स्वेच्छा असणे’, इत्यादी दोष उफाळून येतात. हे दोष घालवण्यासाठी व्यष्टी साधनेच्या प्रक्रियेनुसार सारणीत चुका लिहिणे, स्वयंसूचना देणे, आढावा देणे, शिक्षा पद्धतीचा अवलंब करणे इत्यादी करूनही ‘वासना’ या माझ्या अहंच्या पैलूूंंवर मी पूर्णपणे मात करू शकलो नाही.

 

२. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी  ‘वासना नष्ट
झाल्याविना साधनेला आरंभ होणार नाही’, असे ग्रंथात स्पष्टपणे
सांगितल्यामुळे या दोषाचे गांभीर्य लक्षात येऊन त्याची व्याप्ती काढणे

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी वरील ग्रंथामध्ये ‘वासना नष्ट झाल्याविना साधनेला आरंभ होणार नाही’, असे स्पष्टपणे सांगितल्यामुळे या दोषाचे गांभीर्य माझ्या लक्षात आले. ‘महाराजांनी या दोषाविषयी स्पष्टपणे सांगून दोषाच्या मुळावरच घाव घातलेला आहे’, असे मला वाटले. तोपर्यंत ‘वासना’ हा अहंचा पैलू साधनेला अतिशय बाधक असूनही तो व्यष्टी साधनेच्या आढाव्याच्या सारणीत लिहिल्यावर किंवा स्वयंसूचना सत्रे करतांना मवाळ वाटत होता.

त्यानंतर मी माझ्यातील ‘वासना’ या अहंच्या पैलूची व्याप्ती काढली. तेव्हा खाणेपिणे, चांगले कपडे घालणे, शरिराला सुखसोयी मिळणे (पंखा, वातानुकूलित खोली, चारचाकी, पहिल्या वर्गाने प्रवास), कामवासना इत्यादी माझ्या शारीरिक स्तरावरील वासना असल्याचे लक्षात आले.

 

३. ग्रंथात केलेले मार्गदर्शन आणि त्यानुसार केलेले प्रयत्न

३ अ. वासना म्हणजे काय ?

३ अ १. मार्गदर्शन

‘वासनेच्या किंवा ‘हवे’पणाच्या तीन अवस्था आहेत. पहिली ‘आस’, दुसरी ‘हव्यास’ आणि तिसरी ‘ध्यास !’ ‘आस’ म्हणजे वस्तू नुसती हवीशी वाटणे. ‘हव्यास’ असतो, तेव्हा वस्तू नेहमीच आपल्याजवळ असावीशी वाटते, तर ‘ध्यासा’मध्ये त्या वस्तूविना इतर काहीच सुचत नाही. वासना म्हणजे ‘अभिमान’, ‘मीपणा.’ अशी ही वासना मनुष्याचा शत्रू आहे.’

३ अ २. कृतीच्या स्तरावर केलेले प्रयत्न

ध्यास लावणारी आणि भगवंतापासून दूर नेणारी कोणतीही इच्छा ही वासनाच असते. ‘माझ्यातील कोणत्या वासना कोणत्या टप्प्याला आहेत ?’, हे माझ्या लक्षात आले.

३ आ. वासनांचे स्वरूप

३ आ १. मार्गदर्शन

‘वासना प्रतिदिन नवीन नवीन खेळ आपल्याला दाखवते. खरे म्हणजे खेळ जुनेच असतात; पण आपली वासना मात्र नवी असते.’

३ आ २. मनाच्या स्तरावर केलेले प्रयत्न

‘माझ्या इच्छेप्रमाणे घडले पाहिजे’, असे मला वाटायचे. तसे नाही झाले, तर मला तीव्र प्रतिक्रिया येऊन वासनेमुळे माझ्याकडून प्रतिदिन चुका आणि प्रसंग घडत होते. माझे साधनेत लक्ष लागत नव्हते. ‘सर्व ईश्‍वरेच्छेने घडते. वासना माझ्याशी नवीन खेळ खेळत आहे’, हे संतवचन गुरुकृपेने समजल्यावर माझ्यातील वासना घालवण्याचे गांभीर्य वाढून देवाने माझ्याकडून प्रयत्न करवून घेतले.

३ इ. ‘भगवंताची वासना’ ही वासना नसणे

३ इ १. मार्गदर्शन

‘भगवंताची वासना’ ही वासना होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे कणिक अनेक वेळा चाळून गव्हाचे सत्व काढतात, त्याचप्रमाणे विषयाची वासना सर्व(तः) नाहीशी झाल्यावर जी उरते, ती ‘भगवंताची वासना’ होय.’

३ इ २. आध्यात्मिक स्तरावर केलेले प्रयत्न 

‘ईश्‍वरप्राप्तीची वासना’ असणे, म्हणजे ईश्‍वरप्राप्तीची तळमळ असणे. दिवसभरातील प्रसंगांतून भगवंत माझे प्रारब्ध अल्प करून माझी साधनेची तळमळ वाढवत आहे. माझ्या मनात येणारे विचार मायेतील असून साधनाच मला आनंद देणार आहे. साधनेचे ध्येय साध्य करण्यासाठी देवाने माझ्याकडून तळमळीने प्रयत्न करवून घेतले. ‘साधनेचे ध्येय गाठण्याचा प्रयत्न आणि तळमळ वाढवणे, ही वासना होऊ शकत नाही’, हे मला शिकायला मिळाले.

३ ई. वासना आणि देहबुद्धी यांचा संबंध

३ ई १. मार्गदर्शन

‘हिमालयावर ज्या वेळी आकाशातून बर्फ पडते, त्या वेळी ते अगदी भुसभुशीत असते; पण ते पडल्यावर काही काळाने दगडापेक्षाही घट्ट बनते. त्याप्रमाणे वासना ही सूक्ष्म आणि लवचिक आहे; पण आपण तिला देहबुद्धीने अगदी घट्ट बनवून टाकतो. मग ती काढायला फार कठीण जाते.’

३ ई २. केलेले प्रयत्न

माझ्यातील ‘परिस्थिती न स्वीकारणे, इतरांना समजून न घेणे, चिडचिडेपणा’ इत्यादी दोषांमुळे चुका होत होत्या. प्रश्‍न गंभीर होत असतांनाही माझ्या वासना वाढत होत्या. ‘वासनेला मीच खतपाणी घालत आहे’, हे मी या दोषाची व्याप्ती काढल्यावर देवाने माझ्या लक्षात आणून दिले.

 

४. हाव, म्हणजेच वासनेची पूर्ती न झाल्याने मनुष्य आशेवर अवलंबून
राहत असल्याने त्याला समाधान मिळत नसल्याचे ग्रंथात नमूद केलेले असणे

‘मनुष्य तेच तेच करत असूनही त्याला त्याचा कंटाळा कसा येत नाही ? कालच्याच गोष्टी आपण आज करतो. आपल्या लक्षात जरी आले नाही, तरी त्या गोष्टी झालेल्याच असतात. असे असतांना माणसाला त्याचा कंटाळा का येत नाही ? याचे कारण असे आहे की, विषय अत्यंत गोड तरी असला पाहिजे किंवा हावेला तृप्ती तरी नसली पाहिजे. या दोन कारणांपैकी दुसरे कारणच खरे आहे. ज्याची हाव, म्हणजे वासना पुरी झाली नाही, तो आशेवर अवलंबून असतो. या कारणाने त्याला समाधान मिळत नाही.’

 

५. वासनांच्या परिणामांवरून वासनांचे  गांभीर्य लक्षात येणे आणि
‘त्यावर त्वरित उपाय काढणे किती आवश्यक आहे ?’, याची जाणीव होणे

मी व्यष्टी साधना म्हणून नामजप करण्यास बसलो की, माझ्या मनात सारखे इतर विचार येत असत. त्यामुळे माझ्या मनाची एकाग्रता होत नव्हती. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रग्रंथात दिलेल्या वासनांच्या पुढील परिणामांवरून माझ्यातील वासनेचे गांभीर्य माझ्या लक्षात आले आणि त्यामुळे ‘त्यावर त्वरित उपाय काढणे किती आवश्यक आहे ?’, याची मला जाणीव झाली.

अ. ‘वासना ही विस्तवासारखी आहे. ज्या विस्तवाने सुंदर स्वयंपाक करून कढत आणि ताजे अन्न खायला मिळते, तोच विस्तव जर घरावर ठेवला, तर घर जाळून टाकतो. त्याचप्रमाणे वासना भगवंताकडे वळली, तर माणसाला आनंदरूप बनवते; पण जर विषयाकडे वळली, तर त्याला दुःखामध्ये लोटते.

आ. वासना ही लाडावलेल्या कुत्र्यासारखी आहे. तिला नुसते ‘हड् हड् ऽऽ’ करून ती बाजूला जात नाही. ‘चांगली वासना तेवढी आत येऊ द्यावी’, असे म्हणावे, तर तिच्या समवेत वाईट वासनाही हळूच आत येते आणि वाईट वासनेमध्ये चांगल्या वासनेला मारण्याचे बळ आहे; कारण आपण स्वतः वाईट वासनेच्या बाजूचेच आहोत.

इ. परमात्मा जसा चिरंजीव आहे, तशी वासनाही चिरंजीव आहे. आपली वासना आजही तशीच ताजीतवानी आहे.

ई. आपले मन वासनेच्या अधीन होऊन तात्पुरत्या सुखाच्या मागे गेल्यामुळे थप्पड खाऊन परत येते.

उ. वासनेमुळे चित्ताला समाधान नाही, हे मान्य असूनही वासनेचा जोर इतका विलक्षण आहे की, ती शेवटच्या श्‍वासापर्यंत जात नाही.

ऊ. काळ हा आपल्याला आशेत गुंतवून ठेवतो आणि शेवटपर्यंत सुख न देता आपले आयुष्य संपवतो.

ए. ‘मी आता कंटाळलो’, असे म्हटले, तरी वासना आपल्याला सोडत नाही.

ऐ. वासनेमुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि रात्रीपर्यंतची सगळी कर्मे एकमेकांत गुंतून गेली आहेत.

ओ. श्रीमंतांच्या गरजा मरेपर्यंत भागत नाहीत; कारण त्यांना वासना अधिक असते.

औ. म्हातारे आणि तरुण या सर्वांना वासना सारखीच आहे.

अं. देह ठेवतांना आपली वासना आपल्यासह येते.’

 

६. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी वासनेवर दिलेल्या
दृष्टीकोनांनुसार केलेल्या उपायांमुळे वासना नष्ट करण्यास साहाय्य होणे

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी सदर ग्रंथात दिलेले वासनेवरील पुढील दृष्टीकोन आणि विवरण यांच्या मंथनातून मी सर्वच स्तरांवर कृती केल्याने मला वासना नष्ट करण्यास साहाय्य झाले.

६ अ. दृष्टीकोन

‘वासनेचे झाड तोडण्यासाठी त्याच्या फांद्या (म्हणजे आपले ‘हवे-नको’पण) तोडाव्यात आणि शेवटी वासना मारावी.’

६ अ १. विवरण

‘मोठे झाड तोडायचे असेल, तर आपण आधी त्याच्या वरच्या फांद्या तोडतो; नंतर त्याचा बुंधा तोडतो. त्याचप्रमाणे वासनेचे झाड तोडण्यासाठी प्रथम त्याच्या फांद्या (म्हणजे आपले ‘हवे-नको’पण) तोडायला हव्यात. शेवटी वासना मारावी.’

६ अ २. कृती

मी समष्टीला बाधक असलेल्या तीव्र वासना नष्ट करण्यासाठी प्राधान्याने घेतल्या. ‘वासना’ हा साधनेचा शत्रू असला, तरी माझ्या दोषयुक्त मनाचा जीवलग मित्र आहे. यासाठी ‘मनाशी कठोर होऊन वासनेशी लढले पाहिजे’, हे माझ्या लक्षात आले. त्यानुसार ‘स्वयंसूचना सत्रे घेणे, प्रायश्‍चित्त आणि शिक्षा पद्धतीचा उपयोग करणे’, असे प्रयत्न देवाने माझ्याकडून करवून घेतले.

६ आ. दृष्टीकोन

‘आपल्याला जे मागायचे आहे, ते भगवंताजवळच मागावे.’

६ आ १. विवरण

‘आपल्याला जे मागायचे आहे, ते भगवंताजवळच मागावे. ‘त्याने ते दिले नाही, तर ते न देणे आपल्या हिताचे आहे’, अशी बुद्धी (आपल्यात) उत्पन्न होईल. त्यानेच पुढे वासना मरेल.’

६ आ २. कृती

मी वासना मरण्यासाठी पुढील आध्यात्मिक उपाय केले.

अ. मानस दृष्ट काढली.

आ. मनात येणारे नकारात्मक, वाईट आणि वासनेचे विचार कागदावर लिहून त्यावर कापूर टाकून जाळले, म्हणजे अग्नीसमर्पण केले.

इ. मी श्रीकृष्णाला शरण जाऊन आणि क्षमायाचना करून प्रार्थना वाढवल्या. ‘हे श्रीकृष्णा, माझ्या साधनेला आवश्यक तेच मला दे. माझ्या साधनेला बाधक गोष्टी मी मागितल्या, तरी तू त्या मला देऊ नकोस.’

ई. ‘सर्व ईश्‍वरेच्छेने घडते’, हा दृष्टीकोन मनावर बिंबवला.

६ इ. दृष्टीकोन

‘हवे आणि नको यांचा आग्रह नसावा; यातच वासनेचे मरण आहे.’

६ इ १. कृती

‘साधनेला आवश्यक ते असू दे. व्यवहारातील नसेल, तर नसू दे आणि मला परिस्थिती स्वीकारता येऊ दे’, असा दृष्टीकोन मी घेतला. दु:खदायक प्रसंग घडण्याला माझ्या पूर्वीच्या वासनाच कारणीभूत आहेत. माझ्या मनाच्या विरुद्ध घडणारे प्रसंग हे माझ्या वासना घालवण्यासाठीच आहेत. ‘देव मला मायेचे अशाश्‍वत रूप दाखवून त्यातून सोडवत आहे’, याची मला जाणीव झाली.

६ ई. दृष्टीकोन

‘आपण आपल्याच घरामध्ये पाहुण्यासारखे वागावे. असे वागण्याने वासना क्षीण होईल.’

६ ई १. कृती

प्रत्येक प्रसंगांत मी पाहुण्यासारखा आहे. मला साधना करणे, एवढेच कर्तव्य आहे. मला अन्य काहीच अधिकार नाही.

६ उ. दृष्टीकोन

‘आपल्याला मिळायचे तेवढेच मिळते; पण आपले ‘हवे-नको’पण, म्हणजेच आपली वासना गेली की, त्याचे सुख-दुःख राहत नाही. विषयाचा आनंद मारायला हाच उपाय आहे.’

६ उ १. कृती

प्रारब्धभोग भोगून मोक्षप्राप्तीसाठी आपल्याला मानव जन्म मिळाला आहे. प्रारब्धानुसार भगवंत आपल्याला मायेतील गोष्टी देतो. असे असतांना ‘हवे-नको’ म्हणणे, म्हणजे ‘भगवंतापेक्षा मला अधिक कळते’, असे झाले.

६ ऊ. दृष्टीकोन

‘वासना मारायला ‘भगवंताचे अधिष्ठान असणे’, हा एकच उपाय आहे. वासना ही दुसर्‍या कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून आपण जर भगवंताजवळ ‘वास ठेवला’, तरच ती नष्ट होते. ‘वासना’ (‘वास-ना’) म्हणजे विषयाजवळ ‘वास नको.’

६ ऊ १. कृती

‘भगवंताचे अधिष्ठान म्हणजे चैतन्यशक्ती ! त्यामध्येच आनंद आहे. ते सत्य आणि शाश्‍वत आहे. त्यामुळे तेथे वासनेचे अस्तित्व राहत नाही’, असे परात्पर गुरु पांडे महाराज यांनी मार्गदर्शन केले. तेव्हा त्यांच्याच कृपेने माझ्या चित्तावरील अनेक जन्मांचे रज-तमाचे आवरण अल्प करण्याचे प्रयत्न देवाने करवून घेतले. देवाने माझ्याकडून नामजप, सत्संग, सेवा इत्यादी भावपूर्ण करण्याचे प्रयत्न करवून घेतले आणि मानसपूजा, भावप्रयोग, गुरुस्मरण वाढवण्याचेही प्रयत्न करवून घेतले.

६ ए. दृष्टीकोन

‘राम कर्ता’ या भावनेने वासनेची नांगी मोडा.’

६ ए १. कृती

कर्तेपणामुळे वासनेचे विचार येतात; मात्र ‘भगवंतच कर्ता-करविता आहे’, हे लक्षात आले, तर कर्तेपणाचा अहं राहत नाही. अहं उणावल्यामुळे परेच्छेने राहता येऊन ईश्‍वरेच्छेने वासना न जोपासता राहता येते. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार ‘भगवंताला, म्हणजे चैतन्याला पुढे आणून कार्य करायचे आहे. तोच कर्ता-करविता आहे. मला केवळ साक्षीभावाने पाहायचे आहे’, यामुळे माझे कर्तेपणाचे विचार उणावले.

६ ऐ. दृष्टीकोन

‘लोक समजतात, तितके वासनेला जिंकणे कठीण नाही. ‘जी गोष्ट आपल्या हातात नाही, तिच्याविषयी वासना करणे, हे वेडेपणाचे आहे’, हे ध्यानात ठेवावे; म्हणून विचार आणि नाम यांनी वासनेला निश्‍चितच जिंकता येईल. आपले कर्तेपण आपोआप मरून जाईल.’

६ ऐ १. कृती

मी माझ्यातील तीव्र वासनायुक्त विचार सारणीत लिहिले. त्यावर सूचना लिहिल्या आणि व्यष्टी आढाव्यात सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन स्वयंसूचना दिल्या. त्यावर योग्य दृष्टीकोन घेतले. त्यामुळे सकारात्मकता वाढली. त्यांनी मला नामजपाचे उपाय करण्यास सांगितले.

६ ओ. दृष्टीकोन

‘जो नामात राहिला, त्याचा वासनाक्षय झाला.’

६ ओ १. कृती

गुरुकृपायोगात नामसाधनेला महत्त्व आहे. नाम चांगले होण्यासाठी मनातील विचार गेले पाहिजेत. विचार घालवण्यासाठी, म्हणजेच वासनाक्षय करण्यासाठी व्यष्टी आढावा घेणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याकडून स्वयंसूचना समजावून घेतल्या, उदा. ‘जेव्हा माझ्या मनात …….वासनेचे विचार येतील, तेव्हा मला त्याची जाणीव होईल आणि ‘यामुळे मी भगवंतापासून दूर जात आहे’, हे लक्षात घेऊन मी माझे लक्ष नामजपाकडे देईन.’

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांजवळ बसून जप करणे’, ‘श्रीकृष्णाला हृदयात बसवणे’, ‘माझ्यापेक्षा तेच दोघे नामजप करत आहेत’ इत्यादी भाव ठेवून मला नामजप करण्यास सुचवले. त्यामुळे माझ्या मनातील विचारांचे प्रमाण अल्प होऊन माझा नामजप चांगला होऊ लागला.

६ औ. दृष्टीकोन

‘परमार्थ सोपा नाही. त्याच्यासाठी निदान वाईट वासना तरी माराव्यात आणि चांगल्या वासनासुद्धा नीती अन् धर्म यांना धरून असतील, तेवढ्याच भोगाव्यात.’

६ औ १. कृती

येथे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी परमार्थ करण्यासाठी वासना मारण्याचे महत्त्व सांगितले आहे. प्रत्येक वासना ही चूकच असते आणि ती भगवंतापासून आपल्याला दूर नेते. त्यामुळे ‘गुरुकृपायोगा’नुसार साधनेमध्ये स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

 

७. वासनानिर्मूलनासाठी अन्य गोष्टींकडून प्रेरणा घेऊन केलेले कठोर प्रयत्न

७ अ. स्वयंसूचना देणे

अध्यात्म हे कृतीचे शास्त्र असल्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘स्वयंसूचनायोग’ या अंतर्गत ‘वासना कशा मारायच्या ?’, हे सांगून करवून घेतले आहे. स्वयंसूचना दिल्याने वासनांचा १०० टक्के क्षय होतो, याची देवाने मला अनुभूती दिली.

७ आ. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या आढाव्यातून मिळालेली प्रेरणा

‘व्यष्टी साधना सहजासहजी किंवा सुखासुखी होत नसते. त्यासाठी स्वतःच्या मनाशी कठोर राहून प्रयत्न केले पाहिजेत’, असे सद्गुरु श्री. राजेंद्र शिंदे यांनी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगितल्याने मला त्यातून प्रेरणा मिळाली.

७ इ. प्रायश्‍चित्त घेणे

माझे प्रयत्न अल्प झाले किंवा मी सवलत घेतली, तर माझा स्वतःशी कठोर वागून प्रायश्‍चित्त आणि शिक्षा घेण्याचा भाग वाढला. त्यानुसार मी स्वतःशी कठोर राहून माझ्या अहंयुक्त मनाला दयामाया न दाखवता शिक्षा घेतली.परिणामी कठीण प्रसंग असतांनाही गुरुमाऊलीने माझ्याकडून साधनेचे प्रयत्न करवून घेतले.

 

८. वासना नष्ट झाल्याने होणारे लाभ

‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी वासना नष्ट झाल्यावर कोणते लाभ होतात, याचे सार संक्षिप्त रूपात पुढीलप्रमाणे सांगितले आहे.

अ. ‘जो जिवंतपणी वासनारहित राहिला, त्याला सुखदुःख नाही.

आ. वासना नष्ट झाल्यावर बुद्धी भगवंतस्वरूप होईल.

इ. जेथे वासना संपली, तेथेच भगवंताची कृपा झाली.’

 

९. कृतज्ञता

जटील व्याधी दूर करण्यासाठी आयुष्यभर वैद्यांचे उपचार घ्यावे लागतात. ते सांगतील त्याप्रमाणे पुनःपुन्हा फेरतपासणीसाठी जावे लागते. ते सांगतील त्यानुसार महागडे आणि वेळखाऊ उपचार करावे लागतात. मला ‘वासना’ या दोषरूपी महारोगातून बाहेर काढणारे (बरे करणारे) श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

Leave a Comment