अहं-निर्मूलन : ईश्‍वराशी एकरूप होण्याचा सर्वोत्तम मार्ग !

व्यक्‍तीमध्ये अहंचा थोडा जरी अंश असला, तर तिला ईश्‍वरप्राप्ती होणार नाही. यासाठी साधना करत असतांना अहं-निर्मूलनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्‍न करणे आवश्यक असते. प्रार्थना, कृतज्ञता, शारीरिक सेवा यांसारख्या कृतींनी अहं अल्प होण्यास मदत होते.

 

१. अहंचे दुष्परिणाम

१ अ. अहंमुळे दुःख होणे

मी कर्ता ऐसें म्हणसी । तेणें तूं कष्टी होसी ।
राम कर्ता म्हणतां पावसी । यश कीर्ति प्रताप ॥ ३६॥
– दासबोध, दशक ६, समास ७, ओवी ३६

भवार्थ : अहं जितका जास्त, तितकी व्यक्‍ती जास्त दुःखी होते. मनोरुग्णांचा अहं सर्वसाधारण व्यक्‍तीपेक्षा जास्त असल्यामुळे ते जास्त दुःखी असतात. माझी संपत्ती, माझे शरीर असे विचार असले, तर स्वतःची संपत्ती न्यून झाली किंवा स्वतःच्या शरिराला रोग झाला, तर व्यक्‍ती दुःखी होते; पण दुसर्‍यांसंबंधी तसे घडल्यास ती व्यक्‍ती दुःखी होत नाही. अहंमुळे मनाला होणारे दुःख हे काही वेळा शारीरिक वेदनेपेक्षाही अधिक त्रासदायक असते. याउलट संत सर्वच परमेश्‍वराचे समजतात, स्वतःचे काहीएक समजत नाहीत; म्हणून ते कधी दुःखी होत नाहीत, नेहमीच आनंदात असतात.

१ आ. अहंकार हाच सर्व दुःखांचे मूळ

`वासना आहे म्हणून आसक्‍ती आहे, अहंकार आहे. अहंकार म्हणजेच स्वार्थ, अभिमान, देहबुद्धी. अहंकार हाच घाव आहे, हीच आग आहे. अहंकारच दुःख आणि पीडा देतो. अहंकारच पुनर्जन्माचे मूळ आहे. एक अहंकार नष्ट झाला की, सगळी दुःखे समूळ नष्ट होतात. अहंकार गेला की, प्रसन्नता, शांती, विश्रांती आणि आनंद लाभतो.’

१ इ. अहंमुळे खर्‍या अर्थाने सुख उपभोगता न येणे

अहंचा त्याग केल्याविना सामान्य सुखसुद्धा उपभोगता येत नाही, उदा. आवडता पदार्थ खायचे सुख उपभोगतांना आपण एखादे मोठे प्राध्यापक, श्रीमंत मनुष्य अथवा कोणीतरी मोठे आहोत, याची आठवण ठेवली, तर ते सुख कधीच उपभोगता येणार नाही. कोणतेही भौतिक सुख उपभोगतांना जर आपल्याला आपले पद वा विद्वत्ता यांचा विसर पडला, तरच ते सुख खर्‍या अर्थाने उपभोगता येते.

१ ई. अहंयुक्‍त कर्माचा नाश, तर निष्काम भावाने केलेले कर्म अमर होणे

अहंयुक्‍त कर्माच्या संदर्भात ‘कालः पिबति तद् रसम् ।’; म्हणजे ‘काळ त्याचा रस पिऊन टाकतो’, असे सांगितले आहे. याचाच अर्थ अहंयुक्‍त कर्म काळाच्या ओघात नाश पावते. याचे महत्त्व पूर्वीच्या काळी ठाऊक असल्याने ऋषीमुनीच नव्हे, तर प्रत्येक जणच स्वतःचे नाव किंवा कीर्ती यांची यत्किंचितही अपेक्षा न ठेवता निष्काम भावाने कर्म करत. याचे उत्तम आणि सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणजे आपले वेद अन् प्राचीन शिल्पे. वेदांवर कोणाचेही नाव लिहिलेले किंवा शिल्पांवर कोणाचेही नाव कोरलेले नाही; म्हणूनच वेद अमर आणि शिल्पकृती चिरंजीव आहेत.

१ उ. अहं सर्वच नष्ट करतो

जरा रूपं हरति धैर्यमाशा मृत्युः प्राणान् धर्मचर्यामसूया ।
क्रोधः श्रियं शीलमनार्यसेवा ह्रियं काम: सर्वमेवाभिमानः ।। – महाभारत, उद्योगपर्व, अध्याय ३५, श्‍लोक ४३

अर्थ : म्हातारपण रूप हिरावून नेते, आशा धैर्य नष्ट करते, मृत्यू प्राण हरण करतो, द्वेष धर्माचरणाचा नाश करतो, क्रोध संपत्ती नष्ट करतो, अनार्य (असंस्कृत) माणसांची सेवा करण्याने शील भ्रष्ट होते, काम लज्जा नाहीशी करतो आणि अभिमान (अहं) हा सर्वच नष्ट करतो.

१ ऊ. दानाचा लाभ न मिळणे

महाभारतात पुढील कथा आहे. एकदा एक ब्राह्मण आणि त्याचे कुटुंबीय स्वतः उपाशी असतांना त्यांच्या वाट्याचे अन्न त्यांनी दारी आलेल्या वृद्ध अतिथीला भिक्षा म्हणून देऊन टाकले. तो वृद्ध अतिथी अन्न खाऊन तृप्त झाला. नंतर त्याने हात धुतले. तेवढ्यात तेथे एक मुंगूस आले आणि हात धुतलेल्या ठिकाणी पाण्यात त्याने अंग घुसळले, तेव्हा त्या मुंगसाचे अर्धे शरीर सोनेरी झाले. ही वार्ता सर्वत्र पसरली. धर्मराजाला हे समजल्यावर त्याच्या मनात विचार आला, ‘आपण तर लक्षावधी लोकांना जेऊ घालतो. जर येथे मुंगूस आले आणि त्याने शरीर घुसळले, तर मुंगसाचे उरलेले अर्धे शरीरही सोनेरी होईल.’ मुंगूस आले, त्याने तसे केले; परंतु त्याचे अर्धे शरीर सोनेरी मात्र झाले नाही. धर्मराजाने याचे कारण विचारल्यावर श्रीकृष्ण म्हणाला, ‘‘तुला अहं झाला आहे की, मीच जेवू घालू शकतो, अन्नदान करू शकतो. त्यामुळे मुंगसाचे शरीर सोनेरी झाले नाही.’’

१ ए. खरी साधना न होणे

‘मी’पणावीण साधन । करू जाणे तोची धन्य ।

 

२. अहं अल्प करण्याचे उपाय

ईश्‍वर म्हणजे शून्य अहं; म्हणून आपल्यातील अहं नष्ट करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ईश्‍वरासारखे होण्याचा, म्हणजेच ईश्‍वराशी एकरूप होण्याचा प्रयत्‍न करणे. ईश्‍वराशी एकरूप होणे म्हणजे त्याचे विविध गुण आपल्या अंगी आणणे होय. यासाठी प्रतिदिन करावयाचे प्रयत्‍न म्हणजे साधना. ही साधना कशी करायची, हे पुढे दिले आहे.

२ अ. सेवा

१. अमुक एक सेवा श्रेष्ठ आणि अमुक एक सेवा कनिष्ठ असे न मानता ‘सेवा म्हणजे आपले तन, मन, धन, बुद्धी अन् अहं अर्पण करण्याचे माध्यम आहे’, असा भाव ठेवावा.

२. सेवा करतांना ‘मी सेवक आहे’, असा भाव ठेवावा.

३. शूद्रवर्णाच्या सेवेने, उदा. भांडी घासणे, झाडलोट करणे, प्रसाधनगृहाची स्वच्छताइत्यादींनी अहं लवकर न्यून होण्यास साहाय्य होते.

२ आ. चूक मान्य करण्याची वृत्ती ठेवणे

मनुष्य ईश्‍वरासारखा परिपूर्ण नसल्याने त्याच्याकडून चुका होणारच. प्रत्येकाकडूनच कोणत्या ना कोणत्या स्तरावर अल्प- अधिक प्रमाणात चुका होतच असतात; पण बर्‍याचदा सामान्य व्यक्ती अाणि साधकस्वतःमधील अहंमुळे त्याच्याकडून एखादी चूक झाल्यास ती मान्य करायला सिद्ध नसतो. चूक मान्य न करणे म्हणजे स्वतःमधील अहंला खतपाणी घालणे, तर ‘मी चुकलो’, असे म्हणणे म्हणजे स्वतःचा अहं अल्प करण्याचा प्रयत्‍न करणे होय. पहिल्या टप्प्यात चूक मान्य करण्यास शिकावे, तर दुसर्‍या टप्प्यात चुकीविषयी ईश्‍वराची आणि ज्या व्यक्‍तीच्या संदर्भात चूक घडली, तिची क्षमा मागावी. यामुळे अहं आणखी अल्प होण्यास साहाय्य होते.

२ इ. नम्रता

‘विद्या विनयेन शोभते ।’ असे सुवचन आहे. विनय नसला, तर अहं आला, म्हणजे अविद्या येते. एखादा कितीही ज्ञानी झाला, तरी त्याला ईश्‍वराइतके ज्ञान होत नाही; म्हणून ती उणीव विनयाने भरून काढावी, म्हणजे ईश्‍वराइतके ज्ञान होते. प्रत्येक व्यक्‍ती आणि गोष्ट यांच्याविषयी आपण जितके अधिक नम्र होऊ, तितका आपला अहं लवकर अल्प होतो.

२ ई. सतत दुसर्‍यांना शिकवत रहाण्यापेक्षा इतरांकडून शिकण्याची वृत्ती ठेवणे

सतत शिकत रहाणे, हे मनुष्याच्या स्वभावाचे एक वैशिष्ट्य आहे; मात्र काही जणांना याचा विसर पडल्याने ते सतत दुसर्‍यांना शिकवण्याचेच काम करतात. यामुळे ‘आपण कोणीतरी मोठे आहोत आणि आपले सर्व जण ऐकतात’, असे वाटून अहं वाढतो. याउलट जिथे शिकण्याची वृत्ती असते, तिथे आपल्यात अज्ञान असल्याची जाणीव असते आणि जिथे अज्ञान आहे, तिथे अहं नसतो.

२ उ. कौतुकाची अपेक्षा न ठेवणे

कौतुकाची अपेक्षा ठेवणे, हे अहंचेच निर्देशक आहे. सर्वच गोष्टी गुरूंच्या किंवा ईश्‍वराच्या इच्छेनुसार वा नियमानुसार होत आहेत, असा भाव नेहमी ठेवला, तर कौतुकाची अभिलाषा निर्माण होत नाही. तसेच एखाद्याकडून स्वतःचे कौतुक झाल्यास त्या कौतुकाचे रूपांतर साधनेच्या दृष्टीने काहीतरी शिकण्यात केले, तर त्या कौतुकाचा अहं निर्माण होत नाही.

२ ऊ. स्वतःची तुलना स्वतःपेक्षा श्रेष्ठ लोकांशी करणे

बालपणीची जी अहंरहित वृत्ती असते, ती मोठेपणी नष्ट होण्यास मुख्यत्वे दोन गोष्टी कारणीभूत ठरतात – विद्या आणि पैसा. या दोन्हींमुळे ‘मला काहीतरी कळते आणि मी कुणीतरी श्रेष्ठ आहे’, ही वृत्ती निर्माण होते. हीच वृत्ती पुढे घातक ठरते. यासाठी प्रत्येकाने स्वतःची तुलना स्वतःपेक्षा श्रेष्ठ लोकांशी करावी, उदा. गायनात प्रवीण असलेल्याने आपल्यापेक्षा श्रेष्ठ गायकाशी, कार्यालयात काम करणार्‍याने आपल्यापेक्षा उच्च पदावर असलेल्याशी स्वतःची तुलना करावी. त्याचप्रमाणे साधकाने आपल्यापेक्षा उन्नत असलेल्या साधकाशी स्वतःची तुलना करावी. संत कबीरसुद्धा स्वतःच्या भक्तीची तुलना गोपींच्या भक्तीशी करतांना पुढीलप्रमाणे सांगतात – ‘कबीर, कबीर’ म्हणून माझे कौतुक काय करता ? यमुनेच्या तिरावर जाऊन पहा. एकेका गोपीच्या कृष्णावरील प्रेमात लाखो कबीर वाहून जातील.

२ ए. लहान मुलांशी खेळणे

लहान मुलांशी खेळल्याने थोड्या प्रमाणात तरी आपण आपला ‘मोठे’पणा विसरतो.

२ ऐ. स्वतःविषयी इतरांना काही न सांगणे

स्वतःचे सुख-दुःख, प्रपंचातील घडामोडी इत्यादी जेव्हा एखादा दुसर्‍यांना सतत सांगतो, तेव्हा त्याच्यात देहबुद्धी फार असते. स्वतःविषयी इतरांना काही न सांगितल्याने देहबुद्धी आपोआप न्यून होऊ लागते.

२ ओ. कुटुंबियांशी वागतांना स्वेच्छेपेक्षा परेच्छेने वागणे

२ औ. ‘मी’, ‘माझे’ असा उल्लेख करण्याचे टाळणे

‘मी’, ‘माझे’ असा उल्लेख न करण्याने किंवा करायचा झाल्यास ‘तो’, ‘त्याचे’, ‘गुरूंचे’ असा तृतीय पुरुषी उल्लेख स्वतःसंबंधी करण्याने ‘मी’ची भावना न्यून व्हायला साहाय्य होते. व्यावहारिकदृष्ट्या तसे करणे कठीण असले, तरी ते शक्य आहे. ‘ऋषीमुनी, संतमहात्मे हेसुद्धा ‘मी’चा उल्लेख करणे कसे टाळायचे’, ते पुढील काही उदाहरणांवरून कळेल.

अ. पूर्वीच्या बर्‍याच आध्यात्मिक लिखाणांत ऋषीमुनींनी पुढीलप्रमाणे लिहिले आहे.

१. ‘तू विचारलेला प्रश्‍नच एकाने नारदांना विचारला होता. त्यांनी जे उत्तर दिले, तेच मी सांगतो.’

२. ‘एकदा एकाने ब्रह्मदेवाला हाच प्रश्‍न विचारला होता, तेव्हा ब्रह्मदेवाने असे उत्तर दिले.’

३. ‘पार्वतीच्या प्रश्‍नाला उत्तर देतांना शिव म्हणाला.’

आ. बर्‍याच ऋषीमुनींनी स्वतःची नावे वेद-उपनिषदांत लिहिलेली नाहीत.

इ. संत ज्ञानेश्‍वर उपदेश करतांना ‘निवृत्ती प्रसादे । ज्ञानदेव बोले ।’, असे सांगायचे.

संदर्भ : सनातन-मिर्मित ग्रंथ ‘अहं-निर्मूलनासाठी साधना’

1 thought on “अहं-निर्मूलन : ईश्‍वराशी एकरूप होण्याचा सर्वोत्तम मार्ग !”

Leave a Comment