गुरुदेवांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’ मुळे होणारी मनोलय आणि बुद्धीलय यांची प्रक्रिया !

पू. के. उमेश शेणै

 

१. साधनेत मन निर्मळ आणि बुद्धी सात्त्विक करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व !

१ अ. अंतर्मनावरील संस्कार नष्ट केल्यास आपल्याला चैतन्याची, म्हणजेच निजस्वरूपाची जाणीव होणे शक्य !

‘साधनेत मन निर्मळ आणि बुद्धी सात्त्विक करणे, याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मन पळणारा घोडा, तर बुद्धी त्याचा लगाम आहे. ‘मन एव मनुष्याणाम् कारणम् बंध मोक्षयोः ।’ या सुवचनानुसार मनच आपले बंधन आणि मोक्ष यांना कारण आहे. या मनाचा निग्रह करून अंतर्मनावरील संस्कार नष्ट केल्यास आपल्याला चैतन्याची, म्हणजेच निजस्वरूपाची जाणीव होते. संस्कारजन्य मन निरनिराळ्या प्रकृती निर्माण करते; म्हणूनच गुरुदेवांनी सांगितलेले साधनेचे मूलभूत तत्त्व ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’ हे आपल्याला मनोलय आणि बुद्धीलय यांसाठी उपयोगात आणावे लागते.

१ आ. मनोलयाच्या प्रक्रियेत स्वेच्छेला स्थान नसल्याने ‘मनाविरुद्ध वागणे’ ही साधना असणे

बिंब-प्रतिबिंब न्यायानुसार प्रत्येक व्यक्तीचे बोलणे, कृती आणि वागणे यांतून त्याचे संस्कार जागृत होऊन तो त्यानुसार वागतो. एवढेच नव्हे, तर पंचेंद्रियांच्या प्रभावामुळेही संस्कार जागृत होतात. त्यांना लगाम घालण्याच्या दृष्टीनेच गुरुदेवांनी ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ या ग्रंथात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाला प्राधान्य दिले आहे. मनोलयाच्या प्रक्रियेत स्वेच्छेला स्थान नाही. मन स्वेच्छापूर्तीसाठी त्याला वाटेल, तसे वागते. यासाठी गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे ‘मनाविरुद्ध वागणे’ हीच साधना आहे. कलियुगात सर्वसामान्य व्यक्तीत ५० टक्केे स्वभावदोष असतात. गुरुकृपेमुळे आम्हा साधकांना स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याची संधी लाभली आहे.

 

२. स्वेच्छा, परेच्छा आणि ईश्‍वरेच्छा

२ अ. ‘स्वेच्छा म्हणजे मन आणि बुद्धी यांच्या तालावर नाचणे’,
असे असून अशी व्यक्ती अहंची परमावधी गाठून देवापासून पुष्कळ दूर जाणे 

स्वेच्छा म्हणजे मन आणि बुद्धी यांच्या तालावर नाचणे ! स्वभावदोष आणि अहं यांचे प्राबल्य अधिक असतांना व्यक्ती स्वेच्छेच्या बंधनात असते. मनाला वाटेल तसे वागणे, मनावर किंचितही नियंत्रण नसणे, ‘आपल्या मनाप्रमाणे झाले पाहिजे’, असे वाटणे, म्हणजे स्वेच्छा ! अशी व्यक्ती पशूप्रमाणे ‘मी’, ‘माझ्यासाठी’ आणि ‘माझ्यामुळे’ या चक्रव्यूहात अडकलेली असते. अशा व्यक्तीमध्ये देहबुद्धी असते आणि आवड-नावड जागृत असतात. स्वेच्छेची परमावधी म्हणजे दुःख ! अशा व्यक्तीला मनोलय आणि बुद्धीलय प्रक्रिया कठीण वाटते. साधनेतही अशी व्यक्ती स्वत:च्या मनाप्रमाणे साधना करते आणि प्रगती न झाल्याने निराश होते. व्यक्तीने स्वत:च्या मनाने केलेल्या साधनेमुळे अहं निर्माण होतो आणि ‘मी करत असलेली साधना श्रेष्ठ आहे’, अशा मनोधारणेमुळे प्रगती होत नाही. अशी व्यक्ती शिकण्याच्या स्थितीत न रहाता इतरांना शिकवण्यात मग्न रहाते, म्हणजेच विचारणे, ऐकणे, स्वीकारणे किंवा समजून घेणे या स्थितीत नसते. त्यामुळे ती कारणदेह आणि महाकारणदेह यांच्या अधीन होऊन अहंची परमावधी गाठून देवापासून पुष्कळ दूर जाते.

२ आ. परेच्छेमुळे मनाविरुद्ध लढणे शक्य होत असल्याने समष्टी साधनेमुळे साधक परेच्छेने वागू शकणे

उत्तम मार्गदर्शन, तीव्र इच्छाशक्ती आणि साधनेचे बळ यांद्वारे व्यक्ती परेच्छेकडे वळणे शक्य आहे. यामुळेच गुरुदेवांनी आपल्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया चालू केली आहे. परेच्छेत मनोलय आणि बुद्धीलय यांचा मार्ग सुगम असतो. इथे साधक स्वतःला विसरतो. तो ‘मी इतरांसाठी काय करू शकतो ? माझ्या मनाचा त्याग कसा करू ?’, या चिंतनात असतो. इतरांच्या इच्छा आणि आकांक्षा यांच्याशी समरस झाल्यावरच स्वत:चे कार्य सुलभ होते. गुरुकार्याची तळमळ असल्यास सेवेच्या संदर्भात पुष्कळ वेळा परेच्छेने वागावे लागते. वरचेवर सेवेत होणार्‍या पालटामुळे, तसेच तातडीच्या सेवांच्या संदर्भात वेळ आणि काळ यांच्या बंधनातून बाहेर पडण्यासाठी परेच्छेला मान्यता द्यावी लागते. इथे मनोलयाच्या प्रक्रियेला प्रारंभ होतो. यासाठी गुरुदेव साधकांना समष्टी साधना करण्यासाठी प्रेरित करत आहेत. इतरांचे विचार ऐकणे, त्यांना प्रोत्साहन देणे, समजावून सांगणे, शांतपणे उत्तर देणे आदी प्रक्रियेमुळे मनोलय होतो. परेच्छेमुळे साधक इतरांचे मन त्वरेने जिंकून आपल्या मनाला हरवू शकतो. यामुळे मनाविरुद्ध लढणे शक्य होते.

२ आ १. ‘स्वेच्छा म्हणजे विघटन’ आणि ‘परेच्छा म्हणजे संघटन’, असल्याने साधक समष्टीचे नेतृत्व करण्यास पात्र होणे

समष्टी साधनेमुळे साधकाचे जेवण-खाणे, झोप, आरोग्य, पोशाख आदी गोष्टींकडे लक्ष देणे न्यून होऊन त्याची देहबुद्धी नष्ट होऊ लागते. समष्टी सेवेत अन्य विचारधारांच्या व्यक्ती, संघटना, तसेच धर्माभिमानी यांच्यासह सेवा करतांना त्यांचे ऐकून घेणे, त्यांच्या मताला अनुमोदन देणे, एकत्रित निर्णय घेणे आदी कृती करतांना साधकाला परेच्छेने वागण्याविना पर्याय रहात नाही. परेच्छा सर्व संघटना, व्यक्ती, विविध विचारधारांच्या व्यक्ती यांना एकत्रित करून कार्य करण्याची इच्छा निर्माण करते; म्हणून संघटनेच्या दृष्टीने ‘स्वेच्छा म्हणजे विघटन’ आणि ‘परेच्छा म्हणजे संघटन !’ इतरांचे मन समजून घेण्याच्या मोठ्या ध्येयासाठी आपले मन मारण्याचे विचार येताच साधक समष्टीचे नेतृत्व करण्यास पात्र होतो. यामुळे सर्वांना आपल्यासह घेऊन जाण्याची वाट सुगम होते. जेव्हा साधक आपली व्यष्टी साधना नियमित करतो, तेव्हाच त्याला समष्टी साधनेत यश प्राप्त होते.

२ इ. ईश्‍वरेच्छा

२ इ १. कर्तृत्व, अहंभाव आणि अपेक्षा यांचा त्याग होऊन शरणागतभाव जागृत झाल्यावर ‘सर्व ईश्‍वरेच्छेनेच होते’, अशी अनुभूती येते 

ईश्‍वरेच्छेचा पाया परेच्छेत आहे. स्वतःकडून काही चूक झाल्यास ‘माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांच्या प्रकटीकरणामुळे हा प्रसंग घडला असून ‘मी कुठे चुकलो ?’ याचा विचार करून साधक अंतर्मुख होतो. अंतर्मुखता म्हणजे आत्मस्वरूपाकडे प्रयाण, म्हणजे देवाशी अनुसंधान ! ईश्‍वरेच्छेकडे प्रयाण करतांना कर्तृत्व, अहंभाव आणि अपेक्षा यांचा त्याग व्हावा लागतो. तेव्हाच शरणागतभाव जागृत होतो आणि ‘सर्व ईश्‍वरेच्छेनेच होते’, अशी अनुभूती येऊ लागते. जेव्हा साधकाला ‘सर्व ईश्‍वरेच्छेनेच घडते’, हे लक्षात येते, तेव्हा त्याचे मन शांत आणि स्थिर होते. ‘मी काहीच करत नसून सर्व ईश्‍वरेच्छेनेच घडते’, या अनुभूतीमुळे तो निश्‍चिंत होतो. तो बुद्धीचा उपयोग करून ‘असे का झाले ? कुणामुळे झाले ?’ असा विचार न करता त्याचा स्वीकार करतो. यातून ‘देव मला शिकवत आहे. देवानेच माझ्या साधनेसाठी हा प्रसंग निर्माण केलेला आहे’, असे म्हणून तो ईश्‍वरेच्छेला शरण जातो. आपले मन आणि बुद्धी देवाला अर्पण केल्यावर (शरण गेल्यावर) ‘देवच सर्व करतो’, याची अनुभूती त्याला येते. शरणागतभाव निर्माण झाल्यावर स्वतः भगवंतच साधकाकडे धावत येऊन त्याचे कार्य करतो.’

२ इ २. ‘सर्व ईश्‍वरेच्छेनेच घडते’, याची जाणीव झाल्यावर मनोलय आणि बुद्धीलय होऊ लागून दैवी विचार येण्यास प्रारंभ होणे

‘सर्व ईश्‍वरेच्छेनेच घडते’, असे म्हटल्यावर बुद्धीला कामच काय ? ईश्‍वरेच्छा म्हणून सर्व स्वीकारणार्‍या साधकाला प्रत्येक प्रसंगात दैवी साहाय्य लाभते. मनोलय आणि बुद्धीलय या टप्प्यावर दैवी कृपेमुळे दैवी विचार येण्यास प्रारंभ होऊन त्याला अनेक आध्यात्मिक अनुभूती येऊ लागतात. मनोलय आणि बुद्धीलय होऊन विश्‍वमन अन् विश्‍वबुद्धी यांत प्रवेश करणे साध्य होते. गीतेत श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे ‘तुझ्या शक्तीची शक्ती मी आहे, तुझ्या मनाचे मन मीच आहे, तुझ्या बुद्धीची बुद्धी मी आहे’, म्हणजे सर्वकाही तोच आहे ! त्याला संपूर्ण शरण जाणे, म्हणजे ईश्‍वरेच्छेला शरण जाणे. बुद्धीलयाच्या संदर्भातही ‘मी देवाची सेवा आणखी चांगली कशी करू ?’, अशी उत्कट तळमळ निर्माण झाल्यावर त्याला भगवंताला शरण जाण्यावाचून अन्य पर्यायच नाही. इथेही त्याला बुद्धी भगवंताच्या चरणी अर्पण केल्यावर मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील विचार येऊ लागतात.

 

३. साधना हे एक प्रकारचे युद्धच असून
मनाविरुद्धच्या लढ्यात बुद्धी आणि मन यांची शरणागती असणे अत्यावश्यक !

अशा प्रकारे अष्टांग साधनेत साधना करणारे आणि करवून घेणारे गुरुदेवच आहेत. प्रार्थना, कृतज्ञता, भाव आणि शरणागती यांमुळेच सर्व होते. ‘मी करतो’, हा अहंभाव नष्ट होताच कृपाळू गुरुदेव सर्व भरभरून देतात. साधना हे एक प्रकारचे युद्धच आहे. षड्र्िपू, स्वभावदोष आणि अहंभाव नष्ट करणे, म्हणजे मनाविरुद्ध लढाच आहे. या लढ्यात देवाचे अधिष्ठान असले, तर विजय निश्‍चित ! त्यासाठी आपले मन आणि बुद्धी यांची शरणागती अत्यावश्यक आहे.

३ अ. गुरुकृपेविना स्वेच्छा, परेच्छा आणि ईश्‍वरेच्छा हे टप्पे ओलांडणे अशक्य !

स्वेच्छा, परेच्छा आणि ईश्‍वरेच्छा हे टप्पे ओलांडणे गुरुकृपेविना शक्य नाही. अध्यात्मात बुद्धीचा अधिक उपयोग करणे म्हणजे अज्ञानच आहे. बुद्धी सद्गुरूंना अर्पण केली, तरच ज्ञानप्राप्ती होते. मनोलय (कारणदेह), बुद्धीलय (महाकारणदेह) झाल्याविना ईश्‍वरप्राप्ती होणे शक्य नाही. त्यांचा लय होताच आपण निर्गुणाची, म्हणजेच शून्यत्वाची अनुभूती घेऊन त्याच्याशी एकरूप होऊ शकतो. गुरुदेवांनी हे आपल्यासाठी सुलभ केले आहे. अष्टांग साधना हाच याचा मूळ स्रोत आहे. त्यानुसार कृतीच्या स्तरावरच प्रयत्न केले पाहिजेत.

हे लिखाण लिहून घेणार्‍या गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता.’

– (पू.) के. उमेश शेणै, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.१२.२०१६)

Leave a Comment