‘प्रतिमा जपणे’ या अहंच्या पैलूचे विश्‍लेषण आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी करावयाचे प्रयत्न

‘एखाद्या मानसोपचारतज्ञांनाही लिहिता येणार नाही, असा ‘प्रतिमा जपणे’ या विषयावरील सुंदर लेख श्री. अशोक लिमकर यांनी लिहिला आहे. याआधीही त्यांनी ‘प्रतिक्रिया येणे’ या विषयासंदर्भात लेख लिहिला होता. त्याविषयी मी लिहिले होते, ‘प्रतिक्रिया’ या विषयावर श्री. अशोक लिमकर यांनी इतका अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे की, मलाही तसा लिहिता आला नसता. सर्वांना साधनेत अतिशय उपयुक्त अशा या लेखाबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे !’ ‘त्यांनी स्वभावदोषांच्या विविध पैलूंवर असेच लेख लिहावेत’, ही त्यांच्याकडून अपेक्षा आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. प्रतिमा म्हणजे काय ?

१ अ. वेगवेगळे संस्कार करून सजवलेले व्यक्तीमत्त्व म्हणजे प्रतिमा !

‘ईश्‍वराने पंचतत्त्वांपासून प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी शरीरप्रकृती निर्माण केली आहे. जगाची लोकसंख्या ७०० कोटींहून अधिक आहे. त्यातून एकसारख्या शरीरयष्टीच्या दोन व्यक्ती शोधूनही सापडत नाहीत. तसेच प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तीमत्त्व त्याच्या पूर्वजन्मांच्या अनेक संस्कारानुसार बनलेले असते. अशा व्यक्तीमत्त्वाला ती व्यक्ती या जन्मातही आणखी वेगवेगळे संस्कार करून सजवत असते. असे सजवलेले प्रत्येकाचे व्यक्तीमत्त्व म्हणजे त्याची ‘प्रतिमा’ असे म्हणू शकतो.

२. प्रतिमा जपण्याची प्रक्रिया

२ अ. प्रत्येकाची स्वतःच्या व्यक्तीमत्त्वाच्या
चौकटीच्या बाहेर जाण्याची सिद्धता नसणे

प्रत्येकाचा माझा स्वभाव कसा आहे ? माझ्या आवडीनिवडी काय आहेत ? माझे वागणे, बोलणे कसे आहे ? इत्यादींविषयी अभ्यास असतो. चित्तावरील संस्कारांनुसार प्रत्येकाने स्वत:च्या व्यक्तीमत्त्वाची एक चौकट बनवलेली असते आणि त्याची त्या चौकटीच्या बाहेर जाऊन काही करायची सिद्धता नसते.

२ आ. स्वतःच्या चौकटीची दुसर्‍याच्या मनातील चौकटीशी तुलना करणे

समाजात वावरतांना वेगवेगळ्या चौकटींची माणसे एकमेकांसमोर येतात आणि स्वत:च्या चौकटीचे प्रतिबिंब दुसर्‍याच्या चौकटीत उमटलेले पाहून तुलना करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्या मनात ‘माझी चौकट अशी आहे, तशी आहे. दुसर्‍याची चौकट माझ्याहून वेगळी आहे. त्याच्या चौकटीत अमुक न्यून आणि अमुक अधिक आहे’, असे विचार येऊ लागतात.

२ इ. समान व्यक्तीमत्त्वाच्या व्यक्तींचे एकमेकांशी जुळणे
आणि त्यांनी एकमेकांना व्यक्तीमत्त्व घडवण्यास साहाय्य करणे

दोन व्यक्ती भेटल्यावर त्यांच्या व्यक्तीमत्त्वामध्ये सारखेपणाचे घटक अधिक असतील, तर त्यांचे जुळते. त्यांच्यात सुसंवाद होऊ शकतो. ते एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि एकमेकांच्या व्यक्तीमत्त्वाविषयी दोघांमध्येही सकारात्मकता असते. त्यालाच आपण ‘दोघांचे चांगले जमते’, असे म्हणतो. त्यांच्यामध्ये मैत्री होते. दोघेही एकमेकांना त्यांचे व्यक्तीमत्त्व घडवण्यास साहाय्य करतात.

२ ई. भिन्न प्रकृतीच्या व्यक्तींनी स्वत:चे व्यक्तीमत्त्व सुरक्षित रहाण्यासाठी प्रयत्नरत असणे
आणि स्वतःचे व्यक्तीमत्त्व समोरच्या व्यक्तीला आवडण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजेच प्रतिमा जपणे

जेव्हा वेगळ्या प्रकृतीच्या, वेगळ्या व्यक्तीमत्त्वाच्या (चौकटीमध्ये साधर्म्य न्यून असलेल्या) दोन व्यक्ती एकमेकांना भेटतात, तेव्हा मात्र दोघांच्याही मनात एकमेकांविषयी सकारात्मकतेचा भाग अल्प आहे, याची त्यांना जाणीव होते अन् दोघेही ‘स्वत:चे व्यक्तीमत्त्व सुरक्षित कसे राहील ?’, याचा विचार करतात. हा विचार म्हणजेच ‘प्रतिमा जपणे’ होय. माझे व्यक्तीमत्त्व जसे आहे, तसे मला आवडते; परंतु माझे व्यक्तीमत्त्व समोरच्या व्यक्तीला आवडेल कि नाही, यासाठी मी साशंक असतो. दोन चौकटींची, म्हणजे दोन व्यक्तीमत्त्वांची तुलना करणे, म्हणजे प्रतिमा जपण्याचा प्रयत्न होय.

३. प्रतिमा का जपली जाते ?

३ अ. स्वतःचे व्यक्तीमत्त्व आदर्श आहे, असे भासवण्यासाठी
स्वतःत आदर्श घटक असल्याचे इतरांना सांगण्याचा प्रयत्न करणे

माझे व्यक्तीमत्त्व मला जसे आहे तसे प्रिय आहे; परंतु माझ्या मनात ‘आदर्श व्यक्तीमत्त्व कसे असायला हवे ?’, याच्या कल्पनाही असतात. त्या आदर्श व्यक्तीमत्त्वाच्या घटकांशी माझ्या वास्तव व्यक्तीमत्त्वाच्या घटकांची तुलना करू लागतो. अशी तुलना करतांना माझ्या व्यक्तीमत्त्वातील घटक आदर्श व्यक्तीमत्त्वातील घटकांपेक्षा अधिक चांगले असतील, तर ‘ते घटक माझ्यात अधिक आहेत’, याविषयी मी इतरांना सांगत रहातो; म्हणजे ‘माझा स्वभाव असा आहे. माझ्या आवडीनिवडी अशा आहेत. माझे वागणे-बोलणे असे आहे’ इत्यादी.

३ आ. स्वतःत नसलेले आदर्श व्यक्तीमत्त्वातील
घटक इतरांना कळू नयेत, यासाठी धडपड करणे

जेव्हा आदर्श व्यक्तीमत्त्वातील घटकांपेक्षा माझ्या व्यक्तीमत्त्वातील घटक अल्प असतील, तेव्हा मात्र हे घटक असलेले व्यक्तीमत्त्व घेऊन इतरांच्या समोर जातांना माझे मन अस्वस्थ होते. मी मनातच दोन व्यक्तीमत्त्वांमधील विविध घटकांची तुलना करू लागतो आणि ‘माझ्यात अमुक चांगले घटक अल्प आहेत. अमुक चांगले नसलेले घटक अधिक आहेत’, हे समोरच्याला कळल्यावर त्याच्या मनात माझ्या व्यक्तीमत्त्वाविषयी काय विचार येऊ शकतील ?’ या विचाराने मी अस्वस्थ होतो. मला माझी चौकट सुरक्षित ठेवायची आहे, यासाठी माझी धडपड चालू होते. ‘माझी चौकट आदर्श व्यक्तीमत्त्वाच्या जवळ कशी आहे ?’ हे सांगण्याचा माझा प्रयत्न चालू होतो. हा प्रयत्न म्हणजेच प्रतिमा जपण्याचा प्रयत्न होय.

३ इ. इतरांच्या मनातील स्वतःच्या आदर्श
व्यक्तीमत्त्वाला तडा जाऊ नये, यासाठी प्रयत्न करणे

‘माझ्या व्यक्तीमत्त्वाला तडा जाऊ नये. ते आदर्श असेच आहे’, हा विचार अबाधित रहावा, ही प्रत्येकाची आंतरिक इच्छा असते. त्यासाठी जे प्रयत्न केले जातात, ते प्रयत्न म्हणजे प्रतिमा जपण्याचे प्रयत्न होय. माझ्या चौकटीविषयी इतरांच्या मनात विचार, प्रतिक्रिया येऊ नयेत, यांसाठी प्रयत्न केले जातात, म्हणजेच येथे प्रतिमा जपण्याचा प्रयत्न केला जातो.

४. प्रतिमा जपण्याची काही उदाहरणे

सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रतिमा जपण्याचे अनेक प्रसंग घडतात आणि मी प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करतो. त्यांपैकी काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

४ अ. माझे स्नान, कपडे धुणे इत्यादी आवरण्यास समयमर्यादेपेक्षा अघिक वेळ लागत असला, तरी ‘सकाळचे झटपट आवरून घेतो’, असे मी सांगण्याचा प्रयत्न करतो.

४ आ. दिवसभरात नियोजनाप्रमाणे माझ्याकडून कृती घडत नाहीत. त्यामध्ये पालट होत असतो; परंतु ‘माझे सगळे वेळापत्रकानुसार चालू असते’, असे सांगत असतो.

४ इ. सेवा करतांना काही वेळा समयमर्यादेपेक्षा अधिक वेळ लागतो, तरीही ‘मी गतीने सेवा करतो’, असे चित्र रंगवत असतो. माझ्याकडून सेवा घाईगडबडीत केल्याने ती कार्यपद्धतीनुसार न होता उरकली जाते. असे झाल्यावर ‘मी सेवा समयमर्यादेपेक्षा अल्प वेळेत पूर्ण केली’, असे स्वतःला आणि इतरांना दाखवतो.

४ ई. एखादी सेवा स्वीकारल्यावर त्या सेवेविषयी चिंतन, नियोजन, पूर्वतयारी इत्यादी गोष्टींचा अभ्यास न करता ‘मला कळते’ या अहंच्या पैलूमुळे थेट सेवेच्या कृतीला प्रारंभ करतो. सेवा करतांना त्रुटी किंवा चुका लक्षात आल्या, तर ‘त्या किरकोळ आहेत’, असे सांगण्याचा अन् स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न होतो.

४ उ. ‘एखादी सेवा करू नये’, असे वाटत असेल, तेव्हा त्या सेवेऐवजी ‘दुसरी अमुक सेवा करू का ?’, असे विचारले जाते. एखादी सेवा कशी करायची किंवा त्या सेवेतील छोटे-छोटे बारकावे ठाऊक नसले, तरी ते विचारून घेणे होत नाही. ‘विचारले तर समोरच्याला काय वाटेल’, असा विचार मनात येतो.

४ ऊ. काही प्रसंगांत ‘मला कळते. मला सर्वकाही ठाऊक आहे’, असे सांगण्याचा प्रयत्न होतो.

४ ए. मी कोणाला थोडेफार साहाय्य केले किंवा माहिती सांगितली, तर ‘मी इतरांना साहाय्य करतो’, असे सांगतो किंवा तो विचार मनात असतो.

४ ऐ. ‘आता माझे वय झाले आहे. शारीरिक कष्टाच्या कृती पूर्वीसारख्या होत नाहीत, तरीही मी त्या करण्याचा प्रयत्न करतो’, असे सांगतो आणि ‘मला अजून या कृती करता येतात’, असे भासवतो.

४ ओ. एखाद्या विषयावर इतरांची चर्चा चालू असेल, तर मला ‘त्या विषयाचे ज्ञान आहे’, या विचाराने त्या चर्चेत सहभागी होतो.

४ औ. ‘एखाद्या व्यक्तीशी बोलावे’, असे मनातून वाटत नसले, तरी मी ‘त्या व्यक्तीशी प्रेमाने बोलत आहे’, असे दाखवतो.

४ अं. व्यष्टीचे प्रयत्न न्यून झाल्यावर ‘आढावा सेवकांना काय आणि कसे सांगायचे ? त्यांना माझ्याविषयी काय वाटेल ?’, असा विचार येतो. त्यामुळे त्या दिवशी आढावा सांगतांना बोलण्यामध्ये सहजता नसते.

४ क. संतांच्या समोर जातांना किंवा त्यांना भेटतांना मनावर दडपण असते. नमस्कार केल्यावर सहज संभाषण होत नाही. काय बोलायचे याचे चिंतन होत नाही. काही वेळा चुका लपवणे, ‘चुका सांगू नये’, असे वाटणे, चुकांमधील गांभीर्य अल्प करून सांगणे, स्पष्टीकरण देणे आणि परिस्थिती कशी कारणीभूत होती किंवा अन्य साधक चुकांमध्ये कसे सहभागी होेते, असे सांगण्याचा प्रयत्न केला जातो.

४ ख. काही वेळा ‘मी एखादी कृती कशी चांगली किंवा अल्प वेळेत केली’, हे सांगण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न होतो.

४ ग. ‘काही महत्त्वाच्या प्रलंबित सेवांचे माझे दायित्व नसतांनाही मी पाठपुरावा करतो. त्याविषयी काही सूचना करतो’, असे सांगण्यातून माझी प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न असतो.

४ घ. ‘इस्त्रीचे कपडे वापरले नाही, तर इतरांना काय वाटेल’, हा विचार मनात येतो आणि मी इस्त्रीचेच कपडे वापरतो.

४ च. खोलीची स्वच्छता व्यवस्थित केली नाही, तर ‘सहसाधकांना काय वाटेल ?’, असा विचार असतो.

४ छ. ‘एखाद्या सेवेला नकार दिला, तर उत्तरदायी साधकाला किंवा अन्य साधकांना काय वाटेल’, असा विचार येतो.

४ ज. सत्संगाला किंवा बैठकीला उशिरा गेलो, तर ‘सत्संग किंवा बैठक घेणार्‍या साधकाला, तसेच इतरांना काय वाटेल’, असा विचार येतो.

४ झ. बाहेरगावी किंवा नवीन ठिकाणी गेल्यावर ‘तेथील माहिती कोणाला आणि कशी विचारू ? त्यांना काय वाटेल ?’, असा विचार येतो.

प्रतिमा जपण्याविषयी अशा प्रकारचे अनेक प्रसंग स्थळ, काळ आणि व्यक्ती या संदर्भात घडत असतात. या सर्व प्रसंगांची सूची केली, तर स्वतःचे खरे व्यक्तीमत्त्व आणि स्वतः दुसर्‍यांना दाखवण्याचा प्रयत्न करत असलेले भासमान व्यक्तीमत्त्व यांचा अभ्यास करणे सोपे होईल. ‘भासमान व्यक्तीमत्त्वामुळे मी स्वतःला आणि दुसर्‍याला फसवण्याचा प्रयत्न करत असतो’, असे म्हटले तर ती चूक नाही.

५. प्रतिमा जपण्याचे दुष्परिणाम

५ अ. व्यक्ती स्वतःच्या खर्‍या व्यक्तीमत्त्वापासून आणि इतरांपासून
अन् देवापासून दूर जाणे, तसेच प्रांजळपणा नष्ट होऊन अहं वाढणे

प्रतिमा जपण्यामुळे स्वतःला आणि इतरांना फसवून ‘मी कसा आहे आणि कसा नाही’ हे सांगण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न करतो. ‘माझे प्रत्यक्ष स्थूल शरीर आणि त्याची लहान-मोठी दिसणारी छाया ही दोन्ही खरे असून ‘माझी छाया इतरांपुढे कशी चांगली आहे’, हे दाखवण्याचा आणि सांगण्याचा मी प्रयत्न करतो. हे प्रयत्न करतांना ‘ती आकृती म्हणजे छाया आहे’, याचा मला विसर पडतो आणि ‘ती छाया म्हणजे माझे व्यक्तीमत्त्व आहे’, हे गृहीत धरून मी सर्वत्र वावरत असतो. त्यामुळे मी माझ्या खर्‍या प्रतिमेपासून दूर जाऊन खोट्या आणि भ्रामक प्रतिमेला धरून राहिल्याने देवापासून अन् इतरांपासून दूर जातो. जोपर्यंत माझे मन निर्मळ होत नाही, चित्ताची शुद्धी होत नाही आणि चुकीच्या संस्कारांची आणखी पुटे चित्तावर निर्माण होतात, तोपर्यंत ‘बुडत्याचा पाय खोलात’ याप्रमाणे स्थिती होते. प्रतिमा जपल्यामुळे अहं वाढतो, मनाचा प्रांजळपणा नष्ट होतो, खरी चौकट बाजूला पडते आणि अनेक भ्रामक चौकटींमध्ये स्वतःला बद्ध करून घेतो.

५ आ. आध्यात्मिक उन्नतीसाठी इतरांचे साहाय्य न मिळणे

‘माझे मूळ व्यक्तीमत्त्व लोकांना दाखवण्यातच माझे हित आहे’, याचा मला विसर पडल्यामुळे माझ्या उन्नतीसाठी इतरांचे साहाय्य घेऊ शकत नसल्याने माझी प्रगती थांबते. एवढेच नाही, तर ‘प्रतिमा जपल्यामुळे घसरगुंडी होऊ शकते’, याचे भानही मला रहात नाही. प्रतिमा जपल्यामुळे काही वेळा परस्परांमध्ये पूर्वग्रह निर्माण होऊन ते दूर करण्यासाठी दोघांचीही साधना खर्च होते.

५ इ. स्वतःच्या खर्‍या स्वरूपाला, म्हणजे
ईश्‍वराला ओळखता न येणे आणि ईश्‍वरप्राप्तीचा विसर पडणे

‘ईश्‍वरच परिपूर्ण आहे. बाकी सर्वांमध्ये अल्प-अधिक दोष असतात’, याचा विसर पडल्यामुळे माझी प्रतिमा उंचावण्याचा, मी कसा बरोबर आहे, हे सांगण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न सतत चालू असतो. ‘मी इतरांपासून कसा वेगळा आहे, मी असा आहे, मी तसा आहे’, या भ्रामक कल्पनांमध्ये अडकल्यामुळे माझ्यातील खर्‍या ‘मी’ला मी ओळखत नाही. माझ्यातील ईश्‍वराला जाणत नाही आणि ‘मला ईश्‍वरी तत्त्वाशी एकरूप व्हायचे आहे’, याचा विसर पडतो. त्यामुळे ईश्‍वरापासून दूरच रहातो अन् जन्म-मृत्यूच्या चक्रांत अडकून पडतो.

६. ‘प्रतिमा जपणे’ हा पैलू दूर करण्यासाठी काय करावे ?

६ अ. स्वतःच्या साधनेच्या होत असलेल्या हानीची मनाला जाणीव करून देणे

‘प्रतिमा जपल्यामुळे लाभ नाही, तर हानीच अधिक आहे’, याची मनाला प्रथम जाणीव करून देऊन ‘मी प्रतिमा जपण्याचा एकही प्रयत्न करणार नाही’, असा बुद्धीने निश्‍चय करायला हवा. ‘अगदी स्वप्नातही प्रतिमा जपण्याचा माझ्याकडून प्रयत्न होणार नाही’, एवढा दृढनिश्‍चय असावा.

६ आ. ‘स्वतःचा मूळ स्वभाव आहे तसाच आत
आणि बाहेर दाखवायचा आहे’, असा विचार ठेवून कृती करणे

मनाची धारणा जशी असते, तशी वृत्ती बनते आणि त्यानुसार कृती घडते. मला मनाची धारणाच पालटायची आहे. माझी मूळ प्रतिमा जशी आहे, तशीच आत आणि बाहेर दाखवायची आहे. त्यासाठी ‘नकारात्मकतेवर मात करून माझे वेगळे व्यक्तीमत्त्व नाही आणि त्याला ओढून ताणून सजवून नाटकातील पात्रांप्रमाणे तात्पुरते सादर करायचे नाही’, या विचाराची जागृती मनात सतत राहिली पाहिजे.

६ इ. ‘इतरांपेक्षा देवाला काय वाटेल’, असा विचार करणे

‘लोकांना काय वाटेल’, असा विचार करण्यापेक्षा ‘देवाला माझी खोटी प्रतिमा सादर केलेली आवडेल का ?’, याचा विचार झाला आणि तो कृतीत आणला, तर प्रतिमा जपण्याचे प्रयत्न होणार नाहीत. देवाला सर्वकाही कळत असून तो क्षणाक्षणाचा हिशोब ठेवतो.

६ ई. खोटे फार काळ टिकत नाही आणि देवाला
खोटेपणा आवडत नाही, याची मनाला जाणीव करून देणे

‘माझा स्थूलदेह म्हणजे माझे व्यक्तीमत्त्व नाही, तर लिंगदेहामध्ये असलेल्या जन्म-जन्मांतरीच्या संस्कारांचे उमटलेले प्रतिबिंब म्हणजे माझे व्यक्तीमत्त्व होय. ते जसे आहे तसेच सादर करणे देवाला आवडेल. देवाला खोटेपणा आवडत नाही आणि केवळ सत्यच शाश्‍वत असते. खोटे फार काळ टिकत नाही’, याची जाणीव होऊन दिवसभरात एकाही प्रसंगात प्रतिमा जपण्याचा माझ्याकडून प्रयत्न होणार नाही, याची काळजी घेणे.

६ उ. खोटेपणा उघड झाल्याने इतरांच्या मनातील आपल्याविषयीचे चांगले विचार न्यून होऊन दुरावा निर्माण
होणार असल्याने स्वतःचे दोष आणि अहं यांसह इतरांसमोर आहे तसे सादर करायचे असल्याचा निश्‍चय करणे

प्रतिमा जपण्याचे मानसिक सुख क्षणापुरते किंवा काही काळापुरते असते; कारण असत्य फार काळ टिकत नाही. आज ना उद्या सत्य बाहेर आल्यावर माझ्या प्रतिमेवरचे आवरण दूर होऊन खोटेपणा उघड होईल. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये माझ्याविषयी चांगलेपणाचे विचार असतील, तर ते न्यून होऊन दुरावा निर्माण होईल. आपलेपणा रहाणार नाही. जवळीक साधण्याचा आणि मला साहाय्य करण्याचा भाग होणार नाही. त्यामुळे माझीच हानी अधिक होईल, याची जाणीव होऊन मला माझ्या मूळ प्रतिमेला स्वभावदोष आणि अहंच्या पैलूंसह लोकांसमोर सादर करायचे आहे, असे ठरवून त्यानुसार कृती करावी.

६ ऊ. इतरांना आपल्या प्रतिमेत स्वारस्य नाही, हे मनाला सांगणे

खरेतर माझ्या प्रतिमेविषयी इतरांना काही वाटत नाही, तर मलाच प्रतिमेचे विचार अधिक सतावत असतात आणि त्यासाठी मी वेळ अन् ऊर्जा यांचा अपव्यय करून साधनेची हानी करून घेत असतो.

६ ए. मनात प्रतिमेचा विचार आल्यावर त्याला भावाची जोड देणे

मनात प्रतिमेचा विचार आल्यावर त्याला भावाची जोड देण्याचा प्रयत्न केला, तर प्रतिमेचा विचार अल्प होऊन सकारात्मकता वाढेल.

६ ऐ. कृती करतांना देवाचे साहाय्य घेणे

प्रतिमेच्या लक्षणांची सूची बनवून त्यावर मात करण्यासाठीची उपाययोजना त्यासमोर लिहून कृती करतांना देवाचे साहाय्य घेतले, तर प्रतिमा जपणे हा दोष लवकर दूर होईल.

७. प्रार्थना

वरील चिंतन प.पू. गुरुदेवांनी लिहून घेतले. ते त्यांच्या चरणी अर्पण करतो. ‘माझे सर्व स्वभावदोष लवकरात लवकर दूर करावेत’, अशी गुरुचरणी प्रार्थना करतो.’

– श्री. अशोक लिमकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment