‘व्रत’ यासंबंधी टीका किंवा अयोग्य विचार आणि त्यांचे खंडण

 

विश्वाच्या आरंभापासून भूतलावर असणारा सनातन वैदिक धर्म (हिंदु धर्म), हिंदूंचे धर्मग्रंथ, देवता, संत, वर्णाश्रमव्यवस्था, अध्यात्म आदींवर अनेकांकडून टीका केली जाते. ही टीका भाषणे, चर्चासत्रे, पुस्तके, वृत्तपत्रे, टिंगलटवाळी आदींद्वारे समाजात प्रसृत केली जाते. मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धतीमुळे अनेकांना ‘ही टीका आहे’, हेच कळत नाही ! अनेकांना ती अयोग्य टीका खरी वाटते, तर अनेकांना ‘ती टीका विखारी आहे’, हे लक्षात येऊनही टीकेचे खंडण सहज उपलब्ध नसल्यामुळे सडेतोड उत्तर देणे शक्य होत नाही. काही वेळा काही विद्वान किंवा अभ्यासक यांच्याकडूनही अज्ञानापोटी किंवा नकळत अयोग्य विचार मांडले जातात.

असे सर्वच अयोग्य विचार आणि टीका यांचा योग्य प्रतिवाद न केल्याने हिंदूंची श्रद्धा डळमळीत होते अन् त्यामुळे धर्महानी होते. ही धर्महानी रोखणे, हे काळानुसार आवश्यक असे धर्मपालनच आहे. ही धर्महानी रोखण्यासाठी हिंदूंना बौद्धिक बळ प्राप्त व्हावे, यासाठी ‘व्रत’ यासंबंधी अयोग्य विचार आणि टीका यांचे खंडण पुढे दिले आहे.

 

१. म्हणे, वटसावित्रीचे व्रत अडाणी आणि रानटी आहे !

ज्येष्ठ पौर्णिमेला नदीतिरावरील एका विशाल वटवृक्षाच्या पाराभोवती शे-सव्वाशे स्त्रिया पूजासाहित्यासह एकत्र आल्या. पुरोहितांनी पूजा सांगितल्यावर सर्व स्त्रियांनी वटवृक्षाला एकामागून एक दोरा गुंडाळला. पूजा करून निरंजन आणि उदबत्ती लावून वटवृक्षासमोर फळ अन् दक्षिणा ठेवली. पुरोहितांनाही दक्षिणा दिली. वटसावित्रीचे, म्हणजे पातिव्रत्याचे व्रत करणार्‍या सर्व स्त्रिया विवाहित होत्या.

 

१ अ. टीका

`जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे’, अशी प्रार्थना असलेले वटसावित्रीचे व्रत अडाणी, रानटी आहे. ते वर्तमानाशी पूर्णपणे विसंगत आहे. ते झुगारून द्या’, असे आधुनिक म्हणतात. व्यक्तीस्वातंत्र्याचे मूल्य श्रेष्ठ मानणार्‍या आधुनिक स्त्रियांच्या कपाळावर वटसावित्री व्रताचे नाव कानी येताच आठ्या पडतात आणि त्यांचा तोंडवळा तांबडा-लाल होऊन कानशिले ताडताड उडू लागतात.

जिज्ञासू : `जन्मोजन्मी हाच पती मिळावा’, अशी प्रार्थना करणार्‍या या स्त्रिया अडाणी नाहीत का ?

गुरुदेव : आंग्लछायेच्या पुरोगामी स्त्रिया सोडल्या, तर सर्व हिंदु स्त्रिया हे व्रत कटाक्षाने पाळतात.

जिज्ञासू : या स्त्रियांत अनेक स्त्रिया अशा असतील की, ज्यांना पती छळत असेल, त्यांच्यात भांडणे असतील.

 

१ आ. खंडण

गुरुदेव : वर्षानुवर्षे श्रद्धेने वटसावित्रीचे व्रत आचरणार्‍या या स्त्रियांच्या अंतःकरणाचा आपण शोध घेतला आहे का ? या जन्मी हाच नवरा आपल्या प्रारब्धात असेल, तर त्याची वागणूक सुधारून जीवन सुसह्य व्हावे; म्हणून त्या वटसावित्रीचे व्रत आणि प्रार्थना करत असतील. त्यांचा अनंत जन्मांवर विश्वास असल्याने दुःख झाले, तरी ‘ते आपल्याच पूर्वकर्मांचे फळ आहे. भोगून संपवून टाकू, या धर्माचरणाचे फळ परमात्मा परलोकी देईलच’, असे त्या मानतात. त्यामुळे साहजिकच त्यांच्यात कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची शक्ती येते. तो नवरा सोडून दुसरा नवरा किंवा इतर काही मागण्याची आमच्यात परंपरा नाही. हिंदु विवाहामध्ये ‘समानी व आकूतिः समाना हृदयानि वः । समानमस्तु वो मनो यथा वः सुसहासति ।।’ हा श्लोक म्हणण्यात येतो. याचा अर्थ ‘तुमचे संकल्प एकसमान असोत. तुमची हृदये एक होवोत. तुमची मने एकसमान होवोत आणि त्यामुळे तुमचे परस्पर कार्य पूर्णरूपाने संघटित होवो.’ यामुळे त्या पती-पत्नीमध्ये संकटे सहन करण्याची शक्ती आणि सर्व सामावून घेण्याची वृत्ती येते. त्यांची त्याग करण्याची वृत्ती वाढते, हेच तर आमच्या संस्कृतीचे मूळ सूत्र आहे.

नवर्‍याचा जाच सहन करणारी स्त्री श्रेष्ठ कि थोड्याशा कारणाने भांडणारी आणि घटस्फोट घेऊन नवरे पालटणारी स्त्री श्रेष्ठ ?

आणखी एक सूत्र (मुद्दा) म्हणजे स्त्री केवळ एकाच मनुष्याला सर्वस्व अर्पण करून त्याच्यावर एकदाच प्रेम करू शकते. तो कसाही वागला, तरी तिचे लक्ष दुसरीकडे जात नाही. खरे सांगायचे, तर दुसर्‍यांदा लग्न करणारी स्त्री केवळ सुडाने तसे करते, दुसर्‍या नवर्‍यावरील प्रेमामुळे नव्हे ! हिंदु स्त्रीची ‘नवरा पालटला की, सुख मिळते’, अशी खुळचट आत्मकेंद्री समजूत नसते. दुसरा नवरा केल्याने का दुःखक्षय होतो ? तिथे नवे दुःख ! आजच्या युगातील किती स्त्रिया एकाच जन्मात अनेक नवरे करून सुखी झाल्या आहेत ? पत्नी पतीच्या देहावर नाही, तर त्याच्या हृदयातील परमेश्वरावर प्रेम करते; म्हणून ती त्याला ‘पतीपरमेश्वर’ म्हणते. तिलाच पतीव्रता म्हणतात. पतीव्रतेच्या सामर्थ्याच्या अनेक कथा आहेत. सावित्रीने आपल्या पातीव्रत्याच्या सामर्थ्याने यमाकडून आपल्या पतीचे प्राण परत आणले. हे व्रत म्हणजे त्या पातीव्रत्याच्या सामर्थ्याचे प्रतिकात्मक पूजन आहे. या सामर्थ्याची आधुनिक विचारसरणीच्या स्त्रियांना काय कल्पना येणार ? विवाहातील सप्तपदी म्हणजे सात जन्मांचे प्रतीक आहे. ती सात वचने एकनिष्ठतेसाठी घेतली जातात. हे कपड्यांप्रमाणे नवरे पालटणार्‍या आजच्या आधुनिक स्त्रियांना कसे कळणार ?’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १२.६.२००८)

 

२. व्रत, उपवास इत्यादींचे महत्त्व ठाऊक नसलेले रजनीश !

२ अ. टीका

‘भूक मारल्यामुळे ती आणखीन वाढते आणि खाण्यास अयोग्य असे पदार्थ, उदा. फूल इत्यादी काहीही मानव खातो. (भूखको दबानेसे भूख ज़ोर पकड़ती है और न खाने योग्य फूल आदिको भी प्राणी खाने लगते हैं ।) एक साधक अरण्यात रहात असतो. त्याचे उपवासाचे व्रत असते. त्याचा मित्र त्याला भेट पाठवू इच्छितो. ‘काय पाठवायचे, उपवास असल्यामुळे खाण्याचे पदार्थ कसे पाठवायचे ?’, असा त्याला प्रश्न पडतो. तो फुलांचा गुच्छ पाठवतो. भूक अशी जोर करते की, उपवास करणारा व्रती ती फुलेच खातो. – रजनीश

संदर्भ : काय ? संभोगातून समाधी ??

 

२ आ. खंडण

’व्रत, उपवास यांवर रजनिशांनी शस्त्र धरले आहे. गेली २० वर्षे अखंड निर्जला एकादशीचे व्रत करणारे माझे मित्र आहेत. ते सांगतात, ‘‘आदल्या दिवसापासूनच मला एकादशीच्या उपवासाचे वेध लागतात. दशमीला रात्री जेवायचे नसते. मी जेवत नाही. व्रत असते तो दिवस परम प्रसन्न आणि परम सुखात जातो.’’ जैन लोकांमध्येही एक मास केवळ गरम पाणी पिऊन उपवास करतात. नव्या व्रतीला भूकेची वेदना होते; पण व्रताच्या दिवशी तो ती वेदना सहजतेने (संयमाने) सहन करू शकतो. त्यामुळे अन्नाची स्मृतीही त्याला होत नाही. ‘व्रताचे पालन होत आहे. प्रभूचरणी वृत्ती खिळत आहे’, ही धारणा असल्यामुळे प्रसन्नता असते.

याउलट उपवास न करणार्‍याला एखाद्या दिवशी जेवण मिळाले नाही, तर तो व्यथित आणि चिंताग्रस्त होतो. त्याचा उत्साह मावळतो. दुसर्‍या कामातही त्याचे मन लागत नाही. दृष्टी आणि अंतरीची वृत्ती पालटल्यावर एकच घटना एका दिवशी सुख देते, तर दुसर्‍या दिवशी दुःख देते.

माणसात मोठेपणा आला म्हणजे ‘आपण अभ्यास न करता काही म्हणावे आणि लोकांनी ते ऐकावे’, असे मानणार्‍यांपैकी हे रजनीश दिसतात.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

Leave a Comment