प.पू. डॉक्टरांचे शिष्यरूप

उच्च विद्याविभूषित असलेल्या प.पू. डॉक्टरांनी त्यांच्या गुरूंची, परात्परगुरु प.पू. भक्तराज महाराज यांची तन-मन-धन अर्पून परिपूर्ण सेवा केली. त्यामुळेच प.पू. भक्तराज महाराजांनी त्यांना ‘डॉक्टर, तुम्हाला ज्ञान, भक्ती आणि वैराग्य दिले’, असे सांगितले. आम्ही अनुभवलेले त्यांचे हे शिष्यरूपातील वागणे सर्व साधकांसाठी मार्गदर्शक असल्याने येथे देण्याचा प्रयत्न करत आहोत.

शिष्यरूपी प.पू. डॉक्टर
शिष्यरूपी प.पू. डॉक्टर

 

१. गुरूंकडे जातांना साधेपणाने जाणारे आणि सर्व प्रकारच्या सेवा करणारे शिष्यरूपी प.पू. डॉक्टर !

प.पू. डॉक्टर शीव गुरुकुलात राहून ग्रंथ लिखाणाचे कार्य, प्रसार-प्रचाराचे कार्य अशा विविध सेवा करायचे. त्या काळात प.पू. बाबांकडे भंडारे व्हायचे. प्रत्येक भंडार्‍याला प.पू. डॉक्टर जात असत. इतकेच नव्हे, तर दिवाळी-दसरा अशा सणांनाही प.पू. बाबा जेथे असत, तेथे प.पू. डॉक्टरांना बोलावून घेत. प.पू. डॉक्टर प.पू. बाबांकडे जातांना नेहमी साधे कपडे घालून जात असत. त्या वेळी ते तेथे गेल्यावरही विविध सेवा करत असत.

तेथे जातांना ते प.पू. बाबा, प.पू. रामानंद महाराज आणि पू. जीजी (प.पू. बाबांच्या धर्मपत्नी) यांना देण्यासाठी अर्पण सोबत घेत असत. तसेच काही भक्तांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून त्यांच्यासाठीही काही वस्तू अथवा कपडे घेत.

 

२. गुरूंना साधनेचा आढावा देणारे शिष्यरूपी प.पू. डॉक्टर !

प.पू. बाबांकडे भंडार्‍याला जातांना प.पू. डॉक्टर आपल्या साधनेचा एकूणच लेखा जोखा (आढावा) प.पू. बाबांना देत असत.

 

२ अ. अप्रकाशित ग्रंथांचे लिखाण आणि प्रकाशित ग्रंथ गुरूंना दाखवणे

‘तू किताबोंपे किताबे लिखेगा।’ हा प.पू. अनंतानंद साईश यांनी प.पू. बाबांना दिलेला आशीर्वाद प.पू. बाबा प.पू. डॉक्टरांच्या माध्यमातून पूर्ण करत होते. शीव येथे ग्रंथनिर्मितीचे कार्य चालू असायचे. अशा वेळेला एखादा नवीन ग्रंथ प्रकाशनाच्या मार्गावर असल्यास प.पू. डॉक्टर त्याचे लिखाण प.पू. बाबांना दाखवण्यासाठी स्वतःसंगे घेत असत. तसेच जे ग्रंथ प्रकाशित झालेले असतील, ते दाखवण्यासाठी आणि भक्तांना भेट देण्यासाठी त्याच्या काही प्रती सोबत घेत असत. तेव्हा ते पाहून प.पू. बाबाही प.पू. डॉक्टरांचे कौतुक इतरांसमोर करत असत आणि म्हणत, ‘‘पहा किती सुंदर ग्रंथ लिहिला आहे.’’

 

२ आ. प्रश्नांची सूची सोबत नेणे

प.पू. बाबांकडे गेल्यावर प.पू. डॉक्टर स्वतःला आलेल्या अनुभूतींचे विश्लेषण त्यांना विचारत. तसेच त्यांना विचारण्यासाठी काही आध्यात्मिक प्रश्नांची सूचीही सोबत घेत असत.

 

२ इ. गुरूंना सनातन संस्थेच्या कार्याचा आढावा देणे

सनातन संस्थेच्या (त्या वेळचे नाव सनातन भारतीय संस्कृती संस्था) संदर्भात प्रसारात घडलेल्या घटनांची इतर दैनिकांतील कात्रणे सोबत घेत. त्यातील सनातनविषयक आणि प.पू. डॉक्टरांच्या विषयी लिहिलेले प.पू. बाबांना दाखवत. तेव्हा बाबा म्हणायचे, ‘‘आमच्या गुरूंनी आम्हाला चाळीस वर्षे सांभाळले. आम्ही तुम्हाला सांभाळणार नाही का ?’’ प.पू. बाबा असे आश्वासक उत्तर त्यांना द्यायचे. त्यामुळे कार्य करायला उत्साह येत असे.

एकूणच ते अध्यात्मप्रसाराचा आणि स्वतःच्या साधनेचा सर्व आढावा गुरूंच्या चरणी देत असत.

 

३. गुरूंच्या आश्रमातील शिष्यरूपी प.पू. डॉक्टरांचा सेवाभाव !

३ अ. आश्रमात गेल्यावर त्वरित स्वच्छतेच्या आणि इतर सेवेला आरंभ करणे

आश्रमात गेल्यावर इकडे-तिकडे न जाता प.पू. डॉक्टर प्रथम थेट प.पू. बाबांच्या दर्शनाला जात आणि सोबत आलेल्या साधकांनाही त्यांच्या दर्शनासाठी नेत असत. प.पू. बाबांचे दर्शन झाल्यानंतर आश्रम व्यवस्थापनाने रहाण्यासाठी दिलेल्या खोलीत स्वतःचे सर्व सामान ठेवत आणि इतर साधकांचीही रहाण्याची व्यवस्था झालेली आहे का, ते पहात असत. हे सर्व झाल्यावर मग आश्रमातील सेवेला आरंभ होत असे. ते सेवेचा आरंभ कुठून करायचे, तर आश्रमातील शौचालयांपासून. शौचालये, स्नानगृहे स्वच्छ करणे, आश्रमातील सर्व खोल्यांच्या भिंतीवरील जळमटे काढणे, पंखे आणि दिवे स्वच्छ पुसणे, भक्तांच्या चपला एका रांगेत लावण्यासाठी लाकडांच्या फळ्यांचे थर बनवणे, जेवणाच्या वेळी भक्तांना जेवण वाढणे, जेवणाच्या पत्रावळ्या उचलणे, आश्रमाच्या भोवतालचा परिसर स्वच्छ करणे, अशा अनेक सेवा ते स्वतः करत असत.

 

३ आ. भर उन्हात आश्रमाच्या परिसरातील काटे आणि मोठमोठे दगड स्वतः उचलणे आणि साधकांकडूनही ते करवून घेणे

त्या काळी कांदळी येथील आश्रमाच्या भोवतालचा परिसर काट्याकुट्यांनी भरलेला असायचा. सर्वत्र मोठमोठे दगड पडलेले असायचे. भर उन्हामधे प.पू. डॉक्टर तो परिसर स्वच्छ करायचे. त्यांच्या हाताला काटे लागायचे, तसेच दगडही वजनदार असायचे; परंतु तरीही ते उचलायचे. आम्ही सर्वजण ही सेवा करतांना मेटाकुटीला यायचो. हाताला काटे लागायचे. वर रखरखते ऊन असायचे. आम्ही दमून जायचो; परंतु प.पू. डॉक्टर न दमता सर्व सेवा स्वतः करायचे आणि आमच्याकडूनही करून घ्यायचे. गुरुसेवा कशी करायची, हे आपल्या प्रत्येक कृतीतून शिष्यरूपातील प.पू. डॉक्टर आम्हा साधकांना शिकवत असत.

 

३ इ. भजनाच्या कार्यक्रमाच्या वेळी बैठकव्यवस्थेपासून सर्व सेवा शेवटपर्यंत उभे राहून करणे

प.पू. बाबांच्या भजनाच्या कार्यक्रमाच्या वेळी आश्रमातील सभागृहामधे गर्दी होत असे. अशा वेळी प.पू. डॉक्टर सर्व भक्तांना बसण्यासाठी जागा करून देणे, मधेच कोणाला पाणी हवे असल्यास ते देणे, कुणाला आणखी काही साहाय्य हवे असल्यास ते देणे, अशा सर्व सेवा ते अव्याहतपणे आणि शेवटपर्यंत उभे राहून करत असत. प.पू. बाबांच्या आरंभीच्या भजनापासून ते शेवटच्या भजनापर्यंत ही सेवा ते न थकता करत असत. प.पू. बाबाही किलकिल्या नजरेने ते काय करतात, हे पहात असत. प.पू. बाबा त्यांना ‘‘बसा’’ म्हणायचे, तेव्हाच ते खाली बसायचे. तोपर्यत त्यांची सेवा अव्याहतपणे चालू असायची.

 

३ ई. इतर भक्तांची अंथरुणे घालणे आणि घड्या पडल्यास साधकांना योग्य दृष्टीकोन देणे

काही वेळा भजन चालू असतांना भक्तांची झोपण्याची व्यवस्था करावी लागे. अशा वेळी प.पू. डॉक्टर पुढाकार घेऊन ती सेवा आम्हा साधकांकडून करवून घेत. गाद्या घालणे, त्यावर पलंगपोस (चादर) घालणे, अशा सेवा आम्ही करत असू. सेवा पूर्ण झाल्यावर ते पहाण्यासाठी येत. एखाद्या गादीवरील पलंगपोसाची (चादरीची) चुणी (घडी) पडली असल्यास ते आम्हाला ती दाखवून देत आणि ‘येथे नामजप न्यून झाला’, ‘येथे सेवा करतांना मनात दुसरा विचार होता’, असे म्हणून ‘पलंगपोसावर पडलेली एक एक चुणी म्हणजे आपल्या मनातील एक एक विचार आहे’, असे आध्यात्मिक दृष्टीकोन देत आणि ते व्यवस्थित करवून घेत. अशा प्रकारे ते आम्हाला सेवा परिपूर्ण कशी करावी, हे शिकवत असत.

 

– पू. सत्यवान कदम आणि श्री. दिनेश शिंदे

 

Leave a Comment