गोव्याची लोकवाद्य परंपरा : एक दृष्टीक्षेप !

गोव्यातील विविध संगीतप्रकार आणि त्यासाठी वापरली जाणारी वाद्ये यांद्वारे इतिहासाचा मागोवा घेता येतो. कोणत्याही समाजाचे सांगितिक जीवन हे त्या समाजाच्या वास्तव जीवनासमवेतच सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाच्या घटकांशी पूर्णांशाने निगडित झालेले असते. मानवी जीवनाचा दृष्टीकोन हा त्या त्या समाजाच्या संगीत परंपरांशी आंतरप्रक्रियेने जोडलेला असतो. त्यामुळे लोकपरंपरांमधून उत्पन्न झालेल्या वाद्यांचे मानववंशशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व असते. वाद्यांची बनावट, वादनपद्धत आणि त्या अनुषंगाने केले जाणारे यातुविधी यांचा अभ्यास हा मानव वंशशास्त्रासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे. गोमंतकातील लोकवाद्यांवर दृष्टीक्षेप टाकतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे येथील लोकशैलीतील बहुतेक संगीतप्रकार आणि वाद्ये यांवर दक्षिण भारतीय परंपरेचा अधिक प्रभाव दिसतो. अर्थात तो दिसणे स्वाभाविकच आहे. गोवा दक्षिण भारतातील अनेक राजवटींच्या आधिपत्याखाली होता.

गोव्यातील वाद्यांचा विचार करतांना त्यात लयवाद्ये, स्वरवाद्ये, स्वतंत्रपणे वाजवण्याची वाद्ये यांचा सर्वंकष विचार करावा लागतो.त्यामध्ये काही स्वतंत्र वाद्ये आहेत तशीच साथीची वाद्ये आहेत. काही वाद्यवृंद आहेत. देवालये आणि चर्च इत्यादी ठिकाणी ही वाद्ये वाजवली जातात. वाद्यांचा मूलगामी विचार करतांना माणसाच्या शरीरालाच प्राचीन वाद्य म्हटले आहे. त्याला दैवी वीणा हा शब्दप्रयोग वापरला आहे. या कल्पनेमुळेच वाद्यांच्या विविध भागांना शिर, मुख, तोंड, उदर, दंड वगैरे नावे मिळाली असावीत. भारतीय वाद्यांची प्राचीन परंपरा वेदकाळापासूनची आहे. त्या वेळी देखील विशिष्ट वाद्य विशिष्ट प्रसंगी वाजवण्याची परंपरा होती. गृह्यसूत्रात विवाहप्रसंगी ‘बाण’ पद्धतीचे वाद्य वाजवावे, असे सांगितले आहे. विवाहपूर्व विधीच्या वेळी चार सुवासिनींनी नंदी हे वाद्य वाजवावे. महाव्रताच्या वेळी उद्गाता शततंत्री वीणा वाजवत असे. त्याच्या बरोबरीने यज्ञ करणार्‍या यजमानाच्या पत्नी काण्डवीणा (तंत्रवीणा) आणि पिच्छोरा हे सुषिरवाद्य वाजवत असत. आजदेखील लोकशैलीत ही सांकेतिक परंपरा जपलेली आपल्याला दिसते.

आजच्या घडीला शास्त्रीय संगीतापेक्षा लोकसंगीत, धार्मिक संगीत आणि उत्सव संगीत यांसाठी अनेक वाद्ये वापरात आहेत. गोव्यात अधिकाधिक प्रचलित असलेल्या आणि अप्रचलित वाद्यांवर टाकलेला हा एक दृष्टीक्षेप !

 

घुमट

घुमट

घुमट हे लोकवाद्य खास गोवा आणि सीमेवरील महाराष्ट्र (कोकणपट्टी), तसेच कर्नाटक (दक्षिण आणि उत्तर कॅनरा जिल्हा) अन् केरळमधील कोकणीभाषक प्रांतात वापरात असलेले दिसते. हे वाद्य गोव्यात अत्यंत लोकप्रिय आहे. या वाद्याची रचना अत्यंत सोपी आणि वादनपद्धतदेखील वरकरणी सोपी वाटत असली, तरी तालनिर्मिती क्लिष्ट वाटते. दोन भिन्न व्यासाची तोंडे असलेला मातीचा भाजलेला घडा कुंभाराकडून करवून घेतात. मोठ्या तोंडाचा व्यास सुमारे २० सेंटीमीटर असतो, तर लहान तोंडाचा व्यास १० ते १२ सेंटीमीटर असतो. मोठ्या तोंडावर घोरपडीचे कमावलेले कातडे ताणून बसवतात. त्यासाठी वनस्पतीचा चीक अथवा डिंक लावून त्यावर सुंभाच्या दोरीने आवळून कातडे बसवतात आणि सावलीत सुकवतात. दोन्ही तोंडांवर दोरी ओवून ते घुमट खांद्याला अडकवून वाजवतात. वाजवतांना उजव्या हाताने कातड्यावर थाप मारून ध्वनीनिर्मिती करतात. डावा हात लहान तोंडावर ठेवून पंजाने हवेचा दाब नियंत्रित करून वादन केले जाते.हे वाद्य स्वतंत्रपणे वाजत नाही: त्यासाठी शामेळ, जोडशामेळ अथवा म्हादळे यांपैकी एखादे वाद्य साथीचे वाद्य म्हणून वापरतात. घुमटवादन हे ग्रामीण भागात खूपच लोकप्रिय असते. पूजा-अर्चा, गणेशचतुर्थी, शिगमो इत्यादी व्रतवैकल्ये, सण, जत्रा-उत्सवांच्या आणि जागरांच्या वेळी घुमटवादन केले जाते. शास्त्रीय पद्धतीने वादन होते त्याला सुंवारीवादन, चंद्रावळ, फाग, खाणपद, आरत्या अशी नावे आहेत; मात्र या वादनात घुमट हे वाद्य मुख्य असले, तरी शामेळ आणि कासाळे ही वाद्ये साथीला असतात. गायक गीते गातात आणि सोबतीला वाद्यवादन होते. अनेक लोकनृत्यांच्या साथीसाठी घुमटवादनाचे विविध प्रकार ठरलेले आहेत.

 

पखवाज

मृदंग, पखवाज आणि तबला

गोव्याच्या मंदिरांमधून होणार्‍या पूजाअर्चेचा भाग म्हणून परंपरेने कीर्तन सादर केले जाई. पखावज किंवा पखवाज हे वाद्य मंदिरातून सादर होणारा शंखासुर कालो, दशावतारी कालो, भजन इत्यादी प्रसंगी साथीचे वाद्य म्हणून वापरतात. अलीकडे मृदंग, पखवाज ही वाद्ये गोव्याच्या संगीतपटलावरून निघून चालली आहेत आणि त्यांची जागा तबला या वाद्याने घेतली आहे. ही तीनही वाद्ये शास्त्रीय वाद्यांच्या पंक्तीतील असल्याने आणि सर्वपरिचित असल्याने त्यांचे वर्णन देण्यात आलेले नाही.

 

तासो किंवा ताशा आणि आराब

ताशा

संबळ वर्गातील असलेले हे लोकवाद्य गोव्यात अत्यंत लोकप्रिय आहे. हे पूर्वी रणवाद्य म्हणून वापरात होते. त्याची प्रचीती गोव्यातील शिगमोत्सवाच्या वेळी येते; परंतु ढोल-ढोलक्याच्या साथीने हे वाद्य गोव्याच्या मंदिरांमधून तिन्ही-त्रिकाळ वाजत असते. घंगाळाचा आकार असलेल्या लाकडी, मातीच्या अथवा तांब्या-पितळीच्या भांड्यावर कड्यातून ओवलेल्या सुती ताणदोयांच्या अथवा ताणचाव्यांच्या (पितळी स्क्रू) साहाय्याने बकर्‍याचे कातडे ताणून बसवलेले असते. दोन्ही हातांनी सुमारे ३० सेंटीमीटर लांबीच्या बारीक आकाराच्या दोन वेतकाठ्या चामड्यावर आपटून वाद्य वाजवले जाते. बहुतेक वेळा वाद्य गळ्यात अडकवून अथवा कमरेला बांधून वाजवतात. भल्यामोठ्या आकाराच्या ताशाला गोव्यात ‘आराब’ असे म्हणतात. काही गावातून शिगमोत्सवासारख्या प्रसंगी ‘आराब’ साथीसाठी वापरून लोकगीते गात लोकनृत्ये सादर करण्याची परंपरा आहे

 

सनई

सनई आणि सूर्त

अन्य प्रांतांप्रमाणेच गोव्यातही सर्वपरिचित असे हे सुषिरवाद्य ! त्याला गोव्यात ‘शनाय’ असे म्हणतात. पूर्वी प्रत्येक देवळात सनई-चौघडा वाजवला जाई. त्यासाठी परंपरेने कलाकार नियुक्त केलेले असत; परंतु कालौघात गोव्यामध्ये सनईवादन लुप्त होत चालले आहे. नव्या दमाचे कलाकार सनईवादन शिकण्यात किंवा पेशा म्हणून स्वीकारण्यास पुढे येत नाहीत. एक काळ असा होता की, रोज किमान ३ वेळा तरी प्रत्येक मोठ्या मंदिरातून सनईवादन (चौघडा) व्हायचे. आता कलाकार नसल्याने यांत्रिक स्वरूपाच्या चौघडावादनाची व्यवस्था मंदिरव्यवस्थापनाला करावी लागली आहे. शनायची लांबी ३० ते ३२ सेंटीमीटर असून एक बाजूने निमुळती केलेली अशी ही शिसम लाकडाची पोकळ नळी असते. अरुंद टोकावरील पोकळीचा व्यास सुमारे एक सेंटीमीटर असतो. त्यावर २ सेंटीमीटर लांबीची पाला या गवती वनस्पतीपासून बनवलेली दुपदरी ‘जिभली’ बसवलेली असते. नळीच्या दुसर्‍या रुंद टोकावर धोतर्‍याच्या आकाराचा धातूचा कर्णा बसवलेला असतो. दुपदरी जिभली स्वरनिर्मितीसाठी मधली लांब नळी स्वराला आकार देण्यासाठी आणि कर्णा स्वरवर्धनासाठी वा स्वरविकासासाठी असतो. मधल्या नळीवर ८ किंवा ९ छिद्रे असतात. त्यांपैकी एकाच रेषेत असलेली ७ छिद्रे स्वरनिष्पत्ती आणि स्वरविस्तारासाठी वापरतात. वादक उजव्या हाताची ३ बोटे आणि डाव्या हाताची ४ बोटे स्वररंध्रांवर ठेवून अपेक्षित स्वरनिर्मिती करतो. सनईच्या साथीला अखंड षड्ज स्वर पुरवण्यासाठी सूर्त किंवा सूर हे वाद्य वापरतात. अप्रगत सुषिरवाद्याचा नमुना म्हणून सूर्त या वाद्याकडे दिशानिर्देश करता येईल.

 

गोव्याच्या लोकवाद्य परंपरेतील काही वाद्यांची ओळख !

म्हादळे

मृदंग अथवा पखवाजसाठी जसा आडवा लाकडी घडा वापरतात, तसाच मातीचा लंबवर्तुळाकृती ६० ते ६५ सेंटीमीटर लांबीचा घडा तयार करवून घेतात. तो भाजण्याआधी त्याच्या मधोमध एक छिद्र ठेवले जाते. या घड्याची दोन्ही तोंडे सुमारे २० सेंटीमीटर व्यासाची असून ती घोरपडीच्या कातड्याने मढवलेली असतात. घुमटावर जसे चीक अथवा डिंक यांच्या साहाय्याने कातडे ताणून बसवले जाते, तसेच म्हादळ्यावर कातडे बसवतात. घुमटवादनाच्या वेळी म्हादळे आडवे धरून गळ्यात अडकवून, बगलेत अथवा मांड्यांत धरून उजव्या तोंडावर हाताच्या बोटांनी आघात करून साथ करतात. ख्रिस्ती समाजामधील जागोर या विधीनाट्याच्या प्रसंगी, तसेच ख्रिस्ती गावडा जमातीमधील तोणयां खेळ, धालो इत्यादी प्रसंगी हे वाद्य साथीसाठी वापरले जाते.

शामेळ

शामेळ म्हणजे संबळ ! सुमारे ३० सेंटीमीटर उंचीचे खैरवृक्षाच्या खोडापासून बनवलेले लाकडी उभट भांडे २ लोखंडी वाळ्यांमध्ये उभे अडकवले जाते. त्याच्या सुमारे १६ ते १८ सेंटीमीटर व्यासाच्या उघड्या तोंडावर बकरीचे पातळ कातडे दोरीच्या साहाय्याने लोखंडी वाळ्यात ओवून ताणून बसवतात. दोन्ही वाळ्यांपासून समान अंतरावर दोरी ओवून कातड्यावरील ताण कमीअधिक करण्याची व्यवस्था केलेली असते. एरव्ही सगळे शामेळ हे बसून वाजवण्याची प्रथा आहे. शामेळ बव्हंशी हिंदूंमध्येच वाजवण्याची परंपरा रूढ आहे. तबल्याप्रमाणे दोन वाद्ये (शामेळ) असलेला; पण दोन्ही दोरीच्या साहाय्याने एकत्र बांधलेला शामेळ म्हणजे जोड-शामेळ.

उजव्या बाजूस बांधलेला हा शामेळ असतो; परंतु डाव्या बाजूस बांधलेल्या शामेळाचा आकार डग्ग्याप्रमाणे थोडा गोल असतो. तशा बनावटीमुळे तो खर्ज स्वराचा बनतो; मात्र उजवा शामेळ हा तुलनेने चढ्या स्वराचा असतो. जोडशामेळ गळ्यात अडकवून उजव्या हातात सरळ आकाराची वेतकाठी आणि डाव्या हातात पुढील टोकावर गोल आकार दिलेली वेतकाठी घेऊन घुमटाच्या साथीसाठी वाजवला जातो. सुवारीवादनात आणि खास करून शिगमो उत्सवामध्ये काणकोण, सांगे इत्यादी भागात जोडशामेळ वाजतांना दिसतो.

नगारा

नगारा, घूम आणि चौघडा

आज नगारा हे वाद्य गोव्यातील सर्व महत्त्वाच्या देवस्थानांमधून वाजवले जाते, तर घूम हे वाद्य गोव्याच्या शिगमोत्सवात मध्य आणि उत्तर भागांत वाजतांना दिसते. गोव्यातील देवळांतून जत्रा-उत्सवांच्या प्रसंगी आणि लगनसमारंभासारख्या मंगलप्रसंगी चौघडावादन केले जाते.

जघांट

कासे आणि पितळ या मिश्र धातूपासून बनवलेली एक ते दीड सेंटीमीटर जाडीची अन् २५ ते ३० सेंटीमीटर व्यासाची थाळी मधोमध थोडी जाड (२ सेंटीमीटर) केलेली असते. परिघाजवळ दोन भोके पाडून दोरी अथवा तार ओवण्याची सोय केलेली असते. ही थाळी दोरीच्या साहाय्याने खुंटीला टांगतात किंवा डाव्या हाताने टांगती धरून उजव्या हाताने लाकडी काठी आपटून नादनिर्मिती केली जाते. गोव्यातील देवळे आणि हिंदूंच्या धार्मिक उत्सवांच्या वेळी जघांट वाजवली जाते. जघांट हा शब्दप्रयोग जयघंटा या शब्दातून आला असावा. धार्मिक करमणुकीत या घंटेचा वापर आवर्जून केला जातो.

कासाळे, झांज आणि टाळ

गोव्यात वापरल्या जाणार्‍या घनवाद्यांपैकी कासाळे हे प्राचीन घनवाद्य आहे. गोल आकाराचे १५ ते २० सेंटीमीटर व्यासाचे दोन काशाच्या पत्र्याचे तुकडे, ४ सेंटीमीटर व्यासाच्या मध्यभागावर खोलगट करून त्यातून दोरी ओवण्यासाठी छिद्र ठेवतात. दोन्ही तुकड्यांतून दोरी ओवून त्याला लाकडी मुठी बांधतात. दोन्ही हातात दोन तुकडे धरून एकमेकांवर आपटून घासून वाजवतात. हे वाद्य तालवाद्य आहे. काशाचे ताळ किंवा कास्य-ताल म्हणजे कासाळे. घुमट-शामेळाच्या साथीने हे वाद्य वाजवले जाते. शिगमोत्सवातील चौरंग अथवा जोत हे नृत्यप्रकार सादर करतेवेळी गीताला ताल धरण्यासाठी कासाळे स्वतंत्रपणे वाजवले जाते. कासाळ्याचा छोटा अवतार म्हणजे झांज. ही बहुतेक पितळेची बनवलेली असते.

आरत्या, कीर्तन, कालो, जागर इत्यादी सादरीकरणासाठी झांजेचा वापर अनिवार्य समजला जातो. टाळ हा गोव्यातील भजनात सर्वत्र वापरला जातो. ढोल, ढोलके, ढोलक गोव्यात सर्वत्र प्रचारात असलेली ही चर्मवाद्ये. गोव्यातील बहुतेक सर्व देवळांतून हे वाद्य पूजा-अर्चाप्रसंगी वाजवले जाते. शिवाय घरगुती व्रतवैकल्ये, विवाहविधी आणि अन्य कौटुंबिक विधींच्या वेळीही हे वाद्य वाजवले जाते. त्यामुळे ढोल या वाद्याला मंगलवाद्याच्या पंक्तीत बसवले गेले आहे. हे वाद्य अन्य ताशा, सनई, सूर्त, कासाळे इत्यादी वाद्यांच्या साथीने वाजवले जाते.

कर्णो, बांको आणि शिंग

लोकोत्सव आणि धार्मिक उत्सवातून वाजवली जाणारी ही सुषिरवाद्ये आहेत. गोव्यातील प्रमुख अशा शिगमो या लोकोत्सवात ही वाद्ये वाजवली जातात. कर्णो म्हणजे कर्णा. सुमारे दीड मीटर लांबीची एका बाजूने निमुळती केलेली धातूची नळी, त्यावर रुंद टोकावर सुमारे ३० सेंटीमीटर व्यासाचा गोलाकार कर्णा बसवलेला असतो. अरुंद टोकातून फुकण्याची सोय असते. बांको हे कर्ण्यासारखेच; पण त्याहून मोठ्या आकाराचे गोव्यातील सुषिरवाद्य आहे. गोव्याच्या देवळातून पंचवाद्य वादनाच्या प्रारंभी, मध्यंतरी आणि शेवट अशा ३ वेळा बांको वाजवण्याची पद्धत आहे. हे वाद्य खास करून फोंडा तालुक्यात शिगमोत्सवात वाजतांना दिसते. शिंग हे वाद्य म्हणजे महाराष्ट्रात लोकप्रिय असलेली तुतारी. भारतीय वाद्यशास्त्रात याला ‘शृंग’ या नावाने ओळखण्यात येते. त्यावरून गोव्यात याला शिंग म्हणत असावेत. शिवाय त्याचा आकार हासुद्धा गाई-म्हशींच्या शिंगासारखा (अर्धचंद्राकृती) असतो. ते तांब्याचे बनवलेले असते. गोव्यात मंदिरातील आणि कौटुंबिक विधींसमवेत उत्सवप्रसंगी ते वाजवले जाते.

सुरपावो, कोंडपावो, नाकशेर

सुरपावा या नावातच वाद्याचे स्वरूप आणि कार्य अभिप्रेत आहे. हे वाद्य म्हणजे आदीम प्रकारची मुरली अथवा पावा होय. हे वाद्य गवळी आणि धनगर जमातींचे लोक शिगमोत्सव अन् दसर्‍याच्या उत्सवप्रसंगी सादर होणार्‍या लोकनृत्याच्या वेळी वाजवतात. कोंडपावा ही ३० ते ३५ सेंटीमीटर लांबीची आणि २ सेंटीमीटर पोकळ असलेली मुरली. धनगरांच्या लोकनृत्याच्या वेळी वरच्या पट्टीतील स्वरनिर्मितीसाठी वापरली जाते. धनगर-गवळी जमातीत वाजवले जाणारे दुसरे एक सुषिरवाद्य म्हणजे नाकशेर. नाकशेर हे वाद्य पुंगीसारखे असते. पुंगीऐवजी ही जमात या वाद्याला ‘दुदी’ असेही म्हणते, कारण स्वरविकासासाठी या वाद्यात छोट्या दुधीभोपळ्याचा ज्याला मर्कदुदी म्हणतात, त्याचा भांडे म्हणून वापर केलेला असतो. सुमारे १० ते १२ सेंटीमीटर व्यासाच्या रिकाम्या भोपळ्यात १ सेंटीमीटर व्यासाच्या आणि १० ते १२ सेंटीमीटर लांबीच्या बांबूच्या नळ्या ३ ते ४ सेंटीमीटर आत सरकवतात. दुसर्‍या बाजूने छोटी फट असलेली जोड नळी भोपळ्यात सरकवून अन्य भागातून हवा निघू नये, यासाठी मेणाचा वापर करतात. पुढील नळ्यांवर स्वररंध्रे ठेवून आणि दुहेरी जिभली बसवलेल्या फटीच्या नळीतून हवा फुकून हे वाद्य वाजवतात. पूर्वी हे वाद्य नाकाने वाजवत असत. म्हणून याला गोव्यात नाकशेर म्हणजेच ‘नासायंत्र’ आणि उत्तरेत ‘नागसर’ असे म्हणतात. विविध लोकसंस्कृतीमध्ये प्रचलित असलेल्या वाद्यांचा आणि वादनपरंपरेचा विचार करतांना एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे माणसाने चराचरात भरून राहिलेला ध्वनी अनुभवला तो सातत्याने अनुभवतांना आपल्याला तसा ध्वनी निर्माण करता येईल का, या कुतुहलातून वाद्ये जन्माला घातली. त्या वाद्यातून निसर्गातला नाद आपण निर्माण करू शकत असल्याविषयीचे परमोच्च समाधान मानवाने अनुभवले. त्यातूनच त्याला उमगले की, वाद्य आणि नाद हे अभिन्न आहेत, जसे शरीर आणि आत्मा. वाद्यातून निघणारा नाद म्हणजे जणू शरीरातून ओसंडणारे चैतन्य. त्या चैतन्याची अनुभूती घेत माणूस संगीतात रमला, रमत आहे आणि अनंत काळापर्यंत रमत राहील.

संदर्भ : लेखक – श्री. पांडुरंग फळदेसाई, चतुरंग मासिक

Leave a Comment