ग्रंथराज दासबोध

समर्थ रामदास स्वामी

समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म एप्रिल, इ.स. १६०८ साली, रामनवमीला, जालना जिल्ह्यातील जांब, महाराष्ट्र येथे झाला. १६८२ साली त्यांनी देहत्याग केला. समर्थ रामदास स्वामी यांचे मुळ नाव ‘नारायण सूर्याजीपंत कुलकर्णी’ (ठोसर) होते. त्यांच्या वडीलांचे नाव सूर्याजीपंत  ठोसर हे होते. समर्थ रामदास स्वामी यांचे उपास्य दैवत श्रीराम आणि हनुमंत होते. समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा आणि राष्ट्रप्रेम यांचा प्रसार संपूर्ण महाराष्ट्रात करुन समाज संघटनाचे कार्य केले. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते.

समर्थ रामदास स्वामी यांनी बरेच समाज प्रबोधनपर रचना केल्या त्यातील काही रचना दासबोध, श्रीराम स्तुती, हनुमान स्तुती‎, मनाचे श्लोक, करुणाष्टके‎, मारुती स्तोत्र या होत.

दासबोध हा ग्रंथ समर्थ रामदास स्वामींनी रचला. रामदास स्वामींचे शिष्य कल्याण स्वामींनी याचे लिखाण केले. रायगड जिल्ह्यात असलेल्या शिवथर घळ या ठिकाणी हे लेखन झाले. दासबोध हा ग्रंथ एकूण २० दशकांमध्ये विभागलेला असून, प्रत्येक दशकात १० समास आहेत. दासबोधातील एक एक समास म्हणजे जणु काही एक एक मनुष्य जन्माच्या अनुभवांची शिदोरी ठरावी, इतका ओतप्रोत संदेश त्यात भरलेला आहे.

समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाचे वर्णन खालीलप्रमाणे करून ठेवले आहे.

भक्तांचेनि साभिमानें। कृपा केली दाशरथीनें।

समर्थकृपेचीं वचनें। तो हा दासबोध ॥श्रीराम॥

वीस दशक दासबोध। श्रवणद्वारें घेतां शोध।

मनकर्त्यास विशद। परमार्थ होतो ॥श्रीराम॥

वीस दशक दोनीसें समास। साधकें पाहावें सावकास।

विवरतां विशेषाविशेष। कळों लागे ॥श्रीराम॥

ग्रंथाचें करावें स्तवन। स्तवनाचें काये प्रयोजन।

येथें प्रत्ययास कारण। प्रत्ययो पाहावा ॥श्रीराम॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

 

दशक पहिला स्तवन
दशक दुसरा मूर्खलक्षणे
दशक तिसरा स्वगुणपरीक्षा
दशक चवथा नवविधाभक्ति
दशक पांचवा मंत्र
दशक सहावा देवशोधन
दशक सातवा चौदा ब्रह्में
दशक आठवा ज्ञानदशक-मायोद्भव
दशक नववा गुणरुप
दशक दहावा जगज्जोती
दशक अकरावा भीमदशक
दशक बारावा विवेकवैराग्य
दशक तेरावा नामरुप
दशक चौदावा अखंडध्यान
दशक पंधरावा आत्मदशक
दशक सोळावा सप्ततिन्वय
दशक सतरावा प्रकृतिपुरुष
दशक अठरावा बहुजिनसी
दशक एकोणिसावा शिकवण
दशक विसावा पूर्ण
संदर्भ : संकेतस्थळ

 

त्या वेळच्या प्रचलित प्रथेप्रमाणे दासबोध ग्रंथ ओवी या गेयछंदात निबद्ध असला, तरी याकडे काव्यग्रंथ म्हणून बघता येत नाही. माझ्या दृष्टीने श्री समर्थांचे विविध विषयांवरील ओघवत्या भाषेतील हे निबंध होत. चतुर्दश ब्रह्म, विमल ब्रह्म, माया, शुद्ध ज्ञान, सृष्टीविचार, द्वैत कल्पना निरसन, त्रिविध ताप, सत्त्व, रज, तमोगुण-विचार, नवविधाभक्ती, वैराग्य, गुरुलक्षण, शिष्यलक्षण, विरक्तलक्षण, मूर्खलक्षण, पढतमूर्खलक्षण, चातुर्यलक्षण, बद्धमुमुक्षु-साधक-सिद्ध लक्षणे, प्रकृति-पुरुषविचार, चत्वार देव निरूपण, विवेक निरूपण, महंतलक्षण, राजकारण, नि:स्पृहता, कथा-कीर्तन, उपासना, आत्माराम, उत्तम पुरुष, जनस्वभाव, बुद्धीवाद, प्रयत्नवाद, लेखनकला इत्यादी विविध विषयांचा सखोल ऊहापोह या ग्रंथात झालेला दिसतो.

तत्त्वज्ञानानुसार जगद्गुरु आदिशंकराचार्य, संतसम्राट श्री ज्ञानेश्‍वर महाराजादी भागवतधर्मीय सर्व संत आणि श्री समर्थ रामदासस्वामी या सर्वांचा अद्वैत सिद्धांतच आहे अन् मांडणीतील तपशिलाचा भेद वगळता सर्वांची सैद्धांतिक एकरूपता आहे. हे अद्वैत तत्त्वज्ञान आणि भक्तीमार्गी साधनापद्धत याशिवायही कितीतरी विषयांचा दासबोधात समावेश झालेला वरील सूचीवरून दिसून येतो आणि व्यवहाराच्या पहिल्या पायरीपासून परमार्थाच्या शेवटच्या स्थितीपर्यंत सर्व काही यात समाविष्ट झाले आहे, असे म्हटल्यावाचून राहावत नाही. एकूणच समर्थांनी जितक्या विविध विषयांवर लेखन केले आहे, तितक्या विषयांवर महर्षि वेदव्यासांशिवाय अन्य कोणीही लिहिलेले नाही, असे जाणकारांचे मत आहे.

स्वामी गोविंददेवगिरी (महाराज)

‘येथे बोलिला विशद । भक्तिमार्ग ॥’ असे समर्थांनीच ग्रंथाच्या आरंभी म्हटलेले असल्यामुळे या ग्रंथाचा मुख्य विषय ‘भगवद्भक्ती’ हा आहे, हे स्पष्टच आहे. समर्थांचा स्थायीभाव प्रामुख्याने ‘दास्यभक्ती’ हा असल्यामुळे ‘प्रभु रामचंद्रांच्या दासाने आपल्या शिष्यांना केलेला बोध म्हणजे उपदेश’, हा तर दासबोध शब्दाचा अर्थ आहेच; पण ‘श्रीरामाचे दास्ये करणाच्या भक्तांना केलेला उपदेश’, असाही याचा अर्थ आहे. हा ग्रंथ आणि संप्रदाय यांतील भक्ती ही शंकराचार्यांच्या अद्वैत तत्त्वज्ञानावर उभी आहे अन् भागवतातील भक्तीप्रक्रियांनी ती अलंकृत आहे. या भक्तीचा प्रपंचाशी केवळ अविरोधच नाही, तर प्रपंच नेटका करण्याचा आग्रह आहे. उत्कट भक्तीने परमार्थ कसा करावा, याचे जसे मार्गदर्शन यात आहे, तसे दक्षतेने प्रपंच कसा यशस्वी करावा, याचीही सर्व सूत्रे या ग्रंथात उपलब्ध आहेत. प्रपंच असो वा परमार्थ, दोन्ही आघाड्यांवर समर्थ प्रयत्नवादाचे प्रखर पुरस्कर्ते आणि दैववादाचे खंडनकर्ते आहेत. ‘यत्न तो देव जाणावा’, असे म्हणून त्यांनी प्रयत्नवादाला परमेश्‍वरी स्तरावर मान्यता दिली आणि ‘अचूक यत्न करावा’, असे म्हणून प्रयत्नवादाचे मर्मही सांगितले. विवेक आणि वैराग्य हे समर्थ-विचारांचे प्रिय सांगाती असून, प्रयत्न, प्रचीती आणि प्रबोध या त्रिसूत्रीने या ग्रंथात समग्र मानव जीवनाचे विज्ञानच साकार केले आहे.’

– श्री ज्ञानेश्‍वरपदाश्रित, स्वामी गोविंददेवगिरी (महाराज)
संदर्भ : दासबोध (गद्य रूपांतरासह), गीताप्रेस, गोरखपूर.

1 thought on “ग्रंथराज दासबोध”

Leave a Comment