मानस दृष्ट कशी काढावी ?

Article also available in :

१. मारुतिरायाला मानस दृष्ट काढण्यासाठी प्रार्थना करणे

‘प्रत्यक्ष हनुमंत आपली दृष्ट काढणार आहे’, असा भाव ठेवून ‘हे हनुमंता, हे मारुतिराया, आपण माझी दृष्ट काढावी,’ अशी संपूर्ण शरणागतभावाने प्रार्थना करावी.

 

२. मानस दृष्ट काढण्याची प्रत्यक्ष कृती

अ. साक्षात मारुतिराया माझ्यासमोर आहे. त्याने हातात नारळ घेतला आहे. नारळाची शेंडी माझ्या दिशेने आहे.

आ. मी संपूर्ण शरणागतभावाने मारुतिरायाच्या चरणांवर मस्तक ठेवून प्रार्थना करत आहे, ‘हे हनुमंता, मारुतिराया, माझ्या स्थूल आणि सूक्ष्म (प्राणदेह, मनोेदेह, कारणदेह, महाकारणदेह) देहांतील त्रासदायक (काळी) शक्ती, मोठ्या वाईट शक्तींनी निर्माण केलेली हाडे, कवट्या, यंत्रे, दागिने आणि यंत्रणा या नारळात पूर्णपणे खेचली जाऊन ती स्थानासह नष्ट होऊ दे.’

इ. मारुतिराया माझी दृष्ट काढत आहे. मारुतिराया माझ्या पायापासून डोक्यापर्यंत आणि डोक्यापासून पायापर्यंत असे लंबगोलाकार ३ वेळा नारळ फिरवणार आहे. तेव्हा मी ‘माझ्या स्थूल आणि सूक्ष्म देहांतील त्रासदायक शक्ती नारळात अत्यंत वेगाने खेचली जाणार आहे’, असा भाव ठेवत आहे.

ई. मारुतिरायाने ‘जय श्रीराम’ असे म्हणून हातात नारळ घेऊन घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने माझ्या पायापासून डोक्यापर्यंत आणि डोक्यापासून पायापर्यंत सावकाश नारळ फिरवला.  माझ्या स्थूल आणि सूक्ष्म देहांतील त्रासदायक शक्ती नारळात अत्यंत वेगाने खेचली जात आहे. अशा प्रकारे त्याने एकूण ३ वेळा नारळ देहाभोवती फिरवला.

उ. ‘साक्षात मारुतिराया माझी दृष्ट काढत असल्याने मला होणारा त्रास वेगाने अल्प होत आहे’, या जाणिवेने मला पुष्कळ कृतज्ञता वाटत आहे.

ऊ. आता मारुतिराया माझ्याभोवती गोल फिरणार आहे. त्याच्या हातातील नारळाची शेंडी माझ्या दिशेने आहे. मी मनात ‘हे हनुमंता ! माझ्या स्थूल आणि सूक्ष्म देहातील शेष त्रासदायक शक्ती, मोठ्या वाईट शक्तींनी निर्माण केलेली सर्व स्थाने, हाडे, कवट्या आणि दागिने हे सर्व स्थानांसह नष्ट होऊ दे अन् माझे सर्व त्रास दूर होऊन मला गुरुसेवा करण्यासाठी शक्ती मिळू दे’, अशी प्रार्थना करत आहे.

ए. आता मारुतिरायाने माझ्याभोवती उजवीकडून डावीकडे, म्हणजे घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने गोलाकार फेरी मारायला आरंभ केला आहे. तो सावकाश चालत माझ्या पाठीमागच्या भागाकडे जाऊन पुढच्या बाजूला आला आहे. अशा प्रकारे त्याची एक फेरी पूर्ण झाली आहे. ‘माझा त्रास अल्प होत आहे’, असे मला जाणवत आहे.

मारुतिराया हळूहळू माझ्याभोवती दुसर्‍यांदा फेरी घालत आहे. तो माझ्या पाठीमागे गेला आहे. पाठीमागून परत पुढच्या बाजूला आला आहे. अशा प्रकारे दुसरी फेरी पूर्ण झाली आहे.

आता तो तिसर्‍यांदा माझ्याभोवती फिरत आहे. प्रचंड वेगाने माझ्या शरिरातील त्रासदायक शक्ती नष्ट होत आहे. मारुतिराया माझ्या पाठीमागे गेला आहे. तो पाठीमागून हळूहळू पुढे येऊन माझ्यासमोर उभा राहिला आहे. त्याने हातात घेतलेल्या नारळाची शेंडी माझ्या दिशेने आहे. त्याने थोडा वेळ नारळ माझ्यासमोर धरला आहे. माझ्या शरिरातील सर्व त्रासदायक शक्ती नारळात खेचली जात आहे. हळूहळू त्रासदायक शक्ती खेचण्याचे प्रमाण उणावत चालले आहे; कारण शरिरातील त्रासदायक शक्ती पूर्णपणे नष्ट झाली आहे.

ऐ. साक्षात मारुतिरायाने दृष्ट काढल्यामुळे मला हलकेपणा जाणवून उत्साही वाटत आहे.

ओ. मारुतिराया आता तिठ्यावर (३ रस्ते एकत्र येतात, असे ठिकाण) नारळ फोडायला जात आहे. तेथे जाऊन मारुतिरायाने ‘जय श्रीराम’ असे म्हणून नारळ जोरात फोडला. नारळातील सर्व त्रासदायक शक्ती नष्ट झाली आहे.

औ. मारुतिराया माझ्यासमोर उभा आहे. मी संपूर्ण शरणागतभावाने त्याच्या चरणांवर डोके ठेवून कृतज्ञता व्यक्त करत आहे. हे मारुतिराया, आपल्या कृपने माझ्या स्थूल आणि सूक्ष्म देहांतील त्रासदायक शक्ती अन् वाईट शक्तींनी निर्माण केलेली त्रासदायक शक्तीची केंद्रे नष्ट झाली आहेत. तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘हे मारुतिराया, तुझी कृपादृष्टी माझ्यावर अखंड राहू दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.

 

३. मानस दृष्ट किती वेळा काढावी ?

मानस दृष्ट काढण्याच्या कृतीला अनुमाने ५ मिनिटे लागतात. अशा प्रकारे दिवसातून एक किंवा ३ – ४ वेळा मानस दृष्ट काढू शकतो, तसेच त्रासाच्या तीव्रतेनुसार सलग २ – ३ वेळा काढू शकतो.

 

४. नामजपादी उपाय करण्यापूर्वी मानस दृष्ट काढणे

साधक प्रतिदिन मानस दृष्ट काढू शकतात. नामजपादी उपाय करण्यापूर्वी साधकांनी मानस दृष्ट काढल्यास त्रासदायक शक्तीचे आवरण अल्प वेळेत उणावल्याने नामजप करतांना एकाग्रता वाढायला साहाय्य होते.’

संदर्भ :  सनातन-निर्मित ग्रंथ ‘दृष्ट काढण्याचे प्रकार ’

Leave a Comment