दृष्ट काढण्याची पद्धत

Article also available in :

दृष्ट काढून घेणारी व्यक्ती उपस्थित असतांना आणि नसतांना करावयाच्या कृती पुढे दिल्या आहेत.

१. दृष्ट काढून घेणारी व्यक्ती
उपस्थित असतांना करावयाच्या कृती

दृष्ट शक्यतो सायंकाळी काढावी. त्रास दूर होण्यासाठी ती वेळ अधिक चांगली असते; कारण त्या वेळी वाईट शक्तीचे सहजतेने प्रकटीकरण होऊन तो त्रास दृष्ट काढण्यासाठी उपयोगात येणाऱ्या घटकामध्ये खेचून घेता येतो. तीव्र त्रास असल्यास तीन-चार वेळा सलग किंवा प्रत्येक घंट्याने (तासाने) किंवा दिवसातून तीन-चार वेळा दृष्ट काढावी.

अ. ज्या व्यक्तीची दृष्ट काढायची आहे, तिला पाटावर बसवावे.

आ. दृष्ट काढण्यापूर्वी पुढील प्रार्थना कराव्यात.

दृष्ट लागलेल्या व्यक्तीने उपास्यदेवतेला करावयाची प्रार्थना

‘दृष्ट काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या घटकामध्ये माझ्या शरिरातील, तसेच शरिराबाहेरील त्रासदायक स्पंदने खेचली जाऊन त्यांचा समूळ नाश होऊ दे.’

दृष्ट काढणाऱ्या व्यक्तीने उपास्यदेवतेला करावयाची प्रार्थना

‘दृष्ट काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या घटकामध्ये दृष्ट लागलेल्या जिवाच्या देहातील आणि देहाबाहेरील त्रासदायक स्पंदने खेचून जाऊन त्यांचा समूळ नाश होऊ दे. दृष्ट काढत असतांना तुझ्या कृपेचे संरक्षक–कवच माझ्याभोवती निर्माण राहू दे.’

इ. ज्या व्यक्तीची दृष्ट काढायची आहे, तिने पाटावर बसायची आणि दोन्ही हात ठेवण्याची स्थिती :

drushta_1

ई. दृष्ट काढणाऱ्या व्यक्तीने करायच्या कृती

• मीठ-मोहरी, मीठ-मोहरी-लाल मिरच्या, लिंबू, नारळ इत्यादी विविध घटक दृष्ट काढण्यासाठी वापरतात. ज्या घटकाने दृष्ट काढायची आहे, तो घटक दृष्ट लागलेल्या व्यक्तीच्या समोर हातात धरावा.

• ‘आल्या-गेल्याची, वाटसरूची, पशू-पक्ष्यांची, गुरा-ढोरांची, भुता- खेतांची, मांत्रिकांची आणि या विश्वातील कोणत्याही प्रकारच्या शक्तींची दृष्ट लागली असेल, तर ती निघून जाऊ दे’, असे म्हणत दृष्ट काढायचा घटक त्रास असलेल्या व्यक्तीवरून सर्वसाधारणतः ३ वेळा ओवाळावा. घटक ओवाळण्याची पद्धत त्या त्या घटकानुसार थोडी निराळी असते.

• दृष्ट काढायचा घटक ओवाळतांना प्रत्येक वेळी भूमीला हात टेकवावेत. असे केल्याने व्यक्तीतील त्रासदायक स्पंदने घटकामध्ये खेचून येऊन मग भूमीत विसर्जित होण्यास साहाय्य होते.

• व्यक्तीला त्रास जास्त असल्यास घटक तीनपेक्षा जास्त वेळा ओवाळावा. बहुतेक वेळा मांत्रिक ३, ५, ७ किंवा ९ अशी विषम आकड्यांची करणी करतात; म्हणून शक्यतो विषम संख्येत घटक ओवाळावा.

• कधी २-३ वेळा दृष्ट काढूनही त्रास अल्प होत नाही. वरिष्ठ वाईट शक्तींचा त्रास असल्यास असे होते. अशा वेळी दृष्ट काढतांना दृष्ट काढायचा घटक त्रास असलेल्या व्यक्तीच्या पुढून ओवाळून झाल्यानंतर तिच्या पाठीमागूनही ओवाळावा. नेहमीची भुते असल्यास पुढून ओवाळले, तरी पुरे असते. मोठ्या वाईट शक्ती शरिराच्या पाठीमागे स्थाने करतात. त्यामुळे दृष्ट काढतांना दोन्हींकडून ओवाळायला हवे.

• दृष्ट काढून झाल्यानंतर ती घेऊन जातांना मागे वळून पाहू नये.

उ. दृष्ट काढल्यानंतर दृष्ट काढणारा आणि ज्याची दृष्ट काढली तो, यांनी कोणाशीही न बोलता मनात १५-२० मिनिटे नामजप करत पुढील कर्म करावे.

ऊ. दृष्ट काढणाऱ्याने ज्या घटकाने दृष्ट काढली असेल, त्या घटकात खेचून आलेली त्रासदायक शक्ती नष्ट करण्याची पद्धत त्या त्या घटकानुसार निरनिराळी आहे, उदा. मिरच्या आणि लिंबू जाळावे, तर नारळ मारुतीच्या देवळात फोडावा किंवा पाण्यात विसर्जित करावा.

ए. दृष्ट काढणारा आणि ज्याची दृष्ट काढली तो, यांनी हात-पाय धुवावेत, अंगावर गोमूत्र किंवा विभूतीयुक्त पाणी शिंपडावे, देवाचे किंवा गुरूंचे स्मरण करून आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून विभूती लावावी आणि आपल्या पुढच्या कर्मांना आरंभ करावा.

२. दृष्ट काढून घेणारी व्यक्ती
उपस्थित  नसतांना करावयाच्या कृती

काही वेळा रुग्ण (आजारी) व्यक्ती दृष्ट काढण्याच्या ठिकाणी येऊ शकत नसेल किंवा एखादी व्यक्ती दूरदेशी असेल, तर त्या व्यक्तीची पुढे दिलेल्या पद्धतींप्रमाणे दृष्ट काढावी.

  • व्यक्तीचे छायाचित्र ठेवून त्यावरून दृष्ट काढणे
  • व्यक्तीचे नाव कागदावर लिहून त्या कागदावरून दृष्ट काढणे
  • व्यक्तीचे नाव उच्चारून दृष्ट काढणे

वरीलप्रमाणे दृष्ट काढण्याची सर्वसाधारण पद्धत नेहमी आपण जशी दृष्ट काढतो तशीच आहे.

संदर्भ :  सनातन-निर्मित ग्रंथ ‘दृष्ट काढण्याचे प्रकार (भाग १)’